प्रचण्डताण्डवशिवम् : भाग १

१७३५ सालापासून मराठी फौजा ह्या माळवा, राजपुताना आणि बुंदेलखंड भागात धुमाकूळ घालत होत्या. लहानसहान युद्धे घडत होती, विजय मिळत होते. पण एक मोठं आणि निर्णायक युद्ध मात्र अटळ होतं. त्यावेळी दिल्लीचा बादशहा होता मुहंमदशाह! त्याने अयोध्येचा नवाब सादतखान, वज़ीर कमरुद्दीनखान, मुहंमदखान बंगश, जयसिंह, अभयसिंह अश्या सगळ्यांना गोळा करुन मराठ्यांना नेस्तनाबूत करायचे हुकूम दिले. आणि नोव्हेंबर १७३६ ला मराठी रियासतीचे शौर्यभास्कर, खासे बाजीराव पेशवे सरकार भोपाळला डेरेदाखल झाले! आसपासची भेलसासारखी छोटी छोटी गावे घेत, खंडणी गोळा करीत आग्र्यापासून अवघ्या काही कोसांवर मराठी फौजा गोळा झाल्या.

युद्धनीतीचा एक साधासोपा नियम आहे. एकाच वेळी सगळे शत्रू अंगावर नाही घ्यायचे. शिवचरित्राचा अभ्यास करताना ही बाब विशेषत्वाने लक्षात येते. महाराजांनी कधीच अनेक शत्रूंशी एकदम युद्ध नाही केलं. मुघलांशी लढताना बाकीच्या शाह्या शांत ठेवल्या. इतर कुणाशी लढताना मुघलांना रसभरीत विनम्र पत्रे पाठवून घोळात घेतले. ही युद्धनीतीतली राजनीती आहे. ही नंतरच्या काळात केवळ बाजीरावांमध्येच दिसते! त्यामुळे एकाचवेळी इतक्या सगळ्या मुघल सरदारांशी लढण्याची बाजीरावांची अजिबातच इच्छा नव्हती. कमरुद्दीन आणि बंगश येऊन मिळायच्या आत सादतखानला मार देण्याचा त्यांचा डाव होता. त्याप्रमाणे त्यांनी मल्हारराव होळकर आणि पिलाजी जाधव यांना सैन्य देऊन फेब्रुवारी १७३७ च्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीस यमुना ओलांडून पुढे पाठवले.

सादतखानसोबत त्याचा पुतण्या सफ़दरजंग होता! जलेश्वरला होळकर-जाधवांच्या फौजेचे त्याच्याशी तुंबळ युद्ध झाले. तो माघार घेऊ लागला. ते पाहून मराठ्यांना चेव चढला. ते त्वेषाने त्याचा पाठलाग करु लागले. आणि पाठलाग करता-करता सादतखानच्या जाळ्यात अलगद अडकले! सफ़दरजंग खरे तर मराठ्यांना फसवत होता. तो पळता पळता सादतखानच्या प्रचंड फौजेला जाऊन मिळाला आणि मराठे थेट त्या फौजेच्या तोंडाशीच येऊन सापडले! १२ मार्च १७३७ ला झालेल्या त्या विषम युद्धांत एक सहस्राहूनही अधिक मराठा मारला गेला. होळकर, बाजी भिवराव यांना पळता भुई थोडी झाली. त्यांनी तशीच पळत पळत यमुना ओलांडली आणि २२ मार्चला बाजीरावांच्या मुख्य सैन्याला जाऊन मिळाले! बादशहाच्या एका रणकुशल सरदाराने बाजीरावांच्या सैन्याचा अतिशय वाईट आणि अपमानास्पद पराभव केला होता! पण पराभव बाजीरावांच्या सैन्याचा झाला होता, बाजीरावांचा नव्हे! लढाई आणि युद्ध यात फरक असतो. लढाया खूप होतात, निर्णायक युद्ध एकच असते. युद्ध अजून संपले नव्हते, कारण बाजीराव अजून जिंकले नव्हते!

बाजीरावांनी माघार घेतली. सैन्य माघारी पाठवून दिले. मग काय! सादतखान न भूतो न भविष्यति चेकाळला! अरे कोण बाजीराव? कुठला बाजीराव? म्हणे एकही युद्ध हारला नाही आजवर! अरे हॅट!! हाकलून लावलंय मी त्याला आज, हाकलून! एकट्याने! ना बंगशची गरज पडली ना कमरुद्दीनची! पार बेहोश होऊन गेला सादतखान. आनंदाच्या भरात त्याने बादशहाला एक मस्तपैकी पत्रच लिहून टाकले. बाजीरावांनी चिमाजीआप्पांना २ एप्रिल रोजी पाठवलेल्या पत्रात सादतखानच्या या पत्राचा उल्लेख सापडतो —
“मराठ्यांची फौज यमुना उतरोन आली होती ते बुडविली. दोन हजार स्वार मारिले व दोन हजार नदींत बुडाले. मल्हारजी होळकर व विठोबा बुळे कामास आले. बाजीरावाची धाड आली होती तिची गत हे जाहली. आम्ही यमुना उतरोन मराठे बुडवून चमेलीपार करितों”.

बादशहा या पत्राला लाखवेळा भुलला! मराठोंकी क्या औकात है हमारे सामने! अरे, हमारे सामने तो सिवाजीभी टिक नहीं सका, संभाजीभी टिक नहीं सका; यह बाजीराव किस खेतकी फ़सल है!! त्याने बेहद्द खूश होऊन सादतखानला वस्त्रे पाठवली, मोतीमाळ दिली, शिरपाव पाठवला! मग काय, सादतखानची छावणी आनंदात गुंग होऊन गेली. या आनंदात बंगश आणि खानदौरानदेखील सहभागी झाले. पण अफ़सोस! अफ़सोस की, फुशारक्या मारणाऱ्या बादशहाला ना शिवप्रभूंचे तेज कळाले होते, ना शंभूराजांचा प्रताप समजला होता ना बाजीरावांचे तंत्र त्याच्या डोक्यात शिरले होते. मुघल सल्तनत गफ़लतीत मश्गूल असताना अचानकच बातमी आली “मराठे आए.. मराठे आए..”!

मराठे आए? पळून गेलेले मराठे आए? दिल्लीत? शक्यच नाही! मुघलांच्या दुर्दैवाने हे नुसतं शक्यच नव्हतं तर सत्यदेखील होतं! माघार घेतलेले बाजीराव परत गेलेच नव्हते! ज्या आग्र्यात सादतखानचा तळ होता, त्या आग्र्याला जवळजवळ २२.५ किलोमीटरचा वळसा घालून त्यांनी गुपचूपपणे अवघ्या २च दिवसांत सुमारे १५० किलोमीटर अंतरावरची दिल्ली गाठली! दिवसाला ६५ किलोमीटरचा विक्रमी वेग होता बाजीरावांच्या ससैन्य हालचालींचा. इतक्या प्रचंड वेगाची मुघलांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. परिणाम? बादशहाचे सगळेच महत्त्वाचे सरदार पार लांब आग्र्याला होते आणि दिल्ली, मुघलांचा सन्मान असलेली खाशी दिल्ली एखाद्या अभिसारीकेप्रमाणे बाजीरावांसमोर उघडी पडलेली होती!

२८ मार्चला बाजीरावांचा तळ दिल्लीला लागून असलेल्या कुशबंदीला होता. ही बातमी तिन्ही खानांना पोहोचेपर्यंत १ एप्रिल उजाडला. ते धडपडत दिल्ली गाठायला धावले. बाजीराव चिमणाजींना लिहितात —
“तात्पर्यार्थ आमचे फौजेंत जीव नाहीं केवळ निर्जीव, बुडवून नेस्तनाबूद केली असें लिहित लपंडाव करून दाखविले. मोगली कारभार, आपण ऐकत जाणतच आहेत. करावें थोडें, लिहावें फार. पातशहास सत्य भासलें तें मिथ्या केलें पाहिजे. त्याचे विचार दोन. एक सादतखानास बुडवावें किंवा दिल्लीस जाऊन दिल्लीचे पूर जाळावे, तेव्हां मिथ्या होईल”.

बाजीरावांनी दुसरा मार्ग निवडला होता. पण दिल्ली जाळण्याचा मनसुबा विचाराअंती त्यांना फारसा पटला नाही. ते लिहितात —
“दिल्लीस बारापुला व कालिकेचें देऊळ उजवे हातें टाकून जाऊन कुशबंदी नजीक शहर येथें मुक्काम केला. पुऱ्यास आगी देऊन शहर खाक करावें, त्यास दिल्ली महास्थळ, पातशहा बरबात जालियांत फायदा नाहीं. दुसरें, पातशहाचे व खानडौराचे चित्तांत सलूख करावयाचें आहे. मोगल यांस सलूख करुं देत नाहींत. अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो. याकरितां आगी लावायाचें तहकूब करून, पातशहास व राजे बखतमल्ल जयसिंगाचा वकील दिल्ली येथें यांसीं पत्रें पाठविलीं. शहरांतून दोन हत्ती व घोडी उंटें आलीं होतीं तीं सांपडलीं. लष्करचे लोकांनीं शहरचे लोक भवानीचे यात्रेस बाहेर आले होते, त्यांस झांबडाझांबड केलें. दुसरे दिवशीं बुधवारीं पातशहाचे आज्ञेनें बखतमल्ल यांनीं उत्तर पाठविलें कीं, धोंडोपंतास पाठविणें. त्यावरून मशारनिल्हेस पाठवावें तरी, आम्ही शहराजवळ आलों, यांमुळें दिल्लीत गलबला झाला, यांमुळें पाठविले नाहींत. भला मनुष्य व स्वार पाठवून देणें. मशारनिल्हेस पाठवून देतों, आम्ही शहरानजीक राहिल्यानें, शहरास उपसर्ग लागेल, याकरितां कूच करून झीलच्या तलावावर जातों.’ म्हणून उत्तर पाठवून आम्हीं कूच केलें”.

दरम्यानच्या काळात ही बोलणी सुरु असताना बादशहाने शहाणपणा केला. त्याने मीर हसन कोकाच्या नेतृत्वाखाली ८०००ची फौज बाजीरावांवर धाडली. पण या फौजेला शिंदे-होळकर आणि पवार बंधूंनी धू-धू धुतले. २००-२५० मुघल सैनिक, काही सरदारसुद्धा मारले गेले. सुमारे ४०० मुघल जखमी झाले. स्वतः मीर हसन गंभीर जखमी होऊन पळाला. मग मात्र चवताळलेल्या मराठ्यांनी दिल्लीच्या आसपासचा सगळाच मुलूख आणि गावे साफ लुटली.

यावेळी बादशहा मुहंमदशाह काय करत होता? दिल्लीपती! दिल्लीश्वर! बादशाह-ए-हिंदोस्ताँ त्यावेळी बाजीरावांना भिऊन किल्ल्यात उंदरासारखा लपून बसला होता! पण ही काही त्याच्या अपमानाची परमावधी नव्हे! शिवप्रभूंचे रक्त आटवणाऱ्या, शंभूमहाराजांचा जिहादी निर्घृणतेने खून करणाऱ्या सल्तनतीच्या बादशहाने किल्ल्याच्या मागे नदीत होड्या सज्ज ठेवल्या होत्या! कश्यासाठी!! पार्श्वभागाला पाय लावून पळून जाण्यासाठी!! शतकानुशतकांच्या अपमानाचा मराठ्यांनी अखेरीस बाजीरावांच्या नेतृत्वाखाली सूड उगवला होता.

पण बाजीराव काही मुघलांसारखे गाफील आणि मूर्ख नव्हते. त्यांची चहूबाजूला नजर होती. तिन्ही खान दिल्लीच्या दिशेने धावत येताहेत याची त्यांना सगळी बित्तंबातमी होती. ते चिमाजींना लिहितात —
“संध्याकाळच्या चार घटका दिवस बाकी राहिला, तों कमरुद्दीनखान पातशहापुरावरून आल्याची खबर आली. तेच क्षणीं आम्ही तयार होऊन गेलों. त्यांचे आमचे फौजेचें युद्ध झालें. बारांत गेलेला एक हत्ती रा. यशवंतराव पवार यांणीं घेतला. घोडीं उंटें लष्करांत आलीं, त्यास दिवस अस्तमानास गेला. रात्रींचा दम धरून चौगीर्द मोगल वेढून बुडवावा, तरी झीलचा तलाव सोळा कोस लांब, उजवीकडे कमरुद्दीनखान, पुढें शहर. दुसरें, आम्ही दिल्लीस गेल्याचें वर्तमान नबाब खानदौरा व सादतखान व महंमदखान बंगस यांसी ७ जिल्हेजीं मंगळवारीं राधाकुंडाचे मुक्कामीं कळतांच सडेसड होऊन पंचवीस तीस हजार फौजेनें बडेलास बत्तीस कोस येऊन मुक्काम केला. दुसरे दिवशीं अलावर्दीच्या नाल्यावर पंचवीस कोस मुक्काम केला. गुरुवारीं प्रातःकाळी खानदौरा, सादतखान, बंगस व कमरुद्दीन सारे एक होणार. एक झाल्यावर सोसणार नाहीं, व शहर समीप. यास्तव मोगलांस टाकून चहूं कोसांवर मुक्काम केला. आम्हाकडील फिरंगोजी पाटणकरास गोळी लागोन ठार झाला. वरकडही दहा पांच माणूस व घोडीं जखमी झालीं, मोगलांकडील दहापांच ठार झाले. दहावीस जखमी झाले. गुरुवारीं सादतखान व खानदौरा व बंगस सारे कमरुद्दीनखानाजवळ आले. अलाबर्दीपासून झीलच्या तलावापर्यंत मुक्काम करून आहेत. आम्ही मोगल पाठीवर घेऊन दाबांत आणून बुडवावे , या विचारें कूच करून रेवाडी, कोटपुतळी, मनोहरपुरावरून आलों. अद्याप सारे मोगल अलाबर्दी व झीलच्या तलावावरी आहेत म्हणोन बातमी वर्तमान आलें. खानदौराची पत्रांवरी पत्रें सवाई जयसिंगजीस गेलीं. त्यांवरून ते पंधरा सोळा हजार फौज व तोफखाना देखील स्वार होऊन बासव्यावर गेले आहेत. भेटीस जातात. सवाईजींचीं पत्रें ममतायुक्त आपला मुलुख रक्षावा म्हणून येतात. आम्हांकडील व्यंकाजीराम त्यांजपाशीं आहेत, त्यांजपासून लिहीवीत असतात. आम्ही त्यांचे मुलखाचे वाटेस जात नाहीं. वाटेनें दाणादुणा देतील. अभयसिंग जोधपुरास आहेत. आम्ही आतां ग्वालेर प्रांतें बाकीसाकी राहिली आहे, ती वसूल करून, मोगल मागें मागें आले तरी त्यास हैराण करून, पायींची धांपा देऊन, धावतां धावतांच खराब होत तेंच करून, दाबांत आणून, गांठ घालून, राजश्री स्वामींचें पुण्यें, व वडिलांचे आशीर्वादें बुडवितों. आमची चिंता न करणें, मुख्य गोष्टी खानडौराचे व पातशहाचे चित्तांत सलूख करावयाचें आहे. मोगल यांणीं हिंमत धरिली आहे. त्यांतें शीरोपस्थ सादतखान आहे. त्याचा गर्व श्रीसंकल्पें हत जालियास, सर्व मनोदयानुरुप होईल. मनोदयानुरूप सलूख जालिया करुं, नाहीं तरी सलूख करीत नाहीं. दिल्लीभवता मुलूख खालसा केला. पुढें सोनपतपानपत यमुनापार मुलूख राहिला, तोही ताराज़ करून मोगल अन्नास महाग होत ऐसेंच केलें जाईल”.

यावरुन बाजीरावांच्या डोक्यातील या छोट्याश्या युद्धाला जोडलेल्या अखिल भारतीय राजकारणाची जाण व त्यांची मुत्सद्देगिरी लक्षात येते. बादशहाला जन्माची अद्दल घडली होती. खानांना बसलेली जरब एवढी काही भयानक होती, की प्रचंड फौज हाताशी असूनदेखील एकानेसुद्धा बाजीरावांचा पाठलाग करायचा विचार केला नाही. लढाई हरली वाटणारे बाजीराव, युद्ध जिंकून जुलै १७३७ मध्ये पुण्यात परतले! यावेळी बाजीरावांच्या आयुष्यातील औरंगज़ेब असलेला निज़ाम काय करत होता? तो उत्तरेकडे निघाला होता! कश्यासाठी?

(क्रमशः)

— © विक्रम श्रीराम एडके
*लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
(लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)
संदर्भ —
१) अजिंक्ययोद्धा बाजीराव – जयराज साळगांवकर
२) Bajirao : An Outstanding Cavalry General – Col. Palsokar
३) मराठी रियासत : खंड ४ – सरदेसाई
४) An Advanced Study In The History Of Modern India – Sen

image

One thought on “प्रचण्डताण्डवशिवम् : भाग १

  1. !! जय श्रीराम !!

    पुण्याप्रतापी रणधुरंधर श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा …. विजय असो…विजय असो… विजय असो.. !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *