Author: Vikram Edke

  • भिक

       मी शक्यतो रेल्वेनेच प्रवास करतो. याचं कारण म्हणजे एकतर हा प्रवास थोडा मोठा होत असल्याने यात एकप्रकारचा निवांतपणा असतो. त्यामुळे प्रवास माझ्या व्याख्यानाच्या निमित्ताने असेल तर मला शांत मनाने मी मांडणार असलेल्या मुद्द्यांवर विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. नवीन लोकांशी ओळखी होतात, नवनवे अनुभव येतात. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे, मोठ्या प्रवासात मला माझ्या आवडीचे संगीत भरपूर वेळ ऐकता येते.
       असाच एक नगर-पुणे रेल्वेप्रवास. मी माझ्या आवडीची “युवराज” चित्रपटातील गाणी ऐकत होतो. दौंडच्या आसपास काही हिजडे गाडीत शिरले. ओंगळ लाडिकपणा करत ते प्रत्येकाकडून पैसे मागत होते. १० रुपयांच्या खाली एक पैही घेत तर नव्हतेच, पण कमी पैसे देणार्याला अथवा द्यावयास टाळाटाळ करणार्याला गलिच्च शिव्या घालत होते, नको तिथे स्पर्श करून त्रास देत होते. मला हा प्रकार काही नवा नव्हता, त्यामुळे त्यांच्याशी घासाघीस करण्यात काहीच अर्थ नाही हेही ठाऊक होते! कटकट नको म्हणून मी इतरांप्रमाणेच पैसे दिले, ती “मंडळी” निघून गेली, मीही पुन्हा गाणी ऐकू लागलो.
       अचानक हेडफोन्सच्या आवाजावर ताण करणारा एक बायकी आवाज ऐकू येऊ लागला, “परदेसी परदेसी जाना नहीं...”
       पाहतो तो एक भिकारी स्त्री कडेवर एवढूस्से पोर घेऊन गाणे गात होती. तिच्याकडे लक्ष देण्याची कोणत्याही प्रकारे सक्ती नसल्याने, किंबहुना त्या बाईचे कोणतेही म्हणावे असे उपद्रवमूल्य नसल्याने जो तो आपापल्या कामात गढलेला होता.
       मघाशी ते हिजडेही भिकच मागत होते आणि आता ही बाईदेखील भिकच मागतेय. पण “ते” भिक जणू त्यांचा अधिकारच असल्याप्रमाणे सक्तीने वसूल करत होते. त्यांना पैसे देणं प्रत्येकालाच भाग होतं. पण या बाईला कुणी पैसे द्यायचे नाकारले तरीही ती कुणाचंच काही वाकडं करू शकणार नव्हती, हे प्रत्येक जण जाणून होता. आणि म्हणूनच कुणी तिच्याकडे साधं लक्ष द्यायलाही तयार नव्हतं. माझ्या मोबाईलवर गाणी चालूच होती, पण आता मी हेडफोन काढून ठेवल्यामुळे गाडीच्या धडधडाटात त्यांचा आवाज अतिशय मंद, दुरून कुठूनतरी येत असल्यासारखा ऐकू येत होता.
       बरं ती काय नुसतीच भिक मागत होती का, तर अजिबात नाही. त्याबदल्यात ती गाणी गात होती. फार सुरात नसेलही ती, पण एखादी गोष्ट फुकटात किंवा तोंड वेंगाडून न घेण्याचा स्वाभिमान तिच्यात निश्चितच दिसत होता. या विचाराने मला अस्वस्थ करून सोडले. मी खिशात हात घालून एक ५ रुपयांचं नाणं तिला देऊ केलं, तर या बाईने मला हातानेच गाणे संपेपर्यंत थांबण्याचा इशारा केला. म्हणजे तिला खरोखरच बदल्यात काहीतरी देऊ केल्याशिवाय एक पैसाही नको होता. मी थांबलो. गाणे संपल्यावर तिने एकेकापुढे पदर पसरायला सुरुवात केली. कुणी ५ कुणी १० रुपये, कुणी आणखी जमेल तितके पैसे देत होते. मीही पैसे दिले.
    खरी गम्मत तर पुढेच झाली, एका सरदारजींनी १०० ची नोट पुढे केली आणि म्हणाले, सुटे पैसे नाहीत. तिने ते पैसे घेतले, आणि पुढच्या बोगीत गेली. सुमारे १५ मिनिटानंतर ती पुन्हा आमच्या बोगीत आली आणि तिने त्या सरदारजींना ५-१० नोटा आणि नाण्यांच्या स्वरूपात ९० रुपये परत केले! बोगीतील आम्ही सारेच अवाक झालो. सरदारजीही “मला वाटलं नव्हतं तू परत येशील. सगळे पैसे ठेवले असतेस तरी चाललं असतं”, असं काहीतरी म्हणाले.
       यावर ती शांतपणे म्हणाली, “साहेब मला माहितीय माझी लायकी काय आहे. उगाच जास्त पैसे घेऊन मी काय करू..”?
       भिक मागणे या प्रकाराचं कुठल्याही प्रकारे उदात्तीकरण करायचा माझा अजिबात प्रयत्न नाही. पण त्याच दिवशी नगरच्या स्थानकावर एक खुरडत-खुरडत रांगणारा भिकारी दिसला होता. कुणालाही सहजच दया यावी अशी त्या म्हातार्याची अवस्था होती. लोक कणव येऊन त्याला पैसेही देत होते. पण पाचच मिनिटांनी तो भिकारी मला जेव्हा व्यवस्थित चालत पाण्याच्या नळावर पाणी पिताना दिसला, तेव्हा मला हसू आवरले नाही! त्यानंतर गाडीतील तो हिजड्यांचा उच्छाद! या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या बाईचे एकूणच वागणे मनाला कुठेतरी स्पर्श करून गेले. गाडी पुढे जातच होती, आणि माझ्या मोबाईलमध्ये श्रीनिवास आपल्या मखमली आवाजात गात होता,
    “जिन्दगी जिन्दगी, क्या कमी रह गयी…
    आंख की कोर में, क्यू नमी रह गयी…
    जिन्दगी जिन्दगी…”

    गाडी पुढे जातच होती, जातच होती…

    © विक्रम श्रीराम एडके.
    (edkevikram@gmail.com)

  • Burning For Freedom

     

       इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या आभासी जगताने कुणाला काय दिलं माहिती नाही. पण मला मात्र अनेक जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी दिले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे पुष्कराज खेडेकर! आमची ओळख कधी आणि कुठे झाली मला खरोखरच आठवत नाही, पण २ वेगवेगळ्या देशांत राहत असूनही आमचा संवाद निरंतर सुरु आहे. याचे कारण म्हणजे आम्हाला जोडणारा समान धागा – स्वातंत्र्यवीर सावरकर! मला आठवतं कि पुण्यात मी दिलेल्या पहिल्याच व्याख्यानालाही त्यांनी भारतातील त्यांच्या सुट्टीचा कालावधी अडजस्ट करून हजेरी लावली होती!

        पुष्कराजमुळेच माझी ओळख श्रीमती अनुरूपा सिनार यांच्याशी झाली. खरंच सांगतो, झपाटलेपण काय असतं ना, ते या जिद्दी विदुषीकडून शिकावं! मराठीचा फारसा गंध नसताना, दूरदेशी वास्तव्यास असताना आणि संदर्भ-साहित्य मिळण्यापासून अनेक अडचणी असतानाही यांनी २००९ साली वीर सावरकरांची जीवनगाथा सबंध जगाला कळावी म्हणून इंग्रजीतून कादंबरी लिहिण्याचा संकल्प सोडला, आणि अक्षरशः शेकडो अडथळे ओलांडून तो पूर्णत्वासही नेला. आणि यातून जन्माला आली कादंबरी – Burning For Freedom!

        या दोन्हीही गोष्टी सांगायचे कारण म्हणजे, मी सावरकरांवर तसेच हिंदुत्वावर व्याख्याने देतो म्हणून माझ्या अभ्यासासाठी पुष्कराजने हे पुस्तक मला पार अमेरिकेहून पाठवायचं ठरवलं आणि अनुरुपाजींनी तत्परतेने त्यासाठी वैयक्तिक संदेशही दिला. पुष्कराजने पाठवलेलं हे पुस्तक मला आजच मिळालंय आणि मी झपाटल्यागत वाचायला सुरुवातही केली आहे. अतिशय काव्यमय तरीही विषयाशी पूर्णतः प्रामाणिक राहत लिहिलेली इंग्रजीतील ही या विषयावरील एकमेव कादंबरी असावी. कादंबरी असूनही त्यातील काही भागांसाठी अनुरुपाजींनी केलेले संशोधन नवे तर आहेच परंतु त्यांच्या चिकाटीची साक्ष देणारेही आहे! सावरकरांवर ज्यांची निष्ठा आहे त्यांनी तर हे पुस्तक अवश्य वाचावेच शिवाय इंग्रजी साहित्याची आवड असणार्या परंतु सावरकर माहिती नसणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींनाही हे पुस्तक आवर्जून वाचायला द्यावे – इतके हे पुस्तक सुंदर आहे!

        पुस्तकाच्या मलपृष्ठावर असलेला पुढील मजकूर माझ्या मनाला फारच भिडला आहे –

    This is the story of one man’s – Vinayak Damodar Savarkar’s – sacrifice of his name, fame, comfort & family life in the fifty years of his quest for the freedom of his beloved motherland, India. It is the story of politics & power plays. Exposed here is the reality that lies behind the mask of Truth; exposed are the shenanigans of Mahatma Gandhi in the Freedom Movement of India. The reality is a far cry from the rosy picture presented by what passes as history.
    Here, Savarkar’s life is creatively intertwined with a fictional character, Keshav Wadkar, taking the reader from the horrors of the Cellular Jail in 1913 to the assassination of Mahatma Gandhi in 1948. Savarkar fought to preserve the integrity of India, to reinstate the honor of his motherland without ripping her heart out. For the emancipation of his beloved country & people, he suffered agonies & gross injustices at the hands of the British government. Gandhi-Nehru-led Indian National Congress, and the successive Governments of free India.
    That his contribution to India should be negated to bolster the political aspirations of any political party is inacceptable.
    THE TRUTH CANNOT – AND SHALL NOT –BE HIDDEN!

        मला खात्री आहे की हि कादंबरी पाठवल्याबद्दल मी आभार मानणे या दोघांनाही आवडणार नाही, तेव्हा तो प्रयत्नही मी करणार नाही. उलट त्यांच्या या प्रेमळ ऋणाखाली राहण्यात मला आनंदच आहे! हे पुस्तक आपण सर्वांनीही अवश्य मागवून वाचावे असे मी नक्की म्हणेन.

    * काही उपयुक्त लिंक्स –
    १) श्रीमती अनुरूपा सिनार यांची वेबसाईट :
    www.anurupacinar.com
    २) श्रीमती अनुरूपा सिनार यांचा ब्लॉग :
    http://anurupacinar.blogspot.in/
    ३) पुस्तक ऑनलाईन मागविण्यासाठी लिंक :
    http://www.amazon.com/Burning-Freedom-Goddess-Death-without/dp/1426974981

    – आपलाच,
    विक्रम श्रीराम एडके
    (edkevikram@gmail.com)

  • हिंदुत्व हे मोठे अजब रसायन आहे

    हिंदुत्व हे मोठे अजब रसायन आहे. ते संपले म्हणून कुणी पोत खाली करू गेले तर त्याची ज्वाळा दुप्पट त्वेषाने वर वरच उफाळते.
       जगज्जेत्या शिकन्दराला भ्रम होता की हा हा म्हणता म्हणता हिंदुस्थान काबीज करेल. तो शिकंदर हिंदुस्थानचे साधे अंगणही बघू शकला नाही! कालौघात चाणक्यही गेले आणि चंद्रगुप्तही, केवळ हिंदुत्व तेवढे टिकून राहिले. म्लेन्छांनी या भूमीला उणीपुरी ६०० वर्षे गुलाम करून ठेवले. आता हिंदुत्व औषधालाही उरणार नाही असे वाटत असताना ते नुसते तगलेच नाही तर या भूमीत त्याने शिवप्रभून्सारखा संजीवन योद्धाही जन्मास घालून दाखवला. शिवप्रभूही गेले आणि शंभूछ्त्रपतीही पण तोवर हिंदुत्वाची धुरा बाजीराव बल्लाळ नावाच्या महायोद्ध्याने केव्हाच पेलली होती!
       इंग्रजी अंमलातही हे दैवी रसायन आपले अस्तित्व दाखवून देताच होते, कधी १८५७ च्या रूपाने तर कधी अनेकानेक क्रांतिकारकांच्या रूपाने! पुढे जन्माला आला तो विनायक दामोदर सावरकर नावाचा महानायक, हिंदू-हृदय-सम्राट! या महानायकाने हिंदुत्वाचा उद्घोष असा काही केला की सबंध देश ढवळून निघाला! पुन्हा तोच प्रश्न, सावरकरांच्या नंतर कोण?
       सावरकरांच्या नंतर कोण? अरे केव्हाच जन्माला आला होता एक हिंदू-हृदय-सम्राट! “बाळ” नावाचा “बाप” माणूस, ज्याने गेली पाच दशके केवळ हिंदूंच्याच कशाला, सर्वच सच्च्या देशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
       आज हा बापही गेला. पण म्हणून हिंदुत्व पोरके झाले असे मानायचे काही कारण नाही. मराठी वाघ जरी अनंताच्या यात्रेवर प्रयाण करता झाला असला तरीही, गुजरातचा सिंह अजून जिवंत आहे. म्हणून म्हणतो, हिंदुत्व संपले नाही, हिंदुत्व संपत नाही. ते एक मोठे अजब रसायन आहे. ते संपले म्हणून कुणी पोत खाली करू गेले तर त्याची ज्वाळा दुप्पट त्वेषाने वर वरच उफाळते!
    © विक्रम श्रीराम एडके.
  • " ते…. "

    जेव्हा तुम्ही-आम्ही घालत असतो आपल्या कुजलेल्या दु:खाचे लोणचे,
    तेव्हा ‘ते’ आशेचे अंकुर पेरत असतात..
    जेव्हा तुम्ही-आम्ही ढाळत असतो वांझोटे अश्रू,
    तेव्हा ते कष्टाच्या जमिनीवर घामाचं सिंचन करत असतात..!
    आपल्याला अंधारात दिसतो बागुलबुवा,
    अन् ‘ते’ आशेच्या किरणांना खेचत असतात..
    दिवस सरतात, काळ जातो,
    तुम्ही-आम्ही उचलत राहातो आयुष्याचे तेच जुने ओझे,
    अन् तेव्हा ‘ते’ यशोशिखरावर स्वार झालेले असतात..
    आपण बुजगावण्यासारखं जगतो, मरून जातो,
    तेव्हा ‘ते’ अमर झालेले असतात..
    असे कसे? कारण…
    जेव्हा तुम्ही-आम्ही बडवत असतो परिस्थितीचा पोकळ ऊर,
    तेव्हा ‘ते’ स्वप्नांची धारदार शस्त्रे करून मैदानात उतरलेले असतात..
    आणि कदाचित म्हणूनच ‘ते’ सामान्य असूनही असामान्य ठरत असतात..

    – © विक्रम.

  • याद हैं वोह हमारी पहली मुलाक़ात की रात..?

    याद हैं वोह हमारी पहली मुलाक़ात की रात?
    हमारी दोस्तीका मोती तुमने अपनी नर्म पल्कोंपे तोला था..
    शायद धनकमें कुछ और रंग जुड़ गए होंगे उस रात,
    या फिर यूँ कहो की ज़िन्दगी के रेगिस्तांमें बरसात हुई थी पहली बार..
    एक रात वोह भी तो थी,
    जब हमने सारी दुनियादारीको लात मारके कहकहे लगाए थे!
    लगा था जैसे वक़्त के पन्नोंपे किसीने पेपरवेट रख दिया हो!
    ‘यारी-दोस्ती और बात हैं, तो दुनियादारी कुछ और’
    बात ये समझके भी नहीं समझना चाहते थे उस रात हम तीनों..
    कल को एक रात वो भी तो आएगी..
    की जब तुम चली जाओगी..
    हम भी आंसूओंको बारिश का पानी कहके जी बहला लेंगे!
    ज़िन्दगी तो किसी पहिए की तरह हैं, गोल-गोल!
    फिर किसी मोडपे मुलाक़ात तो होगी ही होगी..!
    तब तुमसे पूछेंगे,
    याद हैं वो हमारी पहली मुलाक़ात की रात?
    हमारी दोस्ती का मोती तुमने अपनी नर्म पल्कोंपे तोला था..!
    – © विक्रम.
  • जी करता हैं…

    जी करता हैं, गुलाल बन जाऊँ..
    चीखता-चिल्लाता बवाल बन जाऊँ..!
    दूरीयों, मजबूरीयोंसे अलग..
    उन रेशमी हाथोंका रुमाल बन जाऊँ..!
    जिंदगी क्यूँ सिखाए मुझे उसके मायने..
    आज खुद जवाब, खुद सवाल बन जाऊँ..!
    पीछे घनी धुंध, आगे गहरा कुऑं..
    डर को डरानेवाली मिसाल बन जाऊँ..!
    कभी किशन बन बन्सी बजाऊं..
    कभी गाय, तो कभी गोपाल बन जाऊँ..!
    हो जाऊँ आज मैं परोंसे भी हलका..
    मस्तीमें उडता खयाल बन जाऊँ..!
    आखिर कब तक उठाए गैरोंके बोझ..
    आज खुद के बोझ का हमाल बन जाऊँ..!
    जी करता हैं.. जी करता हैं..!

    – © विक्रम.
  • जब तक है जान (संगीत-समीक्षण) : भाग – १

    चित्रपटागणिक प्रगती करत करत कायम स्वतःची शैली बदलत राहणारा माझ्या माहितीतील एकमेव संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान! १९९५ च रहमान २००५ साली आढळत नाही आणि २००५ चा रहमान २०१२ साली आढळणार नाही!
       परंतु मला सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट हि नव्हे! मला कळतं तेव्हापासून मी रहमानचं सर्व संगीत ऐकत आलोय. सुरुवातीच्या काळात त्याने लता मंगेशकर, आशा भोसले, एस. पी. बालासुब्रह्मण्यम, येसुदास, एस. जानकी, के. एस. चित्रा आदी दिग्गजांसोबत खूप सुरेख गाणी दिली. आजही तो, गीताची तशी गरजच असेल तर या महानुभावांकडून गाऊन घेतोच. पण त्याने लवकरच बहुधा विचार सुरु केला असावा की, ‘ही मंडळी गेल्यानंतर काय‘? म्हणूनच त्याने जाणीवपूर्वक या लोकांची जागा नव्या गायकांना देणे सुरु केले. सुरुवातीला त्याच्यावर चहूबाजूंनी प्रखर टीकाही झाली, परंतु तो डगमगला नाही. १०-१२ वर्षे मेहनत घेऊन त्याने काही हिरे घडवले. आज हे गायक उपरोक्त दिग्गजांच्या तुलनेत कुठेही कमी तर नाहीतच, उलट या प्रत्येकाचा स्वत:च एक दिग्गज बनण्याकडे प्रवास चालू झाल्याचे स्पष्ट दिसते. ही काही नावे पहा – कार्तिक, जावेद अली, बेनी दयाल, चिन्मयी, हर्षदीप कौर, विजयप्रकाश, नरेश अय्यर, राशीद अली, विजय येसुदास – सगळीच नावे देणे मला शक्यही होणार नाही. कदाचित, घेतलेल्या नावांपेक्षा राहिलेली नावेच अधिक असतील!
       आता या लोकांना घडवलं म्हणजे नेमकं काय केलं? काही उदाहरणे देतो. जावेद अलीची रहमानकडे गायलेली जश्न-ए-बहारा (जोधा अकबर – २००८) पासून ते जोहरा जबीन (एक दिवाना था – २०१२) या चार वर्षांतली सारी गीते ऐका. तुम्हाला त्याचा ‘एक साधा गायक’ ते ‘एक दिग्गज’ असा झालेला प्रवास सहज जाणवेल. तीच गोष्ट चिन्मयीची, कार्तिकची आणि इतर सर्वांची! किलीमांजारो (एनधिरन – २०१०) हे गीत ज्या जावेद-चिन्मयी जोडीने गायलेय, त्याच जोडीने मैय्या यशोदा (झूठा हि सही – २०१०) देखील गायलेय हे खरेच वाटत नाही इतके वैविध्य त्यांनी आपल्या गायकीत आणलेय. यात त्यांचा गुरु असलेल्या रहमानचा वाटा काय असेल हे मी निराळे सांगायची आवश्यकता नाही! आता तर रहमानने के. एम. म्युझिक कॉन्झरवेटरीद्वारे असे हिरे अधिक शिस्तबद्ध पद्धतीने घडविणारे विद्यालयच सुरु केले आहे. याच विद्यालयात शिकलेला फणी कल्याण हा संगीतकार सध्या तमिळ चित्रपटसृष्टीत नाव कमावतो आहे. रहमानचा भाचा जी. व्ही. प्रकाशकुमार तिकडे तर प्रसिद्ध आहेच, शिवाय ग्यांग्स ऑफ वासेपूर (२०१२) आणि जोकर (२०१२) द्वारे तो इकडेही हळूहळू प्रसिद्ध होतोय. असो, विस्तारभयास्तव एवढीच उदाहरणे पुरे!
       यावेळी हाच ए. आर. रहमान रॉकस्टार (२०११) नंतर तब्बल वर्षभराने संगीतप्रेमींसाठी मेजवानी घेऊन आलाय ‘जब तक है जान’च्या रूपाने. एकीकडे यश चोप्रांचा शेवटचा चित्रपट असे वलय लाभलेले तर दुसरीकडे दिल से (१९९८) पासून ते रावण (२०१०) पर्यंत एकाहून एक सरस गीते देण्याची परंपरा असलेली रहमान-गुलजार ही जोडी! वर चर्चा केल्याप्रमाणे, इतका भव्य प्रकल्प असूनही बहुतांशी गीते नवोदितांनी गायली आहेत तर उरलेली गीते नवदिग्गजांनी! आता ही गीते खरोखरीच जमून आली आहेत किंवा काय हे पाहूया याच लेखाच्या पुढील भागात!

    – © विक्रम श्रीराम एडके

    (edkevikram@gmail.com)

  • भाषाभिमान – एक स्फुट चिंतन.

       लॉर्ड मेकोले आपल्या २ फेब्रु. १८३५ रोजी ब्रिटीश संसदेत केलेल्या भाषणात म्हणतो,
    I have traveled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self-esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation“.
        दुर्दैवाने मेकोले यशस्वी झालाय असं नाही वाटत का आपल्याला? भाषेपुरताच विचार करू. आज आपण इंग्रजीत बोलणेच भूषण मानू लागलो आहोत. माझ्या माहितीत काही लोक असेही आहेत जे प्रसंगी उपाशी राहतात पण भरमसाठ शुल्क भरून मुलाला इंग्रजी शाळेतच टाकतात! का तर म्हणे, इंग्रजी ही जगाची भाषा आहे, इंग्रजी येत नसेल तर आजच्या जगात वावरणे अशक्य आहे, वगैरे.. खरंच तसं आहे का हो?
        चीनमध्ये इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. जपानमध्ये कुणी इंग्रजीत बोलत नाही. जर्मनी, फ्रान्समध्ये इंग्रजीत बोललात तर लोक तुमच्याकडे तुच्छतेने पाहतात. रशियात सर्व कारभार रशियन भाषेतच चालतो. इंग्लंडसारखे काही अपवाद वगळले तर सबंध युरोपात कोणताही देश इंग्रजी-भाषिक नाही. उपरोक्त सर्व देशांत शिक्षण, प्रशासन आणि व्यापार हे तिन्ही त्यांच्याच भाषेत चालतात. हे सर्व देश तथाकथित “प्रगत देश” या व्याख्येत बसतात. मग कश्याच्या आधारावर आम्ही इंग्रजीला “जगाची भाषा” म्हणतो? बरं, मी इंग्रजी अजिबातच शिकू नये असे म्हणतोय का? नाही. इंग्रजी शिकावी, अवश्य शिकावी पण कोणतीही इतर परकीय भाषा कामापुरती शिकतो तशी. याउप्पर तिचा अतिवापर टाळावा.
       एक उदाहरण सांगतो. विख्यात विद्वान श्री. रामदास कळसकर कामानिमित्त फ्रान्समध्ये जात, राहत असत. तिथे गेले कि नेहमीच एका फ्रेंच कुटुंबाकडे उतरत. काही वर्षांचा हा परिचय दाट स्नेहात बदलला होता. एकदा कळसकर तेथे काही काळासाठी वास्तव्यास असताना त्यांना भारतातून काही पत्रे आली. कळसकर बाहेर गेले होते म्हणून घरमालकिणीच्या मुलीने ती पत्रे स्वत:कडे ठेवली आणि ते आल्यावर त्यांना ती दिली. देताना तिने विचारले की, ‘मी पत्रे फोडली नाहीत पण पाकीटावरचा मजकूर वाचला. तो इंग्रजीत आहे. असे का?’ कळसकर तिला म्हणाले की, ‘आमच्या देशात बर्याचदा पत्रव्यवहारासाठी वगैरे इंग्रजीचा वापर होतो.’ ही गोष्ट त्या मुलीने आपल्या आईला सांगितली. जेवणाच्या वेळी त्या बाई कळसकरांना म्हणाल्या, ‘तुम्ही आमच्या घरातून कृपया दुसरीकडे राहायला जा. ज्या देशातील लोक स्वभाषेचा वापर करीत नाहीत त्या लोकांना आमच्याकडे रानटी समजतात. आणि अश्या व्यक्तीला मी आमच्या घरात ठेवू इच्छित नाही.’ गोष्ट थोडीशी तिखट वाटेल, पण अंजन झणझणीतच असायला हवे!
        याउलट पहा. स्वातंत्र्य मिळाल्यावर इस्रायेलने आपल्या हिब्रू भाषेच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. “शुद्ध हिब्रूत बोला आणि बक्षीस मिळवा” अश्या धर्तीच्या स्पर्धाही घेतल्या गेल्या आणि मृतप्राय झालेल्या हिब्रूचे पुनरुज्जीवन झाले. ही त्यांची निष्ठा!
        कुणाला काही शिकवावे इतका काही मी मोठा नाही, पण माझ्यासारख्या अतिसामान्य माणसालाही एवढं नक्की कळतं की आपल्या भाषेची काळजी आपणच घ्यायला हवी. इंग्रजीतच एक म्हण आहे – Alphabet follows the religion. दुर्दैवाने ही म्हण खरी ठरू पाहतेय. हे व्हायला नको. आपला श्रेष्ठ वारसा आपण आपल्याच कर्मांनी गमवायला नको. किमान माझ्याशी सहमत होणार्यांनी तरी आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे. इंग्रजीचा दुराग्रह हा आपल्या मानसिक पारतंत्र्याच्या पाउलखुणा आहेत, त्या पुसायची जबाबदारी आपलीच आणि त्यासाठी स्वभाषाभिमानाची वाट बांधायची जबाबदारीदेखील आपलीच!

    – विक्रम श्रीराम एडके.
    (edkevikram@gmail.com)

  • " जब तक हैं जान "

    ” जब तक हैं जान “
    बरखा की छींटें तेरे रुखसारोंपर,
    जैसे ओस आ थमी हो गुलजारोंपर..
    देखके धडकने कुछ यूँ तेज हुई हैं,
    के सुन नहीं पा रहा तेरे लब्जोंके गुलफामोंको..
    मानो जैसे सुर्ख होठोंसे खामोशी ही खामोशी छलक रही हो..!

    पूछा तुमने, चुपचाप हो क्यूँ..
    कैसे समझाऊ मैं तुम्हे, बस इतना समझ लो..
    आगोशमें भरके सुनना चाहता हूँ मैं ये मस्तानी खामोशी तेरी..
     
    जब तक हैं जान, जब तक हैं जान..!!
  • शांती नव्हे, "सद्गती"

    कुणीही महत्वाची व्यक्ती गेली की मी फेसबूकवर पोस्ट्स वाचतो किंवा मला भ्रमणध्वनीवर संदेश येतात, “त्यांच्या आत्म्याला शांती लाभो” अथवा “Rest In Peace”. वास्तविक ही इंग्रजांनी रूढ केलेली पद्धत, आपली नव्हे. पण आपल्यातले बहुतांशी लोक कळत-नकळत हीच पद्धत पुढे चालवतायत. यालाच साध्या भाषेत मानसिक-पारतंत्र्य म्हणतात.
    ख्रिशचन धर्मात अशी समजूत प्रचलित आहे की, व्यक्तीचा आत्मा त्याच्यासह कबरीत अंतिम निवाड्याचा

    दिवस येईपर्यंत पडून राहणार आहे. मग इतकी हजारो वर्षे पडून राहण्याचे त्या आत्म्याच्या नशिबात आहेच तर ते किमान शांततेने होवो, म्हणून म्हणतात, “शांती लाभो”. याउलट भारतीय संस्कृतीत मृत्यूला एक मंगल-सोहळा मानतात. आपण ज्याप्रमाणे जुने कपडे टाकून देत नवीन कपडे घालतो, त्याप्रमाणेच आत्माही जुने शरीर टाकून मोक्षप्राप्ती होईपर्यंत नवनवीन शरीरे परिधान करत असतो. आपल्या संस्कृतीत मृत्यूला स्वल्पविरामच नव्हे, तर एका प्रवासाची, अनंताच्या यात्रेची सुरूवात मानतात. या अश्या प्रवासासाठी त्या आत्म्याला साहजिकच गतीची आवश्यकता असणार. म्हणूनच आपली संस्कृती जाणणारे म्हणतात, “त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो” किंवा “May His/Her Soul Attain Sadgati”.
    आता काही तर्कट मंडळी प्रश्न करतील की, भारतीय संस्कृतीत खरी कश्यावरून? त्याच्यासाठी काही मुद्दे –
    १) मृत्यूनंतर आत्म्याला शरीराबाहेर ढकलण्याचे काम अपान वायू करतो. वैज्ञानिकदृष्ट्या एक गोष्ट नक्की की, मृत्युसमयी शरीरातून “काहीतरी बाहेर जाते”. आता बाहेर जाते म्हटलं की गतीशी संबंध आलाच.
    २) पाश्चात्यांकडून आपल्या संस्कृतीतली एखादी गोष्ट मान्य झाली तर आणि तरच ती मान्य करणारे काही महाभाग असतात. अश्यांनी कृपया विविध पाश्चात्त्य Theosophists ची या विषयावर मते वाचावीत आणि एक्टोप्लाझ्म वगैरे त्यांच्याच भाषेत समजून घ्यावे, कारण त्यांना आत्मा, गती वगैरे शब्द डाऊन-मार्केट वाटण्याची शक्यता आहे.
    ३) पाश्चात्य शांतीची संकल्पना बरोबर की आपली गतीची हे वैज्ञानिकदृष्ट्या अजूनतरी १००% सिद्ध झालं नाही. मग जर का दोन्हीही शंकास्पदच असतील तर त्यांची संकल्पना का वापरावी? जरासा स्वाभिमान वापरत खरं काय ते कळेपर्यंत आपलीच संकल्पना का वापरू नये?
    इतर सूज्ञांनाही माझी नम्र विनंती आहे की, किमान स्वाभिमान आणि आपल्या संस्कृतीवरील विश्वास या दोन कारणांनी तरी आपण व्यक्तीस “सद्गती लाभो” असे म्हणावे. श्राद्ध या संकल्पनेमागेही मृतात्म्यास सद्गती देण्याचाच विचार असतो.