तुज भगवान श्रीशिवराजा

सन १६६५! मिर्ज़ाराजा जयसिंह कोटीचण्डीयाग करीत होता. चण्डीका तोषावी ही त्याची इच्छा. रणांत जय मिळावा ही त्याची मनीषा. पण तो जय कुणासाठी? औरंग पातशहासाठी! हाय रे दुर्दैवा!! देवीपुढे जय मागतो तरी कुणासाठी, तर जो दिसताक्षणी देवीची मूर्ती फोडण्याची एकही संधी सोडणार नाही त्या पापी औरंग्यासाठी! आणि कुणाविरुद्ध? तर छातीचा कोट करुन अन् तळहातावर शिर घेऊन जो सुखदुःखं समे कृत्वा आयुष्य झिजवित होता त्या पुण्यश्लोक शिवाजीराजांविरुद्ध. काली कशी तोषावीं? त्याने पुरंदरला वेढा घातला. वज्रगड पाडला. लढता लढता मर्द मुरारबाजी कामी आला. जयसिंहासोबत आलेला दिलेरखान तर बोलून-चालून परकाच. तो ही हिंदूभूमी नासवायलाच आलेला. पण जयसिंह स्वतःला राजपूत म्हणवून घेतो आणि इमान कवडीमोल असल्यासारखे बादशहाच्या चरणी वाहातो? छी छी छी छी! मिर्ज़ाराजा बुद्धीमान तर खराच. चतुरही. पराक्रमीही केवढा. पण त्या बुद्धीबलाची किंमत मातीमोल कारण ते त्याने स्वकीयांविरुद्धच वापरले. परकीय शत्रूंच्या भल्यासाठी वापरले. पण मुघलांकडचे सारेच एवढे देशबुडवे नव्हते. अवघ्या १५ वर्षांचा एक पोरगा होता, ज्याचे इमान अजून पुरते गहाळ झाले नव्हते. कोण होता तो पोरगा?

छत्रसाल बुंदेला! बुंदेलखंडची जमीन हिऱ्यांनी संपन्न आहे म्हणतात. पण छत्रसालकडे पाहून समजत होते की ती जमीन नुसते कार्बनचे तुकडेच देणारी नव्हे, तर खरीखुरी तेजस्वी नररत्नेही प्रसवणारी होती! त्याचे वडील चंपतराय बुंदेला. मुघलांच्या हिरव्या अत्याचारांखाली सारा बुंदेलखंड भाजून निघत असताना, तो एकटाच मर्द असा होता जो क्रूरकर्मा शाहजहानपुढे पाय रोवून उभा राहीला होता. हो, असेलही शाहजहान येरागबाळ्यांसाठी मोठा प्रेमवीर. पण आम्ही त्याच्या मनांत प्रेमभावना होती हे कसं मान्य करावं? अहो इथल्या भूमीच्या कणाकणाला विचारा, ते सांगतील तुम्हाला शाहजहानच्या अत्याचारांच्या कहाण्या! आमची भूमी हिरावण्यात, आमची रयत बाटवण्यात आणि आमच्या मायबहिणी नासवण्यात शाहजहान हा खरोखर औरंगज़ेबचा बाप होता. त्याच्याविरुद्ध चंपतराय उभा ठाकलेला. इतर बुंदेले जेव्हा आपली आई विकण्यात गुंग होते, तेव्हा हा चंपतराय भांडभांड भांडत होता. मुघलांची औलादच सापाची. औरंगज़ेब आपल्या बापावरच चालून आला. तेव्हा चंपतरायला त्याने मदतीला पुकारले. चंपतरायनेही मदत देऊ केली. शामूगढच्या युद्धात मोठाच पराक्रम गाजवला त्याने. बादशाह झालेल्या औरंगज़ेबाने मात्र कृतघ्नपणा केला. महाराणा प्रतापांसारखीच चंपतरायचीही ससेहोलपट सुरु झाली. आणि अखेरीस १६६१ साली चंपतराय हिंदुस्थानसाठी हुतात्मा झाला. धनी गेल्याची खबर पोहोचताच वीरपत्नी राणी कालीकुमारीनेही तलवारीने आपले शिर छाटून प्राणत्याग केला. मुघलांना कळलंही नसेल की त्यांनी आणखी एक संसार उधळला! चंपतरायच्या ५ पोरांपैकी थोरला अंगदराय त्यावेळी १३-१४ वर्षांचा होता. त्याहून लहान आपला छत्रसाल अवघ्या ११ वर्षांचा होता. दोन अनाथ पोरं नशीब काढण्यासाठी मिर्ज़ाराजा जयसिंहाची चाकरी करायला लागली. देव, देश आणि धर्म समजण्याचे त्यांचे वय नव्हते. १५व्या वर्षीच ही अक्कल असायला माणूस शिवाजी म्हणून जन्माला यावा लागतो. आणि शिवाजी तर इतिहासालाही अनंतकाळात एकच घडवता आलेयत! ही पोरं त्याच शिवप्रभूंविरुद्ध झगडायला निघालेली. त्यांच्या मनगटात जोर होता, ह्रदयात आग होती. छत्रसालने पुरंदरच्या वेढ्यात अपूर्व पराक्रम गाजवला!

पुढे मिर्ज़ाराजांनी छत्रसालला दिलेरखानकडे सोपवले. देवगडच्या गोंड राजांशी लढताना त्याने न भूतो न भविष्यति पराक्रम गाजवला. एवढा, की छत्रसाल नसते तर देवगड मुघलांना कदाचित कधीच जिंकून घेता आले नसते. पण बादशाहकडून मानमरातब आला तो कुणासाठी? एकट्या दिलेरखानासाठी! कारण तो सेनानी. तो मुघल. तो गाज़ी! हिंदूंनी काम करावे, पराक्रम करावा तो त्यांच्याच हाताखाली राहून! १७ वर्षांच्या त्या समशेरबहादूरास ही गोष्ट फार लागली.
“आम्ही पराक्रमाची शर्थ करायची, ती काय मुघलांचा गौरव व्हावा म्हणून? मग आम्ही कोण? आमचे अस्तित्व काय? किड्यामुंग्यागत मरण्यासाठीच का पैदास आमची? विसरलात का मुघलांनो, माझ्या वडलांनी कसे तलवारीचे पाणी पाजले होते तुम्हाला? विसरलात”?
आणि अंतर्मनातून आवाज आला, “ते नाही विसरले, तू विसरलास! तू!”
छत्रसाल खडबडून जागा झाला. “हे मी काय करतोय?ज्यांच्याविरुद्ध माझे वडील लढले, त्यांच्याच भरभराटीसाठी मी जीवाची जोखीम घेतोय”?

स्वा. सावरकर लिहीतात, बाजीप्रभू देशपांडेही जेव्हा मुघलांचे चाकर होते, तेव्हा शिवदूत येऊन त्यांना विनवू लागले —
बाजीराया म्लेंच्छ सबळ हा दोष न काळाचा ।
ना देवाचा, ना धर्माचा किंवा नशिबाचा ।।
देशद्रोही चांडाळांचा भरला बाजार ।
गुलामगिरी जे देती त्यांना निष्ठा विकणार ।।
तुम्हींच ना स्वातंत्र्य चिरियले या पोटासाठी ।
तुम्हींच ना रे भूमातेच्या नख दिधले कंठी ।।
हो सावध बाजीराया ।
दास्यिं का काया ।
झिजविसी वाया ।
तुज भगवान श्रीशिवराजा ।।
स्वातंत्र्यप्राप्तीच्या काजा ।
बोलावी तिकडे जा जा ।
देशभक्तिची सुधा पिऊनी घे प्रायश्चित्ताला ।
चला घालु स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ।।

नेमकी हीच भावना छत्रसालचीही झाली. “काय पाप करत होतो मी आजवर. पितरं थुंकत असतील स्वर्गातून मला पाहून. मज नीचाला नरकात तरी स्थान मिळेल का? पण आता नाही. आता आणखी नाही”, दिलेरखानकडे शिकारीचा बहाणा करुन छत्रसाल निघाला, तो थेट भयाण जंगल तुडवत तुडवत सिंहगडाच्या पायथ्याशी आला. त्याच्या मनात आता केवळ एकच गोष्ट फिरत होती, “तुज भगवान श्रीशिवराजा”! त्याने महाराजांची भेट मिळवली. परब्रह्म प्रकटल्यावर भक्ताचे अवसान गळावें, तसेच झाले छत्रसालचे. तो गांगरला. मुघलांमध्ये आणि महाराजांमध्ये हाच सर्वांत मोठा फरक आहे की, महाराजांनी कधीच पद आणि त्यापाठोपाठ येणारा अहंकार आपल्या गुणग्राहकतेच्या आड नाही येऊ दिले. त्यांनी स्वतः उठून छत्रसालची भेट घेतली. महाराजांची नजर चौफेर. त्यांना देशातल्या चिमण्याकावळ्यांचीही सारी खबरबात. क्षुल्लक बातमीचाही स्वराज्यासाठी वापर करुन घेण्याकडे महाराजांचे लक्ष. त्यांना काय छत्रसालची हकीकत ठाऊक नसेल? सारे ठाऊक होते त्यांना. छत्रसालने फक्त गाळलेल्या जागा भरल्या. आणि महाराजांसमोर पदर पसरला त्याने. समशेर हिंदुराष्ट्रवैभव प्रभो शिवाजीराजांच्या पायी ठेवली आणि म्हणाला,
“मला पदरांत घ्या. तुम्ही द्याल ती चाकरी करेन. पण पुन्हा त्या देशशत्रूंच्या नोकरीत जायला सांगू नका मला”.
छत्रसालची तळमळ थोर. भावना खरी. महाराजांनी त्याला हाताशी धरुन उठवले. त्यानंतर महाराज जे बोलले, ते ह्रदयावर कोरुन ठेवण्यासारखे आहे. महाराजांनी त्याला सांगितले,
“छत्रसाल, मी जर तुम्हाला नोकरीत ठेवून घेतले तर तुमच्या यशाचे सर्व श्रेय मला मिळेल. तुम्ही स्वयंप्रकाशी आहात. हे तुर्क आपल्या देशावर आले. मी त्यांना हुसकावून लावण्यासाठी माझी तलवार उगारली आहे. मला आईभवानीचे आशीर्वाद आहेत. मी जे इथे करतोय, तेच तुम्ही तिकडे जाऊन करा. बुंदेलखंडांत जा. मायभूमी पुन्हां एकवार जिंकून घ्या. राज्य नव्हे, स्वराज्य करा. आणि स्वराज्यावर राज्य करा. कीचकाप्रमाणे मुघलांचा संहार करा. अंत:करणात श्रीकृष्ण धरा. तुम्हीं क्षत्रियांचे मुकुटमणी. क्षत्रियांनी सदैव तलवारीने कमावून खावें. गोब्राह्मण आणि वेदविद्यांचा प्रतिपाल करावा. दुष्मन हताहत करावें. याकामी मारले गेलो तर मोक्ष मिळतो, पण जिंकलो तर माणूस पृथ्वीराज म्हणविला जातो. तुम्हीं जिंकालच ही माझी खात्री आहे. जा, मुघलांवर तुटून पडा आणि तुमची विजयदुंदुभी माझ्या कानीं निनादूं द्या! गरज पडली तर मी आहेच.”

केवढी विलक्षण ओजस्वी वाणी! अनाथ छत्रसाल पुन्हा एकवार सनाथ झाला. ते साल १६७० होते. छत्रसालकडे त्यावेळी केवळ ५ घोडेस्वार आणि २५ पदाती होते. तो स्वतः केवळ २१ वर्षांचा होता. पण रामनामाच्या ताकदीने जसे पत्थरांचेही जलतरण होते, तद्वतच शिवनामाच्या स्फूर्तीने राष्ट्रभक्तीचे वर्धन होते. गवतासही भाले फुटतात, पर्जन्यबिंदूंचेही निखारे होतात आणि तान्हूलं बाळही गर्जना करतं “हर हर महादेव”! छत्रसालने असा भरगच्च पराक्रम केला की, मुघलांना पळता भुई थोडी झाली. छत्रसालने बुंदेलखंडात स्वतंत्र स्वराज्य स्थापले. मुघलांच्या एकूण एक फौजेचा पराभव केला. अखेरीस औरंगज़ेबच्या मृत्यूनंतर गादीवर आलेल्या बहादूरशाहला छत्रसालशी तह करावा लागला! शिवरायांचा खरा बच्चा होता छत्रसाल!!

नंतर गादीवर आलेल्या बादशाह मुहंमदशाहने मात्र छत्रसालवर राक्षसांची टोळधाड सोडली. आणि या राक्षसी टोळधाडीचा म्होरक्या होता, खासा फर्रुखाबादचा नवाब, नवाब ग़नज़फरजंग मुहंमदखान बंगश!! साल होते १७२७!! त्यावेळी छत्रसालची उमर ८० वर्षांची होती. ज्या वयात लोक सारे काही सोडून देवाज्ञेची वाट पाहातात, त्या वयात हा रणमर्द हाती तलवार घेऊन उभा होता. त्याने तुंबळ युद्ध मांडले. बंगशला हिंदू तलवारीचे पाणी पाजण्यात जरादेखील कसर नाही सोडली. छत्रसालला जैतपूरच्या वनाचा आश्रय घ्यावा लागला, तरी त्याने हार पत्करली नाही. सलग २ वर्षे लढत होता तो! डिसेंबर १७२८ मध्ये छत्रसाल लढता लढता गंभीर जखमी झाला. त्याला बंगशने पकडले. मुलानातवांसह त्याला जैतपूरच्या किल्ल्यात कैद करुन ठेवण्यात आले. ढाण्या वाघच जेरबंद करुन टाकला होता जणू. शरीर कैद करता येते, ऊर्मीला कोण कैद करणार? छत्रसाल क्षतविक्षत होता, बंदी होता; पण त्याचे मन केव्हांच भगवान श्रीशिवराजापाशी जाऊन पोहोचले होते. त्याच्या कानांत त्यांचे ते ६० वर्षांपूर्वी उच्चारलेले शब्द फिरत होते. त्याचे ध्यान वारंवार एकाच वाक्याभोवती घुटमळत होते, “गरज पडली तर मी आहेच”!

“महाराज, आज खरोखर गरज आहे हो तुमची. बघा, मी दिलेल्या शब्दाला जागलो. तुमचा खरा मावळा बनून राहिलों. मुघलांच्या नाकीनऊ आणले. पण आज मात्र माझा काहीच उपाय चालेना. आज मला तुम्हीं हवे आहात. मी माझा शब्द पाळला. तुम्हीसुद्धा आता तुमचा शब्द पाळा. या, या अनन्यशरणाला ताराया या शिवराया”! आपला हा आक्रोश व्यर्थ असल्याचे छत्रसालला समजत होते. महाराजांनी देहत्याग करुन ५० वर्षे उलटून गेली होती. ते कुठून येणार. ही हाक निष्फळच होती. की नव्हती? महाराज जरी या जगात नसले तरीही त्यांनी पेटवलेल्या स्फुल्लिंगाचा एक अंश अजूनही जिवंत होता, नव्हे तर वणवा बनून म्लेंच्छांना जाळून काढत होता. त्याच्या केवळ नावानेच मुघलांना भयामुळे नको जीव व्हायचा. त्याची जिथे नजर पडेल तो भूभाग स्वराज्याला अंकित व्हायचा. तो तलवार उगारेल ते रण त्याच्या पायी डोके ठेवायचे. महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्य करणारा रणपंडित होता तो! हिंदवी स्वराज्याचा पंतप्रधान, बाजीराव बल्लाळ पेशवा सरकार!!

स्वकर्तृत्वाने मराठ्यांमध्ये देवासमान ख्याती कमावलेेले बाजीराव बुंदेलखंडाच्याच दिशेने दौडत असल्याचे त्याला समजले. छत्रसालला आशेचा किरण दिसू लागला. त्याने ताबडतोब आपले सरदार दुर्गादास यांना एक पत्र देऊन बाजीरावांची भेट घेण्यासाठी पाठवले. आज महाराष्ट्रात बाजीरावांची निव्वळ जात बघून द्वेष करणाऱ्यांची अवलाद जन्माला आलेली असताना ३०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जातीचा न गोताचा पण शिवस्पर्शाने पावन झालेला तो वीराग्रणी बाजीरावांची थेट भगवान श्रीविष्णूंशी तुलना करुन लिहीतो —
“जो गति ग्राह गजेन्द्रकी सो गति भयि आज ।
बाजी जात बुन्देलकी राखो बाजी लाज ।।”

पत्र बाजीरावांकडे पोहोचले. बाजीरावांनी ताबडतोब निर्णय घेतला. जंगलातून वाटा काढण्यात मराठे तरबेज. त्यात त्यांना लघुमार्ग दाखवायला बुंदेले होतेच. बाजीरावांच्या हालचाली जलद. ते दर २ सैनिकांमागे १ घोडा जास्तीचा ठेवत. रोज ६०-७० किलोमीटरपर्यंत सैन्य हलवण्याचा भीमपराक्रम त्यांना सहजसाध्य होता. चातुर्य तर एवढे की, बाजीराव बंगशपासून अवघ्या ४० किलोमीटरवर आले तरी त्याला समजलेदेखील नाही. ३० मार्च १७२९! बंगशच्या ज्या राक्षसांनी छत्रसालला त्रास दिला होता, त्यांच्यावर साक्षात कळीकाळ कोसळला! बाजीरावांनी पहिल्याच फटक्यात त्याला असे काही हाकलले की तो सैरावैरा पळत जैतपूरच्या किल्ल्यात जाऊन लपला. त्याला वाटलं की, किल्ला ही सुरक्षित जागा असते. असते, पण बाजीरावांपुढे नाही. मुघलांनी स्वराज्यातल्या एखाद्या किल्ल्याला वेढा देणं आणि बाजीरावांनी मुघलांना वेढा देणं यात फरक आहे. बाजीरावांनी आसपासचा सगळाच मुलूख ताब्यात घेतला. मल्हारराव होळकर, पिलाजी जाधव, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, दावलजी सोमवंशी अशी बाजीरावांच्या तालमीत तयार झालेली प्रभावळ रात्रंदिवस त्यांच्या आज्ञेवरुन धावपळ करत होती. या मंडळींनी मुघलांची सारी रसद तोडली. अवघ्या काही दिवसांपूर्वीच विजयी मेजवान्या झोडणाऱ्या मुघलांचे दोन वेळच्या जेवणाचेही वांधे होऊ लागले.

बंगशचा मुलगा होता कईमखान. तो ३० सहस्र फौज घेऊन चालून आला. पण बाजीराव काही मुघलांसारखे सुशेगात नव्हते. त्यांनी कईमखानला एवढे काही तिखट उत्तर दिले की तो तर पळालाच, वर त्याच्याकडचे ३ सहस्र घोडे आणि १५ हत्ती मराठ्यांच्या हाती लागले. घाबरलेल्या बंगशने बादशाहला पत्रांमागून पत्रे पाठवण्याचा सपाटाच लावला. बादशाहने खानदौरानला बाजीरावांवर चालून जाण्याचा हुकूमदेखील सोडला. पण बाजीरावांशी कोण पंगा घेईल? खानदौरान जागचा हललासुद्धा नाही. त्याने उलट छत्रसाललाच पत्र पाठवले, “बंगश तुझ्या ताब्यात आहे, टाक मारुन”. कईमखानने दुसऱ्यांदा प्रयत्न केला. त्याची याहीवेळी पहिल्यासारखीच गत झाली. छत्रसालने बंगशला मोठ्या अटी घालून मगच सोडले. तो पुन्हा मोठ्या वैभवाने राज्यारुढ झाला. ६० वर्षांपूर्वी शिवरायांनी त्याला राज्याची प्रेरणा दिली होती, ६० वर्षांनंतर शिवरायांच्याच रणशिष्य बाजीरावांनी छत्रसालची राज्यावर पुनर्स्थापना केली!

काय गरज होती बाजीरावांना हे करण्याची? बाजीरावांनी हे केले, थोरल्या महाराजसाहेबांनी दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी. बाजीराव अवघ्या जगाला अजेय होते, पण मराठी गादीपुढे हात बांधून मान झुकवून मनोभावे बांधिल होते. इतिहास बाजीरावांकडे निव्वळ शिपाईगडी म्हणूनच पाहातो. पण मला मात्र बाजीरावांच्या या युद्धात देशाच्या आगामी शेकडों वर्षे चालणाऱ्या राजकारणाची दिशा दिसते. बाजीराव आयुष्यात एकही युद्ध नाही हरले. पण विनाकारण कधीच नाही लढले. प्रत्येक युद्धातून काही ना काही बहुमूल्य मिळवलेय त्यांनी. या युद्धात मराठ्यांना काय मिळाले? आजवर मराठ्यांकडे पाहाण्याचा बुंदेलखंडाचा दृष्टीकोन ‘लुटारू’ असाच होता. बाजीरावांनी त्यांना मराठ्यांची हिंदुस्थानचे नि:स्वार्थ रक्षक म्हणून असलेली बाजू दाखवून दिली. आता बुंदेलखंड हा मराठ्यांना कायमच झुकते माप देणार होता. आम्ही करंटे छत्रसालने केवळ बाजीरावांना मस्तानी दिली एवढेच पाहातो, प्रत्यक्षात छत्रसालने बाजीरावांना आणि एकूणच मराठी साम्राज्याला आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा – काल्पी, हट्टा, सागर, झाशी, सिरोंज, कूच, गडकोटा, हरदनगर – असा वार्षिक ३ लक्ष उत्पन्न देणारा मुलूखसुद्धा दिला. आता उत्तरेकडील मोहिमांमध्ये महाराष्ट्रातून कुमक येण्या न येण्यावर अवलंबून राहावं लागणार नव्हतं. मराठ्यांचं हक्काचं ठाणं झालं होतं उत्तर भारतात!! रसद आणि कुमक दोन्हीही लवकर मिळत जाणार होती आता. शिवाय छत्रसालचे दोन्हीही पुत्र हरदेश राय आणि जगत राय हवे तेव्हा मदतीला उपस्थित राहाणार होते. या एकाच घटनेने अवघ्या हिंदुस्थानी राजकारणाचा नूरच पालटून गेला. पुढे जगविख्यात राणी लक्ष्मीबाईंनी राज्य केलं ते याच मुलूखातून. १८५७ चे बेत ठरले, तेही याच ठिकाणी! विचार करा, शिवरायांनी जर दूरदृष्टी ठेवलीच नसती, बाजीरावांनी जर हे राजकारण केलंच नसतं तर आपल्याला झाशीची राणी तरी मिळाली असती का? हा २०० वर्षे चाललेल्या राजकारणाचा पट तरी मांडला गेला असता का?

एवढी सगळी मुत्सद्देगिरी केवळ एका लढाईमागे आहे. अश्या ४१ लढाया बाजीरावांनी आपल्या अवघ्या २०च वर्षांच्या कारकीर्दीत लढल्या आणि एकूण एक जिंकल्या. हे कधी नेपोलियनलाही साधलं नाही. आमचं दुर्दैव असं की आम्हाला नेपोलियन ठाऊक असतो पण बाजीरावांबद्दल मात्र काडीचीही माहिती नसते. मग त्यांचे हे अखिलभारतीय राजकारण कुठून समजणार? पण इतिहास साक्षी आहे, की अवघ्या १९व्या वर्षी पेशवा झालेला आणि ३९व्या वर्षी हे जग सोडून गेलेला एक महापराक्रमी अजेय वीर या महाराष्ट्रभूमीवर तांडव करुन गेला, त्याने अवघ्या जगाला एक सुसंगत अशी नवीच दिशा दिली!!

— © विक्रम श्रीराम एडके
*लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
(लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)
संदर्भ —
१) अजिंक्ययोद्धा बाजीराव – जयराज साळगांवकर
२) Bajirao : An Outstanding Cavalry General – Col. Palsokar
३) An Advanced Study In The History Of Modern India – Sen
४) राजा शिवछत्रपती — पुरंदरे
५) श्रीबाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा — सावरकर

image

3 thoughts on “तुज भगवान श्रीशिवराजा

  1. अद्भुत , अद्वितीय,अविस्मरणीय वर्णन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *