दृष्टीदान

२२ जुन १९४०! त्यादिवशी सकाळपासूनच पावसाने रिपरिप लावली होती. तश्या त्या कोसळत्या पावसात दादरच्या ‘सावरकर सदना’बाहेर एक बग्गी येऊन उभी राहिली. एका हाताने बंगाली पद्धतीचे धोतर सांभाळत दुसऱ्या हातात छत्री तोलून धरणारे एक चाळीशीचे देखणे गृहस्थ त्यातून उतरले. पावसापासून बचाव करण्यासाठी झपाझपा पायऱ्या चढून वर जात असतानाच पहारेकऱ्याने त्यांना अडवलं,
“ओ.. कुठे चाललात घाईघाईने? कुणाला भेटायचंय?”
“जी मेरा नाम सुभाषचंद्र बोस है । सावरकरजीसे मुलाक़ात तय हुई है मेरी ।”, हिंदीतून उत्तर!
“रुकीए थोडं. बघता हूँ!”, पहारेकऱ्याने हिंदीला मराठी तडका दिलेला,
“इधर वहीमें तो कुछ नहीं लिखा मुलाखतके बारेमें! खरं खरं सांगो कौन हो तुम और यहाँ किस वास्ते आये हो?”, भेटीच्या दैनंदिनीत नोंद नाहीसे पाहून पहारेकऱ्याचे आक्रमक होणे साहजिकच होते! शेवटी ‘अखिल भारतीय हिंदुमहासभे’च्या अध्यक्षांच्या निवासस्थानावरचा पहारेकरी तो. केवढेतरी जबाबदारीचे काम!
“आप जरा सावरकरजीको संदेसा भिजवाएँगे की, सुभाषबाबू आए है? एक झटकेमें दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा ।”

सुभाषबाबूंचा हा उपाय बिनतोड होता! पहारेकऱ्याने स्वत:ला सुभाषचंद्र बोस म्हणविणाऱ्या त्या गृहस्थास वरपासून खालपर्यंत न्याहाळले. फारसा शिकलेला नसला तरीही आपल्या कामात चांगलाच मुरलेला होता तो. माणसाची व्यवस्थित जाण आली होती त्याला. हा माणूस कुणी का असेना, पण खोटारडा तर निश्चितपणे नव्हता; हे त्याने बरोब्बर जोखले होते. “आप यहीं ठहरो” म्हणून तो चटकन आत गेला आणि अवघ्या काही क्षणांत हिंदूह्रदयसम्राट विनायक दामोदर सावरकरांची तेजस्वी मूर्ती बाहेर आली!

“अरे सुभाषबाबू, आईए आईए”!
सावरकरांनी सुभाषचंद्रांना हाताला धरून आत नेले. दोघेही व्यवस्थित स्थानापन्न झाल्यावर सावरकरांनी सहजस्वरात विचारले,
“बोलिए, कैसे आना हुआ”?
“जी कुछ दिन पहले मै बॅ. मुहंमदअली ज़िनासे मिलने गया था..”
अवघ्या दोन-तीनच दिवसांपूर्वी घडलेला तो प्रसंग सांगता सांगता सुभाषबाबूंच्या मन:चक्षूंपुढे जसाच्या तसा उभा राहिला.

गांधी-नेहरुंच्या गटबाजीला कंटाळून काँग्रेस सोडल्यावर सुभाषबाबूंनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचा पक्ष काढला होता. पण त्याला म्हणावे तसे यश लाभत नाही म्हटल्यावर काही नाही तर किमान हिंदू-मुस्लिम ऐक्याचे तरी काम करावे, असे त्यांनी ठरवले. त्याचेच एक पाऊल म्हणून त्यांनी मुंबईला येऊन बॅ. ज़िनांची भेट घेतली होती. पण ज़िनांनी पहिल्याच वाक्यात सुभाषबाबूंच्या दांड्या गुल केल्या. ज़िना म्हणाले होते,
“तुम्ही मुसलमानांचा प्रतिनिधी असलेल्या मला भेटायला आलात, मला पाकिस्ताननिर्मितीचे स्वप्न सोडून द्यायला सांगताहात; हे सर्व खरे. पण चर्चा ही बरोबरीच्या लोकांमध्ये व्हायला हवी ना! मी मुसलमानांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी चर्चा करेन हो, पण या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही हिंदूंचे अधिकृत प्रतिनिधी आहात का”?
“मी.. समजलो नाही..”
“अहो समजायचे काय त्यात! मी मुसलमानांचा प्रतिनिधी म्हणून काहीतरी शब्द देईन, तसाच काहीतरी शब्द तुम्ही समस्त हिंदूंच्या वतीने देऊ शकता काय? दिला तर सगळे हिंदू तुमचे ऐकतील का? हिंदू-मुस्लिम ऐक्याची चर्चा ही हिंदू-मुस्लिमांच्या अधिकृत प्रतिनिधींनीच करायला हवी ना”!
“होय, खरे आहे तुमचे”, सुभाषबाबू म्हणाले, “मी गांधींना तुमच्याशी चर्चा करण्यासाठी विनवू का”?
“छे छे.. गांधी तर काँग्रेसचे नेते आहेत. ते काँग्रेसचे प्रतिनिधी असतीलही एकवेळ, पण हिंदूंचे खचितच नाहीत!”, ज़िनांचे उत्तर.
“मग नेहरु..”
“तुम्ही पुन्हा काँग्रेसच्याच नेत्याचे नाव घेताहात”!
सुभाषबाबूंनी जरावेळ डोके खाजवले. अखेरीस त्यांनी ज़िनांनाच विचारले,
“मग तुम्हीच सांगा, हिंदूंचा प्रतिनिधी या नात्याने तुमच्याशी कुणी चर्चा करायला हवी”?
यावर ज़िना हसले. शांत स्वरात, एकेका अक्षरावर व्यवस्थित वजन देत ते उद्गारले,
“मी विरोधक असूनही स्पष्टपणे सांगतो. याक्षणी उभ्या हिंदुस्थानात माझे पाकिस्ताननिर्मितीचे स्वप्न भंग करण्याची ताकद ठेवणारा आणि हिंदूंचा अधिकृत प्रतिनिधी या नात्याने माझ्याशी चर्चा करण्याचे सामर्थ्य असलेला एकच माणूस आहे आणि तो म्हणजे हिंदुमहासभेचे अध्यक्ष, बॅ. विनायक दामोदर सावरकर! ते जर हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी माझ्याशी चर्चा करू इच्छित असतील, तर काही अर्थ आहे”.

“..आणि म्हणून मी तुम्हाला चर्चेची विनंती करण्यासाठी आलोय!”, सुभाषबाबू बोलायचे थांबले.
एकूण प्रकार ऐकून सावरकरांना मोठी मौज वाटली. मिश्कील हसत त्यांनी विचारले,
“आणि समजा मी ज़िनांसारख्याशी चर्चा करायला नकार दिला तर”?
“तर काय..”, सुभाषबाबू हताशपणे उद्गारले, “तर माझ्या इतर सर्वच मनसुब्यांप्रमाणे हादेखील भंगला असे समजून कलकत्त्याला परत जाईन मी. तिकडे हॉलवेलचा पुतळा आहे. तो उखडून इंग्रज सरकारला विरोध करत देशासाठी तुरुंगात जाण्याखेरीज दुसरा काहीच पर्याय नाही माझ्याकडे”!
गांधी हे सुरुवातीपासूनच नेहरुंचे पक्षपाती. त्यामुळे सुभाषबाबू जरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तरीदेखील सर्व सूत्रे आपल्या व जवाहरच्याच हाती राहावीत म्हणून त्यांनी काही खेळी खेळल्या. सुभाषबाबू त्यात अडकत गेले. अखेरीस काँग्रेस सोडण्याखेरीज काहीच पर्याय उरला नाही त्यांच्यासमोर. आता तर ते या अश्या पुतळा उखडण्याची आंदोलने करून तुरुंगात जायच्या गोष्टी बोलू लागलेले. काय होऊन बसले होते या लढवय्या देशभक्ताचे! सुभाषबाबूंचे मन सावरकरांना समजत होते. त्यांनी हळूवारपणे विचारले,
“इंग्रज सरकारची तुमच्यावर किती नजर आहे, याची कल्पना आहे का तुम्हाला? तुम्ही काहीतरी वेडगळ पाऊल उचलावं आणि तुम्हाला तुरुंगात धाडावं याची संधीच शोधत असतील ते. अश्यावेळी देशाला तुमची गरज असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टींपायी तुरुंगात जाऊन पडायचे म्हणताय? अहो, मी तर अंदमानातील बंदिजनांनादेखील सांगायचो की, तुम्ही हरप्रकारे सुटका करून घ्या. मुक्त मनुष्यच देशकार्याला साहाय्यभूत होत असतो, बंदीजन नव्हे! आणि तुम्ही मुद्दामहून तुरुंगात जाऊन पडायचे म्हणताय”?
“अहो पण जनतेत ब्रिटिशांविरुद्ध क्षोभ चेतवायला नको का?”, सुभाषबाबू विवश उद्वेगाने उद्गारले.
त्यावर सावरकर एक स्मितहास्य करून म्हणाले, “अहो पण, कित्येक ब्रिटिश प्रपीडक चांगले ठणठणीत जिवंत असताना कुणा मेलेल्या ब्रिटिशाचा पुतळा उखडल्याने निर्माण झालेला जनक्षोभ निरर्थकच नव्हे का”?
सुभाषबाबूंनी विवशतेने खुर्चीच्या दांड्यावर हाताची मूठ आपटली,
“मग तुम्हीच सांगा, मी काय करू”?

उत्तरादाखल सावरकरांनी जवळच्याच पेटीतून एक पत्र बाहेर काढून सुभाषबाबूंसमोर टाकले. सुभाषबाबूंना त्यावरील प्रेषकाचे नाव व्यवस्थित दिसत होते – ‘रासबिहारी बोस’!
सुभाषबाबूंच्या चेहऱ्यावर संभ्रम पाहून सावरकरच बोलू लागले,
“हे जपानहून आलेले रासबिहारी बोसांचे पत्र! तुम्हाला तर माझे सैनिकीकरणाचे धोरण ठाऊकच आहे! नाही, तुम्ही त्यावर अनेकदा मला ‘ब्रिटिशांचा एजंट’ म्हणून टीका केली आहे, हे मी जाणतो. पण आज त्याच धोरणाचा परिणाम असा झाला आहे की, पूर्वी ब्रिटिशसैन्यात जे हिंदू-मुस्लिमांचे प्रमाण ३५:६५ होते, ते आता बरोब्बर उलटे झालेले आहे. हे सारे हिंदू वीर केवळ आणि केवळ हिंदुस्थानाशीच एकनिष्ठ आहेत. मी तर माझ्या भाषणांमध्ये तरुणांना आवाहनच करत असतो की, ‘ब्रिटिश सैन्यात सामील व्हा, त्यांच्याकडून फुकटात बंदुक चालवायला शिकून घ्या आणि वेळ आली की त्याच बंदुकांची तोंडे ब्रिटिशांच्याच दिशेने वळवा’! असे ते हिंदूवीर देशकार्य करायला अतिशय उत्सुक आहेत. त्यांच्यापैकी कित्येकजण या महायुद्धाच्या धबडग्यात जर्मनी-जपानला युद्धकैदी झाले आहेत. आमच्या योजनेचाच एक भाग म्हणून रासबिहारी बोस इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी अश्या युद्धकैद्यांचं एक सैन्य उभारताहेत. तुम्ही त्यांचे नेतृत्व स्वीकारा. ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटा आणि संपूर्ण स्वातंत्र्याची उद्घोषणा करा! आम्ही आतून राजकीय मार्गाने लढतो तुम्ही बाहेरून सैनिकी मार्गाने लढा! आज अखंड हिंदुस्थानात जर मला कुणी या सैन्याचे नेतृत्व करू शकणारे साहसी व्यक्तिमत्त्व दिसत असेल, तर ते तुम्हीच आहात सुभाषबाबू, फक्त तुम्हीच आहात! बोला करणार का त्यांचे नेतृत्व”?

उत्तर द्यायला सुभाषबाबू भानावर होतेच कुठे? त्यांची मुद्रा उत्फुल्ल झाली होती. डोके थरथरू लागले होते. कानशिले तप्त झाली होती. त्या तंद्रीत त्यांना सावरकरांचा ‘आता समजले का, तुमचे नाव भेटीच्या दैनंदिनीत का नव्हते ते?’ हा प्रश्नही ऐकू नाही आला. ‘विचार करतो’ म्हणून सुभाषबाबू गेले खरे, परंतु त्यांची दृष्टी शून्यात लागली होती. नव्हे, आज सुभाषबाबूंना नवेच दृष्टीदान झाले होते; आणि भेट संपेपर्यंत आकाशही निरभ्र!!

— © विक्रम श्रीराम एडके.
[ सदर कथेचे स्वामित्वाधिकार लेखक ऍड. विक्रम एडके यांजकडे सुरक्षित आहेत. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय ही कथा कोणत्याही स्वरुपात प्रकाशित अथवा कॉपी-पेस्ट करता येणार नाही. केल्यास, गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आवडल्यास केवळ ‘शेअर’ बटनावर क्लिक करून लेखकाच्या नावासहित शेअर करावे. लेखकाच्या अन्य ‘सावरकर कथा’ वाचण्यासाठी, तसेच लेखकाने स्वा. सावरकर व अन्य विषयांवर दिलेली व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्यासाठी अथवा लेखकाची व्याख्याने आपल्या परिसरात आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com ]

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories