सावरकर नव्हे, शिवाजीच साकार!!

सध्या सावरकरांवर एक नवीनच आरोप करण्यात येतोय, तो म्हणजे बायकोच्या फसवणुकीचा आणि बलात्काराचा. “सावरकरांची प्रेमकहाणी” असल्या शीर्षकाच्या पोस्ट्स सोशल मिडियावर फिरत आहेत. पोस्टची भाषा सौम्य आणि वरवर विचारी वाटणारी – म्हणजेच आजवरच्या बिग्रेडी आणि हिंदूद्वेषी लेखनाशी सर्वस्वी विसंगत – अशी असल्याने सामान्य वाचकाचा साहजिकपणे सावरकर बलात्कारी होते आणि त्यांनी पत्नीची फसवणूक केली असा ग्रह होतो. पण ह्या आरोपात लवलेशही तथ्य नाही.

गंमत म्हणजे हा आरोप काही नवा नाही. आर. ए. जहागिरदारनामक एका निवृत्त न्यायाधीशांनी ‘Memoirs of a Rationalist” नावाचा ग्रंथ लिहिला. त्यास कै. डॉ. नरेंद्र दाभोळकरांची प्रस्तावना आहे. त्या ग्रंथातही “सावरकरांना एका ब्रिटिश महिलेचा विनयभंग केल्याबद्दल ४ महिन्यांची शिक्षा झाली” (पृ. १३९), असा आरोप केलेला आहेच. बिग्रेडींनी फक्त आपल्या नेहमीच्या जातीयद्वेष्ट्या वृत्तीप्रमाणे ह्या आरोपात अधिक मसाला भरुन ‘विनयभंगा’चा ‘बलात्कार’ केलंय, एवढंच!!

पण खरेच असे काही घडले होते का? सावरकरांशी संबंधित कागदपत्रांची छाननी करत असताना मला काही गोष्टी आढळल्या. स्वतःला ‘अगम्य गुरु’ म्हणविणारी एक व्यक्ती १७ फेब्रुवारी १९०६ दिनी पुण्यात आली होती. हे बुवा इंग्लंडला जाऊन विवेकानंदांप्रमाणे वेदांताचा प्रसार करुन आले होते. वेदांती, शिवाय इंग्लिश बोलणारे, त्यातून राष्ट्रीय विचारांचे; अश्या ह्या अगम्यगुरुंची लोकमान्यांवरही चांगलीच छाप पडली होती (लोकमान्य टिळक यांचे चरित्र, लेखक न. चिं. केळकर, उत्तरार्ध – खंड २, पृ. २०८). गंमत म्हणजे हे अगम्यगुरु चारचौघांमध्ये खूप बोलत, चर्चा करीत; पण प्रकट व्याख्यान कधीच देत नसत (तत्रोक्त). सावरकर त्यावेळी मुंबईस होते. पण अगम्यगुरुंमुळे हरखून गेलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी सावरकरांना विशेष निमंत्रण पाठवून बोलावले व त्याप्रमाणे सावरकर आणि अगम्यगुरुंची भेट झाली (स्वा. सावरकर चरित्र, लेखक धनंजय कीर, अनुवाद द. पां खांबेटे, आवृत्ती ३री – २००८, पृ. २९). ह्या भेटीत त्याने सावरकरांना आपले प्रवास, यौगिक शक्ती, ईश्वरी कृपा असे विषय रंगवून रंगवून सांगितले. शेवटी सावरकरांनी “तुमची राजकीय मते काय” असे स्पष्ट विचारल्यावर गुरुंनी सावरकरांकडे पैश्यांची मागणी केली (कीर, तत्रोक्त). त्यावरुन सावरकरांना अगम्यगुरुचे हेतू आणि त्याची एकूण झेप दोन्हींचाही अंदाज आला. ती भेट तिथेच संपली.

तुम्ही म्हणाल की याचा आपल्या विषयाशी काय संबंध? तर संबंध असा की, लोकमान्यांना मंडालेची शिक्षा सुनावली गेल्यावर त्याविरुद्ध प्रिव्ही कौन्सिलकडे दाद मागण्यासाठी कै. श्री. दादासाहेब खापर्डे आणि सातारचे तत्कालीन प्रसिद्ध वकील कै. श्री. दादासाहेब करंदीकर हे दोघेही इंग्लंडला गेले होते. याकाळात करंदीकरांनी आप्तेष्ट व सातारची मित्रमंडळी यांना पाठवलेली पत्रे १९३५ साली “Letters from England” नावे प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील २७/१०/१९०८ दिनी लिहिलेल्या पत्रात ते लिहितात –

‘(अगम्य गुरु) हे कारस्थानी गृहस्थ असावेत असा पोलिसांना संशय आला. त्यांच्या बोलण्यातही इंग्रजी राज्याविरुद्ध मजकूर फार येऊ लागला. अश्या संधीस यांचे घरी कोणी मोलकरीण होती तिजवर यांनी हात टाकला अशी त्या मोलकरणीने फिर्याद केली व इकडील बॅरिस्टर लोकांचे सल्ल्याप्रमाणे अगम्य गुरुंनी जबाब दिला. त्यासरशी त्यांस चार महिन्यांची सजा झाली. नुकतेच म्हणजे सरासरी १५ दिवस झाले ते सुटून आले. पहिल्या अंकाची इतिश्री झाली! आता त्यांचे पुढील क्रम ठरणार!’

म्हणजेच काय तर सावरकरांनी बलात्कार केल्याचा अथवा दुसरे लग्न केल्याचा कुठलाच समकालीन (हा समकालीन शब्द महत्त्वाचा! टिनपाट बिग्रेडी छचोर पिवळ्या पुस्तकांतल्या मजकूराला पुरावा म्हणत नाहीत!) पुरावा उपलब्ध नाही. एवढेच कश्याला, तर जहागिरदारांनी सावरकरांबाबत केलेल्या आरोपाशी प्रत्यक्षात सावरकरांचा नव्हे तर अगम्यगुरुचा संबंध होता. विनयभंगाची शिक्षा त्याला झाली होती. सावरकरांना नव्हे!

बिग्रेडी असले आरोप का करतात याचे कारण स्पष्टच आहे – सावरकरांची जात! पण जहागिरदारांसारख्या निवृत्त न्यायाधीशांनीही असा चुकीचा आरोप करावा? नजरचुकीने म्हणावे, तर सामान्य माणसाची नजरचूक होऊ शकते. सर्व बाजू पाहून न्याय करणं ज्याचं काम त्या न्यायाधीशांकडून नजरचूक झाली असेल, हे खरे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्याही हेतूंविषयी शंका येते. शिवाय अश्या शंकास्पद पुस्तकाचा कै. दाभोळकरांनी पुरस्कार केल्यामुळे त्यांच्याबद्दलही प्रश्नचिन्हच निर्माण होते. मला वाटते की, ह्या अगम्यगुरुच्या साम्राज्यद्रोही वर्तणुकीमुळे इंग्रजांनीच त्याला सदर आरोपात अडकवले असले पाहिजे. कारण, सुटून आल्यावर अगम्यगुरु अगदीच शांत झालेला दिसतो. ह्या अगम्यगुरुच्या नावाचा वापर करुन सावरकरांना अडकवण्याचा प्रयत्न बिग्रेडीच नव्हे तर इंग्रजांनीही केलेला दिसतो (Sedition Committee Report, पृ. ५). पण क्रांतिकार्याच्या बाबतीत सावरकर सगळ्यांचेच बाप होते. त्यांनी कधी पुरावाच मागे न ठेवल्यामुळे इंग्रजांना याहीबाबतीत हात चोळत बसावे लागले. पण इंग्रज परके होते. एका देशभक्तावर खोटेनाटे आरोप करुन त्याला अडकवणे हेच त्यांचे काम. पण बिग्रेडी काय अथवा जहागिरदारांसारखे स्वयंघोषित विचारवंत काय, जेव्हा हाच प्रकार करु पाहातात, तेव्हा भारतद्वेष्ट्ये इंग्रज आणि हे यांच्यात काहीच फरक उरत नाही! तेही भारताला धोका होते आणि त्यांच्यासारखेच वागणारे बिग्रेडीही भारताला धोकाच आहेत!!

पण आता बिग्रेडींनी सर्वांच्याच डोक्यात कीडा सोडून दिल्यामुळे मग सावरकरांचे चारित्र्य खरोखर नेमके कसे होते, खरेच का त्यांच्या आयुष्यात कुणी प्रेयसी होती; इ. प्रश्न उपस्थित होतातच. सावरकरांचे एका इंग्लिश तरुणीवर प्रेम होते व तिच्यापायीच ते पॅरिसहून इंग्लंडला आले व पकडले गेले अशी अफवा त्याकाळी इंग्रजांनी उठवली होतीच. हेतू एकच – चारित्र्यहनन करुन सावरकरांच्या कार्याचे महत्त्व जनमानसात कमी करणे. पण ती “अफवाच” होती, हे सावरकरांचे समकालीन चरित्रकार चित्रगुप्त (पृ. ९४) यांनी साधार स्पष्ट केले आहे. अर्थातच इंग्रजांनी भारतीयांमध्ये फूट पाडण्यासाठी जी अफवा पसरवली ती सत्यच असल्याचे स्वतःच्या जातीय स्वार्थापायी बिग्रेडी सांगत आहेत. यावरुनच त्यांचे हेतू लक्षात घ्यावे! याविषयावर प्रसिद्ध क्रांतिकारक व सावरकरांचे सहकारी कै. बॅ. ग्यानचंद वर्मा यांनी ०७/११/१९४२ दिनी एक मोठी मार्मिक टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, “सावरकरांच्या आयुष्यात प्रियतमा होती हे खरंय. त्यांच्या आयुष्यात असलेली एकमेव प्रियतमा म्हणजे केवळ आणि केवळ त्यांची मातृभूमीच फक्त”!! (स्वा. सावरकर चरित्र, लेखक शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. २६३). अर्थातच यानंतर कुणाही बुद्धीमंताच्या मनात कसलीच शंका राहायला नको! पण अर्थातच बिग्रेडी आणि बुद्धीमत्ता यांचा दूरान्वयानेदेखील संबंध नसल्याने आणि सगळ्याच गोष्टींमध्ये जात पाहाण्याची सवय लागल्यामुळे वर्मा किती जरी थोर क्रांतिकारक असले तरीदेखील शेवटी ‘वर्मा’च असल्यामुळे बिग्रेडींना त्यांचे मत न पटणे साहजिकच आहे. त्यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्या अरुणा असफअली यांचे पती, भारताचे अमेरिकेतील पहिले राजदूत आणि बिग्रेडींना गोड लागेल असे सेक्युलर नाव असलेल्या बॅ. असफ अली यांचे विधान देतो. बॅ. असफ अली म्हणतात (चित्रगुप्त, पृ. १२४), “सावरकरांच्या रुपाने साक्षात छत्रपती शिवाजीच साकार झाले होते”!! बसली ना पाचर? सावरकरांच्या धवल चारित्र्याचा याहून मोठा कोणता पुरावा हवा?

अंती मी सर्व वाट चुकलेल्या मित्रांना विनंती करतो की, बाबांनो काही लोक तुमचा केवळ जातीसाठी वापर करुन घेत तुमच्या हातून देशभक्तांवर गलिच्छ आरोप करवून देशाची मान खाली घालण्याचे पाप तुमच्या माथी मारताहेत. त्यांचा कावा ओळखा. वेळीच सावध व्हा. सावरकर असो वा अन्य कुणीही राष्ट्रपुरुष, ते काही केवळ आपल्या जातीसाठी लढले नाहीत. प्रसंगी आपल्या जातीचाच विरोध पत्करुनही ही मंडळी अवघ्या हिंदुस्थानासाठी लढली. हीन विचार करुन स्वतःच्याच कुळाला लाज आणू नका. त्यांच्याइतकं कार्य जरी करु शकलो नाही आपण तरी किमान त्यांच्या कार्याचा सन्मान तरी करा. खोटेनाटे आरोप चार दिवस टिकतात पण शेवटी सत्य बाहेर येतेच. आणि ते बाहेर आल्यावर आरोप करणाऱ्यावर कुणीही कधीच विश्वास नाही ठेवत. उगाचच लहानसहान स्वार्थापायी कायमची स्वतःची विश्वासार्हता घालवू नका. परंतु जे तुमचा वापर करताहेत, त्यांना मात्र मला जरा वेगळे सांगायचेय. मित्रांनो, तुम्ही सावरकरांवर शक्य होईल तेवढे अजून अजून खोटारडे आरोप करत राहा. त्यानिमित्ताने आम्हांला सावरकरांच्या दिव्य चरित्राचा अजून अजून अभ्यास करण्याची संधी मिळते. त्यांच्या विचारांचा प्रसार करता येतो. आम्ही अजूनच सतर्क होतो, सशक्त होतो! तुम्हीच जर नसता तर ह्या कार्यात जराशी का होईना पण सुस्ती आली असती, नाही का!!

— © विक्रम श्रीराम एडके
(संपर्क: www.vikramedke.com)

image

One thought on “सावरकर नव्हे, शिवाजीच साकार!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *