बाजीराव एकटेच समर्थ आहेत!!

बाजीरावांच्या फौजेची वाताहत झाली होती. पार दुर्दशाच म्हणा ना! किती जरी झालं, तरी त्र्यंबकराव हे मराठ्यांचे सेनापती होते. सरसेनापती खंडेराव दाभाड्यांचे पुत्र! त्यांनी आपल्या माहूताला आज्ञा केली आणि त्यासरशी त्यांच्या कसलेल्या, लढवय्या, हुजरातीच्या ५००० फौजेने पूर्वेकडून ढाढर नदी पार केली. त्यावर बाजीरावांच्या सैन्याला माघार घेण्यावाचून पर्यायच नव्हता. त्र्यंबकरावांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ज्याची गेली अनेक वर्षे वाट पाहात होतो, ज्यासाठी गेले अनेक महिने जोखीम पत्करुन राजकारण मांडलं, तो विजय दृष्टीपथात आला होता. बाजीराव? अरे हाड्!! एकही युद्ध हारला नाही म्हणे! त्याने अजून खरा मर्द पाहिलाच कुठे होता? आज त्या बाजीरावला दाभाडे कुळीच्या तलवारीचं पाणी पाजतो! विचार करता करता नदी पारसुद्धा झाली. पेशव्यांच्या सैन्याची पीछेहाट सुरुच होती. ३-४ किलोमीटर लांब, पळसवाड्यापाशी असलेले बाजीराव मूकपणे हा सारा तमाशा पाहात होते, आपल्या सैन्याची माघार पाहात होते, दाभाड्यांची आगेकूच पाहात होते. त्यांची नजर थंड होती. शांत होती. की हताश होती?

गुजरात! जे स्थान आज देशाच्या अर्थकारणात मुंबईचं आहे, तेच एकेकाळी गुजरातचं होतं. मुघल साम्राज्याच्या आर्थिक नाड्या गुजरातमध्ये होत्या. शिवछत्रपतींना ह्या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती. आणि म्हणूनच मुघल साम्राज्य जेव्हा त्यांनी बदसुरत करण्याचं ठरवलं, तेव्हा त्यांनी गुजरातमधलं सुरतच निवडलं. याच गुजरातमधून मक्का-मदिनेला जहाजं जायची. या मजहबी कारणामुळेसुद्धा गुजरात मुघलांचा जीव की प्राण. निज़ामने आपल्या अधिकारात तिथला सुभेदार म्हणून आपला काका हमिदखान नेमला होता. परंतु बादशाह मुहंमदशाहची जेव्हा निज़ामवर खफ़ामर्जी झाली, तेव्हा त्याने ताबडतोब हमिदखानची हकालपट्टी करुन त्याच्याजागी सरबुलंदखानला नेमलं. हाती असलेली मलई सहजासहजी सोडायला हमिदखान अजिबातच तयार नव्हता. त्यामुळे सरबुलंदखानने त्याच्यावर चाल करण्याची सिद्धता केली. तो दिल्लीहून निघाला. हमिदखानकडे तर त्याचा मुकाबला करण्याइतकं सैन्यबळ नव्हतं. मग? त्याने डोकं चालवलं आणि मराठा सरदार कंठाजी कदमबांडेंना मदतीसाठी पुकारलं. त्यावर बादशाहने सुरतेचा सुभेदार रुस्तुमअलीखानला हमिदखानचे पारिपत्य करायची आज्ञा दिली. ताकद वाढलेल्या हमिदखानशी मुकाबला करायचं बळ रुस्तुमअलीखानकडे तरी कुठून असणार? त्यानेही डोकं चालवलं आणि दुसरे मराठा सरदार पिलाजीराव गायकवाडांना मदतीसाठी बोलावलं. हेच ते बडोद्याच्या गायकवाडांचे मूळपुरुष! आता मुघल आणि मराठे एकास एक होते. कोण जिंकणार ह्या समसमान युद्धात? गुजरात कुणाचे होणार?

युद्धाला तोंड फुटले. दोन्हीबाजूंनी घोड्यावर स्वार वीर योद्धे रणमैदानात थैमान घालू लागले. तलवारींची खणाखणी चालू होती. बाणांची बरसात चालू होती. भाल्यांची फेकाफेक चालू होती. वातावरणात केवळ तेवढीच एक गाज भरुन राहिली होती. एकच लाल रंग सर्वत्र व्यापून राहिला होता. पिलाजींनी रुस्तुमअलीला सुचवले, ‘तुम्ही पुढे व्हा, मी मागे राहून सामानसुमान सांभाळतो’. थोडक्यात, तुम लडो हम कपडे संभालते है! रुस्तुमअलीने होकार दिला व तो पुढे चाल करुन गेला. तो जाताच पिलाजींनी आपल्या सैन्याला आक्रमणाची खूण केली! आक्रमण कुणाविरुद्ध? ज्या रुस्तुमअलीने पिलाजींना मदतीसाठी बोलावलं होतं, त्याच रुस्तुमअलीविरुद्ध!! पुढून हमिदखान-कदमबांडे आणि मागून गायकवाड अश्या कात्रीत रुस्तुमअलीखान सापडला. त्याच्या सैन्याचा अक्षरशः फडशा उडाला. योद्धा रुस्तुमअली लढता लढता मारला गेला!! चतुर हमिदखानने ताबडतोब गुजरातची चौथाई गायकवाड आणि कदमबांडेंमध्ये वाटून दिली!!

बादशाही फ़र्मानाची अशी बेअब्रु झालेली पाहून बादशाह खवळला. त्याने सरबुलंदखानला ताबडतोब जातीने चालून जाण्याची आज्ञा केली. सरबुलंदखान कूच करुन अहमदाबादपर्यंत आला. त्यासरशी हमिदखान दख्खनच्या दिशेने निज़ामकडे पळून गेला. पण म्हणून काही सरबुलंदखानचा विजय झाला होता असे नाही. दोघे मराठा सरदार, कदमबांडे आणि गायकवाड अजूनही गुजरातमध्येच पाय रोवून उभे होते. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा? नाईलाजाने सरबुलंदखानने त्या दोघांनाही मोठमोठ्या रकमेच्या हुंड्या दिल्या. त्या मिळताच दोघांनीही सबंध गुजरातभर लुटमार करीत धिंगाणा घालायला सुरुवात केली. व्यापाराचा पार बट्ट्याबोळ झाला. व्यापारी त्या खंडणी आणि लुटमारीपायी गुजरात सोडून जाऊ लागले. मराठ्यांनी चंपानेर आणि बडोदासुद्धा ताब्यात घेतले. सरबुलंदखान पार त्रासून गेला. ह्या अश्या भीषण परिस्थितीत सरबुलंदखानला मदतीसाठी एकच नाव आठवले – बाजीराव पेशवे सरकार!!

आता कुणाला प्रश्न पडू शकेल की, हिंदवी साम्राज्याच्या पेशव्यांनी त्याच साम्राज्याचे सरदार असलेल्या गायकवाड आणि कदमबांडेंच्या विरोधात सरबुलंदखानसारख्या मुघलाला का मदत करावी? यालाच तर राजकारण म्हणतात! ह्या राजकारणाच्या पटावर गरज पडेल तसा उभा-आडवा-तिरका चालणारा वजीरच राज्य करत असतो. आणि तो वजीर बाजीराव होते! सरबुलंदखानला बाजीरावांच्या रुपात मदत दिसत होती, पण राजकारणपटू चाणाक्ष बाजीरावांना सरबुलंदखानच्या रुपात संधी दिसत होती. सबंध गुजरात बळकावण्याची संधी! त्यासाठी तात्कालिकरित्या मराठा सरदारांशी युद्ध करावे लागले तरी बेहत्तर होते, कारण यात मराठा साम्राज्याचाच सार्वकालिक फायदा होता! बाजीरावांकडे निव्वळ शिपाईगडी म्हणूनच पाहाणाऱ्यांना बाजीरावांची ही खेळी समजणे अशक्यच! कदमबांडे आणि गायकवाड हे गुजरात वाटून खात असते व मराठा दौलतीला त्याचा फायदा होत असता, तर गोष्ट वेगळी. पण ते दोघे निव्वळ धुडगूस घालत होते. परिणामी गुजरातसारखा संपन्न प्रदेश आटून चालला होता. याखेरीज बाजीरावांना गुजरातमध्ये लक्ष घालायला न्याय्य कारणसुद्धा होते. १७२६ साली शाहू आणि सरबुलंदखान यांच्यात झालेल्या करारानुसार गुजरातमधील अर्ध्या महालांच्या महसुलावर बाजीरावांचा अधिकार होता! तशी अटच शाहूंतर्फे अंबाजी त्रिंबक मुतालिकांनी टाकली होती. त्यामुळे सरबुलंदखानने मदतीसाठी पुकारताच मुघल साम्राज्यात खिंडार पाडण्याची बारीकशी संधीसुद्धा न सोडणाऱ्या पेशवे सरकारांनी ताबडतोब चिमाजीअप्पांना गुजरातकडे रवाना केले. दोघा भावांच्या योजनेप्रमाणे चिमाजींनीही ताबडतोब बंसवाडा, जालोद, दोहद, चंपानेर अशी गावं लुटण्याचा सपाटाच लावला. परिणामी १७२९ मध्ये सरबुलंदखानला चिमाजींच्या रुपाने बाजीरावांना सबंध गुजरातची चौथाई आणि सरदेशमुखी देणे भाग पडले. बदल्यात गायकवाड आणि कदमबांडेंवर वचक ठेवण्यासाठी व वेळप्रसंगी मुघलांना मदत करण्यासाठी म्हणून बाजीरावांना २५०० चं घोडदळ ठेवावं लागणार होतं. म्हणजे थोडक्यात बाजीराव मराठ्यांशी लढायला म्हणून आले आणि सरबुलंदखानलाच लुटून गेले, तेही टिचभर मदतीच्या बदल्यात. सौदा काही वाईट नव्हता! बाजीरावांचं राजकारण हे असं होतं. वरवर विरोधी भासणारं आणि आतून खोल डोहासारखं असणारं!!

गोष्टी बिघडायला सुरुवात झाली ती इथेच! गुजरातवर आधीपासूनच दाभाड्यांचे वर्चस्व. गायकवाडही मुळचे दाभाड्यांचेच सरदार होते ना! माळवा बाजीरावांकडे आणि गुजरात दाभाड्यांकडे असेच तर शाहूंनी ठरवून दिले होते ना! मग आता बाजीरावांनी कशी काय धिटाई करुन सबंध गुजरातची सूत्रे ताब्यात घ्यावीत? त्र्यंबकरावांच्या रागाची आग भडकली. त्यात नव्यानेच सेनापतिपद मिळाल्याच्या अहंकाराचे तेल पडले. वास्तविक पेशवे आणि दाभाडे यांच्यातून आधीच विस्तवसुद्धा जात नव्हता. बाजीरावांच्या मनात काहीएक किल्मिष नव्हते, पण त्र्यंबकराव मात्र बाजीरावांचा द्वेष करायचे. मी सरसेनापती असूनही सगळा मान बाजीरावांनाच कसा काय मिळतो, हा त्यांचा सल होता. तसे तर सातारा-दरबारात बाजीराव सरकारांवर जळणाऱ्या सरदारांची रांगच होती. त्यांपैकीच एक दाभाडे!! पण यावेळी मात्र त्यांच्या रागाचा पारा जरा जास्तच चढला. त्यांनी बंड करायची तयारी केली. हळूहळू प्रयत्न करुन, आई उमाबाईंच्या सल्ल्याने त्यांनी असंतुष्ट सरदारांची मोट बांधायला सुरुवात केली. त्यांना गायकवाड येऊन मिळाले, कदमबांडे मिळाले. लवकरच त्यांना चिमणाजी दामोदर आणि पवार बंधूंचीही साथ मिळाली. हेतू एकच, बाजीरावांचा नायनाट! एकदा का बाजीरावांना संपवले, की मग शाहूंना काहीच बोलता नसते आले.

इथपर्यंत सारे काही ठिक होते. पण दाभाडे आपल्या मत्सरात जरा अधिकच वाहावत गेले. त्यांनी थेट निज़ामशीच संधान बांधले. हा तर राष्ट्रद्रोह झाला. बाजीरावांना संपवण्याची किंमत काय? निज़ामला घरात घेणे! संधीसाधू निज़ामनेही लगेच नव्याने माळव्यावर आलेल्या बंगशला ह्या योजनेत सामील करुन घेतले. खरं तर, निज़ाम काय किंवा बंगश काय, दोघेही बाजीरावांकडून पार पार्श्वभाग सुजेपर्यंत मार खाल्लेले. त्यामुळे दोघांनाही बाजीरावांशी एकट्याने लढण्याची हिंमत होत नव्हती. म्हणून हे संधान! आता बाजीरावांच्या एवढावेळ नितळ असलेल्या कपाळावर हलकीशी आठी उमटली. शाहूंनाही दाभाडेंचे हे पाऊल रुचले नाही. दोघांमध्ये खलबते झाली. मसलती झडल्या. दाभाडे किती जरी म्हटले तरी दौलतीचे जुने आणि एकनिष्ठ घराणे. त्यामुळे शाहूंनी त्यांना समजावणीच्या सुरात एक पत्र पाठवले –
“तुम्ही स्वामींचे कार्याचे एकनिष्ठ हिंदूसेवक. यास्तव स्वामी तुम्हांवर बहुत समयावचित्ते कृपा करीत असता हल्ली चित्तांत विपर्यास आणून व दुसऱ्याचा आश्रय करुन राज्यास अपाय करावा, आपल्या एकनिष्ठतेस बोल लावून घ्यावा यात फायदा काय”?

परंतु दाभाड्यांनी साक्षात शाहूंच्या आवाहनासही भिक घातली नाही. ८ ऑक्टोबर १७३० रोजी दाभाडे छत्रपतींच्या भेटीस जातो असे सांगून तळेगावहून निघाले. परंतु साताऱ्याकडे न जाता उत्तरेकडून संगमनेरमार्गे नारायणगावला गेले व निज़ामचा सरदार तुर्कताजखानची गाठ घेतली. तिथून पुढे नोव्हेंबरमध्ये ते निज़ामला भेटले. ह्या भेटीनंतर निज़ाम नर्मदेच्या दिशेने बंगशला भेटण्यासाठी गेला. इकडे दाभाड्यांना जुन्नरचे कुंवरबहादुर येऊन मिळाले आणि चिमणाजी दामोदर मोघ्यांनी मुल्हेरचा रस्ता मोकळा करुन दिला. दाभाडे गुजरातमध्ये शिरताच त्यांना गायकवाड, कदमबांडे आणि पवार सामील झाले. ह्या सगळ्यांनी मिळून १२ मार्च १७३१ ला मांडवीचा किल्ला जिंकून घेतला व २६ मार्च ह्यादिवशी त्यांनी नर्मदा ओलांडून कर्नालीजवळ तळ ठोकला! दाभाडेंचे सैन्य केव्हाच ४५००० वर जाऊन पोहोचले होते!!

बाजीरावांच्या मागे यावेळी अनेक डोकेदुखी होत्या. चिमाजींच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले होते. त्याचवेळी शनिवारवाड्याचेही बांधकाम सुरु होते. परंतु तरीदेखील अष्टावधानी बाजीरावांचे सर्वत्र असलेले लक्ष  जराही कमी झाले नव्हते. त्यांनी १० ऑक्टोबरला पुणे सोडले व मोठमोठ्या मजला मारीत गुजरातच्या दिशेने निघाले. चिमाजींनीदेखील घरातले दु:ख बाजूला सारुन माही नदीच्या उत्तरेस तळ ठोकला. दरम्यान गुजरातची सुभेदारी अभयसिंहाकडे गेली होती. त्यालाही गायकवाड, कदमबांडे वगैरेंचा त्रास होताच. त्याने बाजीरावांना त्रास न देण्याचे आनंदाने कबूल केले. अश्याप्रकारे गुजरातमध्ये आतपर्यंत घुसतानाच बाजीरावांनी आपली पिछाडी निर्वेध करुन टाकली. बाजीरावांना बंगशची चिंता नव्हती. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी केव्हाच शिंदे आणि होळकरांना सूचना दिल्या होत्या. आता केवळ निज़ामच्या काही तुकड्या जरी दाभाडेंसोबत असल्या तरी निज़ाम ससैन्य येऊन मिळायच्या आत दाभाडेंचे पारिपत्य करणे आवश्यक होते. पण कसे करणार? ४५००० विरुद्ध बाजीरावांचे केवळ २५०००, कसा निभाव लागणार?

बाजीरावांना दाभाडेंच्या सैन्याची जरादेखील चिंता नव्हती. ती निव्वळ सूज आहे हे त्यांना समजत होते. दाभाडेंच्या सैन्याचा बहुतांश भाग हा भिल्ल, कोळी आणि निज़ामने दिलेले मूर-अरब यांनी व्यापलेला होता. नि:संशय दाभाडे गुणवंत सेनापती होते, पण हे सैन्यच मुळात कसलेले नव्हते त्याला कोण काय करणार! बाजीरावांच्या शिस्तबद्ध सैन्याच्या पहिल्या धक्क्यातच पाल्यापाचोळ्यागत उडून जाणार होते ते. शिवाय दाभाडेंसोबत असलेले मराठा सरदार बाजीरावांच्या विरोधात एकत्र आलेले, परंतु त्यांनाही निज़ामशी संगनमत अजिबात मानवलेलं नव्हतं. बाजीरावांनी गोडीगुलाबीने ह्या मंडळींना दाभाड्यांपासून दूर केलं. आता दाभाडेंचं सैन्य ३०००० वरच आलं. त्यातही वर उल्लेख केलेली बिनकामाची भरतीच जास्त. बाजीरावांना खरी काळजी होती ती दाभाडेंच्या मुख्य, हुजरातीच्या ५००० सैन्याची. खंडेरावांच्या तालमीत तयार झालेले हे लोक शूर, हुशार लढवय्ये तर होतेच परंतु त्र्यंबकरावांशी पूर्णतः एकनिष्ठदेखील होते. यावर काहीतरी उपाय काढायला हवा होता.

दरम्यान बाजीरावांनी समेटासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यांनी परत एकवार दाभाडेंना उद्देशून एक पत्र लिहिले की, आपण भांडण्यापेक्षा भेटून बोलूयात, परंतु सध्या निज़ाम आपल्या दिशेने येतोय त्यामुळे मला केवळ नर्मदा पार करुन जाऊ द्या, म्हणजे मला पुण्याकडे निघता येईल. दाभाडे याला पेशवे सरकारांचा पळपुटेपणा समजले. त्यांना वाटलं की, हा आपल्याच ताकदीचा विजय आहे. त्यामुळे ह्या पत्राचा परिणाम नेमका उलटा झाला. जी नर्मदा पार करण्यासाठी बाजीरावांनी दाभाडेंना परवानगी मागितली होती, दाभाडे मुद्दामहून नेमकी तीच वाट अडवून उभे राहिले. इतिहासाला ठाऊक नाही, परंतु कदाचित दाभाडेंनी नेमके असेच करावे यासाठी बाजीरावांनीच ते पत्र मुद्दाम पाठवलेलेही असू शकते; कारण नंतर जे घडलं तो एकतर चमत्कार तरी होता अथवा अचूक टाकलेल्या सामरिक डावपेचांची विजयी परिसीमा तरी होती. काय घडलं होतं असं?

डभोईला भिलुपूरच्या मैदानाजवळून ढाढर नदी पूर्व-पश्चिम वाहाते. तिथेच नदीला एक भलेमोठ्ठे वळण आहे आणि नदी पार करायला उतारसुद्धा! बरोब्बर याच मैदानात दाभाडे आपल्या ३००००च्या भल्यामोठ्ठ्या सैन्यासोबत बाजीरावांच्या २५००० सैन्यावर तुटून पडले. त्यांच्यासोबत उदाजी पवार, आनंदराव पवार, कंठाजी कदमबांडे, रघूजी कदमबांडे, पिलाजी गायकवाड, चिमणाजी दामोदर असे एकाहून एक रणगौरव होते. आणि इकडे? इकडे होता शिवछत्रपतींचा सच्चा शिष्य, साक्षात रणतंत्राधिपती पेशवा बाजीराव बल्लाळ!! त्यांनी अशी जोराची मुसंडी मारली की, पहिल्या फटक्यातच दाभाडेंकडची सगळी बिनकामाची भरती वाट फुटेल तिकडे पळून गेली. पण म्हणून बाजीराव युद्ध जिंकले असे नाही बरं का! त्र्यंबकराव दाभाडे किती जरी अहंकारी असला तरीदेखील खरा मर्द होता. रणधुरंधर होता. तो जोपर्यंत रणांगणावर पाय रोवून उभा होता, तोपर्यंत बाजीरावच काय तर साक्षात प्रलयरुद्रालाही विजय मिळणे अशक्यच. आपल्या लाडक्या हत्तीच्या अंबारीत बसून दाभाडे अर्जुनासारखे चहुदिशांना बाणांचा वर्षाव करत होते. आणि पाय रोवून म्हणजे अक्षरशः पाय रोवूनच उभे होते, कारण नदीच्या आसपास निसरड्या ठिकाणी हत्ती घसरु नये म्हणून त्यांनी हत्तीचे पाय साखळदंडांनी जखडूनच टाकले होते. त्यांचा नेम अचूक होता. त्यांचा बाण लागेल तिथला सैनिक पाणीसुद्धा मागत नव्हता. बाण चालवून चालवून बोटे सोलली गेली होती त्यांची. सूर्य आग ओकू लागला होता. दाभाडेंची ५०००ची हुजरात हुश्शार होती. बाजीरावांचं सैन्य पळू लागलं होतं. माघार घेऊ लागलं होतं. विजय बाजीरावांच्या हातून मुठीतल्या रेतीसारखा निसटून चालला होता. बाजीरावांच्या फौजेची वाताहत झाली होती. पार दुर्दशाच म्हणा ना! किती जरी झालं, तरी त्र्यंबकराव हे मराठ्यांचे सेनापती होते. सरसेनापती खंडेराव दाभाड्यांचे पुत्र! त्यांनी आपल्या माहूताला आज्ञा केली, हत्तीचे साखळदंड तोडले गेले आणि त्यासरशी त्यांच्या कसलेल्या, लढवय्या, हुजरातीच्या त्या ५००० फौजेने पूर्वेकडून ढाढर नदी पार केली. त्यावर बाजीरावांच्या सैन्याला माघार घेण्यावाचून पर्यायच नव्हता. ३-४ किलोमीटर लांब, पळसवाड्यापाशी असलेले बाजीराव मूकपणे हा सारा तमाशा पाहात होते, आपल्या सैन्याची माघार पाहात होते, दाभाड्यांची आगेकूच पाहात होते. त्यांची नजर थंड होती. शांत होती. की मध्येच मिश्कील झाक दिसत होती त्या नजरेत? कुणास ठाऊक! त्यादिवशी दिनांक होता १ एप्रिल १७३१!! काही एप्रिलफूलचा तर डाव नव्हता ना बाजीरावांचा? कसा असणार? की असू शकतो? निदान त्याक्षणी तरी काळपुरुष बाजीरावांची खिल्ली उडवत होता. त्याला बिचाऱ्याला काय कल्पना की, हारकर जीतनेवालेको बाजीराव कहते है!!

बाजीरावांनी एकवार मिशीवरुन ताव दिला. मांड ठोकली. आणि बेफाम घोडा फेकला! थेट रणमैदानाच्या दिशेने. त्यासरशी बाजीरावांच्या पाठोपाठ सारं राखीव सैन्यसुद्धा निघालं. सगळ्यात पुढे होता तो निधड्या छातीचा पेशवा. सपसप तलवार चालवित आणि समोर येईल त्याच्या चिरफाळ्या उडवित तो तीरासारखा शत्रूसागरात आत-आतपर्यंत शिरत होता. लक्ष्य एकच, दाभाडे! बाजीराव आपल्या राखीव सैन्यानिशी येत असलेले दाभाडेंना दिसले होते. आपल्या पाठिशी हजारोंचा सेनासागर असताना दाभाडेंना कश्याची भिती! बाजीराव दाभाडेंच्या अगदी निकट पोहोचले. त्यांनी एका सांडणीस्वाराला आज्ञा केली. तो ताबडतोब पेशवे सरकारांचा खलिता घेऊन दाभाडेंपाशी गेला. समेटाचा शेवटचा प्रयत्न! दाभाडेंनी तो खलिता पाहिला आणि पचकन् जमिनीवर थुंकले ते! बाजीराव ओरडून म्हणाले, “तुमचा पराक्रम अजोड आहे सेनापती. या आपण तो आपल्या सामायिक शत्रुविरुद्ध दाखवू आणि स्वामींची कीर्ती चहुदिशा पसरवू. थांबवा हे युद्ध. हा मी स्वतः माघार घेऊन तुमच्या भेटीसाठी यायला तयार आहे”! उत्तरादाखल दाभाड्यांनी केवळ आपल्या हत्तीचा रोख बाजीरावांकडे वळवला. आणि त्याचक्षणी दाभाडेंना सगळा प्रकार ध्यानात आला. याच मैदानात युद्ध करायला लावणं, हा बाजीरावांचा डाव होता. नदीचं तेच वळण निवडायला लावणं, हाही बाजीरावांचाच डाव होता. बाजीरावांचं सैन्य माघारी पळणं हाही बाजीरावांचाच डाव होता. त्याला भुलून आपण नदी ओलांडून आलो तो उतार बाजीरावांनी केव्हाच ताब्यात घेतलाय. आपला तो तथाकथित सेनासागर पार दूर नदीपल्याडच राहिलाय. नदीच्या वळणात केवळ ५००० लोक मावतील, एवढीच जागा आहे. आणि आपणसुद्धा बरोब्बर ५०००च आहोत! आपण आणि आपली हुजरात दोघेही उतावीळपणात तीन बाजूंनी नदी आणि एका बाजूने बाजीरावांचं सैन्य असे सगळ्या बाजूंनी अडकून पडलो आहोत!

हे लक्षात येताच, त्र्यंबकरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांचा हत्ती जोराने बाजीरावांवर चाल करुन आला. हे पाहाताच त्या तरुण पेशव्याच्या नजरेत जगभराचं दु:ख उमटलं. त्याला लढायचं नव्हतं. त्याला युद्ध नको होतं. त्याला तिटकारा वाटत होता स्वकीयांविरुद्ध लढण्याचा. पण त्याची सारी शिष्टाई दाभाडेंच्या अहंकारापुढे शून्य ठरत होती. आता पर्यायच नव्हता. काही सेकंदांत दाभाडेंच्या हत्तीने चिरडून टाकलं असतं त्याला. युद्ध हे असं असतं. युद्ध मान नाही. युद्ध अपमानसुद्धा नाही. शत्रू स्वकीय असो वा परकीय, युद्ध हे कर्तव्य आहे. लहानपणी पाठ केलेली गीतेची ओळ आठवली त्याला – तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चय:! युद्धाय कृतनिश्चय:!! त्याने तलवार म्यान केली. जिरेटोपावर अडकलेला घाम झटकला. हत्ती चालून येतच होता. कुणालाही काही कळायच्या आतच त्याने शेजारी पडलेल्या एका मृतसैनिकाच्या छातीत घुसलेला भाला उपसला आणि वीजेच्या चपळाईने फेकला. थेट माहूताच्या छातीतून आरपार जात त्या भाल्याने अंबारीच तोडली! हत्ती गडबडला. थांबला. नजरेत अंंगार फुललेले दाभाडे उडी मारुन माहूताच्या जागेवर आले. माहूताचे प्रेत लाथेने उडवून दिले त्यांनी आणि स्वतः हत्ती सावरला. हाती धनुष्यबाण घेतले. एव्हाना बाजीरावांभोवती त्यांच्या निष्ठावंतांनी कडे केले होते. कोणत्याही संरक्षणाची गरज नसलेला तो वीर पेशवा दाभाडेंच्या नजरेत नजर रोखून उभा होता. दाभाडेंनी धनुष्यावर बाण चढवला. आणि काय होतंय ते समजायच्या आतच एक गोळी सुं सुं करीत आली आणि दाभाडेंच्या मस्तकाच्या ठिकऱ्या उडाल्या. बाजीरावांसह सगळ्यांनीच मान वळवून गोळीच्या उगमाकडे पाहिले. एका बारगिराच्या बंदुकीतून आलेली गोळी होती ती. बाजीरावांच्या बाजूने लढणारे, स्वतः त्र्यंबकराव दाभाडेंचे मामा असलेले भाऊसिंह टोकेंचा बारगिर! बाजीरावांच्या तोंडून एकच वाक्य फुटले, “अरे जिवंत पकडायचा होता ना रे..”!

दाभाडेंची फौज वाट फुटेल तिकडे पळून गेली. बंगश आणि निज़ामच्या आशाआकांक्षांचा चुथडा करुन ठेवला बाजीरावांनी. सारे सरदार बाजीरावांच्या हाती लागले. पिलाजी गायकवाड तेवढे जखमी अवस्थेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. परंतु हाती लागलेल्या सरदारांशी बाजीरावांचे वर्तन एखाद्या खानदानी राजपुरुषास साजेसेच होते. त्यांनी सगळ्यांना आदरपूर्वक सोडले. उदाजी पवार व चिमणाजी दामोदरांना तर प्रत्येकी एक हत्तीदेखील दिला बाजीरावांनी. किती जरी झाले तरी ही मंडळी आपली होती. स्वकीय होती. स्वधर्माची होती. शिक्षेने वैर वाढले असते. बाजीरावांनी प्रेमाने त्यांच्यातला शत्रूभावच संपवून टाकला. अर्थात, शाहूंनी स्वतः तळेगावला जाऊन समेटाचा प्रयत्न केला तरी दाभाडेंच्या मातोश्रींनी बाजीरावांना कधीच माफ केले नाही. शाहूंनी यशवंतराव दाभाडेंना सेनापती नेमले, परंतु दाभाडे कुटूंब त्यानंतर मुख्य राजकारणातून हळूहळू बाजूलाच पडत गेले. १४ मे दिनी बाजीराव पुण्यात पोहोचले. विजयी होऊन पोहोचले. त्यांच्या विजयाने एक अत्यंत ताकदीचा संदेश देशभर पोहोचला होता, “देशघातकी शत्रू लाख असू देत, पण त्यांचे पारिपत्य करायला शाहूंचे सेवक बाजीराव समर्थ आहेत! बाजीराव एकटेच समर्थ आहेत”!!

— © विक्रम श्रीराम एडके
*लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
(लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)

संदर्भ —
१) Advanced Study in the History of Modern India 1707-1803 : Mehta
२) Bajirao 1 – An Outstanding Cavalry General : Palsokar
३) Bajirao – The warrior Peshwa : Paul
४) The Marathas – 1600-1818 : Gordon
५) पेशवाई : कस्तुरे
६) मराठ्यांचा इतिहास : कुलकर्णी, खरे
७) अजिंक्ययोद्धा बाजीराव : साळगावकर

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *