प्रचण्डताण्डवशिवम् : भाग २

दिल्लीच्या युद्धात बाजीरावांनी मुघल साम्राज्याचा सारा नक़्शाच उतरवून ठेवला होता. एकेकाळी भारतावर एकछत्री राज्य केलेले हे घराणे. पण आज त्यांना मराठ्यांच्या मेहेरबानीवर जगावे लागत होते. आजसुद्धा मुघलच बादशाह होते, सम्राट होते; पण निव्वळ नावालाच. खरा अंमल चालत होता मराठ्यांचाच! खरी भीती होती ती बाजीरावांचीच! ही गोष्ट बादशाह मुहंमदशाहला आतून पोखरुन काढत होती. अवघे ३८ वय होते त्याचे. त्याच्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहानच असलेल्या बाजीरावांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याला पार पंगू करुन सोडले होते. वज़ीर कमरुद्दीन खान, सादतखान, खानदौरान, मुहंमदखान बंगश असे एकापेक्षा एक रणगाज़ी हाताशी असूनदेखील बादशाह पांगळा होता, फक्त बाजीरावांमुळे! अश्या स्थितीत बादशाहला आपल्या एका जुन्याजाणत्या सरदाराची आठवण झाली. तो जुना होता, वयोवृद्ध होता; सरदार होता पण वफ़ादार नव्हता. गेली अनेक वर्षे बादशाहची त्याच्यावर खफ़ामर्जी झाली होती. म्हणूनच त्याने कित्येकवेळा विचारुनही बादशाहने त्याला भेटीला बोलावलं नव्हतं. त्याच्या नावे निघणारी सुभेदारीची फ़र्मानंही रोखून धरली होती. पण आज त्याच्या एकट्यातच बादशाहला आशेचा किरण दिसत होता. सुबेदार-ए-दख्खन खासा निज़ाम-उल-मुल्क़!

दहाच वर्षांपूर्वी निज़ामाला बाजीरावांनी पालखेडला वाईट मारलं होतं. पण एकंदरीतच मुघलांच्या ताकदीचा आणि डोक्याचा विचार करता आजघडीला बाजीरावांशी टक्कर घेऊ शकणारं जर कुणी असेल तर तो केवळ एकटा धूर्त, पाताळयंत्री, दीर्घद्वेषी निज़ामच होता, हे बादशाहचं पक्कं मत होतं. त्याने निज़ामाला भेटीसाठी बोलावलं. निज़ामाला राजकारणाचा तराजू कोणत्या बाजूला झुकलाय याची पुरेपूर जाण होती. आपला ढीला पडलेला खुंटा बळकट करण्याची आणि आपल्या पोरांची कारकीर्द घडवण्याची हीच संधी आहे हे त्याने बरोब्बर ओळखलं. तो दिल्लीला आला. त्याचं न भूतो न भविष्यति स्वागत करण्यात आलं. याआधी कधीच ठेवली गेली नव्हती अशी बडदास्त ठेवण्यात आली. दि. २ जुलै १७३७ ला त्याची बादशाहशी भेट झाली. या भेटीत बादशहाने निज़ामाला अनेक दिवसांपासून द्यायचा राहीलेला “असफ़ जाह” हा ख़िताब़ दिला. निज़ामाचा थोरला मुलगा गाज़ीउद्दीन याला आग्रा व माळवा यांची सुभेदारी देण्यात आली. निज़ामाने आपल्यासोबत १५०००चं कडवं सैन्य आणलं होतं. बादशाहने त्याला आपल्याकडचं शेवटचं राखीव ३४००० सैन्य दिलं. तोफ़खाना दिला. एवढंच नव्हे, तर १ कोटी रुपयांचा खजिनाही दिला. लक्ष्य केवळ एकच, मराठा साम्राज्य आणि त्या उद्दीष्टादरम्यान पाय रोवून असलेले नरसिंह बाजीराव!

कराल, असमभयकारी फौज घेऊन निज़ाम दक्षिणेकडे निघाला होता. वाटेत त्याला सफ़दरजंग, कोट्याचा राजा दुर्जनसाल, छत्रसालची मुलं असे एक एक रणमर्द येऊन मिळाले. त्याचं सैन्य केव्हाच ८००००च्या संख्येला जाऊन भिडलं होतं. तांडवथैमानासाठी आतूर असलेली भूतंच जणू. पण तांडव अपूर्ण असतं महादेवांशिवाय. इथे तर भूतं महादेवांच्याच विरोधात तांडव करायला निघालेली. त्यावेळी महाराष्ट्रहिमगिरीचे महादेव, श्रीशाहूनरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ पंतप्रधान काय करत होते? बाजीराव निजामाच्या हालचालींची खडानखडा माहिती ठेवत होते. मराठ्यांशी चांगले संबंध राखून असलेल्या जयसिंहाला माळव्याच्या सुभेदारपदावरुन काढून ती निज़ामाच्या पोराला देणं, यातून ध्वनित होणारा अर्थ बाजीरावांना व्यवस्थित लक्षात येत होता. निज़ाम महाराष्ट्रावर प्रलय बनण्यासाठी येतोय हेही त्यांना पुरेपूर समजत होते. निज़ामाकडे ८०००० सैन्य होतं. त्याचवेळी बाजीरावांचे विश्वासू सरदार गायकवाड, दाभाडे, कदमबांडे, भोसले मात्र लांब होते. पैश्यांची चणचण होती. परंतु इतिहासापुढे बहाणे चालत नाहीत; तो रुक्ष असतो, कडक शिस्तीचा असतो, इतिहास फक्त आणि फक्त अंतिम निर्णय पाहात असतो. बाजीरावांनी छत्रपतींची आज्ञा घेतली. आणि केवळ स्वतःच्या संपर्काच्या जोरावर, पैसे नसतानाही तितकीच म्हणजे ८००००ची फौज उभारुन दाखवली. पाहायला गेलं तर आता दोघांचीही ताकद सारखीच होती. पण निज़ामाच्या फौजेत तरीदेखील एक कमतरता होती – त्यांच्या बाजूने बाजीराव नव्हते!

२५ ऑक्टोबरला राऊंनी पुणे सोडले. १२ नोव्हेंबरला त्यांनी तापी ओलांडली. तोपर्यंत त्यांना चिमाजी, शिंदे आणि होळकर येऊन मिळाले होते. खरा सेनापती तोच असतो जो आपल्या हाताशी असलेल्या सैन्याचा तर उपयोग करतोच, पण लांबवर असलेल्या सैन्याकडूनही तिकडून उपयोगी पडतील अशी कामे करुन घेतो. बाजीरावांनी चिमाजींना वरणगावला तळ ठोकायला सांगितले. रघूजी भोसलेंना सूचना देण्यात आल्या. स्वतः बाजीरावांनी नकाशावर एक जागा अंकित केली, स्वतःशीच हसले आणि वर झेपावले.

वरुन निज़ाम येत होता. खालून बाजीराव येत होते. मध्ये होता तो भोपाळचा किल्ला! निज़ामाचे डोळे लकाकले. किल्ल्याचं सामरिक महत्त्व त्याला पक्कं ठाऊक होतं. किल्ल्याला लागून होता तो भोपाळचा जगप्रसिद्ध तलाव. एका बाजूला दाट जंगल. आणि मधोमध होता तो उंचावर स्थित भोपाळचा किल्ला. गरज पडेल तेव्हा वरुन बादशाहकडून मदत येऊ शकणार होती. खालून दख्खनमधूनही मदत येऊ शकणार होती. “हीच जागा योग्य आहे”, तो स्वत:शीच म्हणाला. पण आवाज त्याच्या एकट्याचाच नव्हता. त्याचक्षणी बाजीरावदेखील नकाशावर भोपाळचाच किल्ला अंकित करुन तेच वाक्य उच्चारत होते. नियती निज़ामाकडे पाहून गुदगुल्या झाल्यागत हसत होती! बाजीरावांच्या हालचालीचा वेग फार. त्यामुळे निज़ामाने घाई केली आणि तो किल्ल्यात शिरला. किल्ल्यात शिरणारा निज़ाम खरंतर बाजीरावांच्या सापळ्यात शिरत होता! त्याला फार उशिरा उमगणार होतं की बाजीराव कसे काय लवकर पोहोचले नव्हते.

प्रत्यक्षात निज़ामचे सर्व सैन्य किल्ल्यात मावणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांना साहजिकच किल्ल्याच्या आसपासच्या गावाचा आसरा घ्यावा लागला. त्या नादात बरेचसे सामानसुमान त्यांना ४० किमी लांब असलेल्या रायसेनलाच ठेवावे लागले. गाव आणि आसपासच्या दाट जंगलामुळे त्या सैन्याच्या हालचालीवरही प्रचंड बंधने आली होती. पण निज़ामाला त्याची पर्वा नव्हती. जोपर्यंत त्याच्या ताब्यात उंचावर असलेला किल्ला आणि बादशाहने दिलेला मजबूत तोफ़खाना होता, तोपर्यंत एकच काय छप्पन बाजीरावसुद्धा त्याचे काहीही वाकडे करु शकत नव्हते. पण त्याच्या दुर्दैवाने शत्रूच्या योजनेत फट शोधण्यामध्ये आणि शत्रूच्या ताकदीलाच त्याची कमजोरी बनवण्यामध्ये बाजीराव वाकबगार होते.

निज़ाम अन्नासाठी खूपश्या प्रमाणात भोपाळ गावावर अवलंबून होता. गरज पडेल तेव्हा सिहौर अथवा दिल्लीमार्गे मुबलक रसद येणार होती. बाजीरावांनी मात्र सगळ्यात आधी हे दोन्ही रस्तेच ताब्यात घेतले! १३ डिसेंबर १७३७! भोपाळकडे जाणारे सगळेच रस्ते बाजीरावांनी बंद करुन टाकले. निज़ाम आता पूर्णपणे भोपाळ गावावरच अवलंबून होता. आणि सैन्याची प्रचंड संख्या पाहाता गावातही एक दिवसापेक्षा जास्त अन्नसाठा नव्हता! आता मात्र निज़ाम धास्तावला. त्याची झोप पार उडाली. बाजीरावांनी राणोजी शिंदे, पिलाजी जाधव, बाजी भिवराव असे एकाहून एक सरस सरदार कामाला जुंपले होते. त्यांनी आपले काम चोख बजावले. दिवस असो की काळीकुट्ट रात्र, निज़ामाला आणि त्याच्या सैन्याला, घोडे, बैल, हत्ती यांना अन्नाचा एक कणदेखील मिळू दिला नाही मराठ्यांनी! निज़ामाला काहीच समजेनासे झाले होते. मराठे दिसत तर कुठेच नव्हते. पण जरा कुठून मुघलांनी हालचाल केली की, पटकन कुठूनतरी यायचे, मुघलांना बदड-बदड बदडायचे आणि पुन्हा गायब व्हायचे. इतके करुनही निजामाच्या गोळीबाराच्या टप्प्यातदेखील येत नव्हते ते! म्हटलं तर किल्ल्याला वेढा नव्हता, पाहिलं तर निज़ामाने आजवर बापजन्मी अनुभवला नव्हता एवढा तिखट वेढा होता. आणि एकटा निज़ामच कश्याला? अवघा इतिहासच समरधुरंधर रणवैज्ञानिक बाजीरावांनी लावलेला अभिनव शोध पाहात होता – हलता वेढा! फिरता वेढा!! बाजीरावी वेढा!!!

निजामाला दोनच ठिकाणांहून मदतीची आस होती. एकतर त्याने पाठिमागे दख्खनला ससैन्य ठेवलेला मुलगा नासिरजंग! पण बाजीराव काही बोळ्याने दूध पिणारे नव्हते. त्यांनी नासिरजंगसाठीच रघूजी भोसले आणि चिमाजीअप्पांना पाठिमागे ठेवलं होतं. भोसलेंनी नासिरजंगला वऱ्हाडाबाहेर पाऊलसुद्धा ठेवू दिलं नाही. कसाबसा बिचारा तापीजवळ पोहोचला तर त्याला चिमाजींनी हैराण करुन सोडलं. शिवाय तो तसाच पुढे गेला असता तर उघडे पडलेले औरंगाबाद मराठे साफ लुटतील, ही भीती वेगळीच! नासिरजंग हाताशी सैन्य असूनही बाजीरावांच्या रणनीतीपुढे पूर्णपणे अडकून पडला होता. दुसरा मार्ग होता दिल्लीचा! पण बादशाहने बाजीरावांना संपवायलाच तर एवढं प्रचंड सैन्य दिलं होतं ना निज़ामाला. वर परत आपणच त्याच्या मदतीला जायचं? आणि समजा त्या बाजीरावचं डोकं फिरलं आणि तो आपली ही आगळीक पाहिल्यावर निज़ामाला सोडून थेट दिल्लीवरच आला तर? मागच्या वेळी तो आला होता तेव्हाच चड्डी पिवळी झालेली. यावेळी आला तर पिवळी होण्यासाठी मुळात चड्डीच शिल्लक ठेवणार नाही तो. असा विचार करुन बादशाह स्वस्थ बसला. निज़ामाचे दोन्हीही मार्ग खुंटले. नाही म्हणायला वऱ्हाडातून शुजातखान निज़ामाच्या मदतीला निघाला होता, पण त्याला रघूजींनी एवढे काही भयानक तुडवले की त्याची फौज वाट फुटेल तिकडे पळून गेली.

धान्याचे भाव वाढले. रुपयाला चार शेर धान्य एवढी महागाई झाली. एक दिवस जनावरांना झाडाच्या साली आणि उरलेसुरले गवत दिले. पुढे काय? माणसांनाच खायला मिळेना, तिथे जनावरांचे कसले लाड? पठाणांनी गाडी ओढणारे बैल मारुन खात एक दिवस ढकलला. राजपूत आणि जाटांना मात्र त्याहीदिवशी निर्जळीच घडली. ते बंडाची भाषा बोलू लागले. दुसऱ्या दिवसापासून तर पठाणांवरही उपासमारीचीच वेळ आली. त्यात ते रगेल मराठे, रात्री अचानक उगवायचे आणि किल्ल्यात पेटते पलिते टाकत आगी लावून निघून जायचे. निज़ाम पुरता त्रासून गेला. त्या परिस्थितीत जर त्याला कुणी “झोप म्हणजे काय असते रे भाऊ?” विचारले असते तर वेड्यासारखा दगड घेऊन मागेच लागला असता तो!

निज़ामापुढे आता एकच मार्ग होता. काहीतरी करुन बाजीरावांचा वेढा फोडायचा आणि सरळ दिल्लीकडे चालू पडायचे. दि. १४ डिसेंबर १७३७! निज़ामाने राजपूत आणि बुंदेल्यांच्या जोरावर वेढा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना बंदुकधारी गजभाराची साथ होती. परिणाम? मल्हाररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी एवढ्या त्वेषाने हल्ला चढवला की, सर्वांना पळता भुई थोडी झाली. रणमदाने न्हाऊन निघालेले मराठ्यांचे भालाईत हत्तींवर चढले आणि एकेका बंदुकधाऱ्याला भोसकून काढले. बंदूका आणि तोफ़ा तोडून टाकण्यात आल्या. निज़ामाच्या उपासमारीत अजूनच भर पडली. घाबरलेल्या निज़ामाने आपली खाज़गी छावणी दूर जंगलात हलवली. मराठ्यांनी त्याला तिथेही हैराण करुन सोडले. एकदा तर मराठ्यांनी त्याच्या २ तोफ़ाच उचलून आणल्या.

भुकेलेल्या, खचलेल्या निज़ामाने बाजीरावांकडे शिष्टमंडळ पाठवले. तहाची बोलणी आरंभली. बाजीरावांना संपवायला निघालेला निज़ाम आता बाजीरावांच्याच दयेवर होता. शिष्टमंडळाने बाजीरावांना थोडेसे अन्न नेऊ देण्याची परवानगी मागितली. बाजीरावांनी मोठ्या मनाने भिक घातली. निज़ामाच्या मनातली भीती कमी होण्यासाठी त्यांनी २७ डिसेंबरला आपले सैन्य जरासे मागेसुद्धा घेतले. आता प्रश्न असा उभा राहातो की, बाजीरावांनी निज़ामावर ही मेहेरबानी का केली? त्याला संपवले का नाही? याचे उत्तर आहे शाहूमहाराज! शाहू अनेक वर्षे मुघलांपाशी राहिलेले. नकळतपणे मुघलांच्या बाबतीत त्यांची भूमिका काहीशी नरमाईची झाली होती. शिवाय आपण राज्य दिल्लीपतींकडून मिळवले आहे हीदेखील त्यांची भावना होती, त्यामुळेच दिल्लीपती व त्यांचा सरदार निज़ाम यांना एका मर्यादेपलिकडे दुखावणे त्यांच्या तत्त्वांत बसत नव्हते. ते जर बसले असते, तर आज देशाचा इतिहास वेगळाच झाला असता. निज़ामाला आज कश्याला, पालखेडलाच संपवता आले असते आणि १७३७ मध्येच दिल्ली जिंकता आली असती. वस्तुतः बाजीरावांचे मुघलांशी असले काहीच भावनिक नाते नव्हते. पण तेसुद्धा शाहूंच्या निष्ठेशी मनोभावे बांधलेले होते. शिवाय बाजीराव निज़ामाचा एक थोर सेनानी या नात्याने अतीव आदर करायचे. असा हा सगळा राजकारणात अडकलेल्या भावना आणि भावनेत अडकलेले राजकारण प्रकारचा गुंतागुंतीचा मामला होता. त्याचा फायदा वेळोवेळी जसा हिंदूविरोधी शक्तींना मिळाला, तसाच यावेळी निज़ामाला मिळाला. त्याला मदत देण्यात आली.

पण सापाचीच जात ती! उलटली!! २८ डिसेंबरला निज़ाम मोठ्ठा आवाज करत चालून आला, पण मध्येच अवसान गळाल्यागत माघारी फिरला. आवाजी कवडे आणि यशवंतराव पवार यांनी त्याच्या पाठिवर इतका काही जोराचा हल्ला चढवला की ज्याचे नाव ते! या युद्धात बाजीरावांनी पिछाडी सांभाळली. त्यामुळे निज़ामाने अत्यंत अपमानित अवस्थेत सगळं समानसुमान माघारी टाकून पळून जायचा प्रयत्न केला. तो कसाबसा सिरोंजला पोहोचतो न पोहोचतो तोच त्याला नादिरशाहने भारतावर आक्रमण केल्याची बातमी समजली. दाणागोट्याची प्रचंड टंचाई होती, गोळाबारुद मिळत नव्हता. त्यातच भर म्हणून जाट आणि राजपूत कधीही बंड करु शकत होते. आता तर सगळीकडूनच ससेहोलपट झालेल्या निज़ामाला बाजीरावांशी तह करण्याची खरोखरच घाई झाली. भलीथोरली फौज आणि खजिना घेऊन निघालेल्या ६७ वर्षीय निष्णात सेनानीला अवघे ३७ वय असलेल्या बाजीरावांनी पार भिकेला लावले होते!

बाजीरावांच्या मेहेरबानीने ७ जानेवारी १७३८ ला दुऱ्हासराई येथे तह झाला. झक मारत निज़ामाने अवघ्या काही महिन्यांपूर्वीच पोराला मिळालेली माळव्याची सुभेदारी बाजीरावांना कबूल करुन दिली. नर्मदा आणि चंबळदरम्यामची सगळी भूमी कबूल करुन दिली. बादशाहकडून ५० लक्ष युद्धखर्च मिळवून देण्याचे मान्य केले. मराठ्यांनी कोट्याच्या दुर्जनसालकडून १० लक्ष रुपयांची खंडणी वसूल केली. माळव्याच्या नवीन सुभेदाराच्या आदराप्रीत्यर्थ दरबार भरवला गेला. माळवा भागातील सर्व राजे, खासा निज़ाम आले. सुबेदार-ए-मालवा बाजीरावांनी हात उचलला. त्याबरोब्बर निज़ामासुद्धा सारे गुडघे टेकून झुकले. त्यांच्या नजरा जमिनीकडे लागलेल्या होत्या. आणि त्याचक्षणी, त्याचक्षणी प्रचण्डताण्डवशिवम् संतोष पावला!!

— © विक्रम श्रीराम एडके
*लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
(लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)
संदर्भ —
१) अजिंक्ययोद्धा बाजीराव – जयराज साळगांवकर
२) Bajirao : An Outstanding Cavalry General – Col. Palsokar
३) मराठी रियासत : खंड ४ – सरदेसाई
४) History of the Maratha People : Vol. 1, 2 — Kincaid & Parasnis

image

One thought on “प्रचण्डताण्डवशिवम् : भाग २

  1. Sir
    Tumchi Bajirao peshwechi mahiti Facebook war vachali. Apratim mahiti share zali. History book madhe kahich nahi.pl. share me.Khupach changli post ahe

    Regards
    Hattargekar N.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *