गर्वहरण

घड्याळात ९ चे ठोके पडले आणि बल्लवाचार्याची पाने मांडण्यासाठी धावपळ सुरु झाली. त्याची पाने मांडून होतात न होतात तोच, त्याचे मालक भोजनगृहात आले.
“साहेबांच्या दिनचर्येवर अक्षरश: घड्याळ लावून घ्यायला हवे”, अदबीने नमस्कार केलेला बल्लव पुटपुटत निघून गेला.
मालक मात्र खुर्चीवर बसण्याऐवजी तडक चालत भोजनगृहाच्या टोकाशी असलेल्या आरशाजवळ गेले आणि हात फिरवत केस सारखे करू लागले. खरं तर, केस सारखे करणे हा निव्वळ बहाणा होता. साहेबांना प्रत्यक्षात आरशात बघण्याची भारी हौस! त्याशिवाय का कुणी अगदी भोजनगृहातही आरसा बसवून घेतो? तोही पूर्णाकृती आणि नक्षीदार! साहेब जरा वेळ आपले रुपडे न्याहाळत उभे राहिले. ‘पन्नाशी उलटून दोन वर्षे होऊन गेली, तरी देखणेपण किंचितही कमी झालेले नाही आपले’, हा विचार मनात येताच त्यांची छाती अजून अर्ध्या इंचाने बाहेर आली. मान अजूनच ताठ झाली! मोठ्या अभिमानाने त्यांनी स्वत:चेच नाव मोठ्याने उच्चारले —
“स्टॅफर्ड क्रिप्स”!
आणि मग स्वतःच नकारार्थी मान हलवत दुप्पट अभिमानाने व अजूनच चढ्या आवाजात म्हणाले,
“लॉर्ड प्रिव्ही सिल सर स्टॅफर्ड क्रिप्स”!!
वाह, काय वजनदार नाव आहे! अगदी आपल्यासारख्या वजनदार माणसाला शोभेल असं! नाहीतरी गेले काही दिवस भारताचे राजकारण कुणाभोवती फिरतेय? कुण्या गव्हर्नरच्या की व्हाईसरॉयच्या? अरे हट!! माझ्याभोवती फिरतेय, माझ्या!!

मोठ्या समाधानाने मान डोलावत ते आपल्या खुर्चीशी येऊन बसले. हो, न्याहारीला उशीर व्हायला नको, साडेनऊला अजून काही ‘ब्लडी इंडियन्स’ भेटायला येणार आहेत ना! विचार करता करता त्यांनी ब्रेडचा तुकडा पानात वाढून घेतला. जवळच ठेवलेली सुरी अलगदपणे बटरच्या लादीवर टेकवली. टेकवताक्षणीच ती धारदार आणि अंमळ वजनदार सुरी मऊ बटर कापत खाली गेली, थेट शेवटपर्यंत! क्रिप्ससाहेबांना हसू फुटले!!
‘या सुरीने किती का आरामात बटर कापलेले असो, आपली कारकीर्द हिच्यापेक्षा लाखपटीने अधिक आरामात चाललीये!! आमच्या नॉर्डिक वंशावर जरी बुद्धीमत्तेचा वरदहस्त असला, तरीही आपल्यावर तो काकणभर अधिकच आहे. अवघ्या दोनच वर्षांपूर्वी जर्मनी आणि रशिया या दोन माजलेल्या अस्वलांचे कसे भांडण लावून दिले होते आपण! मूर्खांना अजूनही समजले नसेल की, तुमच्या युद्धाचा कर्ताकरविता हा स्टॅफर्ड.. अंहं.. लॉर्ड प्रिव्ही सिल सर स्टॅफर्ड क्रिप्स होता! आपल्या त्या अक्कलहुशारीमुळेच तर स्वत: चर्चिलसाहेबांनी आपली भारतातला हा सांप्रतचा राजकीय पेच सोडवण्यासाठी नेमणूक केली आहे ना’!

खाता खाता अवघ्या महिनाभरापूर्वी चर्चिलशी झालेल्या भेटीचा प्रसंग जसाच्या तसा समोर उभा राहिला क्रिप्ससाहेबांच्या! कसे साक्षात विन्स्टन चर्चिलने विश्वास व्यक्त केला होता आणि म्हणाले होते,
“मि. क्रिप्स, हिंदुस्थानवर राज्य करणं दिवसेंदिवस अवघड आणि खर्चिक होत चाललंय. त्यातून ही सध्याची युद्धपरिस्थिती! आता लवकरच हिंदुस्थानला स्वायत्तता देण्याखेरीज पर्याय नाहीये आपल्याकडे.”
पंतप्रधानाचे म्हणणे ऐकून क्रिप्ससाहेबांनीही चेहऱ्यावर माफक निराशा दाखवली. आपल्याला इथे बोलावण्याचे कारण मात्र अजूनही त्यांना समजत नव्हते. चर्चिलच पुढे म्हणाले,
“परंतु खूप विचाराअंती आपल्या सरकारने एक योजना बनवली आहे. आपण भारताला स्वातंत्र्य तर द्यायचं, पण भारतातल्या संस्थानांचा स्वतंत्र राहाण्याचा वा वाटलं तर भारतीय संघराज्यात सामील होण्याचा अधिकार मान्य करून! याने भारताला स्वातंत्र्य तर मिळेलच, पण त्याचे शेकडो तुकडेसुद्धा पडतील. आणि ही युद्धपरिस्थिती संपली रे संपली की, खिळखिळं झालेलं भारतीय संघराज्य आपण पुन्हा एकवार हस्तगत करु”!!
‘काय डोकं आहे या माणसाचं! उगाच नाही या महान ब्रिटिश साम्राज्याचा पंतप्रधान झालाय हा माणूस! आपणही होऊ, एक ना एक दिवस आपणही होऊ’, असा विचार करणाऱ्या क्रिप्सचे डोळे चर्चिलबद्दलच्या कौतुकातिशयाने चमकू लागले! पण तरीही प्रश्न उरत होताच. अखेरीस धीर करून क्रिप्सने विचारलेच,
“अतिशय उत्तम कल्पना आहे युवर मॅजेस्टी, परंतु हे सर्व माझ्यासमोर उघड करण्याचा हेतू समजू शकेल का”?
चर्चिल मंद हसत म्हणाले, “भारतीय नेत्यांच्या दृष्टीने अस्वीकारार्ह असलेली ही योजना सर्वांच्या गळी उतरवायला कुणीतरी चाणाक्ष, धूर्त आणि मुत्सद्दी माणूस नको? तुमच्याशिवाय कोण करू शकणार हे अवघड कार्य”!
क्रिप्सचा अहंकार कुरवाळणारा हा वार बरोब्बर वर्मी बसला होता. ताबडतोब सगळी तयारी करून क्रिप्समहाशय दिल्लीला रवाना झाले होते! आणि हां हां म्हणता म्हणता भारतातल्या एकेका धुरंधर पुढाऱ्याला बाटलीत बंद करण्यात त्यांनी यशही मिळवलं होतं!

क्रिप्सना मोहनदास गांधींसोबत झालेली आपली भेट आठवली. स्वयंनिर्णयाचे तत्त्व ऐकून गांधी अस्वस्थपणे उद्गारले होते,
“अश्याने भारताचे तुकडे नाही का पडणार”?
“त्याला माझा इलाज नाही”, क्रिप्स उद्गारले होते, “कायद्याप्रमाणे बोलायला गेले तर ही सारी संस्थाने एकेकाळी स्वतंत्रपणे राज्य करीत होती. मग आता त्यांच्यावर भारतीय संघराज्य लादणे अन्यायकारक होणार नाही का”?
आणि क्रिप्सच्या या युक्तिवादापुढे गांधींनी मान तुकवली होती. ‘महात्मा म्हणे! कसा मिनिटभरात गुंडाळला मी हा महात्मा’, क्रिप्सच्या चेहऱ्यावर मग्रूर स्मित झळकून गेले!

गांधींचे पट्टशिष्य नेहरुंना तर आपण अक्षरशः गपगारच केले होते! म्हणे, स्वयंनिर्णयाला काही आधार आहे का! अरे हा क्रिप्स काय कच्च्या गुरुचा चेला वाटला की काय तुला? इथे येण्याआधी सगळा अभ्यास करुनच आलोय मी! हे घे कॅनडाचे उदाहरण! तिथे अगदी अस्साच स्वयंनिर्णय घेतला होता ना राज्यांनी? मग गप्प बस आता!

क्रिप्ससाहेबांच्या घमेंडी विचारांची तंद्री भंगली ती दारावर झालेल्या टकटकाटामुळे! वळून पाहिले तो त्यांचा नोकर होता.
“आले का ते लोक?”, क्रिप्ससाहेब चेहऱ्यावरची मग्रुरी किंचितही मावळू न देता म्हणाले.
“होय”.
“त्यांना आत बसायला सांग, मी आलोच!”
“मी सांगितलं त्यांना तसं, पण ते आत यायला तयार नाहीत”, नोकर चाचरत म्हणाला.
“भेटीसाठी आले आणि आत यायला तयार नाहीत? हा काय वेडेपणा? ब्लडी इंडियन्स! काय म्हणताहेत ते?”
“जी त्यांनी निरोप पाठवलाय तुमच्यासाठी. ते म्हणाले की, मी अखिलभारतीय हिंदुमहासभेचा अध्यक्ष आहे. तुमचे साहेब हे ब्रिटिश सरकारने पाठविलेले दूत. माझा दर्जा मोठा, तेव्हा तुमच्या साहेबांनी शिष्टाचाराप्रमाणे बाहेर येऊन माझे स्वागत करायला हवे”.

क्रिप्सच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहाणारी गुर्मी क्षणात उतरली! असा अनुभव कधीच नव्हता आला त्याला. गांधी काय, नेहरु काय सारे सारे ठरलेल्या वेळी आत येऊन बसत आणि भेट सुरू होई. हा कोण भलताच अतिशहाणा? अतिशहाणा तर अतिशहाणा, पण शिष्टाचाराचा मुद्दा तर बरोबरच आहे त्याचा. बाहेर जायला हवे!

क्रिप्ससाहेब धडपडत उठले. घाईघाईने दोन दालने ओलांडून बाहेर गेले. ते पायऱ्या उतरत असतानाच कारचा दरवाजा उघडून चालक बाहेर आला व चटकन मागचा दरवाजा उघडून धरला त्याने. तत्पूर्वीच पलिकडच्या दरवाजातून कर्तारसिंह उतरले होते व एव्हाना चहूबाजूला टेहळणी करूनही झाली होती त्यांची! चालकाने उघडून धरलेल्या दरवाजातून मात्र आधी छत्री धरलेली एक मजबूत मूठ डोकावली. मग जमिनीवर टेकले एक दमदार पाऊल. आणि क्षणार्धात बाहेर आली ती हिंदुमहासभेच्या अध्यक्षांची – विनायक दामोदर सावरकरांची तेजस्वी मूर्ती! पांढराशुभ्र पेहराव आणि डोक्यावर दिमाखदार टोपी! मागोमाग उतरले ते डॉ. बा. शि. मुंजे, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, सर ज्वालाप्रसाद श्रीवास्तव आणि लाला गणपतराय!! सावरकरांना पाहाताच चेहऱ्यावर राखीव हसू खेळवत क्रिप्स पुढे झाला आणि इच्छा नसूनही त्यांना हाताला धरून आतल्या दालनात घेऊन गेला!

सर्व मंडळी स्थानापन्न झाली. ओळखीचा कार्यक्रम, नमस्कार वगैरे शिष्टाचार पार पडले. माणूस हुशार असला म्हणून काय झाले, माझ्यापेक्षा हुशार खचितच नसणार, असा विचार करत क्रिप्सने सावरकरांसमोर आपली योजना मांडली. पुढे काय होणार हे क्रिप्सला आजवरच्या सगळ्या अनुभवावरून व्यवस्थित माहिती झाले होते. त्यामुळे तो वाटत बघत होता की, कधी हा सावरकर नावाचा आगाऊ माणूस आपली योजना नाकारतो आणि कधी मी आपला कोटिक्रम मांडतो!

योजना ऐकल्याबरोब्बर सावरकर म्हणाले, “तुमचा भारताला स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव अतिशय स्तुत्य आहे, मात्र संस्थानांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देणे अजिबात मान्य होण्यासारखे नाही. हे म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीला प्रच्छन्न पाठिंबाच देणे झाले. हे कदापिही मान्य होणे शक्य नाही!”
‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत! आता माझा कोटिक्रम ऐक बेट्या. आमच्या साम्राज्याला त्रास देणारा तूच ना? बघ आता कशी जिरवतो तुझी ते!’, असं मनातल्या मनात म्हणून प्रत्यक्षात मात्र मधाळ स्वरात क्रिप्स बोलू लागला,
“मि. सावरकर, आपण एवढे जुनेजाणते आहात. अहो स्वयंनिर्णयाचे तत्त्व नवे थोडेच आहे? याआधी कॅनडानेही असेच केले नव्हते का”?
सावरकरांनी एकवार क्रिप्सच्या डोळ्यांत रोखून पाहिले. व नजर तशीच कायम ठेवत शांतपणे बोलू लागले,
“कॅनडाचे उदाहरण भारताला जराही लागू पडत नाही”!
क्रिप्सचा चेहरा खाडकन पडला! ज्या माझ्या युक्तिवादावर अखिल भारतात कुणालाही प्रत्युत्तर सुचले नाही, तो युक्तिवाद अमान्य असल्याचं सांगतोय हा? प्रत्यक्षात मात्र शब्द फुटले,
“कसं काय”?
“सांगतो!”, सावरकरांनी अजूनही नजर हटवली नव्हती, “कॅनडामध्ये आधीच स्वतंत्र व वेगळी राज्ये अस्तित्वात आली होती. या वेगवेगळ्या राज्यांनी एकत्र येऊन एकसंध देश बनवायचा की संघराज्य बनवायचे, असा पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. भारतात मात्र नेमकी उलट परिस्थिती आहे. येथे एका केंद्रशासनाखाली विविध प्रांत आधीच एकत्रितरित्या नांदताहेत! तेव्हा कॅनडाचे उदाहरण देऊन भारतात स्वयंनिर्णयाचे तत्त्व लावू पाहाणे, संपूर्णतः चूक आहे!”
सावरकरांनी नजर अजूनही हटवली नव्हती. क्रिप्सचा चेहरा चांगलाच उतरला! त्याला नजर टिकवणे जड जाऊ लागले! अखेरिस चेहरा वळवून आजूबाजूला पाहात काहीतरी बोलायचे म्हणून तो बोलला,
“हिंदुस्थान हा अभिन्न एकछत्री देश कधीच नव्हता!”
“चूक”, सावरकरांचा आवाज किंचित चढला. क्रिप्सने दचकून त्यांच्या दिशेने पाहिले. पुन्हा तीच नजर! तापलेल्या आवाजात सावरकर बोलू लागले,
“अखंड हिंदुस्थान ही आपली पितृभू आणि पुण्यभू आहे, ही आम्हां हिंदूंची दृढ निष्ठा आहे. सांस्कृतिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या आमची ही भूमी अभिन्न व अविभाज्य आहे, ही आमची श्रद्धा आहे. सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुस्थान हे एकसंध कसे आहे, याचे विवेचन या लहानश्या भेटीत करणे आणि केले तरी ते तुमच्या ध्यानात येणे अशक्य आहे, तेव्हा ते तूर्तास सोडून द्या! मात्र राजकीय व प्रशासकीयदृष्ट्या तुमचे ब्रिटिश शासनच या देशाला एकसंध मानते की! बघा, या देशाच्या सरकारला तुम्हीच हिंदी सरकार म्हणता. येथल्या लढाऊ दळांना तुम्हीच हिंदी सैन्यदळ, हिंदी नौदळ वगैरे म्हणता. आणि बंगाल असो वा मुंबई, तुमच्याच मालकीचे असल्याची भावनादेखील ठेवता! तेव्हा तुम्हीच हिंदुस्थानला एक एकसंध, केंद्रशासित राष्ट्र मानताय! मग आता तुम्हीच सांगा, ज्या देशाला तुम्हीच लोक एकसंध मानताय, त्या देशाला स्वयंनिर्णयाचे तत्त्व कसे काय लावू पाहाताय”?

आता मात्र उपस्थितांना हसू दाबणे कठीण जाऊ लागले! क्रिप्सचा सारा गर्व, सारा माज एका क्षणात गळून पडला होता. त्याच्या बटरपेक्षाही आरामशीर कारकीर्दीवर भलामोठ्ठा पराभवाचा धोंडा पडत होता आणि नुसते बघत राहाण्याखेरीज त्याच्या हाती काहीच नव्हते! त्याच्या आजवरच्या सर्व वाटाघाटी मातीमोल ठरून उद्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात हाच एक चर्चेचा विषय होऊन राहाणार होता. क्रिप्सला विचारानेच कापरे भरले!

चेहऱ्यावर खट्याळ हसू खेळवत सावरकर म्हणाले, “बघा, तुम्ही जर स्वयंनिर्णयाचा भाग सोडून देत असाल, तर आम्ही तुमची योजना मान्य करायला तयार आहोत. अन्यथा तुमची योजना नको आम्हाला! विचार करा आणि आरामात कळवा. येतो आम्ही”!

सावरकर आणि त्यांचे सहकारी चालू लागले. क्रिप्सला कळेना, कोण कुणावर राज्य करतंय आणि कोण कुणाला प्रस्ताव देतंय! तो नुसताच सावरकरांच्या पाठमोऱ्या तेजाळ आकृतीकडे अनिमिष नेत्रांनी पाहात राहिला होता!!

— © विक्रम श्रीराम एडके
[सदर कथेचे स्वामित्वाधिकार लेखक ऍड. विक्रम एडके यांजकडे सुरक्षित आहेत. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय ही कथा कोणत्याही स्वरुपात प्रकाशित अथवा कॉपी-पेस्ट करता येणार नाही. केल्यास, गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आवडल्यास केवळ ‘शेअर’ बटनावर क्लिक करून लेखकाच्या नावासहित शेअर करावे. लेखकाच्या अन्य ‘सावरकर-कथा’ वाचण्यासाठी, तसेच लेखकाने स्वा. सावरकर व अन्य विषयांवर दिलेली व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्यासाठी अथवा लेखकाची व्याख्याने आपल्या परिसरात आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

image

12 thoughts on “गर्वहरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories