डाव

गावाबाहेरचे गर्द रान. रातकिड्यांची किरकीर आणि दूर कुठूनतरी ऐकू येणारी बारीकशी कोल्हेकुई सोडली, तर रानात अक्षरशः शांतता गोठलेली होती. पोलादी, अभेद्य शांतता!! त्याच शांततेच्या पलंगावर ढगांच्या दुलईत चंद्राचा रजनीसोबत शृंगार सुरू होता. खट्याळपणे वाहाणारा वारा अधूनमधून दुलई ओढत त्या प्रणयात गोड अडथळे आणत होता, एवढेच! ताऱ्यांच्या दिव्यांमध्ये अजून काही तास पुरेल एवढं तेल बाकी होतं. रात्र अजूनही तरुणच होती. अंबरी चाललेल्या या निद्राविलासाच्या पार्श्वभूमीवरच शांततेच्या पोलादाला पहिला तडा गेला. मग दुसरा. आणि त्यापाठोपाठ तिसरा!! रानात तीन सावल्या उगवल्या होत्या. तीन तरुण सावल्या! काहीतरी कट शिजत असावा त्यांचा. ढगांआड रंगलेला चंद्र कान टवकारून त्यांचे बोलणे ऐकायचा प्रयत्न करू लागला. परंतु फारच सावधगिरी बाळगली होती पोरांनी! त्याही परिस्थितीत ‘अभिनव भारत’, ‘ठराव’, ‘शोकसभा’ असे काही चुकार शब्द त्याच्या कानावर पडलेच! काही मिनिटांतच तिघांचीही पांगापांग झाली. चंद्रही झालंगेलं विसरून पुन्हा एकवार रजनीशी श्रृंगार करण्यात निमग्न झाला!

काल आकाशाच्या टोपलीआड झाकून ठेवलेलं पृथ्वीरुपी अंडं आजही जसंच्या तसं असल्याचं पाहून सकाळी सकाळी सूर्य खुदकन हसला! अर्थात सारं काही जसंच्या तसं होतं, ते त्या तेजोनिधीच्या व्यापक दृष्टीने! प्रत्यक्षात या लहानश्या अंड्यावर नेहमीची शेणकिडी वळवळ सुरुच होती!! आज त्या वळवळीला भल्यामोठ्ठ्या दु:खाची किनार लाभली होती. संध्याकाळ झाली. सारा गाव मंदिराच्या मंडपात गोळा झाला.
“आले का रे सगळे”, अध्यक्षांनी एकाला हळूच विचारले.
त्याने होकार भरताच त्यांनी वरच्यांना इशारा केला. त्याबरोब्बर तिशीचा एक चुणचुणीत इसम उभा राहून बोलू लागला,
“..तर मंडळी, आजच्या ह्या सभेचं अध्यक्षस्थान श्री. पायचाटेंनी स्वीकारावं, अशी मी त्यांना विनंती करतो..”,
त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अध्यक्ष पायचाटे टुणकन उडी मारून मंचावर उभे राहिलेदेखील. तशी तो चुणचुणीत सूत्रसंचालक गर्दीत जाऊन बसला.

एकवार घसा खाकरून पायचाटेंनी बोलायला सुरुवात केली,
“मंडळी, आज आपल्या देशावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळलाय. कालच बातमी आली की, आपल्या दयाळू आणि परमकृपाळू इंग्रज सरकारच्या महाराणीसरकार, गंगाभागिरथी श्रीमती व्हिक्टोरियादेवी यांचे परवा देहावसान झाले आहे. आता देहावसान परवा झालं, बातमी काल आली; तर दु:खाचा डोंगर आज कसा काय कोसळला, असं कुणी विचारू नका! ते महत्वाचं नाही, तर दु:खाचा डोंगर कोसळलाय हे महत्वाचं”!
सभेत हलकीशी खसखस पिकली. आपण शोकसभेत विनोद करण्याचा गाढवपणा केलाय, हे पायचाटेंना अंमळ उशीराच लक्षात आले. ताबडतोब सावरुन घेत त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली,
“तर मंडळी, आज आपण सारे या कठिण प्रसंगी दु:ख व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत. आपले नाशिक गाव तसे लहानसेच असले, म्हणून काय झाले? आपली या कृपाळू इंग्रजसरकारप्रति असलेली निष्ठा पुण्या-मुंबईहून यत्किंचितही कमी नाही. तीच निष्ठा आज आपण सारे व्यक्त करुयात. महाराणींच्या निधनानिमित्त दु:खाचा ठराव मी आपणां सर्वांपुढे मांडतोय. चला, आपण सारेच एकमुखाने पाठिंबा देऊन आपल्या भावना दाखवून देऊयात..”!
त्यासरशी, श्री. चेंगट ईमानकर उभे राहिले. मंचावर येऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली,
“श्री. पायचाटेंच्या प्रस्तावाला मी समस्त नाशिककरांतर्फे एकमुखाने अनुमोदन..”
“थांबा!!”
ईमानकरच नव्हे तर सारी सभाच दचकली एवढा जोरदार आवाज घुमला. प्रतिक्षिप्त क्रियेने सर्व माना आवाजाच्या मालकाच्या दिशेने वळाल्या. पांढरेशुभ्र धोतर व तितकाच शुभ्र सदरा, त्यावर अंगरखा, त्यावर कोट असा पेहराव केलेला, मध्यभागी कशिद्याची एक रेष काढलेली टोपी घातलेला तो कोवळा तरुण पाय रोवून उभा होता. लोकांमध्ये कुजबूज सुरु झाली. त्यात कुणाचा तरी आवाज आला,
“अरे हा तर दामोदरपंत सावरकरांचा मुलगा. विनायक”!
लागलीच कुजबूजीला एक चाळा मिळाला, ‘विनायक सावरकर..? विनायक सावरकर..?’

अवघ्या अठरा वर्षांच्या विनायकाने सारी कुजबूज शांत होऊ दिली. आणि पुन्हा एकवार ठाम स्वरांत बोलू लागला,
“एकमुखाने नाही! मी विनायक दामोदर सावरकरदेखील याच नाशिक नगरीतील भगूर गावचा रहिवासी आहे. माझा या ठरावाला पाठिंबा नाही”!
“हो, आमचाही या ठरावाला पाठिंबा नाही”, म्हसकर व पागेदेखील उभे राहिले.
पायचाटेंना अध्यक्षाच्या भूमिकेमुळे फार काही बोलता येईना. आपल्या पुढारपणाच्या आयत्या संधीवर कुणीतरी पंधरा-वीस वर्षांचा पोरगा पाणी फिरवू पाहातोय, ही गोष्टच त्यांना मोठी चीड आणणारी होती. परंतु राग चेहऱ्यावर न दाखवता त्यांनी शांतपणे विचारले,
“पाठिंबा नसण्याचे कारण काय”?
“कारण एकच”, सावरकर त्वेषाने म्हणाले, “कारण एकच की, जी वारली ती इंग्रजांची राणी होती. त्या इंग्रजांची, ज्यांनी आपल्या देशाला पारतंत्र्याच्या अंधकारात ढकललंय. आपल्या देशाच्या शत्रूंची राणी होती ती! ती जर वारली तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. आनंदाचा ठराव करायचा सोडून तुम्ही शोकाचा ठराव करताय? माझा या ठरावाला पाठिंबा नाही”!
पायचाटेंच्या डोळ्यांत अक्षरशः अंगार फुलले! दयाळू इंग्रज सरकारचा एवढा घोर अपमान? ते जोराने गरजले,
“बाहेर हाकला रे या बेअक्कल पोरट्यांना. धड मिसरूड फुटलं नाही अन् चाललात मोठ्यांच्यात लुडबूड करायला. मूर्ख लेकाचे..”!
पडत्या फळाची आज्ञा मानून पायचाटेंच्या पायचाट्यांनी सावरकर व इतरांना ओढतच बाहेर काढले. बाहेर पडता पडताही पायचाटेंची वाक्ये कानावर आदळतच होती त्यांच्या,
“दु:खात सुख ते एवढेच की, आता परमकृपाळू राजे सप्तम एडवर्ड हे गादीवर आले आहेत. ते एवढे थोर आहेत, एवढे थोर आहेत, की महाराज एडवर्ड हे खरोखर आमचे बापच आहेत..”!

बाहेर पडलेले सावरकर आणि मित्रमेळ्याचे इतर सदस्य एका चौकात थांबले.
“आता काय करायचे?”, पागेंनी विचारले.
“हो ना! आपला डाव तर फसला”, म्हसकरांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला.
“डाव फसला नाही”, सावरकर मिश्कील हसत म्हणाले, “डाव तर आता टाकणार आहोत आपण”!
“म्हणजे”?
“म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे! या माझ्यामागे, सांगतो!!”, सावरकर म्हणाले आणि उरलेले दोघेही काहीच न कळून त्यांच्या मागोमाग चालू लागले!

दुसऱ्या दिवशी सकाळी गावाला जाग आली आणि गावातील प्रत्येक रस्त्यावर हास्याच्या लाटा उसळू लागल्या. जो तो एकमेकांना टाळ्या देत, मिश्कील कोट्या करत हसत होता. या हास्यकल्लोळाला एक निनावी भित्तिपत्रक कारणीभूत असल्याची बातमी पायचाटेंपर्यंत पोहोचली. असं काय गमतीदार लिहिलंय त्यावर बघूया तरी, म्हणून ते रस्त्यावर आले. एका भिंतीशी त्यांना ते पत्रक चिकटवलेलं दिसलं. पत्रक वाचलं आणि पायचाटेंच्या पायाखालची जमिनच सरकली! म्हणजे इतका वेळ सगळा गाव आपल्यावर हसतोय? त्या नतद्रष्ट भित्तीपत्रकावर ना कुणाचे नाव होते ना फार काही मजकूर. सगळ्याच पत्रकांवर होता तो हाताने खरडलेला एकच प्रश्न,
‘राजे एडवर्ड जर खरोखर तुमचे बापच असतील, तर मग जे तुमच्या घरी आहेत ते तुमच्या मातोश्रींचे कोण’?

— © विक्रम श्रीराम एडके.
[ सदर कथेचे स्वामित्वाधिकार लेखक ऍड. विक्रम एडके यांजकडे सुरक्षित आहेत. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय ही कथा कोणत्याही स्वरुपात प्रकाशित अथवा कॉपी-पेस्ट करता येणार नाही. केल्यास, गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आवडल्यास केवळ ‘शेअर’ बटनावर क्लिक करून लेखकाच्या नावासहित शेअर करावे. लेखकाच्या अन्य ‘सावरकर कथा’ वाचण्यासाठी, तसेच लेखकाने स्वा. सावरकर व अन्य विषयांवर दिलेली व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्यासाठी अथवा लेखकाची व्याख्याने आपल्या परिसरात आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com ]

टीपा: १) वेगवेगळ्या दिवशी घडलेल्या दोन सत्यघटनांची एकाच कथेत केलेली गुंफण.
२) पायचाटे व चेंगट ईमानकर ही नावे खरी नाहीत. ती सांकेतिक समजावीत. सावरकर स्वतःदेखील आपल्या ललितलेखनात अशी सांकेतिक नावे वापरत असत.

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories