अब ये चने हिंदू हैं..!!

लहानश्या जागेत दाटीवाटीने विद्यार्थी बसले होते. एक एक विद्यार्थी म्हणजे निर्ढावलेला बदमाष. कुणी चोर तर कुणी दरोडेखोर, कुणी बलात्कारी तर कुणी खुनी. प्रत्येकाचे गुन्हे वेगळे आणि त्या गुन्ह्यांमागची कथाही वेगळी. परंतू त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती – काळे पाणी! होय, ते सारेच्या सारे अट्टल गुन्हेगार काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवण्यात आलेले कैदी होते! इथं यायचं, शिक्षा भोगायची, नशीब असलं तर परत जायचं नाहीतर इथेच राम म्हणायचा; अशी अवस्था. ममं बोथट झालेली आणि जाणीवाही! परंतू या अज्ञानतिमिरात अचानकच एक उषेचा, नव्हे नव्हे – आशेचा किरण डोकावू लागला होता – “बडे बाबूं”च्या रुपाने! जगासाठी असतील ते बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, परंतू अंदमानातल्या त्या विक्राळ सेल्युलर जेलमधील सहस्रों कैद्यांसाठी ते त्यांचे प्रेमळ गुरु, मार्गदर्शक, मित्र, आई-वडील; अक्षरश: सारे काही असलेले “बडे बाबू” होते. हे बडेबाबू त्यांना चांगला मार्ग दाखवत, चार समजुतीच्या गोष्टी सांगत. वाणी तर इतकी आर्त होती त्यांची की अक्षरश: दगडालाही पाझर फुटावा; परंतू तेच बडेबाबू नुसते समोर उभे जरी राहिले तरी बारीसारखा सैतानही थरथर कापू लागे! सगळ्यांना बडेबाबूंबद्दल आदर. पण म्हणून काय त्यांनी आम्हां कैद्यांना शिकवायला सुरुवात करायची? काय करायचंय शिकून? तेही या वयात आणि अश्या अवस्थेत. पण सांगितलं ना की बडेबाबूंची मोहिनीच अशी काही जबरदस्त होती की मी-मी म्हणणारे खतरनाक कैदीही निमूटपणे शेळी होऊन त्यांच्यासमोर बसून शिक्षणाचे धडे गिरवू लागले; एवढेच नव्हे, तर त्यांना शिक्षणाची गोडीसुद्धा लागली. कैदी त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यांच्याच तर शब्दाखातर सगळ्यांनी हिदू-धर्मात पिढ्यानपिढ्या चालत आलेला विटाळ सोडला होता. सर्वजण आता एकत्र राहात, खात-पित, काम करत. बडेबाबू अक्षरश: देव होते त्यांच्यासाठी!

सारे कैदी पाट्या सरसावून बसलेले. आज बडेबाबू काय शिकवणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले. शिकवायला सुरूवात करण्यापूर्वी बडेबाबूंनी एकवार सगळ्यांवर नजर फिरवली.

“अरे रामधारी, क्या हुआ? आज पढनेका मन नहीं हैं क्या?”

बडेबाबूंच्या अचानक आलेल्या या सवालामुळे रामधारी दचकला. कसनुसे हसत म्हणाला,
“नहीं नहीं बडेबाबू, वैसी कोई बात नहीं. आप सिखाओ”.
“पण मग तुझा चेहरा असा उतरलेला कश्यामुळे? आणि तुझाच कश्याला, सगळ्यांचेच चेहर्‍यावर आज मलूल वाटतायत मला. काय झालं?”

आपल्या अडचणींचा त्रास बडेबाबूंना का द्यायचा? पण ते एवढे विचारताहेत तर सांगायला तर पाहिजेच. त्यामुळे एक कैदी अंमळ चाचरतच बोलू लागला,
“का बताए बडेबाबू.. तुम्हाला तर माहितीच आहे की इथे अंदमानात रोज कोळसा लागतो. त्या कोळश्यांची पोती जहाजे भरभरून रोज दाखल होतात. आम्हांला सगळ्यांना सध्या कोळसे उतरवण्याचं काम दिलेलं आहे. मोठं श्रमाचं काम आहे. त्यात वेळ खूप लागतो म्हणून आम्हाला दुपारी जेवण देत नाहीत. त्याऐवजी काही चणे-फुटाण्यांची पोती पाठवतात. आता हिंदू आणि मुसलमान एकाच पोत्यातून चणे कसे खातील? त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी पोती पाठवतात. पूर्वी तर हिंदूंच्याही वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळी पोती असायची, पण तुम्ही समजावल्यापासून आता आम्ही सारे हिंदू एकत्रच खातो”.

बडेबाबूंच्या चेहर्‍यावर समाधान पसरले. त्यामुळे त्या कैद्याला बोलण्यासाठी जरा धीर आला.

“परवा पोती आली तर सारे मुसलमान कैदी मुसंडी मारून पळाले. त्यांनी आपली पोती फोडली. पण त्यांच्यातले काही हिंदूंची पोती फोडून त्यांतूनही फुटाणे खाऊ लागले. मोठाच विटाळ झाला, बडेबाबू! मुसलमानांनी विटाळलेल्या फुटाण्यांना आम्ही कसे काय शिवणार? आम्हांला सगळ्यांनाच उपास घडला त्यादिवशी. आम्ही जमादाराकडे तक्रार केली, तर तोही मुसलमानच! तो नुसताच हसू लागला..
कालही तोच प्रकार. गोऱ्या साहेबांकडे तक्रार केली तर म्हणतात, तुमचे तुम्ही निस्तरा. मुसलमानांना समजावले तर म्हणतात, ‘आम्ही आधी हात लावला आता ते फुटाणे मुसलमान झाले; तुम्हाला खायचे तर खा, पण खाल्ले तर तुम्ही पण मुसलमान व्हाल’. बरोबरच तर आहे बडेबाबू त्यांचे. विटाळलेले अन्न खाल्ले तर आमचाही धर्म बुडणारच ना. त्यामुळे काल पण उपास. आज पण उपास. रोज उपाशीपोटी काम करावं लागतंय आम्हाला”.

पाहातापाहाता बडेबाबूंच्या नजरेत अंगार पेटले. बडेबाबूंचा सगळ्यांनाच धाक. त्यामुळे सारे कैदी पार घाबरून गेले. रागाला आवर घालीत, पण तो न लपवता बडेबाबू बोलू लागले,

“तुमच्या या विटाळाच्या खुळचट कल्पनांपायी हिंदू धर्म अक्षरश: नष्ट व्हायची वेळ आलीये, तरी तुमच्या काहीच लक्षात येत नाही का? अरे, धर्माचं स्थान ह्रदय असतं, पोट नव्हे हे कधी कळणार तुम्हाला? मुसलमानांनी तुमचं खाल्लं, ख्रिश्चनांनी तुमचं खाल्लं – ते सारेच धष्टपुष्ट झाले – तेही त्यांचा धर्म अबाधित राखून. तुमचा मात्र धर्म बुडतो म्हणे!
पूर्वीच्या काळीही मुसलमानी फौजा हिंदूंच्या रसदीवर गायीचे रक्त शिंपडायच्या आणि म्हणायच्या की पहा सारे अन्न बाटले. हिंदू फौजा उपाशीपोटी काय लढणार? हरायच्या! कित्येकदा तर न लढताच. असेच एकदा मुसलमानांनी रसद लुटून त्यावर गोरक्त शिंपडले. याहीवेळी हार निश्चित होती हिंदूंची. पण यावेळी हिंदूंचा सेनापती कुणीतरी नवाच होता. त्याने ताबडतोब काही सैनिकांना आसपासच्या गावातून डुकरं मारून आणण्याचा हुकुम दिला आणि त्यांचे रक्त त्या रसदीवर शिंपडले. हिंदूंना पवित्र असलेल्या गायीचे रक्त शिंपडल्याने जर अन्न बाटत असेल, तर मुसलमानांना निषिद्ध असलेल्या डुकराचे रक्त शिंपडल्याने ते पुन्हा शुद्ध झालेच पाहिजे. साऱ्या सैनिकांना हा युक्तिवाद पटला. त्यांनी आनंदाने भोजन केले. शत्रूवर तुटून पडण्याआधी त्या सेनापतीने मग शत्रूच्या रसदीवर हल्ला करायचा हुकूम दिला आणि त्यांच्या साऱ्या रसदीवर डुकराचे रक्त शिंपडायला लावले! इतिहासात बऱ्याच वर्षांनी असं घडलं की ती अवघी मुसलमान सेना न लढताच हरली, तीही उपाशीपोटी!! तो सेनापती कोण होता माहितीये? तो होता वीर बंदा बहाद्दर!
आज आपल्याला अश्या एक नव्हे, शेकडो-सहस्रो बंदाबहाद्दरांची आवश्यकता आहे. परिस्थितीच बिकट आहे तितकी! पण तुम्हाला तर विटाळाचे डोहाळे लागलेले! अरे विटाळाच्या वेडापायी उपाशी मरण्यापेक्षा जरा बंदाबहाद्दराचा आदर्श धरा. शत्रूला त्याच्याच उपायाने संपवा. तरच टिकाल. अरे, परधर्मीयाच्या हातचे खाऊन जर तुम्हाला तुमच्या धर्माचाच रेच होत असेल, तर असा तकलादू धर्म काय कामाचा? जरा धर्माचा कोठा मजबूत करा. दाखवून द्या अवघ्या जगाला की मी मुसलमानाचे खातो, मी ख्रिश्चनाचे खातो तरीही तितकाच पवित्र, तितकाच शुद्ध हिंदू राहातो!”

“हे सारे पटतेय हो आम्हाला बडेबाबू. पण बंदाबहाद्दराचा आदर्श ठेवायचा म्हणता, शत्रूचा वार त्याच्यावरच उलटवायचा म्हणता तर आम्ही काय केले पाहिजे ते तरी सांगा? ही तुमची समजदार भाषा आम्हाला नाही कळत. पण आमचा सगळ्यांचा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही सांगाल ते करू आम्ही!!”

“असे म्हणता? ऐका तर मग..” आणि सावरकर हळू आवाजात सांगू लागले.

दुसरा दिवस उजाडला. अंदमानच्या किनाऱ्यावरील त्या दमट वातावरणात कोळसा उतरवणाऱ्या त्या कैद्यांची शरीरे घामाने अक्षरश: न्हाऊन निघाली होती. सर्वांगाला कोळसा लागलेला. ऊन डोक्यावर येईपर्यंत काम चालले. जेवणाची सुटी झाली तसा हिंदूंचा जथ्था पळत-पळत आपल्या फुटाण्यांच्या पोत्यांकडे निघाला. पण हे काय? त्या जथ्थ्यातून फुटून एक गट मुसलमानांच्या पोत्यांकडेही निघालेला, तोही मुसलमान कैदी पोहोचण्याआधीच! त्यांच्यापैकी काहींनी मुसलमानांची पोती फोडून मुठी भरभरून फुटाणे फस्त करायला सुरुवात केली.

“ऐ.. ऐ.. क्या करता हैं”, ओरडत एक मुसलमान कैदी धावून आला तो एक-दोघा ठाकूरांनी त्याला जागीच रोखले!
“क्या करता हैं म्हणजे? हम चने खाता हैं!”
“चने खाना हैं तो अपने खाओ ना. ये तो मुसलमान चने हैं”.
तोवर तिथे मुसलमान कैद्यांचा मोठ्ठा घोळका जमा झालेला. हिंदू आमची पोती फोडून खातात म्हणजे काय? हिंदूही गोळा होऊ लागले.
“अब काहे के मुसमलमान चने मियाँ? हमनेतो छू लिया इनको. तुम्हारे छुनेसे जैसे हिंदूओंके चने मुसलमान बन जाते हैं, वैसेही हमारे छुनेसे ये सारेके सारे चने अब हिंदू हो गये हैं! और हिंदूओंको हिंदू चने खानेमें क्या परेशानी? वैसे तुम लोग चाहो तो तुम भी हमारे साथ खा सकते हो. लेकीन ध्यान रखना, ये अब हिंदू चने हैं. इनको खाओगे तो तुम भी हिंदू बन जाओगे!”

काहींनी पुढे सरसावून धक्काबुक्कीचा प्रयत्न केला, पण हिंदूंची बहुसंख्या पाहून बाकीच्यांनी त्यांना थांबवले. चरफडत उपाशी परत जाण्याखेरीज त्या मुसलमान कैद्यांकडे काहीच पर्याय उरला नव्हता. त्यांची पाठ वळली आणि अंदमानचा तो किनारा भल्यामोठ्ठ्या आवाजातल्या घोषणांनी दुमदुमून गेला,
“भारतमाता की जय! वीर सावरकर की जय!! बडे बाबू जिंदाबाद!!!”

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख/कथा वाचण्यासाठी, सावरकरांवरील व्याख्याने ऐकण्यासाठी वा लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा – www.vikramedke.com)

image

2 thoughts on “अब ये चने हिंदू हैं..!!

  1. apratim lekh ahe….ani uttam udaharan ahe ki hindu ha hinduch asto kutlyahi parstit vichar karunch tya goshticha swikar athava nakar kela pahije.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories