अर्धवट शिजलेली थाळी – पोन्नियिन सेल्वन २

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, विशेषतः तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टी या हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षा अनेक पटींनी पुढे असल्याचे मी गेली पंधरा वर्षे तरी लिहितो व सांगतो आहे. सुरुवातीला लोक खूप हसायचे माझ्यावर. पण मी सत्याची कास सोडली नाही. याला सोशल मिडियावर आणि बाहेरसुद्घा अनेक साक्षीदार असतील व आहेत. मग उजाडलं २०१५ हे ऐतिहासिक वर्ष! या वर्षी रिलिज झाला, एस. एस. राजमौली या चित्रमार्तंडाचा चित्रपट ‘बाहूबली – द बिगिनिंग’! आणि तिकिटबारीवर दिग्विजयाचा वणवाच पेटला. त्यानंतर राजमौलीचे दोन्हीही चित्रपट जग जिंकून घेणारे ठरले. पण ‘बाहूबली’चं सगळ्यांत मोठं यश जर कोणतं असेल तर ते हे की, राजमौलीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टींची व्यावसायिक दारे सबंध जगासाठी उघडून दिली. त्यानंतर ‘केजीएफ’ (२०१८) ‘पुष्पा – द राईज’, (२०२१) ‘कार्तिकेय २’ (२०२२), ‘आरआरआर’ (२०२२), ‘कान्तारा’ (२०२२) अशा एकामागोमाग एक व्यावसायिक ब्लॉकबस्टर्सनी सबंध राष्ट्राला मोहिनीच घातली. राजमौलीने आधीच मोठ्या असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टींना स्वप्नांचा आवाका अजूनच विस्तारायला शिकवलं!

याच वाहत्या गंगेत मणिरत्नमसारख्या नाणावलेल्या दिग्दर्शकाने आपलं कित्येक दशकांचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. आणि ते स्वप्न होतं, कल्कि कृष्णमूर्तीच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या तमिळ जनमानसावर पिढ्यानपिढ्या राज्य करणाऱ्या कादंबरीचं चित्रपटात रूपांतरण! मणिरत्नम दिग्दर्शक म्हणून थोरच आहे. त्याचे ‘मौना रागम्’ (१९८६), ‘अग्नि नक्षत्रम्’ (१९८८), ‘दलपति’ (१९९१), ‘रोजा’ (१९९२), ‘बॉम्बे’ (१९९५), ‘दिल से’ (१९९८), ‘इरुवर’ (१९९७), ‘अलैपायुदे’ (२०००), ‘आयुधा येळद’ (२००४), ‘कन्नत्तिल मुत्तमिट्टाल’ (२००२), ‘गुरू’ (२००७), ‘ओ कादल कन्मणी’ (२०१५) हे आणि असे अनेक कित्येक चित्रपट पाहून मी सिनेमा शिकलोय. आणि असे माझ्यासारखे लक्षावधी चाहते सबंध भारतात असतील मणिरत्नमचे! पण वर उल्लेखिलेली यादी नीट वाचा. हे सगळे सिनेमे मानवी भावभावनांच्या भोवती फिरणारी नाट्यं आहेत. मणिरत्नम गुरू आहे नात्यांची गुंतागुंत मांडण्याचा आणि उकलण्याचा! पण ऐतिहासिक चित्रपटासाठी तेवढंच आवश्यक नसतं. शेकडों कोटींचं बजेट आणि त्यापाठोपाठ येणारी भव्यता हाताळणंसुद्धा तितकंच आवश्यक असतं. मोठ्या प्रकल्पाचं बारीक व्यवस्थापन तर आत्मा असतो अशा कोणत्याही चित्रपटाचा. इथे केवळ आर्थिक व्यवस्थापन अपेक्षित नाही, तर कथा, पात्रयोजना, चित्रपटाची दिशा, मांडणी, संगीतापासून ते संपादनापर्यंत शेकडो गोष्टी या सगळ्यांवर दिग्दर्शकाचं पूर्ण नियंत्रण अपेक्षित आहे.

मणिरत्नमने त्याच्या आयुष्यातलं पहिलं मोठं बजेट हाताळलं ते ‘रावण’च्या (२०१०) वेळी, ५५ कोटी! ‘रावण’चं बॉक्स ऑफिसवर दहन झालं. त्यापाठोपाठ त्याने लगेच मोठ्या बजेटचा प्रयत्न ‘कडल’मध्ये (२०१२) करून पाहिला, ते बजेट होतं ५० कोटी. त्या चित्रपटालाही बॉक्सऑफिसवर जलसमाधी मिळाली. परिणामी त्याच्या पुढच्या ‘ओके कन्मणी’चं बजेट थेट ६ कोटी एवढं खाली आलं. या छोट्या बजेटच्या चित्रपटाने जगभरात मिळून सुमारे ५६ कोटी कमावले. म्हणजे बजेटच्या नऊ पट परतावा. या अफाट यशानंतर मणिरत्नमने परत एकदा ३४ कोटींचा ‘काऽट्र वेलियिडयी’ (२०१७) बनवून पाहिला, पण तो बॉक्स ऑफिसवर धराशायी झाला. त्याचा पुढचा चित्रपट ‘चेक्का चिवन्ता वानम्’ (२०१८) ४२ कोटींच्या बजेटमध्ये बनला व त्याने सुमारे १५० कोटींचा व्यवसाय केला. यातून काय समजते? मणिरत्नम हा मानवी नात्यांच्या कथा सांगण्यात वस्ताद आहे. पण त्याने जेव्हा जेव्हा तीच थीम मोठ्या बजेटवर मांडायचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा तो चित्रपट आपटलाय. ‘चेक्का चिवन्ता वानम्’च्या यशात मणिरत्नमपेक्षाही मोठा वाटा हा अरविंद स्वामी, विजय सेतुपती आणि सिम्बू यांच्या एकत्रित स्टारपॉवरचा होता. इथे मणिरत्नमला लक्षात आलं असणार की, मोठं बजेट हाताळताना येणाऱ्या मर्यादांना स्टारपॉवरच्या जोरावर झाकता येऊ शकतं. हा मुद्दा आणि ‘बाहूबली’चं यश यांच्या एकत्रिकरणातून उभं राहिलं मणिरत्नमचं स्वप्न, ‘पोन्नियिन सेल्वन’ (२०२२-२३)! पण एक गोष्ट इथे लक्षात घेतली गेलीच नव्हती. कोणती?

‘पोन्नियिन सेल्वन’मधील सगळेच अभिनेते हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्स जरी असले तरी उत्तरेकडे माझ्यासारखे काही जन्माचे पंखे वगळता त्यांच्या नावावर तिकिट काढणारे खूपच थोडे लोक असतील. गंमत म्हणजे नेमकी हीच अडचण ‘बाहूबली’चीसुद्धा होती. पण राजमौलीने कथाच अशी गुंफली की ती जगभरातील सगळ्याच प्रेक्षकांना आपल्या जवळची वाटली. ‘पोन्नियिन सेल्वन’ने मात्र गृहित धरलं की त्याच्या प्रेक्षकांनी मूळ कादंबरी वाचलेलीच आहे. परिणामतः उत्तरेकडच्या प्रेक्षकांना गुंतागुंतीची कथा, अनोळखी पात्रांच्या परस्परसंबंधांतून, अनोळखी पद्धतीने मांडलेली कळलीच नाही. त्यामुळेच मणिरत्नमचा चित्रपट हा तमिळखेरीज इतर चार भाषांमध्ये रिलिज होऊनसुद्धा बॉक्स ऑफिसवर तमिळ भाषेच्या सीमा काही ओलांडू शकला नाही. इतर ठिकाणी बॉक्स ऑफिसवर एवढी वाईट अवस्था होती की आत्ता काही दिवसांपूर्वीपर्यंत ‘पोन्नियिन सेल्वन’च्या दुसऱ्या भागाला तेलुगू भाषिक राज्यांमध्ये वितरकच मिळत नव्हता. आणि मी ठामपणे सांगतो की, तमिळभाषिक पट्ट्यांमध्येसुद्धा ‘पोन्नियिन सेल्वन १’ जो चालला तो काही चित्रपट चांगला होता म्हणून नव्हे तर त्या कादंबरीशी तमिळ मनाचा अनेक पिढ्यांचा नॉस्टॅल्जिया जोडलेला होता म्हणून. पहिल्या भागाचे सविस्तर विश्लेषण मी त्यावेळी लिहिलेल्या रसग्रहणात केलेच होते, ते काही इथे नव्याने करत बसत नाही.

पण पहिल्या भागातील त्रुटी दुसऱ्या भागात जरादेखील दूर झालेल्या दिसत नाहीत. साचा आणि मांडणी याबाबतीत ‘पोन्नियिन सेल्वन’चा बाज हा राजमौलीच्या शैलीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्यात तुलना करणं ‘पोन्नियिन सेल्वन’ व मणिरत्नम दोघांवरही अन्याय करणारं ठरेल. परंतु स्वतंत्रपणे पाहू गेलं तरीही ‘पोन्नियिन सेल्वन २’मधील त्रुटी सहजच नजरेत भरतात. उदाहरणच द्यायचं झालं तर, चित्रपट सुरू होतो आदित्य करिकालन (विक्रम) आणि नंदिनीच्या (ऐश्वर्या राय) अपुऱ्या प्रेमापासून. त्यांची प्रेमकथा सांगताना मणिरत्नमने पहिल्या ५-१० मिनिटांतच रहमानच्या तीन दैवी गाण्यांची विल्हेवाट लावून टाकलीये. माझं एक प्रामाणिक मत आहे ते म्हणजे गेल्या ३० वर्षांत रहमान एवढा आभाळाहूनही मोठा होऊ लागलाय की त्याचं संगीत हाताळणं हे भल्याभल्या, मी मी म्हणणाऱ्या दिग्दर्शकांच्याही आवाक्याबाहेर जाऊ लागलंय. या माझ्या मताला दक्षिणेकडे अपवाद होता केवळ तीन दिग्दर्शकांचा – मणिरत्नम, शंकर आणि गौतम वासुदेव मेनन! आज ‘पोन्नियिन सेल्वन २’ पाहून आल्यापासून मी या यादीतून मणिरत्नमचं नाव काढून टाकतोय. तीन दैवी गाणी हो. मणिरत्नमने चिल्लर असल्यासारखी वापरली. ‘चिन्नन्जिरू निलवे’सारखं सर्वांगसुंदर गीत, पण गाण्याचे शब्द, चाल, गायकी, संयोजन एक दु:ख मांडतात तर मणिरत्नमचे व्हिज्युअल्स काहीतरी भलतीच असंबद्ध गोष्ट दाखवत असतात. रहमान तिकडे जीव खाऊन वाजवतोय आणि पडद्यावर अगदी एखादा सर्वसामान्य दिग्दर्शकही मांडणार नाही असलं निरर्थक घडतंय. हीच कथा बाकीच्याही गाण्यांची. रहमानने संगीतात जितकं ग्रँज्यर ओतलंय, चित्रपट त्याच्या तुलनेत अगदीच सपक वाटतो.

नुसता रहमानलाच वाया घालवला असता तर चाललं असतं. परंतु मणिरत्नमने एकूण एक अभिनेत्यालाही पार वाया घालवलंय. विक्रमच्या पात्राला काहीही आलेख नाही. त्याने किती जरी कायिक अभिनयाचा वस्तुपाठ उभा केलेला असला तरी तो क्षणात सूज्ञ वाटतो तर क्षणात वेडा. त्याचं आतल्या आत कुढणं, तिळतिळ जळणं त्याने संहितेच्या पुढे जाऊन जिवंत केलंय. पण संहिता आणि दिग्दर्शक दोघेही त्याला जरादेखील साथ देत नाहीत. त्यामुळेच त्याचं पुढं जे काही होतं ते किती जरी ऐतिहासिक सत्य असलं तरी प्रेक्षकांना त्याने काडीमात्रही फरक पडत नाही. मागच्या भागात विक्रमच्या तोडीस तोड अभिनय कुंदवईच्या भूमिकेत तृषा कृष्णनने केला होता. या भागात मात्र तिला दुय्यम पात्रापेक्षाही लहान भूमिकेत सीमित करण्यात आलंय. ज्याच्या नावावर हा सगळा तो डोलारा उभा केलाय तो पोन्नियिन सेल्वन अर्थात अरुळमोळीवर्मनच्या पात्राला तर काही म्हणजे काहीच काम नाही. सबंध चित्रपटात तो काहीच करत नाही. इतकं निरर्थक पात्र मांडलंय ते की, त्याला समजा चित्रपटातून वजा केलं तरी चित्रपटावर फार फार तर १०-२०% फरक पडेल. प्रेक्षकांना तर तेवढाही फरक पडणार नाही. जयम् रवीने काम चांगलंच केलंय हो, पण त्याला कथेतून न्याय मिळायला नको का?

चांगलं काम आणि कथेत न्याय या दोन्हीही मुद्यांवर त्यातल्या त्यात बाजी मारून जातो तो म्हणजे वल्लवरायन् वंदियादेवन् साकारणारा कार्ती! त्याच्या आणि तृषाच्या गाण्यातच फक्त रहमानच्या संगीताला मणिरत्नमचे व्हिज्युअल्स न्याय देतात. पण तिथेही मणिरत्नमने एकच कडवं वापरून सगळ्यावर पाणी फिरवलंय. ते जाऊ द्या. पण अखेरच्या दृश्यांमध्ये कुत्र्यासारखा मार खाऊन साखळदंडाने जखडलेला वल्लवरायन् पुढच्याच दृश्यात युद्धावर जाऊन पराक्रम गाजवतो, हे कसं बरं पटावं? ते पटलंही असतं, पण कुठे? तर राजमौलीच्या काल्पनिक चित्रपटात. लक्षात घ्या, प्रत्येक चित्रपट आपलं स्वतंत्र तर्कशास्त्र आणि आपली स्वतःची सृष्टी घेऊन येतो. त्यामुळेच राजमौलीच्या चित्रपटात पात्रांचं अतिरंजित वागणं खटकत नाही, नोलनच्या चित्रपटात काळाशी केलेला खेळ खटकत नाही. कारण ही मंडळी आपापल्या कथांचं जग आणि तर्कशास्त्र व्हिज्युअली पूर्णपणे स्थापित करूनच आत बुडी मारतात. मंदाकिनी प्रत्येक वेळी योग्य वेळेत हव्या त्या ठिकाणी कशी काय पोहोचते, याला चित्रपटाच्या तर्कशास्त्रात काहीच उत्तर नाही. ‘पोन्नियिन सेल्वन २’ आव आणतो वास्तववादाचा आणि दाखवतो अतिरंजित गोष्टी, म्हणूनच मग त्या बालिश वाटू लागतात. राजकुमार रावसारख्या चित्रपटात सलमान खानच्या चित्रपटासारख्या गोष्टी दाखवल्या तर काय होईल, विचार करा. तेच इथं होतं.

माझं काय म्हणणं आहे की, एकदा अतिरंजिततेच्या सीमेत प्रवेश केलाच तर मग तिथे तरी पूर्णपणे झोकून द्यावं ना? ते ही इथे होत नाही. सगळेच प्रसंग अत्यंत अर्धवट शिजल्यासारखे वाटत राहातात. पडद्यावर एखादी गोष्ट घडतेय तर तिला काहीतरी अर्थ आहे, तिचा कथेवर परिणाम होणार आहे, म्हणून मग त्या गोष्टीला स्क्रिनटाईममधून म्हणा वा इतर गोष्टींतून आवश्यक तेवढं वजन तरी द्यावं की नाही? पण दुर्दैवाने असं एकाही प्रसंगात घडत नाही. प्रसंग महत्त्वाचा असो की बिनमहत्त्वाचा, तो सारख्याच रसहीन लयीत पडद्यावर घडत राहातो. काहीतरी आनंदी झालं काय किंवा कुणी मेलं काय, प्रत्येक प्रसंग हा एखादा बॉक्स टिक केल्यासारखा उरकायचा म्हणून उरकला जातो. थोडक्यात, चित्रपटाला कसलाही ऱ्हिदम नाही. शेवट तर प्रमाणापलिकडे चुकलाय. मणिरत्नमने ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट म्हणून न करता वेबसीरीज म्हणून २-३ पर्वांमध्ये साकारला असता, तर तो नक्कीच आत्ताच्यापेक्षा जरा तरी बरा झाला असता. परंतु २ चित्रपटांत मिळून ६ तासांतच सगळी कथा कोंबल्यामुळे चित्रपट म्हणजे नुसत्या क्रिकेटच्या सामन्याच्या हायलाईट्स झाले आहेत. लढाया आणि विभास तर अक्षरशः लुटुपुटूचे वाटावेत इतके नवख्यासारखे हाताळले आहेत. अनेक राज्यांचं सैन्य एकत्र येऊन लढलेलं अखेरचं युद्ध तर इतक्या कमी वेळात इतक्या अपरिपक्व पद्धतीने उरकलंय की, ना त्याचा प्रभाव पडतो ना त्याला काही अर्थ राहातो. त्यात भर पडते ती अगणित पात्रांच्या गर्दीची. कोण कुणाचं काय लागतं आणि कुणाचं कुणाशी काय आहे हे शेवटपर्यंत कळत नाही, एवढी पात्रं घुसवली आहेत कथेत. त्यातही बहुतांशी दाढीधारी पात्रं इतकी सारखी दिसतात की तमिळेतर प्रेक्षकांचा खात्रीने घोळ होणार म्हणजे होणारच. हिंदी संवाद संस्कृतप्रचुर आहेत तर हिंदी गाणी ऊर्दूने पोखरून टाकलेली, हा विरोधाभास या भागातही कायम आहे व तो मागच्या भागाइतकाच कानांना टोचतो. अशा एक ना अनेक गोष्टी सांगता येतील.

मग चित्रपटात काहीच चांगलं नाही का? खूप चांगल्या गोष्टी आहेत. अभिनय शंभर नंबरी सोन्यासारखा आहे. रहमानने कित्येक शुष्क आणि निर्जीव प्रसंगांमध्ये सगळी ताकद पणाला लावून प्राण फुंकले आहेत. लोकेशन्स अतिशय चपखल आहेत. वेशभूषा, केशभूषा दोन्हीही आघाड्या देखण्या व अप्रतिम झाल्या आहेत. पण यातील एकही गोष्ट, अगदी एक सुद्धा गोष्ट अनियंत्रित हाताळणीला झाकू शकत नाही. मणिरत्नमचा संपूर्णपणे तृप्त करणारा अखेरचा चित्रपट माझ्या दृष्टीने ‘ओ कादल कन्मणी’ होता. त्यानंतरच्या त्याच्या चित्रपटांनी यश जरी पाहिलं तरी त्या यशात गिमिकचा वास येतो, समाधानाची चमक दिसत नाही. तो मास्टर डिरेक्टर मी शोधतोय, पण दुर्दैवाने तो क्लासिक मणिरत्नम त्याच्याच ड्रीम प्रोजेक्टमध्येसुद्धा एखाद-दोन प्रसंगांचा अपवाद वगळता कुठेच गवसत नाही. मी मोठ्या आशेने वाट पाहातोय त्याची. कदाचित पुढच्या एखाद्या चित्रपटात सापडेल.

*२.५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *