एका शब्दाचा जन्म

दारावर मोठ्ठ्या, सोनेरी अक्षरात पाटी डकवलेली होती — ‘गणपत महादेव नलावडे, मेयर’! गणपतरावांनी एकवार पाटीकडे नजर टाकली आणि आत, कार्यालयात प्रवेश करते झाले. गेले चार दिवस रोज ही पाटी पाहात होते ते. पुण्याचे मेयर होऊन बरोब्बर चारच दिवस तर झाले होते त्यांना! बरं कार्यालयात टेबल-खुर्च्या आणि इतर साधनं आहेत, म्हणून त्याला कार्यालय म्हणायचं फक्त. नाहीतर गेल्या चार दिवसांपासून अक्षरशः पुष्पभांडार झालंय त्याचं. हाऽऽ पुष्पगुच्छांचा ढीग! हार-तुरे, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू तर वेगळ्याच! गणपतरावांनी खिन्नपणे एकवार सगळ्याकडे नजर टाकली. गणपतरावांना सारंच निरर्थक वाटत होतं.

जागेवर बसल्या-बसल्या न राहावून त्यांनी शिपायाला हाक मारली. तोही धावतच आला.
“जी”?
“ही एवढीच पत्रं आलीयेत का रे”?
“व्हय जी”!
“नीट आठवून सांग. एखादं पत्र म्हणा, पाकीट म्हणा वा गुच्छासोबत येते तशी चिठ्ठी म्हणा; नजरेतून सुटली तर नाही ना तुझ्या”?
“न्हाई जी. म्या सोत्ताच तर डाकवाल्याकडनं सारी घेऊन लावून ठेवली हितं”.

यावर गणपतरावांचा चेहरा पडला असावा. कारण, शिपायाने ताबडतोब विचारले,
“कोन्ता खास सांगावा यायचा हुता का”?
“नाही नाही. काही नाही. जा तू”.
“सायेब, माज्याकडनं काई चूक झाली का”?
“नाही नाही. अरे खरंच तसं काही नाही. जा तू”, गणपतराव चांगलेच वरमले. आपण जरा अतिच तर करत नाही ना, असंही क्षणभर वाटून गेलं त्यांना.
शिपाई बावळटासारखा चेहरा करून जायला लागला. तशी गणपतरावांनी त्याला थांबवलं. म्हणाले,
“अरे ऐक. आता मी जरा काम करत बसणार आहे. आज काही कुणाच्या भेटी-गाठी ठरलेल्या नाहीत ना? ठिक आहे तर! आता कुणालाच आत सोडू नकोस”.
“जी” म्हणून शिपाई निघून गेला. ‘आपण स्वत:च करावी का चौकशी?’, गणपतरावांच्या मनात येऊन गेलं. पण ‘नको नको. ते बरं दिसणार नाही’, असं म्हणून त्यांनी तो विचार झटकला आणि समोरच्या कामाकडे लक्ष द्यायला लागले. हळूहळू तो विचार मागे पडला. त्यानंतर चांगले दोन-एक तास गणपतरावांनी स्वत:ला कामातच बुडवून घेतलं. समाधीच लागली होती जणू त्यांची.

गणपतरावांची समाधी भंगली ती कसल्याश्या कोलाहलाने. सुरुवातीचे एक-दोन क्षण काही समजलंच नाही. नीट लक्ष देऊन ऐकायला लागले तेव्हा जाणवलं की, त्यांच्या कार्यालयाच्या दाराशीच दोन व्यक्ती वाद घालतायत.

गणपतरावांनी जागेवरूनच “काय चाललंय रे? कोण आहे?” असं विचारलं. त्याबरोबर शिपाई धावतच आत आला. मागोमाग एक कार्यकर्त्यासारखा दिसणारा मनुष्यही आत शिरला. ते पाहून शिपायाच्या कपाळाला नकळतच आठ्या पडल्या. पण साहेबांसमोर चिडणं बरं दिसणार नाही म्हणून तो काही बोलला नाही. गणपतरावांनी इशाऱ्यानेच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्यावर शिपाई सांगू लागला,
“सायेब पाहा ना, तुमीच म्हनले होते ना कुनालाच आत सोडू नको म्हनून. तर ह्ये सायेब ऐकेचनात. काय तर म्हने, टपाल द्यायचंय. म्या म्हनलं, टपालच हाय नव्हं, मंग द्या की माझ्यापाशी मी द्येतो सायबास्नी नंतर. तर म्हनले की, न्हाय, म्हासभेच्या हापिसातून आलोय न् म्हत्वाचा सांगावा हाय. तुमालाच द्यायचा म्हंत्यात”.
गणपतरावांनी आलेल्या व्यक्तीला एकवार आपादमस्तक न्याहाळलं. हिंदूमहासभेच्या कार्यालयातून आल्याचं सांगतोय हा माणूस, पण मग आपण कधी पाहिल्यासारखं का वाटत नाहीये याला?

त्यांचे भाव ओळखून तो समोरचा तरुण मघाशीच्या भांडणाचा लवलेशही न दाखवता उत्साही स्वरात सांगू लागला,
“मी रविंद्र जगताप. राजापूरला असतो. नुकताच मुंबईला आलोय शिकायला. राजापूरला असल्यापासून महासभेचं काम करतो मी. आज कामानिमित्त पुण्यात येणार होतो. तर काल संध्याकाळीच तात्यारावांनी बोलावून घेतलं..”
‘तात्याराव? बॅ. सावरकर?’ हा उल्लेख होताच गणपतरावांनी कान टवकारले! जगतापच्या ते यत्किंचितही लक्षात आलं नाही. त्याचा ओघ चालूच होता,
“..मी म्हटलं, देईन की त्यात काय! आता साक्षात स्वा. सावरकरांनी काम सांगितलेलं. त्यांची सेवा करण्याची संधी म्हणजे साक्षात स्वातंत्र्यलक्ष्मीचीच सेवा करण्याची संधी की! घेतलं पत्र आणि आलो इकडे! तर हे महाशय आत सोडेचनात! साहेब कामात आहे म्हणे! आता मला सांगा, सावरकरांच्या निरोपापेक्षा अजून कोणतं काम महत्वाचं असणार आहे? घ्या..”!!
असं म्हणून जगतापने पत्र गणपतरावांच्या दिशेने सरकावले. गणपतरावांच्या हाताला हलकासा कंप सुटला होता. परंतू तसं जाणवू न देता त्यांनी ते पत्र हातात घेऊन एका बाजूला ठेवले आणि जगतापकडे वळून म्हणाले,
“जगतापसाहेब, चहा घेता ना”?
“छे छे साहेब, चहा नको. घाईत आहे मी जरा. बाहेर मित्र वाट पाहात थांबलेयत. ते काय.. ते पुण्यात नवा आहे ना मी. कार्यालय माहिती नव्हतं मला”.
यावर गणपतराव म्हणाले, “हरकत नाही. पुढच्यावेळी आलात तर चहाला जरुर या”! मग शिपायाकडे मान वळवून म्हणाले, “पुढच्यावेळी हे आले तर अडवू नकोस रे यांना. पाहुणे आहेत आपले”! शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली! त्या आनंदातच तोही परतला.

दोघेही गेल्यावर गणपतरावांनी अक्षरश: झडप घालून ते पत्र हातात घेतलं. आपल्या गुरूंचं पत्र! आपल्या देवाचं पत्र!! साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पत्र!!! गेले चार दिवस या-त्या सगळ्या लोकांच्या आणि सगळ्या नेत्यांच्या शुभेच्छा येत होत्या. पण आपली नजर लागली होती ती केवळ याच पत्राकडे. कित्येकदा वाटलं होतं की धावत जावं तात्यारावांकडं आणि सांगावं.. —
‘तात्याराव.. तात्याराव बघा! मी मेयर झालोय तात्याराव! या विद्वज्जनांच्या पुणे नगरीने हिंदूमहासभेच्या बाजूने कौल दिलाय! तात्याराव, तुमचे हिंदूराष्ट्राचे स्वप्न साकारण्याच्या मार्गात आज अजून एक पाऊल पुढे टाकलंय आपण! आणि त्या पावलात कणभर का होईना पण तुमच्या या शिष्याचा वाटा आहे, या गणपत नलावड्याचा वाटा आहे, तात्याराव’!

आणि ज्यावेळी येणाऱ्या संदेशांपैकी एकही संदेश तात्यारावांचा निघत नव्हता, तेव्हा कसे खट्टू झालो होतो आपण! नुसत्या आठवणीनेच गणपतरावांना एखाद्या लहान बालकासारखे हसू फुटले! त्याभरातच थरथरत्या हातांनी त्यांनी ते पत्र एकवार भाळी लावले. मग हलक्या हातांनी त्यांनी ते फोडले. आत सावरकरांनी स्वहस्ते लिहिलेला कागद! पत्राच्या सुरुवातीस सावरकरांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे लिहिलेल्या ‘श्रीराम’कडे त्यांनी किंचित काळ डोळे भरून पाहिले. सावरकरांची छबी दिसली असावी बहुतेक गणपतरावांना त्यात! ते अधीर होऊन वाचू लागले —

“प्रति श्री. गणपत महादेव नलावडे यांस, सप्रेम नमस्कार.
पुण्याची धुरा आता समर्थ हातांत आलीये म्हणायची! तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच, यात मला किंचितही शंका वाटत नाही. तुम्हाला या जबाबदारीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
खरं म्हणजे मी तुमची क्षमाच मागायला हवी. पत्र पाठवायला अंमळ, नव्हे बराचसा उशीरच झालाय. पण काय करू! तुम्हाला माझे हे भाषाशुद्धीचे धोरण तर ठाऊकच आहे. ज्यांच्याशी भांडायचं त्याच इंग्रजीला आपल्या देशी भाषांचा भ्रतार बनवायचं? तेही आपल्या देशी भाषा स्वत:च अतिशय संपन्न आणि सामर्थ्यवान असताना? आपणच परकीय शब्द घुसडून आपल्या वैज्ञानिक आणि अर्थवाही भाषेचे व शब्दांचे मूल्य का म्हणून उणावून घ्यायचे? जिथं स्वकीय भाषांतील प्रतिशब्द उपलब्ध आहेत, तिथे ते योजायलाच हवेत. तिथे इंग्रजीचे वा ऊर्दू-फारसीसुद्धा अन्य कुणाही परकीय भाषेचे भलते लाड नकोतच! मात्र जिथे शब्दांना प्रतिशब्द उपलब्ध नाहीत, तिथेही देववाणी संस्कृतला शरण जात सोपे, सुटसुटीत आणि अर्थवाही शब्द शोधणे व ते बोलीभाषेत रुळवणे, हे देखील आपले तितकेच महत्वाचे असे राष्ट्रीय कर्तव्य आहे! उदाहरणार्थ – ते ‘स्कूल’ म्हणतात, मला त्यासाठी ‘शाळा’ हा पर्याय सुचतो. ते ‘हायस्कुल’ म्हणतात – त्याला आपण ‘प्रशाला’ म्हणू शकतो. ते ज्याला ‘टॉकी’ अथवा ‘सिनेमा’ म्हणतात, त्यासाठी ‘बोलपट’ अथवा ‘चित्रपट’ असे दोन शब्द सुचताहेत मला – यातला कोणता शब्द वापरायचा ते तेवढे ठरवायचे. ‘अप-टु-डेट’ला ‘अद्ययावत’ म्हणता येईल, ‘ऍटमॉस्फिअर’ला ‘वायूमान’ म्हणता येईल, ‘पोलिस’ला ‘आरक्षी’ म्हणता येईल. ‘तारीख’ला ‘दिनांक’ म्हणता येईल. असे बरेच काही. मात्र माझे घोडे या ‘मेयर’ शब्दाच्या तटावर अडले होते. त्यासाठी पर्यायी शब्द काही सुचत नव्हता आणि तुम्हाला ‘मेयर’ म्हणून शुभेच्छा देणे मनाला पटत नव्हते. आता काहीच सुचणार नाही, असे वाटत असतानाच एक शब्द स्फुरला — महापौर!
साधारण मोठ्या गावाच्या प्रमुखास ‘मेयर’ म्हणतात. अश्या मोठ्या गावांच्या मागे ‘पूर’ लावायची आपल्याकडे पद्धत आहे. अगदी वैदिक काळापासून आहे. आणि अश्या ‘पुरा’त राहाणाऱ्या रहिवाश्यांना म्हणतात, ‘पौरजन’. तुम्ही या पुणे नामक ‘पुरा’चे प्रमुख आहात. प्रथम नागरिक. त्याअर्थी तुम्ही झालात – महापौरजन! आणि त्याचेच सुटसुटीत रूप आहे ‘महापौर’!
असा अर्थपूर्ण शब्द सापडल्या-सापडल्या ताबडतोब पत्र लिहावयास घेतले आणि ताबडतोब धाडलेसुद्धा! तेव्हा, महापौर गणपतराव नलावडे, तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा”!!

खाली दिनांक आणि सावरकरांची घुमावदार स्वाक्षरी होती! पत्र वाचत असतानाच गणपतरावांचे मन सावरकरांची अजोड तत्त्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धीमत्ता, यांच्यासमोर नत झाले होते. भानावर येताच गणपतराव धावत-धावत आपल्या कार्यालयाबाहेर आले. त्यांना असे आलेले पाहून बाहेर उभे असलेले लोक चमकलेच! शिपाई बिचारा गोंधळून उभा राहिला. तिकडे कुठेच लक्ष न देता त्यांनी दारावर लावलेली पाटी उतरवण्याची खटपट चालू केली.
“काय झालं सायेब”, शिपायाने बावरून विचारले.
“तू लागलीच पळ आणि नवी पाटी बनवायला टाक. अश्शीच नक्षी हवीये अगदी! फक्त त्यावर लिहिलेलं हवंय – ‘गणपत महादेव नलावडे, महापौर’! समजलं? जा लवकर”, असे म्हणून त्याच्याकडे वळूनदेखील न पाहाता गणपतरावांनी पाटी उतरवण्याचे काम सुरूच ठेवले!

शिपाई बिचारा काहीच न समजून जागीच उभा होता. बेट्याला काय कल्पना की, तो एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला होता! हो, सावरकरांनी मराठी भाषेला अजून एक चिरंतन टिकणारी आणि लवकरच सर्वमान्य होणारी देणगी दिली होती! आज एका शब्दाचा जन्म झाला होता!!

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख/कथा वाचण्यासाठी तसेच विविध विषयांवरील लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories