बॅरिस्टर

नाव पुकारण्यात आले, “मि. व्हि. डि. सावरकर”!!
खरं तर पुकारण्याची गरजच नव्हती. ‘ग्रेज इन इन्स्टिट्यूट ऑफ लॉ’च्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडत होती. हो, शिस्तभंगाची कारवाई यापूर्वीही व्हायची पोरांवर. पण थेट एखाद्या विद्यार्थ्याला पदवी द्यावी की नको, याची चौकशी? हा प्रकार पहिल्यांदाच होत होता. बरं, लोकांना माहिती व्हावं म्हणून पुकारलंय म्हणावं, तर एव्हाना विनायक दामोदर सावरकर या तेरा अक्षरांनी बनलेला धगधगता निखारा इंग्लंडमधील सामान्यातिसामान्यापासून ते थेट राजा एडवर्डपर्यंत सर्वांनाच व्यवस्थित माहिती झालेला. त्रयोदशाक्षरी महामंत्रच जणू!! कामच असं केलं होतं त्याने. काय केलं होतं? तर भर इंग्लंडमध्ये – ज्या साम्राज्यावरून कधीच सूर्यही मावळू धजत नाही त्या ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीत – या सावरकरने क्रांतीची मशाल पेटवली होती. अक्षरशः साम्राज्याच्या ह्रदयात! अल्पावधीतच पोखरून काढलं होतं सबंध साम्राज्य – तेही एकसुद्धा पुरावा मागे न सोडता! इथेच लंडनमध्ये राहून भारतभर चालणाऱ्या क्रांतिकारी कारवाया नियंत्रित करायचा हा खविस! खरं तर, याने भारतात पिस्तुले पाठवली, तेव्हाच याला उचलायला हवा होता. पण काय करणार, पुरावा नव्हता ना! याने बॉम्ब पाठवले, तेव्हाच अटक करून फाशी द्यायला हवं होतं. पण काय करणार, पुरावा नव्हता ना! याने ते ‘ओ मार्टियर्स’ पत्रक काढलं तेव्हाच त्याला धरायला हवा होता. पण काय करणार, पुरावा नव्हता ना! त्याने धिंग्राकरवी कर्झन वायलीचा वध घडवला तेव्हाच त्याला बेड्या ठोकायला हव्या होत्या. पण काय करणार, पुरावा नव्हता ना! त्याने ब्रिटिश साम्राज्याविरोधात रशियनांशी संधान बांधलं तेव्हाच.. नाही नाही, थांबा – आधी जर्मनांशी संधान बांधलं – नाही नाही फ्रेंचांशी – की इटालियनांशी? की.. – मरो तो सावरकर! त्याची जगभर संधाने आणि जगभर त्याला नेता मानणारे लोक! पण काय करणार, पुरावा नव्हता ना! असो!! आणि ज्याचे नाव पुकारलेय, तो तर स्वतःच त्या कक्षात हजर!! मग नाव पुकारणे, ही नुसती वांझोटी औपचारिकताच नव्हती काय?

नाव ऐकताच, सावरकर उठले. त्यांच्यासाठी निर्धारित केलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले! मध्ये एक टेबल. आणि त्यापलिकडे दोन जणांची चौकशी समिती! त्यांपैकी एक होते, पुढे लॉर्ड बर्कनहेड म्हणून नावाजलेले श्री. एफ. ई. स्मिथ! आणि दुसरे होते साक्षात भारतमंत्री लॉर्ड मोर्ले!! मोर्लेंनी पंचविशीच्या त्या सुकुमार पोराकडे एकवार खालपासून वरपर्यंत पाहून घेतले आणि कारवाई सुरू करण्याचा इशारा केला.

त्याबरोबर कारकुनाने विचारले, “मि. विनायक दामोदर सावरकर; तुम्ही बंड करणे, हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणे, रक्तपात व शस्त्राचारास उत्तेजन देणे, इ. अनेक गोष्टींमध्ये अडकलेले आहात. सबब, महान ब्रिटिश साम्राज्याचे पाईक असलेल्या या ‘ग्रेज इन’ संस्थेने तुम्हाला का म्हणून ‘बॅरिस्टर’ ही पदवी द्यावी”?
चष्म्याआडचे अथांग डोळे सरोवरासारखे शांत ठेवत सावरकरांनी चौकशी समितीच्या दिशेने पाहून उत्तर दिले, “कारण मी माझे शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केले आहे”!
अश्या उत्तरांनी तोंडघशी पडायला श्री. स्मिथ काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. तेही तितक्याच शांतपणे म्हणाले, “परंतु तुमच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत”.
“त्यातील एखादा तरी आरोप सिद्ध झालाय का?”, सावरकरांचा प्रतिप्रश्न!
उत्तरादाखल लॉर्ड मोर्लेंनी काही कागदपत्रं सावरकरांच्या दिशेने सरकावले.
“या कागदपत्रात नाशिक, पुणे आणि लंडन येथील विविध गुप्तचरांकडून आलेल्या तारी आहेत. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महान ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कारवाया करता आहात. हे तुमचे बंधू गणेश दामोदर सावरकरांवरील खटल्याचे कागदपत्रं..” त्यांनी आणखी एक गठ्ठा सरकावला – “..यातही तुमचे नाव आहे”!
सावरकरांनी हळूच पायाची घडी मोडली. पुन्हा घातली. म्हणाले, “गुप्तचरांचे अहवाल कधीपासून पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ लागले”?
“नसतील. पण गणेश सावरकरांवरील खटल्याचं काय”?
“त्यासाठी त्यांना दयाळू ब्रिटिश साम्राज्याने शिक्षाही फर्मावलीये. त्या खटल्यात माझं नाव असेलही कदाचित. कदाचित! परंतु ना मला त्यासाठी कधी पाचारण करण्यात आले, ना काही शिक्षा सुनावण्यात आली. मग तो कसा काय पुरावा होऊ शकेल”?

आता मात्र मोर्लेंचा सूर बदलला. ते समजावणीच्या सुरात बोलू लागले, “हे पाहा सावरकर, तुम्हाला पदवी द्यायची की नाही, हे सर्वस्वी आमच्या हाती आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला पदवी देऊच. मात्र आमची एक लहानशी अट आहे..”
सावरकरांच्या चेहऱ्यावरील रेषही हलली नाही. लॉर्ड मोर्लेच पुढे सांगू लागले, “ती अट अशी की, ही पदवी घेण्यापूर्वी तुम्हाला या महान ब्रिटिश साम्राज्याशी राजनिष्ठ असल्याची व राहाणार असल्याची शपथ घ्यावी लागेल”!

सावरकरांनी लॉर्ड मोर्लेंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. क्षणभर विचार करून त्यांनी विचारले, “आणि समजा मी अशी शपथ नाही घेतली तर..?”
आता स्मिथना उत्साह आला. ते हसून म्हणाले, “बघा सावरकर! हा तुमच्या आख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे. शपथ घ्या, अन्यथा पदवी नाही! केवळ एकच साधीशी शपथ तुम्हाला समाजाच्या उच्चातिउच्च स्तरात पोहोचवू शकते. पैसाच पैसा! पैश्यात लोळाल अक्षरशः! ‘बॅरिस्टर’ या नावाची ताकद माहितीये ना तुम्हाला? केवळ एकच शब्द तुमचे आयुष्य बदलू शकतो. अन्यथा? अहो भिकारी व्हाल, भिकारी”!!
सावरकरांना हसू फुटले. मंद हसत ते बोलू लागले, “आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तुमच्या हेरांनी सांगितलीही असेल तुम्हाला कदाचित. नक्की तारीख सांगायची झाली, तर २२ जानेवारी १९०१! त्यादिवशी तुमच्या देशाची राणी वारली होती. सर्वदूर दु:खाचे वातावरण होते. आमच्या नाशकातही अशीच सारी मंडळी चेहरे पाडून बसलेली. सुतकात! जणू यांच्या घरातलेच कुणीतरी गेलेय. त्या दु:खाच्या भरातच कुणातरी अतिशहाण्याने टूम काढली की, आपण राणीसाठी शोकसभा घेऊयात! सर्वांनी एकमुखाने मान्यता दिली. इतक्यात मी कुठूनसा आलो आणि ते वातावरण पाहून माझी तळपायाची आग पार मस्तकाला भिडली. त्याच तिरीमिरीत मी म्हणालो की, ‘अरे तुमचे डोके-बिके तर नाही ना फिरलेले? इंग्लंडची राणी वारली. आपण त्यांचे गुलाम. म्हणजेच त्यांचे शत्रू. तेही आपले शत्रू! मग शत्रूची राणी वारली, तर आनंदाने वेडं व्हायचं सोडून उलट दुखवटे कसले पाळताहात दळभद्र्यासारखे’? याउप्परही मी ब्रिटिशांशी राजनिष्ठेची शपथ घेऊ म्हणताय मोर्लेसाहेब?
“बघ, पुन्हा एकदा सांगतो, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे”!
“जाऊ द्या हो, मी काही इथं पदवी मिळवायला नव्हतोच आलो. तुमच्या या भल्यामोठ्ठ्या साम्राज्याचा गाडा कसा चालतो, तुमची बलस्थाने काय, मर्मस्थाने काय; या गोष्टी जवळून, अगदी आतून पाहायच्या होत्या मला. पाहिल्या! पदवी-बिदवी या दुय्यम गोष्टी आहेत हो”!

“हे पाहा सावरकर”, लॉर्ड मोर्ले निर्वाणीच्या सुरात बोलू लागले, “ही राजनिष्ठेची शपथ उत्तीर्ण होणाऱ्या सर्वांनाच बंधनकारक असते. तुमचे ते मोहनदास गांधी! त्यांनी तुमच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती ना? त्यांना विचारा हवं तर. त्यांनीही अशीच शपथ घेतलीये बॅरिस्टर होताना. तुम्हालासुद्धा घ्यावीच लागेल”!
“कुणी काय करावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. त्यावरून मी माझे वर्तन ठरवावेच असे काही नाही. त्यामुळे मी शपथ घेणार नाही!”, सावरकर ठामपणे उत्तरले!

हे ऐकले मात्र, स्मिथच्या डोळ्यांत अक्षरशः अंगार फुलले. मोर्लेंनी हातातील हातोडा रागारागाने टेबलावर आपटला आणि जोरात ओरडले, “तू कधीच बॅरीस्टर होणार नाहीस”!!
सावरकरांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. पाणीदार डोळ्यांना अजूनच धार आली. आवाजातील संयम किंचितही ढळू न देता तो वीर उद्गारला, “चुकताहात सर तुम्ही! तुम्ही खात्रीने चुकताच आहात! मला ‘बॅरिस्टर’ ही पदवी मिळत नाहीये केवळ आज! बॅरिस्टर तर मी केव्हाच झालोय! तो तर मी आहेच! ज्यादिवशी क्रांतीच्या न्यायालयात माझ्या मातृभूमीची बाजू घेतली, त्याच दिवशी बॅरिस्टर झालोय मी! माझ्या देशाचा बॅरिस्टर! आणि तीच माझ्यादृष्टीने सर्वोच्च पदवी आहे. बाकी नुसतेच कागदाचे भेंडोळे! मिळाले काय नि नाही मिळाले काय! येतो मी, आज्ञा असावी”!! असे म्हणून सावरकर प्रतिक्रियेची वाटही न पाहाता पाठ फिरवून चालू लागले.

कारकून, स्मिथ आणि मोर्ले, तिघेही अवाक होऊन त्या पाठमोऱ्या तेजाळ अग्निकुंजाकडे पाहातच राहीले! आजचा खटला कुणी जिंकला, तिघांनाही समजेना!! तारीख होती, बुधवार १४ जुलै १९०९!!

— © विक्रम श्रीराम एडके.
[सदर कथेचे स्वामित्वाधिकार लेखक ऍड. विक्रम एडके यांजकडे सुरक्षित आहेत. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय ही कथा कोणत्याही स्वरुपात प्रकाशित अथवा कॉपी-पेस्ट करता येणार नाही. केल्यास, गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आवडल्यास केवळ ‘शेअर’ बटनावर क्लिक करून लेखकाच्या नावासहित शेअर करावे. लेखकाच्या अन्य ‘सावरकर-कथा’ वाचण्यासाठी, तसेच लेखकाने स्वा. सावरकर व अन्य विषयांवर दिलेली व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्यासाठी अथवा लेखकाची व्याख्याने आपल्या परिसरात आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

image

2 thoughts on “बॅरिस्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories