आरम्भ है प्रचण्ड!!

एप्रिल १७२०. सातारच्या अदालत राजवाड्यात दरबार भरला होता. क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर खासे शाहू छत्रपती उच्चासनावर विराजमान होते. त्यांनी एकवार समग्र दरबारावरुन नजर फिरवली. श्रीपतराव पंतप्रतिनिधी, आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, चिमणाजी दामोदर, अंबाजीपंत पुरंदरे, पिलाजी जाधवराव इ. मानकरी दरबारात मोठ्या इतमामाने हजर होते. फिरता फिरता शाहूंची नजर एकेठिकाणी अडली. अंमळ मागे दोन तरुण पोरे बसली होती. नुकतेच स्वर्गस्थ झालेल्या बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची ही मुले. त्यांच्यापैकी एक होता तो बाजीराव बल्लाळ! आणि दुसरा होता तो त्याचा धाकटा भाऊ चिमणाजी!! दोघांचीही उमर विशीच्या आतलीच. थोरल्या बाजीरावाला नुकतेच मिसरुड फुटले होते. धाकट्या चिमणाजीच्या चेहऱ्यावरची तर कोवळीकसुद्धा अद्याप गेली नव्हती. त्या दोघांना पाहाताच शाहूंना आपल्या कैलासवासी पेशव्यांची भयाण सय आली. त्यांच्या भुवया थरारल्या. काय काय म्हणून केलं नव्हतं त्या पेशव्यांनी दौलतीसाठी, स्वराज्यासाठी!! शाहू विचार करु लागले.

बाळाजी विश्वनाथ भट. त्यांच्या घराण्याकडे पिढीजात कोकणातील श्रीवर्धनची देशमुखी होती. त्यांचे थोरले बंधू तानोजी त्या कार्याकडे पाहात असताना हा कर्तबगार युवक त्याकाळी कोकणात दबदबा असलेल्या सिद्दींकडे कामास लागला. मानी माणसाची अज्ञानी माणसासोबत संगत झाली की स्फुल्लिंगे उडणारच! लवकरच सिद्दींच्या वागणुकीला कंटाळून बाळाजींनी नोकरी सोडली आणि ते नशिब काढण्यासाठी देशावर आले. तो काळ छत्रपती राजारामांचा होता. बाळाजी स्वकर्तृत्वाने शंकराजी नारायण सचिवांकडे चाकरीस लागले. हिरा कोपऱ्यात जरी पडून असला तरी त्याचे तेज सर्वत्र फाकतेच! अल्पावधीतच बाळाजींना रामचंद्रपंत अमात्यांनी आपल्या पदरी फडावर ठेवून घेतले. या चाकरीत बाळाजींनी असे काही कर्तृत्व गाजवले की, १६९९ च्या सुमारास त्यांना थेट पुण्याचीच सरसुभेदारी देण्यात आली. याच दरम्यान १७०२-०३ मध्ये बाळाजींनी सिंहगडावर मुघल फौजा चालून आल्या असता जवळजवळ ९ महिने गड लढवला!! पुढे २४ मे १७०२च्या पत्रावरुन असे दिसते की, बाळाजी हे सरसेनापती धनाजी जाधवांच्या चाकरीत होते.

औरंगज़ेब १७०७ साली वयाच्या ८८व्या वर्षी अहमदनगर येथे वारला. काफ़रांचे हिंदू राज्य बुडवायला आलेला आलमगीर त्याच काफ़रांच्या धरतीत पराभूत अवस्थेत गाडला गेला. याला कारणीभूत जसे छत्रपती संभाजी होते, तसेच नंतरच्या काळात छत्रपती राजाराम आणि इतर अनेकानेक सरदारही होते. या सगळ्यांमध्ये अत्यंत पराक्रमी होती ती महाराणी ताराबाई! बाईने अत्यंत कमी वयातही मुघलांशी असा काही चिवट लढा दिला की, ज्याचे नाव ते! पण त्या होत्या राजारामांच्या, म्हणजेच शिवरायांच्या धाकट्या मुलाच्या पत्नी. शिरस्त्यानुसार राज्यावर अधिकार संभाजींच्या मुलाचा. ही गोष्ट औरंगज़ेब पक्की जाणून होता. पण संभाजींचा वंशच नव्हे तर संभाजींची पत्नी महाराणी येसूबाईदेखील औरंगज़ेबाच्याच ताब्यात होत्या. त्यांना त्या धूर्ताने जिवंत ठेवलं होतं, तेच मुळी अश्या नाजूक क्षणासाठी. मरता मरता औरंगज़ेबाने या संभाजींच्या अग्रज वंशाच्या सुटकेची तजवीज केली. आणि इथून सुरु झाली ती आजवर परकीयांशी लढणाऱ्या मराठ्यांमधील यादवी! ताराबाई आणि शाहू एकमेकांविरुद्ध उभे ठाकले! शाहू ज्येष्ठ पुत्र, त्यामुळे साहजिकच बहुतांशी सरदार-मुत्सद्यांचा ओढा त्यांच्याचकडे होता. परंतु आजवर ताराबाईंनीही काही कच्च्या गोट्या नव्हत्या खेळलेल्या. त्यांच्याही बाजूला अनेक नामदार होते. या कुरघोड्यांचे पर्यवसान युद्धात झाले. ताराबाईंनी आधी “हे शाहू नव्हेतच” असा धुरळा उडवून देण्याचा प्रयत्न केला. तो फसल्यावर त्यांनी शाहूंवर आपले सरसेनापती धनाजी जाधव यांना फौजेनिशी धाडले. धनाजीही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. मुघलांना सळो की पळो करुन सोडणारा वीरवर तो! त्यांनी आपल्याकडची सर्वांत विश्वासू असामी खातरजमा करण्यासाठी पुढे धाडली! बाळाजीपंत!! बाळाजींनी आलेले शाहूच असल्याची नुसती खातरजमाच केली नाही, तर आपले धनी जाधवरावांना शाहूंचाच पक्ष न्यायाचा असल्याचेही व्यवस्थित पटवून दिले. परिणामी, स्वतः दौलतीचे सेनापतीच शाहूंना येऊन मिळाले! यथावकाश सोमवार, माघ शुक्ल प्रतिपदा, शके १६२९ अर्थात दि. १२ जानेवारी १७०८ या दिनी शाहूंचा राज्याभिषेक झाला. या सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती ती बाळाजीपंतांचीच. याची शाहूंनाही व्यवस्थित जाणीव असल्याने पुढे धनाजींच्या मृत्यूनंतर त्यांनी बाळाजींना “सेनाकर्ते” पद दिले व सैन्याची विस्कटलेली घडी बसविण्याची कामगिरी सोपवली. बाळाजींनीही स्वामीआज्ञा शिरसावंद्य मानून ही नवी जबाबदारी निष्ठेने पार पाडली. यात त्यांना मदत झाली ती त्यांचे स्नेही अंबाजीपंत पुरंदरेंची, तसेच बारामतीकर नाईक-जोशी व चासकर जोशी या सावकारांची. यांपैकी बारामतीकर जोश्यांना त्यांनी आपली थोरली मुलगी भिऊबाई विवाहाने दिली तर चासकर जोश्यांची मुलगी लाडूबाई हिला आपल्या थोरल्या मुलासाठी म्हणजेच बाजीरावांसाठी सून करुन आणली. लग्नानंतर तिचे नाव ठेवले काशिबाई!

दरम्यानच्या काळात सेनाकर्ते बाळाजीपंत यांनी मोठ्या प्रमाणावर मोहीमा करुन शाहूस्वामींची गादी बळकट केली. याच सुमारास पेशवे बहिरोपंत पिंगळे व खंडो बल्लाळ चिटणीसांना कोल्हापूर गादीचे सरखेल कान्होजी आंग्रेंनी कैद केले. शाहूंच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आता युद्धाशिवाय पर्याय नव्हता. परंतु तत्पूर्वी रिक्त असलेले पेशवेपद भरायला हवे. शाहूंनी आनंदाने सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवाई दिली. आणि अश्याप्रकारे स्वराज्याला पहिलेवहिले कोकणस्थ पेशवे लाभले! दिनांक होता १७ नोव्हेंबर १७१३ आणि स्थान होते पुण्याजवळील मांजरी!! शाहूंनी बाळाजीपंतांना पुण्याजवळचे खेड, शिरुर, जुन्नर, वडगाव, आंबेगाव, दौंड, सासवड, सुपे, इंदापूर, बारामती, भोर, वेल्हे, पौड, मावळ, मुळशी आणि पुणे असे एकूण १६ महाल दिले. पुरंदर आणि सिंहगड हे दोन किल्ले दिले. त्याशिवाय सालीना तनखा १३ हजार होन देऊ केला. परंतु पेशवाई प्राप्त झाल्यानंतरची तातडीची मोहीम काही सोपी नव्हती. समोर उभे ठाकले होते अवघ्या कोकणावर सत्ता चालविणारे कान्होजी आंग्रे! इंग्रज, मुघल, पोर्तुगिझ, सिद्दी सारे सारे ज्यांना वचकून असत ते सरखेल कान्होजी आंग्रे!! खरा लढवय्या रणाग्रणी!! पेशवे बाळाजी फौज घेऊन निघाले खरे. परंतु त्यांनी वाटेत वेगळाच डाव टाकला. त्यांनी आपला एक दूत कान्होजींकडे रवाना केला. कुलाब्याला बोलाचाली झाली. आणि बाळाजींच्या अपेक्षेप्रमाणे कान्होजींनी त्यांना भेटीसाठी आमंत्रित केले. या भेटीत बाळाजीपंतांनी कान्होजींच्या स्वामीनिष्ठेला असे काही मजबूत आवाहन केले आणि कोकणप्रांतावर वचक ठेवण्यासाठी ताराबाईंचा पक्ष कसा कमकुवत आहे हे एवढ्या काही खूबीने पटवून दिले की, युद्ध करावयास आलेले कान्होजी भेटीअंती थेट शाहूंच्याच पक्षात सामिल झाले. हा बाळाजींच्या मुत्सद्देगिरीचा अतुलनीय विजय होता. रक्ताचा एकही थेंब न सांडता ते युद्ध तर जिंकले होतेच, शिवाय कान्होजींसारखे खरेखुरे सोनेदेखील त्यांनी गळाला लावले होते. या प्रकरणानंतर तर बाळाजींचा दरबारातील मान अजूनच वाढला. पुढे बाळाजींनीच विविध राजकारणे करुन राजारामांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांचे पुत्र संभाजी यांना कोल्हापूरच्या गादीवर बसवले व आपला विरोधी पक्ष कायमचाच खिळखिळा करुन टाकला!!

यासुमारास मुघल दरबारातही जरादेखील स्थैर्य नव्हते. १७१२ साली बादशाह बहादुरशाह मृत्यू पावला. त्याच्यानंतर त्याचा मोठा मुलगा मुहिउद्दीन हा जहाँदरशाह नावाने गादीवर बसला. अर्थातच आमच्या देशातील खोटे विचारवंत ज्या मुघलसाम्राज्याला गंगाजमनी तहज़ीबचे बाशिंदे समजतात त्या गंगाजमनी तहज़ीबचे पालन करुनच – म्हणजेच सख्ख्या भावांचा खून पाडूनच! या नीच संस्कृतीचे गोडवे गाणारे आमच्याकडचे कुलघातकी विचारजंत त्याचवेळी श्रीरामांच्या माघारी भरताने त्यांच्या पादुका सिंहासनी ठेवून राज्य केले त्या हिंदू संस्कृतीचा अवमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असो. तर या सर्व प्रकारात जहाँदरशाहचा पुतण्या फर्रुखसियर याचा बापही मारला गेला. त्यामुळे चवताळून त्याने बादशाहवर चाल केली व जानेवारी १७१३ मध्ये जहाँदरशाहला मारुन राज्य मिळवले. त्याला राज्य मिळवण्यासाठी मदत केली ती सय्यद अब्दुल्लाखान बाराहा आणि सय्यद हुसैनअलीखान बाराहा या दोन सय्यद बंधूंनी. हे दोघे शिया होते. मुघलांचे सुन्नी तख़्त उलथून तिथे स्वतःची शिया राजवट सुरु करायचा त्यांचा डाव होता. या सगळ्यात महत्त्वाचा अडसर होता तो दरबारातला पाताळयंत्री सरदार चिन किलिच खान ऊर्फ निज़ाम-उल-मुल्क़! सय्यद बंधूंनी १७१३ साली मोठ्या हुशारीने निज़ामला दख्खनच्या सुभेदारीवर धाडून दिले. आता त्यांचा हात धरणारा अवघ्या दिल्ली दरबारात कुणीच नव्हता. परंतु सय्यद बंधूंचे वाढते वजन फर्रुखसियरला बरोब्बर समजत होते. या बंधूंची ताकद एकत्र असण्यातच आहे, हे त्याने ओळखले. आणि व्यवस्थित डाव टाकून त्याने १७१५ साली सय्यद हुसैनअलीला निज़ामच्या जागी दख्खनच्या सुभेदारीवर नेमले. इथे बादशाहने एकाच दगडात दोन पक्षी मारले होते. एक सय्यद बंधूंना वेगळे केले. आणि दोन, दख्खनसारख्या दिल्लीपासून दूरस्थ भागात मुघलांच्याच साधनसामुग्रीवर स्वतःची राजवट स्थापू पाहाणाऱ्या निज़ामलाही शह दिला!! निज़ामची रवानगी माळव्याला करण्यात आली. थंड डोक्याच्या निज़ामने ती सहजपणे स्वीकारली.

इकडे फर्रुखसियर आणि सय्यद अब्दुल्लाखान यांच्यातील तणाव वाढत गेला. सय्यद अब्दुल्लाने आपल्या बंधूला ताबडतोब ससैन्य बोलावले. त्याच्याकडे ५० हजार फौज होती. शाहूंनी मोठ्या हुशारीने पेशवे बाळाजीपंतांना ५० हजार फौजेनिशी त्याच्या मदतीला दिले. बदल्यात सय्यद बंधूंनी रोजचे ५० हजार रुपये याप्रमाणे दरमहा १५ लाख रुपये मराठी फौजांना देण्याचे मान्य केले. इतकेच नव्हे तर दख्खनच्या विजापूर, बिदर, वऱ्हाड, खानदेश, औरंगाबाद आणि हैद्राबाद अश्या ६ प्रांतांची चौथाई-सरदेशमुखी देण्याचेही आश्वासन दिले. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मोहीमेच्या यशानंतर साक्षात राजमाता येसूबाईसाहेबांची सुटका होण्याचेही वचन देण्यात आले. सर्व बाजूंनी लाभदायी अश्या या मोहीमेत बाळाजींनी आपले थोरले पुत्र बाजीरावांनाही सोबत ठेवले होते. त्यांचे वय त्यावेळी अगदीच १८-१९ वर्षांचे असेल. परंतु त्यांना शाहूंनी सरदारकी बहाल केलेली होती. अश्या या सय्यद आणि मराठा संयुक्त फौजांनी १६ फेब्रुवारी १७१९ ला दिल्लीदरवाजावर धडक दिली. या वज्राघातापुढे मुघल साम्राज्याचा मत्त हत्ती गडबडला. बादशाहने तहाची बोलणी आरंभली. सय्यद बंधू आणि बाळाजीपंत यांनी मोठ्या हुशारीने एक तोतया उभा करुन त्याच्या जोरावर बादशाहकडून मराठ्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या. २८ फेब्रुवारीला जराश्या वादाचे निमित्त होऊन हुसैनअलीने बादशाहचे डोळे काढले आणि त्याला तुरुंगात कोंबला व त्याच्याजागी रफ़िउद्दरजत नावाच्या एका पोराला गादीवर बसवले. जवळजवळ ३० वर्षांनंतर शंभूराजांच्या अर्धांगिनी महाराणी येसूबाईसाहेबांनी स्वतंत्र श्वास घेतला.

हे यश निश्चितपणे बाळाजींच्या मुत्सद्देगिरीचेच होते. शाहूमहाराज बेहद्द खूश झाले. त्यांनी ४ जुलै १७१९ला दरबार भरवून पेशवेसरकारांना ५ महाल इनाम दिले. वाटले आता स्थैर्याचे दिवस येतील. पेशव्यांना चांगले दिवस येतील. गेली २० वर्षे त्यांनी अपार कष्ट करुन स्वराज्य बळकट केले होते. पण यानंतर अवघ्या काही महिन्यांतच पेशवे अतिशय आजारी पडले. मराठा साम्राज्याच्या दुर्दैवाने बाळाजीपंत २ एप्रिल १७२० यादिवशी निजधामी गेले आणि शाहूंनी बहाल केलेले पेशवेपद पुन्हा एकवार रिक्त झाले! या पदावर कुणाचीतरी निवड होणे दौलतीसाठी आवश्यक होते. कपटी निज़ाम पुन्हा एकवार दख्खनचा सुभेदार बनला होता. काळ मोठा बाका होता. त्यावरच तर विचारविनिमय करण्यासाठी आजचा दरबार भरविण्यात आला होता.

पंतप्रतिनिधींसारख्या बाळाजींच्या विरोधकांनी पेशवेपदासाठी चिमणाजी दामोदर मोघ्यांचे नाव सुचवले. ते अनुभवी होते. मुत्सद्दी होते. परंतु वडलांच्या मृत्यूने रिक्त झालेले पद मुलास देण्याचा मराठी दौलतीचा शिरस्ता बनला नव्हता का? शाहूंनी पुन्हा एकवार बाजीरावांवर नजर टाकली. विविध मोहीमांनी रापलेला तरुण. चेहऱ्यावरची कोवळीक कुठल्याकुठे निघून गेली होती. परंतु त्याची जागा असीम तेजाने घेतली होती. आधीच गौर असलेला वर्ण झळाळून निघाला होता. व्यवस्थित वस्त्रावरणांतूनही जाणवणारे दंड त्याच्या सामर्थ्याची जाणीव करुन देण्यास पुरेसे होते. रुंद छाती त्याच्या निडरतेची कहाणी सांगत होती. पगडीच्या आत दडलेली परंतु मस्तकी विराजमान शिखा त्याच्या संस्कार आणि निष्ठेची साक्ष पटवित होती. तो लहान होता. अननुभवी होता. परंतु राज्य मांडावयास घेतले तेव्हा शिवछत्रपतीदेखील लहानच नव्हते काय? मात्र काही दरबारी मंडळींचे मत तर त्याच्याविरुद्धच होते. शाहूमहाराज विचारमग्न झाले. त्यांनी धावडशीच्या ब्रह्मेंद्रस्वामींचा सल्ला घेतला. आणि गुरुवार, चैत्र शुक्ल सप्तमी, शके १६४२, शार्वरीनाम संवत्सर अर्थात १८ एप्रिल १७२० यादिवशी कराडजवळील मासूर येथे श्रीमंत बाजीराव बल्लाळ यांस पेशवाईची वस्त्रे प्रदान केली. अनेकांची नाके मुरडली गेली. परंतु बाजीरावांनी स्वामींस विश्वास दिधला, “आम्ही तो सरकारचे चाकर. जिकडे हुकूम होईल तिकडे जाऊ. आपण शत्रूची भीती बाळगू नये. मोगल म्हणजे काय? आज्ञा झाली असता मोठ्या काळाच्या तोंडातदेखील जाऊन, सरकारचे पुण्यप्रतापे करुन त्याचा बंदोबस्त करुन येऊ”! हे बोल ऐकून शाहूंना अतिशय हर्ष झाला. त्यांनी स्वहस्ते राऊंच्या मस्तकी पगडी चढवली. आणि दरबार गर्जून उठला – “श्रीशाहूनरपति हर्षनिधान, बाजीराव बल्लाळ मुख्यप्रधान”!!

— © विक्रम श्रीराम एडके
*लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
(लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)
संदर्भ —
१) Advanced Study in the History of Modern India 1707-1803 : Mehta
२) Bajirao 1 – An Outstanding Cavalry General : Palsokar
३) पेशवाई – कस्तुरे
४) झंझावात – बेडेकर
५) अजिंक्ययोद्धा बाजीराव – साळगावकर

image

2 thoughts on “आरम्भ है प्रचण्ड!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *