भिक

   मी शक्यतो रेल्वेनेच प्रवास करतो. याचं कारण म्हणजे एकतर हा प्रवास थोडा मोठा होत असल्याने यात एकप्रकारचा निवांतपणा असतो. त्यामुळे प्रवास माझ्या व्याख्यानाच्या निमित्ताने असेल तर मला शांत मनाने मी मांडणार असलेल्या मुद्द्यांवर विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. नवीन लोकांशी ओळखी होतात, नवनवे अनुभव येतात. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे, मोठ्या प्रवासात मला माझ्या आवडीचे संगीत भरपूर वेळ ऐकता येते.
   असाच एक नगर-पुणे रेल्वेप्रवास. मी माझ्या आवडीची “युवराज” चित्रपटातील गाणी ऐकत होतो. दौंडच्या आसपास काही हिजडे गाडीत शिरले. ओंगळ लाडिकपणा करत ते प्रत्येकाकडून पैसे मागत होते. १० रुपयांच्या खाली एक पैही घेत तर नव्हतेच, पण कमी पैसे देणार्याला अथवा द्यावयास टाळाटाळ करणार्याला गलिच्च शिव्या घालत होते, नको तिथे स्पर्श करून त्रास देत होते. मला हा प्रकार काही नवा नव्हता, त्यामुळे त्यांच्याशी घासाघीस करण्यात काहीच अर्थ नाही हेही ठाऊक होते! कटकट नको म्हणून मी इतरांप्रमाणेच पैसे दिले, ती “मंडळी” निघून गेली, मीही पुन्हा गाणी ऐकू लागलो.
   अचानक हेडफोन्सच्या आवाजावर ताण करणारा एक बायकी आवाज ऐकू येऊ लागला, “परदेसी परदेसी जाना नहीं...”
   पाहतो तो एक भिकारी स्त्री कडेवर एवढूस्से पोर घेऊन गाणे गात होती. तिच्याकडे लक्ष देण्याची कोणत्याही प्रकारे सक्ती नसल्याने, किंबहुना त्या बाईचे कोणतेही म्हणावे असे उपद्रवमूल्य नसल्याने जो तो आपापल्या कामात गढलेला होता.
   मघाशी ते हिजडेही भिकच मागत होते आणि आता ही बाईदेखील भिकच मागतेय. पण “ते” भिक जणू त्यांचा अधिकारच असल्याप्रमाणे सक्तीने वसूल करत होते. त्यांना पैसे देणं प्रत्येकालाच भाग होतं. पण या बाईला कुणी पैसे द्यायचे नाकारले तरीही ती कुणाचंच काही वाकडं करू शकणार नव्हती, हे प्रत्येक जण जाणून होता. आणि म्हणूनच कुणी तिच्याकडे साधं लक्ष द्यायलाही तयार नव्हतं. माझ्या मोबाईलवर गाणी चालूच होती, पण आता मी हेडफोन काढून ठेवल्यामुळे गाडीच्या धडधडाटात त्यांचा आवाज अतिशय मंद, दुरून कुठूनतरी येत असल्यासारखा ऐकू येत होता.
   बरं ती काय नुसतीच भिक मागत होती का, तर अजिबात नाही. त्याबदल्यात ती गाणी गात होती. फार सुरात नसेलही ती, पण एखादी गोष्ट फुकटात किंवा तोंड वेंगाडून न घेण्याचा स्वाभिमान तिच्यात निश्चितच दिसत होता. या विचाराने मला अस्वस्थ करून सोडले. मी खिशात हात घालून एक ५ रुपयांचं नाणं तिला देऊ केलं, तर या बाईने मला हातानेच गाणे संपेपर्यंत थांबण्याचा इशारा केला. म्हणजे तिला खरोखरच बदल्यात काहीतरी देऊ केल्याशिवाय एक पैसाही नको होता. मी थांबलो. गाणे संपल्यावर तिने एकेकापुढे पदर पसरायला सुरुवात केली. कुणी ५ कुणी १० रुपये, कुणी आणखी जमेल तितके पैसे देत होते. मीही पैसे दिले.
खरी गम्मत तर पुढेच झाली, एका सरदारजींनी १०० ची नोट पुढे केली आणि म्हणाले, सुटे पैसे नाहीत. तिने ते पैसे घेतले, आणि पुढच्या बोगीत गेली. सुमारे १५ मिनिटानंतर ती पुन्हा आमच्या बोगीत आली आणि तिने त्या सरदारजींना ५-१० नोटा आणि नाण्यांच्या स्वरूपात ९० रुपये परत केले! बोगीतील आम्ही सारेच अवाक झालो. सरदारजीही “मला वाटलं नव्हतं तू परत येशील. सगळे पैसे ठेवले असतेस तरी चाललं असतं”, असं काहीतरी म्हणाले.
   यावर ती शांतपणे म्हणाली, “साहेब मला माहितीय माझी लायकी काय आहे. उगाच जास्त पैसे घेऊन मी काय करू..”?
   भिक मागणे या प्रकाराचं कुठल्याही प्रकारे उदात्तीकरण करायचा माझा अजिबात प्रयत्न नाही. पण त्याच दिवशी नगरच्या स्थानकावर एक खुरडत-खुरडत रांगणारा भिकारी दिसला होता. कुणालाही सहजच दया यावी अशी त्या म्हातार्याची अवस्था होती. लोक कणव येऊन त्याला पैसेही देत होते. पण पाचच मिनिटांनी तो भिकारी मला जेव्हा व्यवस्थित चालत पाण्याच्या नळावर पाणी पिताना दिसला, तेव्हा मला हसू आवरले नाही! त्यानंतर गाडीतील तो हिजड्यांचा उच्छाद! या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या बाईचे एकूणच वागणे मनाला कुठेतरी स्पर्श करून गेले. गाडी पुढे जातच होती, आणि माझ्या मोबाईलमध्ये श्रीनिवास आपल्या मखमली आवाजात गात होता,
“जिन्दगी जिन्दगी, क्या कमी रह गयी…
आंख की कोर में, क्यू नमी रह गयी…
जिन्दगी जिन्दगी…”

गाडी पुढे जातच होती, जातच होती…

© विक्रम श्रीराम एडके.
(edkevikram@gmail.com)

7 thoughts on “भिक

  1. काही अनुभव स्तब्ध करतात माणसाला , असेही जीवन आहे हे समजते , आपले सर्व पूर्वग्रह बाजूला पडतात

  2. प्रवासातील अनुभव एकदम वेगळे असतात. माझा तर व्यवसायच गाड्या भाडेतत्वावर देण्याचा आहे. माझा आमच्या ग्राहकांशी नेहमीच दरावरून वाद प्रतिवाद होत असतो. मी ठरवलेल्या दरापेक्षा एक दमडी सुद्धा कमी करत नाही. परवा मात्र एका व्यक्तीचा अनुभव वेगळा आला. नेहमी १/२ रुपये दरासाठी घासाघीस घालणारे ग्राहक पाहतो. त्यामुळे थोडी सवयच झालेली आहे कि प्रवास पूर्ण झाला कि ग्राहक हुज्जत घालणारच. पण परवा वेगळाच घडलं.
    ३ दिवसांचा प्रवास होता. इंधन भरण्यासाठी आगाऊ रक्कम घेऊन प्रवास सुरु झाला. गाडीमध्ये असलेली माणसे गप्पा गोष्टी, भेंड्या, पत्ते, चेष्टा मस्करी करीतच होती.. त्यातील सर्वांची एकच विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येकाला कसलं ना कसलं व्यसन होतंच.. गुटखा, सिगारेट, दारू, तंबाखू, आकडा / मटका लावणे. पण तंबाखू किंवा गुटखा खाऊनही कुणीही गाडीच्या खिडकीतून बाहेर पिंक टाकत नव्हता. प्रत्येकाकडे रिकामी प्लास्टिक ची बाटली होती त्यात पिंक टाकली जात होती. प्रवासात मला (चालकाला) कुठेही भूक लागली तर काहीही खाण्याच पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं होतं. पैसे अर्थातच ते देणार होते. पण मी फक्त न्याहारी, शाकाहारी जेवण आणि चहा एवढाच घेत होतो. प्रवासात त्यांचे विनोद आणि गप्पा यामुळे मला हसू येत होतं, प्रवास पूर्ण करून आल्यावर हिशोब सुरु झाला आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे एक व्यक्ती वगळता सर्वांनी पैसे कमी करण्याचा आग्रह केला. मी ऐकत नाही म्हटल्यावर त्यांच्या विनंतीचा मार्ग बदलू लागला थोडी अरेरावीची भाषा येऊ लागली. पण मी माझ्या मुद्द्यांवर ठाम होतो.
    बराच वेळ चाललेला आमचा वादविवाद ऐकून त्यांच्यातलाच एक पुढे आला आणि त्यांना पूर्ण पैसे देऊन टाका म्हणून सांगून गेला. आता त्यांचा आणि त्या व्यक्तीचा वाद सुरु झाला..
    त्याने सांगितलेला स्पष्टीकरण फार आवडलं मला.
    “आपण सर्वजण आधीच दर ठरवून गेलो होतो. प्रवास सुखाचा आणि कोणत्याही त्रासाशिवाय पार पडला. आपण प्रवासात जिथे राहिलो, तिथे दर पाहिला का ? नाही. नंतर जे बिल आलं ते न पाहता दिलं, जेवलो त्या डिश च बिल आपण आधी पाहिलं होतं का ? नाही, जे समोर बिल आलं ते दिलं, दारू प्यालो. दारूच्या किंमती तर अव्वाच्या सव्वा होत्या त्या दिल्या. मग दिवस रात्र याने गाडी चालवली सुखकर प्रवास केला त्याचे योग्य पैसे आपण द्यायचे नाहीत का ? “
    मला लगेच पैसे दिले गेले. नेहमीच माझ्या मनात असलेले प्रश्न हा माणूस बोलून गेला होता. मी सुद्धा विचार करू लागलो, मी हॉटेलात जातो, जेवतो, तिथे न बघता डिश मागवून खातो. बिल देतो. पण तेच मी रस्त्यावर भाजी घेतो तेव्हा ? भाजीच्या दरात किती हुज्जत घालतो ? खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

  3. barech divsananter kahi hrudaysparshi (satya katha)aikayla milali… ani khup chaan lihili ahe…

    sadharan pane me bhikaryanna paise det nahi ani mala tyacha virodh asto karan tumchya kathetil chhakke, platform varcha bhikari ani amchya ikadchya kahi bhikaryanche 25-35 lacs che flat ahet mhanun. tya aivaji me tya vyaktila ek vadapaav kinva buiscuit vagere vikat gheun deto. ani kadhi lambcha pravaas karnyachi vel ali tar gharun aaichi sadi…june kapde… vagere gheun nighto… ani te deto.

    majhya yach savaee mule mala bhikaryanchi ajun ek navin trick kalali. hi trick karnare bhikari tumhala ekdam sakali kaamala jaycha veles bhetatil kinva sandhyakali jenva tumhi ghari jaychya ghait astat. yancha poshak agdi sadha asto ani te bhikari vatat nahit, te jodpyane astat ani aslyas ek chota mul aste. tumhi ubhe asta ani achanak to manus yeun tumhala ekdam halu sangto ‘saahab hame gaanv jana hai… ticket ka paisa nahi hai…mere dost ne gaanv se idhar bulaya aur uska kuch pata nahi chal raha hai…mujhe gaanv jana hai mera sab paisa khatam hua hai’ ani to bayko kadhe bot karto… ti pan vyavashit vatate… to wallet madhun tyacha pancard ani mitracha mobile number vagere kadhun dakhavto… jene karun aplyala kharach vishwas basel.

    accha dusri goshta ajun kay karto tar… to thode paise aplyala dakhavto ani sangto ki ‘mere paas 100rs hai… sirf 50rs jama karna hai…’ mhanje aplyala kharch vishwas basto… same to same anubhav mala 3 vela ale…

    2 vela me laksha nahi dila ani chalat rahilo… mala agodarach fake vatle…pan 3 vela me agodar sarkhach kela… tyala paise na deta tyala bollo ki me tumchya doghancha ticket kadhun deto… ani tujhya javalche paise ahet te pravasaat vapar ani tyala ticketchya line madhe gheun gelo… to line madhe ubha rahila ani me window javal…me mobile var bolayla laglo ani ikde tikde pahayla laglo…titkyat to satakla ani paloon gela…me parat tyach jagevar gelo tar tyachi bayko pan gayab hoti…

    tar mala vatate tyanna paise denya aivaji kahi khayla or ghalayla dila pahije…hech me majhya mitranna suddha sangto…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *