राष्ट्रक्रांतिच्या काजा.. उमाजी राजा!!

आम्ही रॉबिनहूडच्या नुसत्याच गोष्टी ऐकून आहोत. पण एक खराखुरा, देशस्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेला रॉबिनहूड ह्याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला होता, हे आपल्या गावीही नसते. तो सावकारांना, श्रीमंतांना लुटायचा आणि गोरगरीबांना वाटायचा! इंग्रजांना मारायचा आणि एतद्देशीयांना वाचवायचा. १८२४ साली त्यानेच भांबुर्डीजवळ इंग्रजी खजिना लुटला आणि देवळासाठी देऊन टाकला! त्याचे नाव उमाजी नाईक खोमणे! सच्चे देशभक्त त्यांना उमाजीराजे नाईक असे म्हणतात!! इंग्रजांनी मराठा साम्राज्य खालसा केल्यानंतर इंग्रजांच्या विरुद्ध उभा राहाणारा पहिलावहीला ‘आद्य क्रांतिकारक’!! त्यांनी रामोश्यांना संघटीत केले आणि इग्रजांविरुद्ध लढा उभारला. हा सगळा रामोशी समाज मुळचा रामवंशी, म्हणजेच प्रभू रामचंद्रांच्या वंशातला! रानवशी आणि रामवंशी, ते रामोशी!! श्रीरामांना १४ वर्षे वनवास सहन करावा लागला होता, रानावनांत राहून इंग्रजी सत्तेला १४ वर्षे ग्रहण लावलेल्या उमाजीराजेंनी त्या १४ वर्षांचे उट्टे काढले!

इतर देशांत पाहा. ‘हा अमक्या राजाच्या तमक्या राणीच्या फलाण्या दासीपासून झालेल्या पुत्राचा पिढीजात हार’, अश्या गोष्टी जतन करणारी आणि दाखवणारी लाखों माणसे सापडतील. परंतु आमच्या हिंदुस्थानाला ज्वलंत इतिहासाचा धगधगीत खजिना एवढ्या काही प्रचंड प्रमाणात लाभलाय, की आम्हा करंट्यांना त्याची काही किंमतच राहिलेली नाही! शिवाय प्रत्येकजण आपापल्या जातीपुरतीच मौक्तिके त्यातून गोळा करतो आणि इतरांना कोळसे समजतो, हा रोग तर वेगळाच. पुरोगाम्यांनी पार आतपर्यंत घुसवलाय हा रोग! शाहू-फुले-आंबेडकर बोलो और जातीकी ओर ही चलो; अशी अवस्था निर्माण झाली आहे. उच्चवर्णीयांनी कधी जातीयवाद केला असेल तर तो झाला भूतकाळ, पण आज पुरोगाम्यांचा आणि दांभिक जातीअंतकांचा जातीयवाद महाराष्ट्राला विळखा घालून बसलाय, हे दारुण वर्तमान आहे. आणि ह्याच दारुण वर्तमानाचे बळी आहेत उमाजीराजे! अन्यथा मराठी मातीत जन्माला येऊन इंग्रजांना धूळ चारणारे उमाजीराजे केवळ जातीपुरतेच मर्यादित राहावेत? बाकीच्यांना माहितीदेखील नसावेत!

आज कुणालाच ठाऊक नसले म्हणून काय झाले, उमाजीराजेंना त्यांच्या काळात सर्वच जनतेची साथ होती. उमाजींनी १६ फेब्रुवारी १८३१ दिनी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, “लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा ,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल”. ही शिवछत्रपतींच्या पावलावर पाऊल टाकून केलेली स्वराज्याची घोषणाच नव्हती काय?

अर्थातच मरहट्ट्यांना जो एकच शाप आहे, तोच उमाजीराजांनाही भोवला! फितुरी! दुही!! दुफळी!! काहीही म्हणा, परिणाम मात्र एकच – ‘फोडा आणि झोडा’! त्याच मार्गाने आज नाही का हिंदू बलशाली होऊ नयेत म्हणून हे फेक्युलर आम्हाला दुभागायला पाहातात! ते गोरे इंग्रज आणि हे त्यांचे अनौरस बच्चे काळे इंग्रज!! उमाजींच्या सैन्यातल्या काळोजी नाईक आणि नाना चव्हाण या दोघांनी गद्दारी केली आणि अखेरीस उमाजी १५ डिसेंबर १८३१ दिनी भोर तालुक्यातील उतरोली गावी पकडले गेले!

पकडल्यानंतर इंग्रजांनी त्यांना बिर्याणी खाऊ घालण्यात काळ आणि पैसा दोन्हीचाही अपव्यय केला नाही. कारण, इंग्रजांचे दोन्हीही डोळे देशावरच होते. एकही डोळा मतपेटीवर नव्हता! त्यामुळे उमाजीराजांना अवघ्या दिडच महिन्यात म्हणजे ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्यातील खडकमाळ आळीतल्या मामलेदार कचेरीत फासावर लटकावले. उमाजीही हसत हसत हुतात्मा झाले. अवघे ४१ वय होते त्यांचे त्यावेळी! मारल्यानंतरही ३ दिवस उमाजींचे प्रेत तसेच लटकावून ठेवले होते इंग्रजांनी. मुद्दामहून! आम्हाला खिजवण्यासाठी! आम्हाला घाबरवण्यासाठी!! पण आम्ही मात्र त्यानंतर दिडशे वर्षे उलटून गेली तरी उमाजींना तसेच अज्ञानाच्या अंधारकोठडीत लटकावत ठेवलेले पाहून तर इंग्रजांनाही धडकी भरावी!!

आज ७ सप्टेंबर, अर्थातच उमाजीराजांची २२४वी जयंती! म्हणजेच अभिजात भाषेत बोलू गेल्यास, आजपासून उमाजींचे द्विशतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्ष सुरु होतेय. इंग्रज इतिहासकार टॉस म्हणतो की, ‘आम्ही उमाजीला फाशी दिली नसती, तर तो दुसरा शिवाजी झाला असता’. खंत याचीच वाटते की, इंग्रजांनी उमाजीराजांना प्रतिशिवाजी होऊ दिले नाही ते त्यांच्यादृष्टीने बरोबरच होते, पण आम्ही मूर्खांनीही त्यांना प्रतिशिवाजी ठरु दिले नाही हो! प्रतिशिवाजी सोडाच, उमाजी हे उमाजी म्हणूनही माहिती नाहीत आम्हाला!! आम्हीच आमच्या क्रांतिकारकांना अनुल्लेखाने असे मारणार असू, तर उद्या आमच्या देशात नवे क्रांतिकारक जन्म घेणार तरी कसे? हे नाही चालणार! या, उमाजीराजांच्या २२५व्या जयंतीवर्षात प्रण घेऊया, आम्ही तुम्हाला कालप्रवाहात हरवू नाही देणार! आम्ही तुमचे रुप आठवू! प्रताप आठवू!! साक्षेप आठवू!! उमाजीराजे, आम्ही चालू तुमचा मार्ग!!!

— © विक्रम श्रीराम एडके
(विविध महापुरुषांवर लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

image

One thought on “राष्ट्रक्रांतिच्या काजा.. उमाजी राजा!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *