अनादि मी.. अनंत मी..!!

दिवस आहे की रात्र हे न समजण्याइतका अंधार. आणि त्या अंधारवस्त्राला उभा फाडत जाणारा “कर्र.. कर्र..” असा सातत्यपूर्ण आवाज! कसला आवाज आहे हा? कसला आवाज आहे? ‘महाराजा’ नौकेचा तर नव्हे? की ‘मोरीया’चा? नाही नाही! हा नौकेचा आवाज तर खासच नव्हे! मग कसला आवाज हा? इंग्लंडमधील आलिशान बग्गीचा? नाही! मग आपल्या नाशकात असतो तश्या छकड्याचा? नाही नाही!! कोलूचा आवाज आहे हा! होय कोलूचा!! गेले ७ दिवस फिरवतोय नाही का मी हा कोलू!! ७ दिवस की ८? की ९? छे! काहीच समजत नाही.

कर्र.. कर्र..!

घाण्याला जुंपलेल्या बैलालाही विश्रांती असते. मला विश्रांती कधी मिळाली होती? पुण्यात विदेशी कापडांची होळी पेटवायची होती, तेव्हा असेच ७-८ दिवस राबलो नव्हतो का आपण? टिळकांनी केवढे तरी कौतुक केले होते आपले!! त्यावेळी पाठीवर पडलेली कौतुकाची थाप विश्रांती होती का?

कर्र.. कर्रर्र…!

की इंग्लंडमध्ये जीवाची जोखीम पत्करून पहिला बॉम्ब बनवला होता, त्यावेळी ‘विश्रांती’ लाभली होती आपल्याला? नाही नाही! त्यावेळी तर दिवसभर बॅरिस्टरकीचा अभ्यास, संध्याकाळी बॉम्ब-पिस्तुलांची जुळवाजुळव, त्यानंतर भारत-भवनातल्या चर्चा-बैठका-व्याख्याने, त्यातून जरा वेळ मिळाला की ग्रंथालयात जाऊन काढलेली टिपणे आणि केलेले ग्रंथलेखन! जिथे झोप धड मिळत नव्हती, तिथे विश्रांती कुठली मिळायला? त्याच धावपळीत तर धिंग्राचा निषेध करणारी सभा उधळली नव्हती का आपण! मग केवढी तरी धावपळ, धरपकड..! भर लंडनमध्ये कुणीच आसरा देईना, प्रकृती तर ढासळतच चाललेली.. कित्येक रात्री रस्त्यावरच उपाशीपोटी झोपून नाही का काढल्या आपण? लंडनहून ब्रायटन, ब्रायटनहून पॅरीस!! आराम लाभेना, तिथे विश्रांती कुठली मिळायला?

कर्र.. कर्र..!

याच काळात प्रभाकर गेला ना माझा? प्रभाकर.. माझा प्रभाकर..! एवढास्सा जीव.. गेला! अंत्यदर्शनाचेही भाग्य नाही लाभले आपल्याला आणि म्हणे विश्रांती..!!

कर्र.. कर्रर्र..!!

ना खटला चालला तेव्हा विश्रांती लाभली, ना मार्सेल्सला उडी टाकून ब्रिटीश साम्राज्य मुळापासून हादरवून सोडलं तेव्हा, ना अंदमानात आलो तेव्हा!! कधी लाभणार ही विश्रांती? तीस पौंड तेल काढेन तेव्हा? नाही! त्यानंतर लगेच छिलका कुटायला बसवतील! मग छिलका कुटल्यावर मिळेल का विश्रांती? नाही त्यानंतर जंगलतोड! मग कधी मिळेल विश्रांती? कधी मिळेल?

“कधीच नाही”, आवाज आला. कुठून आला? समोर पाहिले तो मीच! तोच तो कोलू फिरवताना घामाने लडबडलेल्या शरीरावर भुसा आणि घाण उडालेल्या; उघड्या-वागड्या, घामट शरीराचा मी! “डि” फॉर “डेंजरस” बिल्ला गळ्यात अडकवलेला बॅ. विनायक दामोदर सावरकर!!

मीच माझ्यासमोर उभा आहे? इतका किळसवाणा आहे मी? आणि काय म्हणतोय? कधीच विश्रांती नाही मिळणार मला?

“होय, कधीच मिळणार नाही. जिवंतपणी तरी कधीच विश्रांती मिळणार नाही तुला. परंतु तुला विश्रांती मिळू शकते! मेल्यावर!! मर! मर!! मग बघ विश्रांतीच विश्रांती”!!

“खोटं बोलतोय तो”!! पुन्हा तोच आवाज, तसाच आवाज! पण विरुद्ध दिशेकडून! कोण आहे हा? अरे हादेखील मीच! काय म्हणतोय मी?
“खोटं बोलतोय तो! फुकट मरण्यासाठी नाही जन्म तुझा”!

यावर ‘पहिला मी’ कुत्सित खिदळला –
“हाहाहाहाहा.. अरे मग काय ठेवलेय असले दु:ख सोसून जगण्यात? ह्या तुझ्या शरीराचा आणि कर्तृत्वाचा राष्ट्रेच्या राष्ट्रे उदयास आणण्यासाठी उपयोग व्हावा, ते तर आता मातीमोल ठरलेयत! मग ह्या अंधारात उगीच कष्टत कश्याला पडतोस? ह्या तुझ्या कष्टांचा तुझ्या मातृभूमीच्या उद्धारासाठी आता कवडीचाही उपयोग नाही! अरे, तिकडे तुझ्या ह्या हालअपेष्टांचे अवाक्षरही कळत नाही, मग त्याचा नैतिक परिणाम होणे तर दूरच! भार आहे तुझे हे जिणे, निव्वळ भार! भाऽऽरऽ!! मग कश्याला धरून बसतोस त्याला? टाक संपवून! दोरीचा एकच हिसका फक्त! आणि मग विश्रांतीच विश्रांती”!!

“अरे हट्”, ‘दुसरा मी’ उसळला,
“वेड्या, अहंकार आहे हा तुझा! अहंकार! म्हणे राष्ट्रेच्या राष्ट्रे उदयास आणणारे कर्तृत्व अन् शरीर! अरे, हे दोन्हीही आत्ता निरुपयोगी खरे, पण अरे, केवळ तुझंच शरीर आणि कर्तृत्व बंदीगृहाची भीषणता सहन करू शकतं म्हणून त्या जगन्नियंत्याने तुला हा बंदीवास दिला नसेल कश्यावरून? अरे देशस्वातंत्र्याच्या संग्रामात कित्येक ठाणी लढवावी लागतात. त्यातले ‘बंदीगृहा’त कष्टत पडण्याचे ठाणे केवढे तरी महत्वाचे! अरे असे महत्वाचे ठाणे लढविण्याची जबाबदारी परमेश्वराने तुझ्या शिरावर टाकली आहे”!!

‘खरा मी’ दिङमूढ होऊन ऐकत होतो. इतक्यात भोवळ आली. मट्कन खाली बसलो! अर्ध्या उपाशी पोटात आतडी ताठरून आली होती अक्षरशः! सरकत सरकत, खुरडत खुरडत; भिंतीशी गेलो. टेकलो. डोळे मिटले, तर तिथल्या तिथेच गाढ गुंगी लागली!! इतकी गाढ की, दचकून जागा झालो तर स्थळ-काळ, दिशा-बिशा, चारपाच मिनिटे काही कळेचना! शांत, शून्य, निर्विकार अश्या कोणत्यातरी सुखद अवस्थेत ‘काही नाहीसे’ होऊन राहिलो! थोड्या वेळाने सावध झालो. उठलो. पुन्हा कामास लागलो. तर ‘पहिला मी’ मोठमोठ्याने हसत होता. मनसोक्त हसून घेतल्यावर म्हणाला,
“हे आजचे काम, तुझे शेवटचेच काम का ठरू देत नाहीस? आज.. आज रात्रीच.. दोरीचा तुकडा घे आणि करून टाक या कष्टांचा अंत! अरे, मघाची ती सुखद शून्यता, हाच मृत्यू!! तू संपला की जगही संपले”!!

‘खरा मी’ खिडकीच्या गजाकडे, त्या फाशीचा दोर टांगण्यास सोयीस्कर गजाकडे लुब्ध नजरेने पाहू लागलो. मनात मघाशीच्या शुन्यतेच्या सुखस्मृतींची तंद्री लागली. पण क्षणभरच!

तंद्री भंगली ती ‘दुसरा मी’च्या खदखदा हसण्याने! तो म्हणत होता,
“अरे, तुझ्या संपण्याने कुठे जग संपत असते का? अरे तुझे स्थान नगण्य आहे रे या विश्वाच्या उलाढालीत! तुझ्या दृष्टीने केवढा तरी मोठा असलेला तो सूर्य पाहा! कसा गर्वाने तळपतोय! साबणाच्या फुग्यासारखा! पण एका क्षणार्धात विश्वाची मूळ शक्ती असाच एक दुसरा फुगा फेकून मारेल, आणि हा गर्वोन्मत्त सूर्य क्षणार्धात नाहीसा होईल! आणि तरीही हे विश्व चालेलच! म्हणून म्हणतो, अरे विवेक कर. सापेक्षात जे कर्तृत्व आहे, त्याची खरी परीक्षा इथेच आहे. या कारागारातही जो देशसेवा करील, तो खरा देशसेवक! जे मूल्य दिल्याविना देशोद्धार होणेच नाही, ते कारापीडनाचे मूल्य देणे म्हणजे जीवन व्यर्थ जाणे नव्हेच नव्हे! अरे नसेल लागलेले त्याला कीर्ती, लौकीक आणि मानरुपी मधाचे बोट, पण अरे, म्हणूनच तर अस्सल सोने आहे रे हे अस्सल सोने आहे”!!

“मर.. मर..”, ‘पहिला मी’ फुत्कारला!

‘दुसरा मी’ने त्याकडे लक्ष न देता आपले बोलणे सुरुच ठेवले,
“अरे, जर मरायचेच असेल तर असा कुत्र्याच्या मोलाने का मरतोस? त्या ब्रिटिशांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय? अरे मग जे त्यांना करता आले नाही, ते तू स्वत:च्याच हाताने का करतोस? त्यांना तर हेच हवे आहे! पण म्हणून तू का स्वपक्षाच्या हानीत आणि पराजयात भर टाकतोस? आणि याउप्परही जर तुला मरायचंच असेल, तर ज्या स्वातंत्र्यसेनेतील तू एक सैनिक आहेस, त्या सेनेचं एखादं कार्य करून मर! मर, पण दहा गोऱ्यांना मारून मर”!!

आणि त्याचक्षणी ‘पहिला मी’चा संयम सुटला. त्याने उसळून ‘दुसरा मी’वर जोरात झेप घेतली. दोघांची झटापट सुरु झाली. ‘दुसरा मी’ने ‘पहिला मी’ला सहज चारीमुंड्या चीत केले. त्यावर पाय रोवून उभा राहिला तो! आणि इकडे ‘खरा मी’च्या मनात शब्द उमटू लागले –

“अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।।

अट्टहास करित जई धर्मधारणी
मृत्युसीच गाठ घालू मी घुसे रणीं
अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो
भिऊनी मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळाऽ रिपूऽ । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतीने भिववु मजसी ये ।।

लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळी ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते
यंत्र तंत्र शस्त्र शास्त्र आग ओकतें
हलाऽ हलाऽ । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।।”

कारागृहाच्या भिंतीभिंतींना, अवघ्या अदमानाला भारून टाकणारे शब्द! पण ते शब्द एकटे नव्हते. त्यांना सोबत होती. ताल होता. ताल.. त्वेषाने फिरत असलेल्या कोलूच्या ‘कर्र.. कर्रर्र..’ आवाजाचा!!

— © विक्रम श्रीराम एडके.
[सदर कथेचे स्वामित्वाधिकार लेखक ऍड. विक्रम एडके यांजकडे सुरक्षित आहेत. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय ही कथा कोणत्याही स्वरुपात प्रकाशित अथवा कॉपी-पेस्ट करता येणार नाही. केल्यास, गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आवडल्यास केवळ ‘शेअर’ बटनावर क्लिक करून लेखकाच्या नावासहित शेअर करावे. लेखकाच्या अन्य ‘सावरकर-कथा’ वाचण्यासाठी, तसेच लेखकाने स्वा. सावरकर व अन्य विषयांवर दिलेली व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्यासाठी अथवा लेखकाची व्याख्याने आपल्या परिसरात आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories