विक्रमवीर ‘विक्रम’!!

आपल्यापैकी प्रत्येकाचे स्वप्न असते, कधीकाळी आपणही चित्रपटात ‘हिरो’ व्हावं. दररोज शेकडो लोक हे स्वप्न उराशी बाळगून मायानगरी गाठतात आणि दररोज लाखो स्वप्ने चक्काचूर होतात! साठच्या दशकात तमिळनाडूतल्या व्हिक्टर अल्बर्टने हेच स्वप्न उराशी बाळगत चेन्नईची मायानगरी गाठली होती. खरं तर मायानगरी वाटते तितकी निर्दयी नाही. इथे प्रत्येकाला काही ना काही काम मिळते. व्हिक्टरलाही मिळाले! मात्र तुम्ही किती का मोठ्या स्टारचे का बेटे असेनात, इथे टिकतात केवळ प्रतिभा आणि कष्टांचा अजोड मिलाफ असलेलेच! व्हिक्टर कष्टाळू होता, पण ना त्याच्याकडे प्रतिभा होती ना तंत्रशुद्धता. त्यामुळे लहानसहान भूमिकांवरच त्याला समाधान मानावे लागले. सखोल ज्ञानाअभावी वडलांची झालेली फरपट केनेडी विनोदराज या व्हिक्टरच्या लहानग्या मुलाने केव्हाच ओळखली होती. नव्हे, वाट्याला आलेल्या भोगांनी ती अक्षरशः मनावर कोरली गेली होती त्याच्या! १७ एप्रिल १९६६ रोजी जन्माला आलेल्या या मुलाने, यातून बरोब्बर धडा घेतला. चेन्नईच्या नाट्यवर्तुळात नाटकांची काही कमतरता नव्हती. तिकीटही फारसं नसायचं! रोज कोणत्या ना कोणत्या नाटकास जायचा. नाटकाच्या बारीक-सारीक अंगांची निरीक्षणे करायचा. कुणाच्याही नकळत वेगवेगळ्या कलाकारांच्या अभिनयाची नक्कल करायला पाहायचा. नक्कल करून झाल्यावर तोच प्रसंग आपल्याला उमगला तसा सादर करायला पाहायचा. यातून त्याला गवसत होता त्याच्यातला मेहनती नवनवोन्मेषशाली अभिनेता, तर त्याच्या शाळा-कॉलेजला गवसत होता अभिनयाचे हमखास बक्षिस मिळवून देणारा कलावंत!! वडलांनी या क्षेत्राचे चटके सोसले होते, त्यामुळे त्यांना केनेडीची काळजी वाटायची. केनेडीने मात्र अभिनयालाच सर्वस्व मानलेले. कुणीच ‘गॉडफादर’ नसताना आपला पोरगा टिकणार कसा, ही वडलांची चिंता; तर माझी मेहनतच माझी ‘गॉडफादर’ बनेल, हा केनेडीचा विश्वास!!

वडलांना जे जमले नाही, ते आपण करून दाखवायचेच, नुसता अभिनेता वा स्टार नव्हे तर सुपरस्टार व्हायचेच ही केनेडीची जिद्द. त्या जिद्दीला मेहनतीची जोड. एकीकडे इंग्रजी साहित्याचे पदवीशिक्षण चाललेले असतानाच केनेडी न चुकता नृत्य शिकायला जायचा. हो, भारतात सुपरस्टार व्हायचे तर नृत्य हे यायलाच हवे! केनेडीने हे ओळखले होते. शास्त्रीय आणि फिल्मी दोन्ही प्रकारच्या नृत्यात त्याने पारंगतता मिळवली. दरम्यान आयआयटी-मद्रासच्या मानाच्या नाट्यमहोत्सवात केनेडीला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि वाटले, आता तमिळ चित्रपटसृष्टीचे दरवाजे आपल्यासाठी उघडतील! नियती क्रूरपणे हसली असावी याक्षणी! केनेडीला ट्रकने उडवले. भीषण अपघात झाला. पायांचा चुराडा झाला होता अक्षरशः.  शिक्षणाची आणि उमेदीची तीन वर्षे केनेडीला बिछान्यावर काढावी लागली. याकाळात त्याच्या पायांवर एक-दोन नव्हे, तर तब्बल २३ शस्त्रक्रिया झाल्या! डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की, हा इथूनपुढे कधीच नाचू शकणार नाही. डॉक्टरांच्या विधानाने स्वप्नांच्या विमानाला अजून इंधन पुरवले असावे बहुतेक! जरा चालता यायला लागल्यावर केनेडीने पुन्हा एकवार नृत्याभ्यास सुरू केला. रोज जीवघेण्या वेदना सहन करायचा आणि तरीही परिश्रम थांबत नसायचे! या परिश्रमांचे फळ असे की, ज्या आयआयटी-मद्रासच्या स्पर्धेनंतर केनेडीचा अपघात झाला होता, बरोब्बर तीन वर्षांनंतर केनेडीने तीच स्पर्धा तितक्याच ताकदीने गाजवली!! या स्पर्धेमुळेच ख्यातनाम दिग्दर्शक सी. व्ही. श्रीधर यांनी केनेडीला आपल्या चित्रपटात मुख्य भूमिका देऊ केली, नाव होते ‘एन कादल कन्मणी’ (१९९०)! पण ‘केनेडी’ असे कुठे नाव असते का सुपरस्टारचे? रुपेरी पडद्यावर राज्य करायचे तर त्याला शोभेल असे नाव नको? केनेडीने विचार केला – वडील व्हिक्टर यांच्या नावातून ‘वि’ घेतला, स्वत:च्या केनेडी नावातून ‘क’ घेतला, आई राजेश्वरीच्या नावातून ‘र’ घेऊन स्वत:च्या नावातून घेतलेल्या ‘क’ला जोडला – झाला ‘क्र’; आणि स्वत:ची सूर्यराशी ‘मेष’मधून घेतला ‘म’!! यातून साकारले भावी सुपरस्टारचे नाव — ‘विक्रम’!!

‘एन कादल कन्मणी’ने बरे यश मिळवले. म्हणून काही कुणी एका रात्रीत स्टार होत नाही. जे जितक्या वेगाने येते, ते तितक्याच वेगाने ओसरत असते. विक्रमला पहिला ‘हिट’ मिळायला थोडीथोडकी नाही, तर तब्बल ९ वर्षे वाट पाहावी लागली! याकाळात त्याने लहानसहान भूमिका केल्या. पोट भरण्याकरता इतर ‘बिझी’ नायकांसाठी ‘डबिंग’ केली. जी भुमिका मिळेल ती जीव तोडून केली. मणिरत्नमने त्याला ‘बॉम्बे’ (१९९३) देऊ केला होता, पण इतर एका भूमिकेसाठी वाढवलेली दाढी काढावी लागेल; म्हणून या पठ्ठ्याने साक्षात मणिरत्नमला ‘नाही’ म्हणायची हिंमत दाखवली! वास्तविक ती साधीशी भूमिका सोडून राष्ट्रपती पारितोषिकविजेत्या मणिकडे गेला असता तर विक्रमला कुणीही दोष दिला नसता. परंतु ती विक्रमवर विश्वास दाखवलेल्या त्या दुसऱ्या दिग्दर्शकाशी बेईमानी झाली असती. साक्षात कलेशीच बेईमानी झाली असती. आणि बेईमानीचे यश विक्रमला नको होते. एक वेळ तर अशी होती की – विक्रम रोज दिवसभर काम करायचा, संध्याकाळी नृत्याभ्यास करायचा आणि रात्री उशीरापर्यंत जागून इतरांसाठी ‘डबिंग’ करायचा! त्या पडत्या काळातही त्याने कधीच कुणाकडे तोंड वेंगाडले नाही. त्याही काळात मेहनत हीच त्याची ‘गॉडफादर’ होती!!

सात वर्षे पराकोटीचे अपयश झेलल्यावर, एके दिवशी आपला पहिलाच चित्रपट करू पाहाणारा ‘बाला’ (जो आता अनेकानेक राष्ट्रपती पारितोषिकांसह तमिळच नव्हे तर जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीतले बडे प्रस्थ आहे!) नावाचा एक नवखा दिग्दर्शक विक्रमकडे आला. चित्रपटाचे नाव होते ‘सेतू’ आणि विक्रमची भूमिका होती ‘कॉलेजातला राऊडी जो एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि मारहाणीत डोक्याला मार बसून वेडा होतो’. अतिशय आह्वानात्मक भुमिका! विक्रमने हे आह्वान स्वीकारायचे ठरवले. काही दिवसांचेच चित्रिकरण असणार होते. ‘चियान (म्हणजे राऊडी!) सेतू’च्या या कॉलेजकुमार अवतारासाठी विक्रमने अक्षरशः २१ किलो वजन कमी केले. मध्यंतरानंतर भूमिकेत होणाऱ्या बदलासाठी नखे वाढवली. आणि दुर्दैवाने पुन्हा एकवार डाव टाकला! या शोकांत चित्रपटास उचलायला कुणीही वितरक तयार होईना. रंगभूषेच्या सातत्यासाठी विक्रमला दुसरे कोणतेच काम स्वीकारता येईना. अथक मेहनत वाया जाते की काय अशी स्थिती! तब्बल दोन वर्षं बेकारीत काढली विक्रमने. अखेरीस नियतीला दया आली आणि डिसेंबर १९९९ मध्ये चेन्नईच्या एका उपनगरातल्या अगदी लहानश्या चित्रपटगृहात ‘सेतू’ प्रदर्शित झाला. रोज फक्त एकच खेळ. तोही दुपारचा! पण हळूहळू ‘माऊथ पब्लिसिटी’ होत गेली आणि ‘सेतू’ लोकांना आवडला! चित्रपटगृहांनी तो मागून घेतला. खेळ वाढले! एकाच खेळापुरता एकाच चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला ‘सेतू’ तमिळनाडूतल्या अनेक चित्रपटगृहांत १०० आठवडे चालला! आणि बुद्ध हसला! विक्रमला पहिलेवहिले व्यावसायिक यश मिळाले. आणि विक्रमला मिळाले ‘चियान’ हे बिरूद! याच ‘सेतू’चा पुढे सलमान खानने ‘तेरे नाम’ नावाने रिमेक केला, हे चाणाक्ष वाचकांस सांगणे न लगे!!

पण विक्रमच्या कथेतून काय शिकायचं, तर हे की यशाला लघुमार्ग नसतो. मान मोडेस्तोवर काम आणि आत्मा श्रमेपर्यंत जीव ओतावा लागतो, तेव्हा कुठे यशाचं दार जरासं किलकिलं होतं! ते उघडेल आणि कायमच उघडे राहील, याची इवलीशीही खात्री नसते. खरे वीर आपल्या प्रचंड कष्टांच्या जोरावर त्या दाराला बंद होण्यापासून अडवून धरत असतात! ‘सेतू’च्या यशानंतर विक्रमवर भूमिकांचा अक्षरशः पाऊस पडू लागला. पण ज्याने अपयश चवीचवीने पचवलेलं असतं ना, तो यशाच्या गोडीवर सहजासहजी विश्वास ठेवत नसतो. ‘सेतू’नंतर चक्क ६५ दिवस विक्रमने एकही चित्रपट स्वीकारला नाही. स्वत:ला वेळ दिला आत्मपरिक्षणासाठी – आपण योग्य मार्गावर तर आहोत ना? आणि अत्यंत विचारपूर्वक ‘धिल’ (२००१) ही पोलिसकथा स्वीकारली. पुन्हा तितकीच मेहनत. काहीही न खातापिता फक्त फळे आणि रसावर दिवस काढले – अप्रतिम देहयष्टी कमावली. ही जी मी गोष्ट सांगतोय ती ९९-२००० च्या सुमाराची. तेव्हा हिंदीतही कुणा तथाकथित ‘परफेक्शनिस्ट’चा परफेक्शनिस्ट म्हणून उदय नव्हता झाला, त्याकाळात एक प्रादेशिक कलाकार भूमिकेत अजोड परिपूर्णता आणत होता! याकाळात विक्रमने पूर्वीच स्वीकारलेले खूप सारे चित्रपट झळकले. त्यांपैकी खूप सारे त्याच्या नावावर चालले, काही अगदीच नाईलाजास्तव स्वीकारलेले होते, ते आपटले. विक्रमने कुठेच लक्ष दिले नाही. मेहनत चालू ठेवली. आणि ‘धिल’ने पुन्हा एकवार इतिहास रचला! विक्रमने सिद्ध केले की, तो नुसता समीक्षकप्रिय अभिनेता नाहीये, तर मसालापटही तो तितक्याच ताकदीने करू शकतो. त्याच वर्षी विक्रमचा आणखी एक चित्रपट आला, दिग्दर्शक विनयनचा ‘काशी’. लोकगीते गाणाऱ्या अंध खेडूताची भूमिका होती विक्रमची. लोक अंधाची भूमिका कशी करतात हो? निरीक्षण करतात, हाताने चाचपडण्याचा अभिनय करतात. विक्रमने या भूमिकेची तयारी कशी केली माहितीये? रोज सकाळी घराच्या गच्चीवर जायचा आणि सूर्याकडे पाहात त्राटक करायचा. डोळ्यांसमोर अंधारी यायची. चक्कर यायची. काहीही दिसेनासं व्हायचं. हे सर्व कश्यासाठी, तर केवळ आंधळ्या माणसाची खरोखर काय संवेदना असेल ते समजून घेण्यासाठी! चित्रपटात पूर्णवेळ बुब्बूळे वर करून वावरला तो! या भूमिकेतील अभिनयाने अवघ्या तमिळनाडूला ढसढसा रडवलं. समीक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या विक्रमवर. याच भूमिकेने विक्रमला पहिलेवहिले ‘फिल्मफेअर’ मिळवून दिले आणि त्याची दृष्टी कायमची अधूदेखील केली! यानंतर विक्रमला जो चष्मा लागला, तो कायमचाच! हा आहे भूमिकेत परिपूर्णता येण्यासाठी स्वत:च्या शरीररसंपत्तीची किंमत मोजणारा विक्रम!!

२००३ च्या ‘सामी’ची हिंदीत संजय दत्तने ‘पोलिसगिरी’ नावाने अत्यंत फालतू नक्कल केली होती. मूळ रजनीपासून कमलपर्यंत सर्वांना स्टार बनवणाऱ्या के. बालचंदरची निर्मिती आणि विक्रमचा अजोड अभिनय! विक्रमसमोर आह्वान होते, ‘सामी’मधला पोलिस अधिकारी जराही ‘धिल’सारखा न वाटू देण्याचे! भूमिका वेगळी, त्यापाठची मेहनत वेगळी आणि लाभलेले यशही वेगळेच!

रंगभूषेवर तर सारेच मेहनत करतात, विक्रम भूमिकेत अक्षरशः शिरतो. खऱ्या अर्थाने जगतो ती भूमिका. त्याची हीच मेहनत त्याला कमल हासनपेक्षाही वेगळ्या वर्गात नेऊन ठेवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शंकरचा ‘आन्नियन’ (२००४)!! हा चित्रपट आपल्यापैकी प्रत्येकाने ‘अपरिचित’ नावाने हिंदीत ‘डब’ झालेला पाहिलाय. त्यामुळे माझा मुद्दा तुम्हाला बरोब्बर लक्षात येईल. कमल हासनसारख्या एकाच चित्रपटात खूप साऱ्या वेगवेगळ्या भूमिका करण्याचे आह्वान पेलणे वेगळे आणि ‘अपरिचित’मध्ये विक्रमने एकाच वाक्यात एकापाठोपाठ एक तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या भावना ओतणे वेगळे!! अश्या भूमिका विक्रमला वेगळे असे त्याचे स्वतःचे यशोमंदिर मिळवून देतात. मग तो मणिरत्नमच्या ‘रावणन’ (२०१०) मधील भयकारी खलनायक असो वा ‘तांडवम’ (२०१२) मधला अंध ‘रॉ एजंट’ असो वा ‘डेव्हिड’ (२०१३) मधला कोळी! ‘दैवा तिरुमगळ’ (२०११) साठी तर तो चक्क महिनाभर मनोरुग्णांमध्ये राहिला होता, निरीक्षणे केली होती; एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे नोंदी घेतल्या होत्या! प्रत्येक भूमिका वेगळी अभिनयक्षमतेची नवनवे मानांकन रचणारी!!

२००३ मध्ये आलेल्या बाला-विक्रमच्या ‘पिधामागन’ने ‘सेतू’चीच पुनरावृत्ती केली. कबर खोदण्याचे काम करणाऱ्या स्वमग्न (ऑटिस्टिक) व्यक्तीची भूमिका. एकही वाक्य नाही. संवाद नाही. जे काय व्यक्त व्हायचे ते फक्त चेहऱ्यावरील हावभावांमधून! फार काय सांगू, या भूमिकेने विक्रमला राष्ट्रपती पारितोषिक मिळवून दिलेय!!

सध्या विक्रम शंकरचा ‘आय’ नावाचा चित्रपट करतोय. प्रादेशिक चित्रपट असूनही त्याचे बजेट शंभर कोटींहून अधिक आहे. यात विक्रमला तीन भूमिका साकारायच्या आहेत. एक अगदी बारीक माणसाची, एक अतिशय सशक्त माणसाची आणि एक जनावराची! तिन्ही भूमिकांत परिपूर्णता येण्यासाठी विक्रमने आपले वजन गरजेप्रमाणे ११० किलोंपर्यंत वाढवले तर अगदी ४० किलो इतके कमीही केले. टक्कल करावे लागणार होते. भुमिकेची गुप्तता राखण्यासाठी त्याकाळात सहा महिने सूर्यदर्शन केले नाही त्याने! वजन राखण्यासाठी सलग दोन वर्ष विशेषकरून बनवलेल्या एका खोक्यात झोपला आणि फक्त ट्यूबमधून द्रव आहार घेतला. जनावराच्या भूमिकेसाठी प्रोस्थेटिक रंगभूषेने केसतोडा तर जवळजवळ रोज व्हायचा त्याला. अगदी एक मिनिटाचे का दृश्य असेना, ती रंगभूषा चढवायला चार तास लागायचे आणि उतरवायला दोन तास! विक्रमने तेही केले!! या चित्रपटाच्या संगीत अनावरणप्रसंगी स्वतः अर्नॉल्ड श्वार्झेनेगर विक्रमच्या मेहनतीपुढे झुकलाय. चित्रपटाच्या टिझरने केव्हाच एक कोटी व्ह्यूज मिळवलेयत तर कालपरवाच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ट्रेलरने केव्हाच ३५ लाख व्ह्यूजचा टप्पा गाठलाय! तुम्ही जर त्याचे ते सर्वांगसुंदर ट्रेलर पाहिले, तर स्वत:ला एक चिमटा काढा व बजावून सांगा की या माणसाचे वय ४८ आहे, २५-३० नाही! हा चित्रपट आजवरचे हिंदी व तमिळ चित्रपटांचे कमाईचे सारे ‘विक्रम’ मोडेल यात शंकाच नाही! आणि यात सिंहाचा वाटा ‘विक्रम’चाच असणार आहे. रजनीकांत एकदा म्हणाला होता, “मला जर कुणाचे शिष्यत्व पत्करावेसे वाटत असेल, तर ते केवळ आणि केवळ विक्रमचेच”!! मला वाटतं, साक्षात रजनीकांतने हे वाक्य ज्याक्षणी उच्चारलं, त्याच क्षणी व्हिक्टर अल्बर्टचे स्वप्न पूर्ण करत त्याचा पोरगा सुपरस्टार झाला!! सुपरस्टार ‘चियान’ विक्रम!!

— © विक्रम श्रीराम एडके.
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

image

21 thoughts on “विक्रमवीर ‘विक्रम’!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *