Author: Vikram Edke

  • श्रीगणेश विज्ञान

     

    खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचे मनात होते. आजचा मुहूर्त अगदी योग्य आहे. श्रीगणेश-जन्माची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे.

    तरीही संदर्भासाठी थोडक्यात देतो.
    पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकून त्याला स्वत:चा मुलगाच मानले. पुढे या मुलाचे शिर श्रीशंकराच्या हातून उडवले जाते. पार्वतीचा विलाप पाहून शिवशंकर एखाद्या दुसर्या बालकाचे शिर आणण्याची आज्ञा …देतात. शिवगण चुकून एका हत्तीच्या पिल्लाचे शिर घेऊन येतात. मानवी शिर शोधण्याइतका वेळ उरला नसल्याने अखेरीस तेच शिर लावले जाते, आणि अश्याप्रकारे गणेशाचा जन्म होतो.”

    आता या कथेत खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.

    १) देवी पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करतात. ही मूर्ती सजीव होते.
    २) कोणतेच दुसरे शिर न मिळाल्याने शिवगण एका हत्तीच्या पिल्लाचे शिर
    आणतात. अखेरीस तेच शिर लावले जाते.

    आता या कथेकडे व्यवस्थित पाहिल्यास कळते की ही कथा म्हणजे “क्लोनिंग” आणि “अवयावारोपण” करण्याचा जगातील पहिला प्रयोग असू शकतो. कसे ते पहा. पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करते,
    जी सजीव होते. जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, आपण जेव्हा एक साधी चुटकी वाजवतो, तेव्हाही सहस्रावधी पेशी शरीरापासून विलग होतात. पार्वतीने जाणून-बुजून अंगावरील मळ खरवडला होता. तिला जिवंत
    उति (tissues) मिळवावयाच्या असाव्यात ही शक्यता नाकारता येत नाही. तात्विक दृष्ट्या हे सहज-शक्य आहे. तसेच शंकराने गणेशाचे शिर उडवल्यावर घाईने दुसरे शिर हवे असते, कारण त्या बालकाचा प्राण गेला होता पण मध्ये फार काळ गेला नसल्याने “वैद्यकीय मृत्यू (Clinical Death)” झाला नसावा. शिवगणांनी वेंधळेपणा केल्यावर पुन्हा मानवी शिर शोधण्यात आणखी कालापव्यय झाला असता. म्हणून हत्तीचेच शिर बसवले गेले. हा तत्कालीन अवयावारोपणाचा प्रकार असण्यात अशक्य काय आहे? आजही विज्ञान मानवी अवयवांचे रोपण करूशकते. अजून थोडी प्रगती झाल्यावर प्राण्यांच्या अवयवांचे रोपण होऊ शकेलच ना? म्हणजे ही देखील गोष्ट तात्विक-दृष्ट्या अशक्य नाही. आता हे सगळे वाचल्यावर काही लोक एक ठेवणीतला प्रश्न विचारतील, “एवढी प्रगती इतक्या प्राचीन काळी झाली असणे कसे शक्य आहे?” त्यांना मी विचारतो की, का अशक्य आहे? केवळ काळ फार प्राचीन आहे, हे काही कारण नाही होऊ शकत. या प्रश्नकर्त्या मंडळींचे खरे दुखणे काय असते माहितीय का? ते आहे “न्यूनगंड”. हो, न्यूनगंड. एखादी गोष्ट हिंदू म्हणजेच भारतीय म्हटली की ती वाईटच असली पाहिजे, हा तो न्यूनगंड होय. हीच गोष्ट जर कुणा युरोपीय अथवा अमेरिकन संशोधकाने शोधली असती तर मात्र आम्ही ती मानानार्यांत अग्रभागी असलो असतो! कारण “साहेबं वाक्यं प्रमाणं!” आपण गोऱ्या कातडीच्या मानसिक गुलामीतून बाहेर यायला आजही तयार नाही हेच खरे! बरे, हिंदू संस्कृती आणि धर्म हा जगात सर्वाधिक विज्ञान-निष्ठ असल्याचे हिंदू सोडून जगातील सगळ्याच संशोधकांचे मत आहे. पण आमचा न्यूनगंड आणि आपसातील भांडण मात्र आपल्याला हे सत्य स्वीकारण्यापासून रोखतेय! हिंदूंच्या विज्ञान-निष्ठेचे आजवर शेकडो पुरावे सापडले आहेत, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतलेय त्यांच्या नजरेला ही गोष्ट कशी पडणार? त्यांना मुळात आपले वेद-पुराणे हेच खोटे वाटतात. चला, क्षणभर वादासाठी तेही गृहीत धरू. आता पुन्हा वरील कथा पहा. याही परिस्थितीत वरील कथा पाहिल्यास ती वैद्यकीय-दृष्ट्या १००% योग्य असल्याचेच आढळेल! मग निदान व्यासांनी “विज्ञान-कथा”
    लिहिली एवढे तरी मान्य कराल? आणि कुठेतरी या गोष्टी खरोखर असल्याशिवाय इतकी “सुयोग्य” विज्ञान-कथा तरी कशी सुचेल? या कथेपेक्षाही कितीतरी प्राचीन काळात “ऋभू” नावाच्या ३ बंधूंनी विविध शस्त्रक्रिया केल्याचे पुरावे ऋग्वेदात आहेत. “चरक” हा “सर्जन” शस्त्रक्रियेपूर्वी आपली हत्यारे उकळून घेत असल्याचे त्यानेच
    लिहून ठेवलेय. याचा अर्थ त्याला इतक्या प्राचीन काळातही सूक्ष्मजीवांचे ज्ञान होते असाच होतो ना? विमान बनवण्याची प्राचीन भारतीय विधी मीच पूर्वी प्रसिद्ध केली होती. राजा भोज याच्या “समरांगण सूत्रधार” नामक ग्रंथात तर “यंत्रमानव” बनविण्याचीही विधी दिलीय. मग इतके सगळे विज्ञान असणार्या संस्कृतीत मी म्हणतो त्याच प्रमाणे गणेश- जन्म झाला नसेल कशावरून?
     पहा, विचार करा. “सूज्ञांना” पटेल.

    गणपती बाप्पा मोरया”

    सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

    आपलाच,
    विक्रम श्रीराम एडके.
    (संपर्क : edkevikram@gmail.com)

  • "चांगले" आणि "वाईट"च्या पलीकडला – रॉकस्टार

    कोणताही कलाकार घ्या. किंवा आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ठरलेली कुणीही व्यक्ती घ्या. ते जर आत्ता आहेत तसे नसते तर कसे असले असते? ए. आर. रहमान घ्या. त्याच्या संगीताला जर अध्यात्माची बैठक नसती तर? तर तो कसा असला असता? कसा सोडा. “काय” असला असता? सहस्रो नद्यांच्या जंजाळात समुद्र “एक”च असतो… पण मग त्याने “किनारा” घेऊनच जन्माला यावं ना? समुद्राला किनारच नसला तर कसे चालेल?
      “रॉकस्टार” पाहून प्रथमदर्शनी विचित्र वाटणारे असे शेकडो प्रश्न मनात उभे राहिलेयत. ही रॉकस्टारची समीक्षा नव्हे. रसग्रहण वगैरेही नव्हे. हा आहे एक प्रयत्न. रॉकस्टार पाहून मनात कल्लोळणार्या वादळाला शब्दांत पकडण्याचा एक निष्फळ प्रयत्न. प्रत्येकाने तो आपापल्या नजरेने पाहावा.
      “पता हैं, यहाँ से बहोत दूर… “गलत” और “सही” के पार एक मैदान हैं..! मैं वहाँ मिलूँगा तुझे..!” या “रुमी”च्या ओळींनी चित्रपट सुरु होतो. आणि शेवटपर्यंत याच भावनेच्या लाटांवर हेलकावे घेत राहतो. कधी त्या लाटा आपल्याला हलकेच भिजवतात तर कधी जोरदार शिपकारा मारतात. फाडकन कुणीतरी कानफटात वाजवल्यासारख्या. पण कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही आणि तुमची नाव या वादळाच्या पार काही जाऊ शकत नाही. जाउच शकत नाही.
      “त्या”ला “ती” भेटत नाही आणि भेटूनही भेटत नाही, हाच “त्या”च्या संगीताचा पाया आहे. “पुढे काय” याचा “तो” विचार करीत नाही, किंबहुना “तो” त्या पातळीलाच पोहोचलेला नाही. “त्या”चा शेवट अटळ आहे. प्रतिभेला दुखा:ची किनार देण्यापेक्षा जर अध्यात्माचे आसन जॉर्डन देऊ शकला असता, तर निश्चितपणे उस्ताद जमील खान (शम्मी कपूर) बनू शकला असता; ही भावना पाहणार्याला सतत जाळीत राहाते. शम्मीच्या डोळ्यांतील दयेतून तर ती त्याची अगतिकता अधिकच अधोरेखित करते. जॉर्डनला जर हे कळलं असतं तर? तर, तर कदाचित त्याचं कुढणं, तुटणं, जरासं कमी होऊ शकलं असतं. “ती” केवळ निमित्तमात्र. “त्या”चं दु:ख मात्र सनातन आहे. “ती” नसती तर “त्या”ला दुसरं काहीतरी निमित्त मिळालं असतं, आणि त्याही स्थितीत Dichotomy Of Fame कायमच राहिली असती. म्हणून श्रेष्ठतेला गरज असते अध्यात्माची. त्याशिवाय श्रेष्ठतेला तिचं श्रेष्ठत्व नाही सांभाळता येत. म्हणूनच कदाचित “बीटल्स” भारतात आले होते. “स्टीव्ह जॉब्स” इकडे सन्याश्यासारखा भटकला होता. आणि म्हणूनच कदाचित “स्वामी विवेकानंद” जगभर खर्या अर्थाने “रॉकस्टार” ठरले. म्हणूनच रहमान ऑस्करलाही साधेपणाने सामोरा जाऊ शकतो आणि एकेकाळचा “सम्राट” मायकेल जाक्सन काळाच्या वस्त्रावरील एका क्षुद्र ठिपक्यासारखा क्षणात नाहीसा होतो.
    “सौ दर्द बदन पे फैले हैं |
    हर करम के कपडे मैले हैं ||”
    हे कितीजारी खरं असलं तरी “नादान परीन्द्या”ला घरी यावंच लागतं. शेवटी डोळे मिटले तर भर सूर्यप्रकाशातही अंधारच अंधार आहे आणि डोळे उघडले तर पणतीच्या मिणमिणत्या उजेडातही सर्वत्र प्रकाशच प्रकाश आहे. तो “रंगरेज़” रंगवायला बसलेलाच आहे. फक्त आपली रंगवून घ्यायची तयारी मात्र हवी.
      हा आहे माझ्या भावनेचा कल्लोळ. कितीही प्रयत्न केले तरी शब्दांत न मावणारा.
    “जो भी मैं कहना चाहूँ |
    बर्बाद करे अल्फाज़ मेरे ||”
      नेहमीच्या धोपटमार्गाने जाऊन सांगायचं तर “रॉकस्टार” अवश्य पाहा. संवेदनशील असलात तर तुमच्याही मनात भावनेचा एखादा उठेल. कदाचित यापेक्षा वेगळा. पण निश्चित उठेल. रणबीरने त्याच्या वाटेला आलेल्या प्रत्येक दृश्यात सिद्ध केलेय की तो उद्याचा “सुपरस्टार” आहे. SSRK म्हणून आपण आज Super Star RajiniKanth ला ओळखतो. भविष्यातला SSRK निश्चितपणे रणबीर आहे. इम्तियाझने हा वेगळा विषय कमालीच्या प्रयोगशीलतेने मांडलाय. एकूणच चित्रपटक्षेत्रात त्याने मोलाची भर घातलीय. रहमान बद्दल काय लिहू? तो “देव” आहे एवढे पुरेसे नाही का? बाकी “नर्गिस” आणि “अदिती राव” यांनीही अतिशय उत्तम काम केलेय. कथानक आणि मांडणीच इतकी सशक्त आहे की, नायिका म्हणून कुणीही चालली असती.
      रेटिंग विचाराल तर थोड्याफार चुका लक्षात घेऊन मी ५ पैकी ४ गुण देईन. पण खरं सांगू? रॉकस्टार म्हणजे रूमीच्या कवितेसारखा आहे. “चांगले” आणि “वाईट” यांच्या पलीकडचा. त्याचं त्या पातळीला जाऊनच आस्वाद घ्यावा. बाकी
    “साड्डा हक़..!
    ऐत्थे रख़..!!”

    © विक्रम श्रीराम एडके.
    (इतरत्र प्रसिद्ध करण्याआधी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.)

  • ३३ कोटी देवांचे कोडे


    खूपशी हिंदुद्रोही मंडळी वाद घालताना एक प्रश्न हमखास विचारतात, कि “तुमच्या त्या फडतूस हिंदू धर्मात म्हणे ३३ कोटी देव आहेत, त्यांची नावे तरी माहिती आहेत का तुम्हाला?” आणि आमचे भोळे-भाबडे हिंदू बंधू या प्रश्नासमोर गडबडून जातात. मलाही व्याख्यानाच्या वगैरे निमित्ताने जेव्हा इतर मंडळी भेटतात, तेव्हा हा प्रश्न विचारणे ठरलेले असते. कधी खोडसाळपणे, तर कधी जिज्ञासेने! तेव्हा माझ्या फेसबुक मित्रांना देखील या प्रश्नाचे उत्तर माहिती असावे म्हणून सांगतो.
    मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट “उगीचच” या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.
    आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो.

    ३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, “प्रकार”. कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात “बैजिक पदांच्या कोटी” हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.
    धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)
    धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)
    हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)
    आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!
    असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात. आता तुम्ही कुणाही प्राश्निकास हे उत्तर देऊ शकता, मी व्यवस्थित संदर्भही दिले आहेत.
    © विक्रम श्रीराम एडके (edkevikram@gmail.com)
    टीप: हा मजकूर माझ्या पूर्व-परवानगीशिवाय कुठेही वापरलात तरी चालेल.
    या प्रश्नास आपले बहुतांशी बांधव उत्तर देऊ शकत नसण्याचे कारण म्हणजे हिंदू धर्माचा विशेषत: संस्कृत भाषेचा अभ्यास नसणे. तेव्हा मी येथे सर्वांना आवाहन करतो कि त्यांनी संस्कृतचा शक्य होईल तेवढा अभ्यास करावा. तीच हिंदू धर्माची किल्ली आहे. याखेरीज इतर प्रश्न आणि शंकांसाठी मला वर दिलेल्या विद्युत पत्त्यावर संपर्क करावा.

  • होस्साना – जयघोष प्रेमाचा… जयघोष माझ्या "देवा"चा..!

    ११ किंवा १२ जानेवारी २०१० चा काळ असावा. मला त्या काळात तमिळ अजिबातच कळत नव्हतं (अजूनही फार कुठं कळतंय!). तिरूअनंतपूरम ते मदुराई या रेल्वेप्रवासात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला मी माझ्या “देवा”च्या गाण्यांचे शब्द आठवून-आठवून अर्थ विचारात होतो. त्यावेळी ते तमिळ कुटुंब भेटलं. नवरा-बायको आणि दोन लहान मुलं! ते “अण्णा” भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते पण संगीतात त्यांना प्रचंड रुची. आणि शिवाय कुणाही तमिळ व्यक्तीइतकेच “रहमानियन“! आम्ही खूप वेळ बोलत होतो. त्या भल्या माणसाने मला “सहाना सारल.. (शिवाजी – द बॉस – २००७)”, “एल्लापगळूम.. (आळगिया तमिळ माकन – २००७)” अशी कित्येक गीते संपूर्ण समजावून सांगितली. अचानक मी त्यांना विचारलं, “होस्साना म्हणजे काय हो”? ते थोडेसे विचारात पडले, म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे हा तमिळ शब्द नाहीये. इंग्लिशही नाही. त्याचा अर्थ कदाचित वेगळा काहीतरी होत असावा”.
      त्या काळात गौतम वासुदेव मेननच्या “विनईतांडी वरुवाया”ची गीते प्रकाशित झालेली होती. “देवा”ची गाणी “चढायला” थोडा वेळ घेतात पण आधी प्रकाशित झालेलं एकक-गीत (Single) “होस्साना” मात्र पूर्णपणे चढलं होतं. त्या भेटीत फक्त “होस्साना” हा तमिळ शब्द नाही एवढीच माहिती कळली.
      किती सुंदर गीत! अहाहा..! “देव” नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येतो. ‘मुखडा-अंतरा” पद्धतीची फिल्मी गीते ऐक्नार्यांसाठी “होस्साना” एक वेगळा अनुभव होता. गाणं आल्या-आल्याच “हिट” झालं. नगरला आल्यावर आधी “होस्साना”चा अर्थ शोधला. “ऑक्सफर्ड शब्दकोश”नुसार त्याचा अर्थ होतो “Shout of Adoration”. मूळचा हिब्रू असलेला हा शब्द माथ्यू – २१ : ९, १५ अश्या ठिकाणी येशूच्या जयघोषासाठी वापरला गेलाय.
      हे सारं कळल्यावर त्या गाण्याचा एक नवाच अर्थ उलगडला! होस्साना! जयघोष! प्रेमाचा जयघोष! नव्याने आयुष्यात येऊ घातलेल्या प्रेमाचा जयघोष! प्रेमाला सलाम! वाह, क्या बात हैं! किती सुंदर कल्पना! मानलं तामरईला (होस्सानाची गीतकार)! मानलं विजयप्रकाश-सुझेनला! आणि हो, मानलं माझ्या “देवा”ला! गाण्याच्या सुरुवातीला असलेल्या व्हायोलीनच्या सुंदर तुकड्याचाही अर्थ कळला! अहाहा, जणू “तो” त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रेमाचेच स्वागत करतोय! हे सारे कळाल्यावर माझी अवस्था खरोखर पहिल्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे –
    “नान आडीपोगिरेन..!
    सुक्कू नुरागीरेन..!”
    (I was shaken..!
    I was broken into pieces..!)
    अशीच झाली!

      हिंदीत हे गीत विजयप्रकाशच्याऐवजी “लिओन डिसुझा” या नव्या गायकाने गायलेय. RAP देखील त्यानेच गायलेय. सुरुवातीला ऐकताना तो “राशीद अली” वाटतो. पण अजून अजून ऐकल्यावर कळते कि लिओनला स्वत:चा असा एक अतिशय सुंदर आवाज आहे. आणि याउप्परही मी म्हणेन की, सनी लिओनच्या या काळात लिओन डिसुझा या नवख्या गायकाचे गाणे हिट करून दाखवणे हे माझ्या “देवा”चेच कर्तृत्व नव्हे काय? जावेद अख्तरने हिंदीत हे गीत तामरईइतक्याच ताकदीने लिहिलेय. तुम्हाला मूळ तमिळ गाण्याची सवय झाली असेल तर हे गीत चढायला थोडा वेळ लागेल. पण एकदा का हे गीत चढले, तर चढलेच! माझी तर अवस्था हे गीत ऐकून –
    “अब क्या बताऊँ मैं,
    किस हाल में हूँ मैं…
    यहाँ-वहाँ बस अपना दिल और होश ढूंढ़ता हूँ मैं..!”
    अशीच झालीय!
      या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यातील “ब्लाझे”च्या RAP चा भागदेखील लिओनने स्वत”च्या पद्धतीने गाण्याच्याच चालीत गायलाय. ब्लाझेचे RAP ऐकायची सवय असणार्यांना हे RAP वाटणारच नाही. चित्रपटातील प्रसंगाला हे अधिक धरून आहे. “देवा”च्या या प्रयोगशीलतेला दाद द्यावी तितकी कमीच! नव्याने ऐकणार्यांना तर हा इंग्लिश भाग अधिकच गोड वाटेल!

      आज माझ्या देवा”चा वाढदिवस! त्याचे संगीत तर अमर झालेच आहे, आणि संगीताच्या रूपाने तोही अजरामर! मग अश्या वेळी त्याला उदंड आयुष्य चिंतणारा मी कोण? मी फक्त त्याच्या चरणांवर हे वाकुडे लेखनपुष्प वाहून नतमस्तक होऊ शकतो. खरोखर माझी तेवढीच इच्छा आहे. मला खात्री आहे, “होस्साना” तुम्हालाही नक्की आवडेल!

  • इलयराजा", "रहमान" आणि "क्या हैं मुहब्बत…

    गुरुदत्तच्या “प्यासा (१९५७)” मधील “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…” ज्याला माहिती नसेल असा संगीत-रसिक सापडणे अशक्यच! खरोखरंच, किती सुंदर संगीताची निर्मिती व्हायची त्या काळात! आजही ती अवीट गीते अंगावर रोमांच उभा करतात. याउलट आजच्या काळातील संगीत पहा. “आत्माहीन” एवढे एकाच विशेषण त्यास शोभून दिसेल. याचे मुख्य कारण म्हणजे आजची चित्रपट-गीते ही केवळ तत्काळ आणि तेवढ्यापुरती गाजावित म्हणूनच बनवली जातात. आणि इतकेच नव्हे तर बरेचदा त्यांत मांडलेल्या भावनाही यांत्रिकच असतात. त्यामुळेच आज गाजणारं गीत महिन्याभरानंतर कुणाच्या लक्षातही नसतं.
        अर्थातच या सगळ्याला इलयराजा आणि रहमानसारखे काही सन्माननीय अपवादही आहेत (आणि जी. व्ही. प्रकाशकुमारसुद्धा – पण त्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचाय). रहमान आणि राजाबाबतीत बोलायचं झालं तर, दोघांचीही संगीतरचनेची शैली भिन्न आहे. उदाहरणार्थ, राजा सरांचा भर गीताची मूळ चाल जशीच्या तशी ठेवण्यावर अधिक असतो. मग जेवणात वरून मीठ भुरभुरावं तश्या ते त्या गीतात वाद्यसंयोजनाद्वारे भावना भुरभूरतात. त्या गीतातील भावनांची अभिव्यक्ती सुयोग्य गायक अथवा गायिकेद्वारे करवून घेणे त्यांना अधिक आवडते. अश्याप्रकारे सिद्ध केलेली त्यांची पाकक्रिया परिपूर्ण असते आणि शिवाय श्रोत्यालाही समजायला सोपी असते. याउलट रहमान सर मात्र गीताच्या मूळ चालीत शब्दांखेरीज संगीताचे वेगवेगळे थर (Layers) पेरतात – कधी वैशिष्ट्यपूर्ण वाद्यसंयोजनाद्वारे तर कधी वैशिष्ट्यपूर्ण ध्वनिमिश्रणाद्वारे. त्यांना गीतातील भावनांच्या अभिव्यक्तीसाठी विशिष्ट गायक-गायिकेची गरज असतेच असे नाही, तर त्यांच्या गीतातील भावना ही चाल, वाद्यासंयोजन, वैविध्यपूर्ण ध्वनींचा वापर अश्या खुपश्या घटकांचा एकत्रित परिणाम असतो. त्यामुळेच त्यांची गीते एकदा ऐकल्यावर काळातही नाहीत, किंबहुना कंटाळवाणीच वाटतात. पण हळूहळू, अधिकाधिक ऐकत गेल्यावर त्यातील नवनव्या गोष्टी मनात रुंजी घालू लागतात. याला मी ते गाणे “चढणे’ असे म्हणतो! ही नवनव्या गोष्टी सापडण्याची प्रक्रिया कधीकधी त्या गीताच्या प्रकाशनानंतर वर्षभरही चालू असते आणि यामुळेच ते गीत महिन्याभरात मरत नाही, उलट जुन्या दारूसारखे अधिकाधिक परिपक्व होत जाते, तजेलदार होत जाते.
        याचा अर्थ असा नव्हे की, राजा सर गुंतागुंतीच्या रचना करतंच नाहीत अथवा रहमान सर साध्यासोप्या रचना करतंच नाहीत. सर्वांना समजावे म्हणून हिंदीतीलच उदाहरणे पाहू. “बातें हवा हैं… (चीनी कम – २००७)” या गीतातील दोन्हीही मध्यमेळ (Interludes) ऐका. एकीकडे सिम्फनी आणि दुसरीकडे रॉक! आणि या दोन्हींच्या एकत्रित परिणामाद्वारे गाण्याच्या अभिव्यक्तीत होणारा बदल हा एकदा ऐकून समजणारा नाही; किंबहुना विचित्रच वाटणारा आहे. आज ५ वर्षांनंतरही मी आश्चर्यात बुडालेलो आहे की इतक्या गुंतागुंतीच्या थरांत या साध्यासोप्या चालीची मांडणी करणे कसे सुचले असेल? किंवा “पा(२००९)” मधील “उडी उडी…” या गीताची ३ विविध भावना मांडणारी ३ विविध रूपे (व्हर्जन्स) आहेत. एकाच चालीतून वेगवेगळ्या वाद्यांद्वारे ३ वेगवेगळ्या भावनांची मांडणी अतिशय रोमांचक आहे. हेही गीत (३ही रूपे) एकदा ऐकून समजणारे नाही. याउलट, रहमान सरांच्या “झूठा ही सही (२०१०)” तील गाणी ऐका. अतिशय सोप्या चाली आणि तितकंच सोपं वाद्यसंयोजन! एकदा ऐकूनच “चढतील” (अपवाद फक्त त्यातील “मूनलाईट”चा!).
        हे सारं विस्ताराने मांडण्याचं कारण म्हणजे “एक दीवाना था (२०१२)”मधील एकमेव नवीन गाणे “क्या हैं मुहब्बत…”! अतिशय साधीसोप्पी चाल, तितकंच साधं (सामान्य नव्हे!) वाद्यसंयोजन! सुरुवातीला मुद्दामच गुरुदत्तच्या गीताची आठवण सांगितली, कारण त्याच धर्तीवर हेही गीत “तरन्नुम” पद्धतीचं! विशेष म्हणजे रहमानची आधीचीच सुरेख असलेली गायकी हरेक गाण्यात अजूनच सुधारत चाललीय! खास करून “मुहब्बत खुदा हैं, खुदा हैं मुहब्बत…” हे शब्द गाताना त्याची सांगीतिक बुद्धिमत्ता आणि गायकी ऐका. कित्येक वर्षांत तरन्नुम हा गीत-प्रकार कुणी हाताळला नव्हता, कारण नुसते “शेर” विशिष्ट पद्धतीने मांडणे म्हणजे तरन्नुम नव्हे तर गीताचा एकूण परिणामही अर्थवाही व्हायला हवा असतो. “संगीताच्या देवा”ने हे सारेच आह्वान अतिशय ताकदीने पेललेय आणि तरीही गीताचा ताजेपणा व प्रामाणिकपणा अबाधित ठेवलाय! तुमच्या वेगवेगळ्या मनोवस्थेत हे गीत तुम्हाला वेगवेगळे वाटेल. कधी ते “Jazz” वाटेल तर कधी ‘गझल” तर कधी “प्रेम म्हणजे नक्की काय हो?” असा सनातन प्रश्न विचारणाऱ्या तत्ववेत्त्याचे मुक्त चिंतन! काहीही असो, हे गीत प्रत्येक वेळी तितकेच गोड वाटते, सुंदर वाटते, प्रामाणिक वाटते! जुन्या गीतांची आवड असणाऱ्या श्रोत्यांना तर हे गीत ऐकल्यावर “तो” सुवर्णकाळच परत आल्यासारखं वाटेल. विशेषत: त्यातील एकूणएक शब्द लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला निश्चितच जावेद अख्तरच्या प्रतिभेला प्रणाम करावासा वाटेल.

        एकूण सांगायचं झालं तर, इलयराजाही रहमानसारखी गुंतागुंतीची रचना करू शकतो आणि रहमानही इलयराजासारखी सोपी! पण यावेळी मात्र रहमान हा राजाच्या सोपेपणापेक्षाही एक पाऊल पुढे गेलाय! हा “शिष्यादिच्छेत्पराजयम्” स्वत: इलयराजालाही निश्चितच आवडेल आणि माझी खात्री आहे की तुम्हां सर्वांना सुद्धा!

  • वेदकाळात ब्राह्मणवाद : एक पोकळ कल्पना

    हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला “पुरोगामी” ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच.
      वेदांतील सर्वांत जुना आणि प्रमुख वेद म्हणजे ऋग्वेद. एखादी गोष्ट ऋग्वेदाच्या बाबतीत खरी असेल तर ती इतर ३ वेदांच्या बाबतीतही खरी असते. आणि ऋग्वेदाबाबतीत एखादी गोष्ट खरी नसेल तर ती इतर ३ वेदांनीही स्वीकारलेली नसते हे आपणास माहिती आहे. तेव्हा शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने जर ऋग्वेदात ब्राह्मणवाड नसेल तर इतर ३ वेदांतही तो नाही हे मानण्यास प्रत्यवाय नाही. असा विचार करून मनात काहीही पूर्वकल्पना न ठेवता जेव्हा मी ऋग्वेद संहिता तपासू लागलो तेव्हा संशोधनांती हाती आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. तेच आत्ता तुमच्यासमोर मांडतोय.
       ऋग्वेदाच्या १० मंडलांत मिळून एकूण १०२८ सूक्ते आहेत. हि सारी सूक्ते एकूण ३९० ऋषींनी लिहिलीयत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण मला सापडलेल्या माहितीनुसार, या मंत्रद्रष्ट्या ऋषीपैकी २१ स्त्रिया स्त्रिया आहेत आणि याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सार्या ऋषीपैकी ४७ ऋषी अब्राह्मण आहेत! या अब्राह्मण ऋषींची नावे आणि त्यांनी रचलेल्या सूक्तांची(ऋचांची नव्हे!) संख्या येथे देत आहे.
    मधुछंद  विश्वामित्र (११)
    जेता  मधुछंदस (१)
    अंबरिष (१)
    वर्षागीर (१)
    इंद्र (३)
    मरुत (१)
    विश्वामित्र  गाथिन (४९)
    ऋषभ  वैश्वामित्र (३)
    कत वैश्वामित्र (२)
    प्रजापति वैश्वामित्र (५)
    भारताश्वमेध राजा (१)
    संवरण प्राजापत्य (२)
    कुमार आग्नेय (२)
    वैवस्वत (५)
    ययाती (१)
    नहुष (१)
    साम्वरण (१)
    वैश्वामित्र वाच्य (२)
    रुणन्चय राजर्षी (१)
    सिंधुद्विप आंबरिष (१)
    यमी (२)
    विवस्वान (१)
    यम (२)
    शंख यामायन (१)
    दमन यामायन (१)
    देवश्रवा यामायन (१)
    सुंशुक यामायन (१)
    मथित यामायन (१)
    विमद ऐन्द्र  अथवा प्राजापती (७)
    वसुक्र ऐन्द्र (३)
    इंद्रस्नुषा (१)
    अभिताप सौर्य (१)
    मुष्कवान ऐन्द्र (१)
    वैकुंठ ऐंद्र (३)
    नाभानेदिष्ट मानव (२)
    सर्प ऐरावत जरत्कर्ण (१)
    सावित्री सूर्या (१)
    इंद्राणी (३)
    वृषाकपि ऐन्द्र (१)
    रेणू वैश्वामित्र (१)
    शार्यत मानव (१)
    अर्बुद सर्प (१)
    उर्वशी (1)
    सर्वाहारी ऐन्द्र (१)
    अप्रतिरथ ऐन्द्र (१)
    अष्टक वैश्वामित्र (१)
    पणय: असुर तथा देवशुनी सरमा (१)
    लबरुपापन्न ऐन्द्र (१)
    हिरण्यगर्भ प्राजापती (१)
    अग्नी, वरूण, सोम (१)
      यावरून असे दिसते कि सुमारे १३९ म्हणजे ऋचान्च्या एकूण संख्येच्या १०% हूनही अधिक ऋचा या अब्राह्मण मंत्रद्रष्ट्या ऋषींनी लिहिल्या आहेत. वरील आकडेवारीबद्दल कुणाला शंका असल्यास आपण स्वत: ऋग्वेद संहिता पाहून खात्री करू शकता.
      यावरून कुणीही सूज्ञ व्यक्ती हाच निष्कर्ष काढेल कि वेदकाळात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद अजिबातच अस्तित्वात नव्हता. कुणीही व्यक्ती (मग ती स्त्री असो वा पुरुष) त्याच्या गुण आणि कर्मांनी योग्य तो वर्ण प्राप्त करून घेऊ शकत असे. जातीव्यवस्था ही कधीही भारतीय समाजाचा भाग नव्हती, हिंदू धर्माचा तर नव्हतीच. जातीव्यवस्था ही अहिन्दुंच्या आक्रमणामूळे झालेले जे अनेक दुष्परिणाम आहेत त्यांपैकी एक आहे – आणि आजचे राजकारणी व अन्य भारतद्वेषी लोक तिला खतपाणी घालत आहेत आणि ते ही “ब्राह्मणवाद” नामक एका निरर्थक आणि पोकळ शब्दाचा आश्रय घेऊन! अश्यांना किती थारा द्यायचा हे आपणच ठरवा. आपण सूज्ञ आहात.
    जयतु भारतं ||

    – © विक्रम श्रीराम एडके
    edkevikram@gmail.com