दक्षिणपंथी – यातिसई

तमिळकम् ची तीन घराणी. पांड्य, चोळ आणि चेर. यांच्यापैकी पांड्य घराण्यातील सुप्रसिद्ध राजा म्हणजे कोचडय्यान रणधीरन्! सुप्रसिद्ध असं मी म्हणतो, प्रत्यक्षात या लोकांना आपल्याकडच्या विचारवंत म्हणवणाऱ्यांनी एकेका परिच्छेदात गुंडाळून आपल्या आवडीच्या आक्रमकांचा उदोउदो केल्याचं आपल्याला ठाऊकच आहे. तर हा कोचडय्यान रणधीरन्. रणधीरन् त्याचं नाव. को म्हणजे राजा. चडय्यान म्हणजे आयाळ. आयाळ असलेला राजा तो कोचडय्यान! या रणधीरनने चेर, चोळ वगैरे अनेकांचा पराभव केला व स्वतः सार्वभौम झाला. त्यामुळे अर्थातच त्याच्याबद्दल इतर अनेकांना प्रचंड राग होता. त्या अनेकांपैकी एक म्हणजे काल्पनिक ऐनार जमातीतला तरुण योद्धा कोदी! कोदीची महत्त्वाकांक्षा आणि त्यातून उद्भवणारं नाट्य मांडणारी कथा म्हणजे धरणी रासेन्द्रनचा चित्रपट ‘यातिसई’!

ऐतिहासिक चित्रपट म्हटला म्हणजे त्यासाठी भरमसाठ बजेटच असलं पाहिजे, हा आपल्याकडे मजबूत रुजलेला गैरसमज आहे. मणिरत्नमने ‘पोन्नियिन सेल्वन’ (२०२२-२३) बनवला तेव्हा त्याचंही बजेट सुमारे पाचशे कोटी असल्याचं सांगितलं जातं. धरणी मात्र हा गैरसमज उचलतो, चुरगाळतो, चुरमडतो आणि पार बोळा करून कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतो. जी सिनेमॅटिक अचिव्हमेंट भल्याभल्यांना शेकडो कोटी ओतूनही साधता आलेली नाही ती धरणीने ‘यातिसई’मध्ये अक्षरशः सात ते दहा कोटींमध्ये साधून दाखवलीये. इतक्या कमी बजेटमध्ये, नवखे कलाकार घेऊन धरणी पडद्यावर जे काही चितारतो, ती एक एक फ्रेम वास्तववादाचं लेणं लेऊन अंगावर येत राहाते. राजाच्या पुढे जाण्यासाठी जसा रहमानला नवाच साऊंड आणणं भाग होतं, तसंच राजमौलीच्या पुढे जाण्यासाठी ऐतिहासिक चित्रपटांची नवीच मांडणी करू शकणारा कुणीतरी पुढं येणं खूपच आवश्यक आहे. का? कारण तसं झालं तरच माध्यम पुढं जात असतं. ‘यातिसई’ ते करून दाखवतो. पण, राजमौली एका चित्रपटाने राजमौली नाही, त्याच्या पाठीशी वीस वर्षांची सातत्यपूर्ण तपश्चर्या आहे. रहमानसुद्धा सातत्यातूनच पुढे जाऊ शकलाय. ते सातत्य धरणी राखू शकला तरच तुलनेला अर्थ आहे, अन्यथा एक चित्रपट हा केवळ आणि केवळ योगायोगाच्या कक्षेत जातो.

चित्रपट जरी कोदीची कथा असली तरीही त्याचा मूळ मुद्दा आहे तो म्हणजे सत्ताकांक्षा! या सत्ताकांक्षेपायी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, कोणत्याही पातळीची कारणं देऊ शकतो आणि कोणत्याही पशूला लाजवेल असं वागू शकतो हे दाखवण्यात चित्रपट काहीही हातचं राखून ठेवत नाही. मी बऱ्याच वर्षांत युद्धाची दृश्यं इतकी वास्तववादी आणि भीतीदायक पाहिली नव्हती. आपल्याकडच्या युद्धपटांमध्ये हिंसेचं स्टायलायझेशन करून दाखवलं जातं. ‘यातिसई’ मात्र कसलाही आडपडदा न ठेवता, अगदीच कमीत कमी बजेटमधूनही युद्धाची काळी बाजू इतक्या प्रखरपणे मांडतो की दुर्बळ मनाचे प्रेक्षक सहनच करू शकणार नाहीत. अखिलेश कदामुत्तुचा कॅमेरा या कथेचा एकूण एक पदर टिपत जातो. पात्रांच्या दिसण्यावर आणि वावरण्यावर अतिशय सूक्ष्म मेहनत केली गेल्याचे पदोपदी जाणवत राहाते. माझी आपल्याकडच्या ऐतिहासिक चित्रपटांबद्दल जी एक कायमच तक्रार असते की, त्यातील पात्रांचे कपडे नवेकोरे आणि म्हणूनच कृत्रिम वाटत राहातात. त्या तक्रारीला दिग्दर्शकाने इथे जागाच ठेवलेली नाही, एवढी वेशभूषा उत्कृष्ट जमून आलीये.

१२१ मिनिटांचा हा चित्रपट बहुतांशी प्राचीन संगम तमिळ भाषेत आहे. हा आणखी एक प्रयोग. धरणीने जे विश्व उभं केलंय त्यात ती भाषा अजूनच रांगडा गोडवा आणते. महेंद्रन् गणेशन् चं संपादन चटपटीत असलं तरीही चित्रपट मध्यांतरानंतर काहीसा ओढल्यासारखा वाटतो. पण नंतर लगेचच तो आपली वाट पुन्हा शोधतोच. तो ओढल्यासारखा वाटण्यामागेही मोठं कारण हेच आहे की, चित्रपटात काडीमात्रही सस्पेन्स नाही. सारं काही सरळसोट. कदाचित, दिग्दर्शकाला तेच अपेक्षित असेल. पण त्याने चित्रपटाच्या व्यावसायिक मूल्यांवर काहीसा दुष्परिणाम व्हायचा तो होतोच. शिवाय त्यातून चित्रपट हा किंचित कलात्मकतेकडे झुकतो व त्याचे व्यावसायिक मूल्य थोडे उणावते. बजेटच्या कमतरतेमुळे विभास पारच गरीब वाटतात. विशेषतः युद्धप्रसंग अत्युत्कृष्ट दर्जाचे झालेले असताना खोट्या जखमा आणि रक्ताच्या विभासी चिळकांड्या खूपच खुपतात. नवख्या कलाकारांचा नवखा उत्साह कधीकधी नियंत्रणात आणायला हवा होता, असं वाटतं. दिग्दर्शकावर स्नायडरच्या ‘३००’चा (२००६) व हिस्ट्री चॅनलच्या ‘व्हायकिंग्स’चा (२०१३-२०) प्रचंड प्रभाव असल्याचे उघडपणे दिसते. चोळ किल्ल्यातील पुजाऱ्याचे पात्रही उगाच चवीपुरता काहीतरी प्रपोगण्डा असावा म्हणून घुसडल्यासारखे वाटत राहाते. पण तरीही ‘पोन्नियिन सेल्वन’ ज्या कारणांमुळे आवडता आवडता राहून जातो, नेमक्या त्याच कारणांमुळे ‘यातिसई’ आवडून जातो.

साकल्याने पाहाता चित्रपट एक दुर्मिळ गोष्ट साधतो, ती म्हणजे विधान! चित्रपट त्याच्या विषयाबद्दल ठाम विधान करतो. त्याच्या नायकांची काळी बाजू दाखवायला तो चुकत नाही. आणि इतिहासातील स्तुत्य म्हणवल्या गेलेल्या पात्रांनाही मार खाताना दाखवायला तो कचरत नाही. चित्रपट वास्तवाच्या जितके जवळ जातात तितके ते एक तर चुकत जातात किंवा मोठे भासत जातात. ‘यातिसई’चा शब्दशः अर्थ होतो ‘दक्षिण दिशा’. दक्षिणेकडे जाणारा हा चित्रपट खचितच दुसऱ्या प्रकारातला आहे!

*४/५

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *