रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन!
वाल्मिकी रामायणात रावणाचा उल्लेख अगदी बालकांडापासूनच असला तरीही रावणाचं पहिलं वर्णन येतं ते थेट अरण्यकांडात स्वतः रावणाच्याच तोंडून. सर्ग ३१ मध्ये अकम्पन नावाचा राक्षस लंकेला जातो आणि रामाने जनस्थानातून राक्षसांचे उच्चाटन केल्याची बित्तंबातमी तो रावणाला सांगतो. तेव्हा क्रोधाने फुत्कारणारा रावण श्लोक क्र. ५ ते ७ येथे त्याला म्हणतो, “माझा अपराध करून इंद्र, यम, कुबेर आणि विष्णूही सुखाने नाही जगू शकणार. मी काळाचाही काळ आहे. मी आगीलाही जाळून टाकू शकतो. आणि मृत्यूलाही मृत्यूमुखी पाडू शकतो मी. मी जर चिडलो तर वाऱ्यालाही रोखू शकतो आणि सूर्यालाही भस्म करू शकतो”. रावण हे जे काही बोलतो यात आलंकारिकता आहे, परंतु अतिशयोक्ती अजिबातच नाही. त्याने खरोखर तिन्ही लोक पादाक्रांत केलेले आहेत, देवादिकांनाही हरवलेलं आहे आणि एक साक्षात शंभूमहादेव व कार्तवीर्य सहस्रार्जुन सोडले तर कुणीच रावणाचं काहीच वाकडं करू शकलेलं नाहीये.
त्यानंतर पुढच्याच सर्गात रावण आपल्याला दिसतो ते शूर्पणखेच्या नजरेतून. लक्ष्मणाकडून प्रताडित झालेली शूर्पणखा लंकेला जाते, तेव्हा तिला रावण कसा दिसतो? अरण्यकांड, सर्ग क्र. ३२, श्लोक क्र. ४ ते २३ इथे वाल्मिकी लिहितात –
“विमानाच्या अग्रभागी बसलेला, तेजाने झळझळणारा रावण तिने पाहिला. इंद्राच्या सभोवती जसे मरुद्गण असतात तसेच त्याच्या आसपास त्याचे सचिव होते. त्याचं स्वर्णसिंहासन सूर्यासम चमकत होतं. आणि ज्याप्रमाणे सोन्याच्या वीटांनी बनलेल्या यज्ञवेदीमध्ये स्थापित अग्नि तुपाच्या आहूतीने अधिकच प्रज्वलित होतो, तसा तो रावण दिसत होता. समरभूमीवर तोंड वासलेल्या यमराजासारखा तो रावण देवता, गंधर्व, भूत, ऋषी यांनाही अजेय होता. देवासुर संग्रामाच्या वेळी त्याच्या शरीरावर वज्र आणि अशनीने ज्या जखमा झाल्या होत्या, त्याच्या छातीवर ऐरावताने जे सुळे खुपसले होते त्या सगळ्यांचे व्रण तो मिरवत होता. त्याला वीस भुजा, दहा तोंडे होती. त्याची छत्रचामरादी आभूषणे प्रेक्षणीय होती. त्याचे वक्षस्थळ विशाल होते. आणि तो सगळ्याच राजलक्षणांनी संपन्न होता. त्याचे शरीर त्याने धारण केलेल्या वैदूर्यासारखेच होते. त्याने तप्तसुवर्णाची आभूषणे परिधान केली होती. त्याचे बाहू सुंदर, दात शुभ्र, चेहरा मोठा व शरीर पहाडासारखे होते. देवांशी युद्ध करताना विष्णुने त्याच्यावर शेकडो वेळा चक्राचा प्रहार केला होता. इतर युद्धांतही अनेक शस्त्रांचे वार त्याच्या शरीराने झेलले होते. आणि अशा देवांच्या शस्त्रांनाही लीलया पचवलेल्या शरीराने तो शांत समुद्रालाही अशांत करून टाकायचा. तो अतिशय चपळ होता. तो पर्वतशिखरे उपटून फेकून द्यायचा. देवांना चिरडून टाकायचा. तो धर्माचा समूळ नाश करायचा आणि परस्त्रियांचं सत्व नासवायचा. तो सर्व प्रकारच्या दिव्यास्त्रांमध्ये पारंगत आणि यज्ञांमध्ये विघ्न उत्पन्न करणारा होता. एकदा तर त्याने भोगवतीला जाऊन नागराज वासुकीला हरवून तक्षकाच्या प्रिय पत्नीचे अपहरण केले होते. कैलासावर जाऊन त्याने कुबेराचे विमान हुसकावले होते. त्याने रागात येऊन कुबेराचे चैत्ररथ वन, नलिनी नावाची पुष्करणी आणि इंद्राचे नंदनवन व इतर उद्यानांची नासधूस केली होती. पर्वतासारखा तो चंद्र आणि सूर्याला आपल्या हातांनी रोखू शकायचा. पूर्वी त्याने घोर वनात दहा सहस्र वर्षे तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला आपल्या मस्तकांचा बळी अर्पिला होता. आणि त्यामुळेच त्याला देवता, दानव, गंधर्व, पिशाच्च, पक्षी व सापांपासून अभय प्राप्त झालं होतं. एक मनुष्यप्राणी वगळता त्याला कुणाकडूनही मृत्यू येऊच शकत नव्हता. ब्राह्मणांद्वारा केलेल्या मंत्रोच्चारांनी यज्ञांतून निघणारा सोम तो महाबली नासवून टाकायचा. यज्ञातून मिळणारे फळ नासवणारा तो ब्रह्महत्यादि क्रूरकर्मे करायचा. तो कर्कश, निर्दय आणि सदैव प्रजेचं अहित करण्यातच गुंतलेला असायचा. समस्त प्राणिमात्रांना भयकारी असा तो क्रूर व महाबलशाली भाऊ शूर्पणखेने पाहिला. तो दिव्य वस्त्राभरणांनी विभूषित आणि दिव्य माळांनी सुशोभित होता. तो राक्षसांचा राजा, महाभाग पौलस्त्यकुलनंदन त्या आसनावर प्रलयकाळी सगळ्यांचा संहार करणाऱ्या काळासारखाच भासत होता”.
हे मूळ रामायणातील रावणाचे फर्स्ट इम्प्रेशन आहे! यात त्याची बुद्धी, बल, पराक्रम, क्रौर्य सारे सारे काही एकाचवेळी अत्यंत समर्थपणे मांडले आहे. मी वाल्मिकी रामायणावर तीन दिवस व्याख्याने देतो (संपर्क) तेव्हा पहिला सबंध दिवस जवळजवळ दोन तास रावणावर बोलत असतो, एवढा महाप्रचंड पसारा आहे रावणाच्या बल, बुद्धी आणि पराक्रमाचा. तो शास्त्रांचा ज्ञाता आहे, अस्त्रांचा धर्ता आहे. तो वेदशास्त्रसंपन्न आहे, तो चक्रवर्ती साम्राज्याचा कर्ता आहे. एका सम्राटाकडे असायलाच हवे ते सारे गुण त्याच्यात एकवटले आहेत आणि इतके असूनही तो केवळ त्याच्या दुर्गुणांमुळे कसा रसातळाला गेला ते स्खलन वाल्मिकींनी अतिशय प्रांजळपणाने मांडले आहे.
असा गुणावगुणांचा खजिना असलेला रावण कलाकृतींतून साकारणे म्हणजे सोपे काम नव्हे. आधुनिक काळात विचार केला तर फक्त आणि फक्त रामानंद सागरांच्या ‘रामायणा’त (१९८७-८८) अरविंद त्रिवेदींनी साकारलेला रावणच या सगळ्या कसोटींवर खरा उतरतो. बाकी बॉलिवूडने कालपरवा रिलिज झालेल्या टिझरमध्ये रावणाच्या डोळ्यांत काजळ, केसांचा मॉडर्न कट वगैरे दाखवून, त्याला व्हायकिंग्ससारखे कपडे घालून जॉन स्नोप्रमाणे ड्रॅगनवर (की वटवाघळावर?) बसलेले दाखवून विविधांगी पटलांनी समृद्ध अशा या बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचा पार विनोदी विदूषक करून सोडलाय. ज्यांची जेवढी झेप तेवढीच त्यांची मांडणी! आणि ज्यांचा जेवढा आवाका तेवढीच त्यांना रामकथा कळते. बाकी श्रीरामचन्द्रार्पणमस्तु!!
— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]
