Category: स्फुट लेख

  • रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव

    रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव

    आज विजयादशमी. आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामांनी राक्षसराज रावणाचा संहार केला. पण हा संहार नेमका केला कसा? काय अस्त्र वापरलं? रावणाच्या मृत्यूच्या क्षणी नेमकं काय घडलं? समकालीन वाल्मिकींनी रामायणात या बद्दल सविस्तर लेखन केलं आहे.

    वाल्मिकी लिहितात, राम आणि रावणामध्ये द्वैरथ युद्ध झाले (युद्धकांड, स. १०७, श्लो. १). दोन्ही बाजूचे सैन्य लढायचे सोडून त्यांचेच युद्ध पाहात बसले (तत्रोक्त २). राम आणि रावण दोघांनाही स्वतःच्या विजयावर पूर्ण विश्वास होता (७). रावणाने त्वेषाने रामाच्या रथावरील ध्वज तोडण्यासाठी बाण चालवले, पण तो असफल झाला (९). रामानेही उट्टे काढण्यासाठी महासर्पासारखा असह्य व ज्वलंत बाण रावणाच्या ध्वजावर सोडला. हा बाण नेमका रावणाचा ध्वज फोडून जमिनीत जाऊन रुतला (१२). या प्रकाराने चवताळलेला रावण रोषपूर्वक बाणांचा वर्षावच करू लागला. त्याने रामाच्या घोड्यांचा वेध घेतला. पण त्यांच्यावर विशेष काहीच परिणाम झाला नाही (१६). यानंतर तर रावणाने अजूनच चिडून जाऊन बाणांसोबतच गदा, चक्र, परिघ, मुसळ, पर्वतशिखर, वृक्ष, शूल, परशू यांचा वर्षाव करायला प्रारंभ केला (१७-१८). वाल्मिकी लिहितात, रावणाने अजिबातच न थकता (अश्रान्तह्रदयोद्यम:) सहस्रावधी बाण चालवले. याला उत्तर म्हणून रामानेही शतसहस्रावधी बाण सोडले (२२). दोन्हीकडून चाललेल्या या वर्षावाने सबंध आकाश भरून गेले होते, इतके की श्वास घ्यायलादेखील जागा शिल्लक राहिली नाही (२६). दोन्हीकडचे बाण एकमेकांवर आपटून जमिनीवर पडू लागले (२५). दोघांनीही एकमेकांचे घोडे जखमी करून टाकले (२७).

    हा रोमहर्षक संग्राम सुरू असताना एक मुहूर्त (मुहूर्तमभवद्) म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटं उलटली (२८).  दोघांचे सारथीदेखील निष्णात होते. ते कधी रथाला गोल फिरवित, तर कधी सरळ नेत, कधी पुढे जातोय असं दाखवून एकदम मागे आणत तर कधी माघार घेतोय असं दाखवून पुढे नेत (३१-३२). राम आणि रावण दोघेही एकमेकांवर वार करण्यात काही एक कसर सोडत नव्हते. दोघांचेही रथ आता जणू काही भरलेल्या मेघासम (जलदाविव) दिसू लागले होते (३३-३४). आता दोन्हीही रथांचे जू एकमेकांना भिडले होते, पताका एकमेकींना स्पर्शू लागल्या होत्या (३५-३६). रामाने चार बाण मारून रावणाच्या घोड्यांना मागे ढकलले (३६-३७). त्यामुळे तळतळलेल्या रावणाने अनेक बाण चालवून रामाला जखमी करून टाकले (३७-३८). रामाने चेहऱ्यावर कोणतीच पीडा दाखवली नाही. रावणाने ताबडतोब रामाचा सारथी मातलीला लक्ष्य केले, अर्थात मातलीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही (३९-४०). आता मात्र रामाच्या क्रोधाला पारावार राहिला नाही (४१-४२). राघवाने बाणांचे जाळेच (शरजालेन), अर्थात बाणांचा समूहच सोडून रावणाला माघार घ्यायला (विमुखं रिपुम्) लावली (४१-४२). रघुनाथाने रावणावर वीस, तीस, साठ, शेकडो, हजारो बाण सोडले. त्यावर रावणाने बाणांचा वर्षाव केला (४२-४४). पुन्हा एकवार भयंकर युद्ध सुरू झाले. त्या तुंबळ युद्धाला पाहून अप्सरा आणि गंधर्वदेखील म्हणू लागले, ‘रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव’! (५२).

    त्यानंतर रघुकुळाची कीर्ती वाढवणाऱ्या रामाने धनुष्यावर एक विषारी बाण चढवला आणि रावणाचे मुंडकेच उडवून टाकले (५३-५४). पण काय आश्चर्य, त्या जागी ताबडतोब दुसरे मस्तक दिसू लागले. रामाने ते सुद्धा अविलंब धडावेगळे केले. हा प्रकार शंभरदा घडला. जणू काही या गोष्टीला काही अंतच नव्हता (५६-५८). हे असे महाभयंकर रणकंदन रात्र न् दिवस चालले (६५-६६). आता मात्र राम काळजीत पडला (५९).

    रामाला काळजीत पडलेला पाहून मातली म्हणाला, ‘हे वीरवर तुम्ही काय त्याच्या हल्ल्यावर केवळ प्रतिहल्ला करत आहात? त्याच्यावर ब्रह्मास्त्र चालवा. रावणाच्या विनाशाची घडी समीप आलीये’ (युद्धकांड, स. १०८. श्लो. १-२). मातलीच्या या सांगण्यावरून रामाने फुत्कारणाऱ्या सापासारखा एक तेजस्वी शर हाती घेतला. हे तेच अमोघ ब्रह्मास्त्र होते जे ऋषींनी (गीताप्रेसच्या प्रतीनुसार अगस्त्य ऋषींनी) रामाला दिले होते. हे अस्त्र पूर्वी ब्रह्माने त्रिलोकजयकांक्षी इंद्राला अर्पण केले होते (तत्रोक्त ३-५).

    तो बाण कसा होता? वाल्मिकी लिहितात, त्या बाणात वायूचा वेग, त्याच्या फाळात आग आणि सूर्य, त्याच्या रचनेत आकाश आणि त्याच्या जडपणात मेरू-मंदराचलांची प्रतिष्ठापना केली होती. तो सर्व भूतमात्रांच्या तेजाने बनलेला, सूर्यासारखा जाज्वल्य होता. तो स्वर्णभूषित, सुंदर पंखांचा, प्रलयाग्निच्या धूरासारखा भयंकर, दीप्तिमान, सापासारखा विषारी, माणसं, हत्ती व घोडे यांना भेदणारा व चपळ होता. दरवाजे, परिघच काय तर पर्वतांनाही भेदण्यास तो सक्षम होता. त्याचं सबंध शरीर रक्त, मेदात न्हायल्यासारखं सुदारुण होतं. तो वज्रासमान दिसणारा, मोठ्ठा आवाज करणारा व शत्रूंची झुंडच्या झुंड नष्ट करणारा होता. तो सगळ्यांना छळणाऱ्या, फुत्कारणाऱ्या सापासारखा भयंकर होता. कावळे, गिधाडं, बगळे व जंबुक इत्यादींना नित्य भक्ष्य प्रदान करणारा, साक्षात यमराजाचेच रूप होता! (६-११)

    असा तो सायक महाबली रामाने वेदोक्त विधीपूर्वक धनुष्यावर चढवला. त्यासरशी सर्व प्राणी संत्रस्त झाले व धरती दोलायमान होऊ लागली. अत्यंत चिडलेल्या रामाने मोठ्या ताकदीने प्रत्यंचा खेचली व तो बाण रावणावर सोडला. वज्रधारी इंद्राच्या हातून सुटलेल्या दुर्धर्ष वज्रासारखा तो बाण रावणाच्या छातीवर जाऊन आदळला! त्याचा वेग एवढा प्रचंड होता की तो रावणाची छाती फोडून, ह्रदय भेदून, रुधिराक्त असा जमिनीत जाऊन रुतला!! रावणाच्या निष्प्राण हातांतून धनुष्य व बाण गळून पडले. त्या महावेगशाली, महातेजस्वी राक्षसराजाचे शरीर वज्राचा फटका खाल्लेल्या वृत्रासुरासारखे रथातून जमिनीवर आपटले. तो बाण मात्र काम संपवून सहजपणे रामाच्या भात्यात पुन्हा जाऊन बसला. इकडे आपला स्वामी मेल्याचे पाहाताच समस्त राक्षस भितीपोटी पळू लागले तर चेव चढलेले वानर त्या राक्षससैन्यावर तुटून पडले! रावणाचा मृत्यू घोषित होताच सर्वत्र दुंदुभी निनादू लागल्या आणि समग्र वातावरण रामाच्या जयजयकाराने भरून गेले!! (१४-२७)

    रावणवध हा केवळ स्त्रीचे अपहरण करणाऱ्या एका राक्षसाचाच वध नव्हता, तर तो होता एका सार्वभौम सत्तेच्या अहंकाराचा एका राज्यविहिन वनवासीने वनवासींच्याच साह्याने केलेला पराभव! ही सामर्थ्य, बुद्धी व धोरणीपणाच्या जोरावर सत्याने असत्यावर विजय मिळवल्याची गाथा आहे. रामायण, ही भारताच्या इतिहासाची चिरंतन महागाथा आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    (रामायणाचे अभ्यासक आणि व्याख्याते. अधिक माहितीसाठी, तसेच रामायणावरील व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क करा, www.vikramedke.com)

    टीप: येथे लेखनाच्या सोयीसाठी तसेच वाल्मिकी रामायणातील उल्लेखांच्या संदर्भानुसार रामाचा एकेरी उल्लेख केला आहे. या मागे श्रीराम या देवतेच्या अवमानाचा चुकूनदेखील उद्देश नाही. लेखकही अन्य कोट्यवधी भारतीयांसारखाच रामभक्त आहे. शिवाय आवडत्या देवतेचा एकेरी उल्लेख करण्याची आपली पिढ्यानपिढ्यांची पद्धत आहे.

  • सोशल मिडिया हाताळताना

    मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. मला माहितीये, फारच वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे हे, पण खरं आहे. आणि या समाजप्रियतेतूनच संपर्काची वेगवेगळी साधने विकसित झाली. कालौघात या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. हा वेग इतका प्रचंड आहे की पत्रे, फोन आणि मोबाईल एकत्र पाहिलेली पिढी अजूनही अस्तित्वात आहे. परंतु गेल्या दशकभरात या संपर्काच्या क्षेत्राने त्याच्या मूळच्याच अतिप्रचंड वेगालाही चक्कर यावी असे वळण घेतले आणि उभा ठाकला सोशल-मिडिया! सोशल मिडिया म्हणजे काय? फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम, युट्यूब, स्नॅपचॅट वगैरे वगैरे? ही तर सोशल मिडियाची उदाहरणं झाली! या उदाहरणांना सोशल मिडिया का म्हणायचं, याच्या ४ मुख्य कसोट्या आहेत.

    १) वेब २.० : पारंपारिक वेबचे स्वरूप असे असते की त्यावरील मजकूर केवळ वाचता येतो. परंतु वेब २.० हे परस्परसंवादी व्यासपीठ आहे. एखाद्या वेबसाईट अथवा अॅपला सोशल मिडिया म्हणण्याची पहिली कसोटी ही, की ती वेबसाईट अथवा अॅप वेब २.० वर आधारित असावी.

    २) मजकूर : वर सांगितल्याप्रमाणे पारंपारिक वेबवरील मजकुर हा त्या वेबासाईटकडूनच फक्त पुरवला जायचा. इतरांनी फक्त वाचायचं. त्यापलिकडे वाचकांचा सहभाग अतिशय मर्यादित होता. एकप्रकारे ही सगळी एकमार्गी वाहतूक होती. परंतु सोशल मिडिया मात्र ‘वेब २.०’वर चालतो. तेव्हा दुसरी कसोटी ही की सोशल मिडियावर त्या वेबसाईटच्या अथवा अॅपच्या चालक-मालकांपेक्षाही त्याचे वापरकर्ते आणि वाचक त्या वेबसाईट अथवा अॅपवरीलवरील मजकूर लेखनाच्या, फोटोंच्या किंवा व्हिडिओजच्या स्वरूपात निर्माण करू शकले पाहिजेत.

    ३) प्रोफाईल्स : प्रोफाईल्स म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर खाती. जसे आपले बँकेत खाजगी खाते असते, तसेच सोशल मिडियावर खाते तयार करता येते. ही झाली तिसरी कसोटी.

    ४) नेटवर्किंग : अनेक खाती नुसती आहेत, पण त्यांचा परस्परांशी काही संपर्कच नसेल, तर ते माध्यम मृतच म्हणावे लागेल! आणि म्हणूनच सोशल मिडियाची चौथी कसोटी आहे ती म्हणजे त्यावरील खात्यांची परस्परांशी जोडणी.

    या ४ कसोट्या पूर्ण करणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन व्यासपीठाला सोशल मिडिया असे म्हणतात.

    संपर्काचे एक प्रभावी माध्यम म्हणून सुरू झालेला हा सोशल-मिडिया कधी आपल्यासमोरील संगणकातून निघून लॅपटॉपच्या रूपाने मांडीवर विसावला आणि कधी तिथून उडी मारून मोबाईलच्या रूपाने आपल्या खिश्यात जाऊन बसला, समजलंही नाही. हल्ली तर प्रत्येक बाबतीत लोक सोशल मिडियावर अवलंबून राहू लागलेयत. पूर्वी लग्न जुळवताना पत्रिका पाहिली जायची आता पत्रिकेच्याही आधी एकमेकांची फेसबुक अकाऊंट्स तपासली जातात. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, तिच्या आवडी-निवडी काय, राजकीय मते काय वगैरे एकूण एक माहिती आजकाल योग्यप्रकारे शोधली तर कुणालाही काही क्लिक्सवर सहज उपलब्ध आहे. जगाच्या एका कोपऱ्यातला माणूस दुसऱ्या कोपऱ्यातील माणसाशी फोन, पत्रे यांच्यापेक्षाही वेगाने आणि स्वस्तात बोलू लागला, जोडला गेला. एवढेच नव्हे, तर या दशकात जगभरातील कित्येक मोठमोठे राजकीय, सामाजिक उठाव हे या सोशल मिडियाच्याच जोरावर झाले. ‘व्हायरल’ हा एकेकाळी काळजीचा वाटणारा शब्द आता परवलीचा बनलाय.

    हे जितके छान आहे, तितकेच धोक्याचेसुद्धा आहे. लोक जास्त जास्त मनोमोकळे झालेयत आणि तितकेच भेद्य अर्थात व्हल्नरेबलसुद्धा. जाणता-अजाणता आपण कुठे जातो, काय करतो, काय आवडते, काय नाही आवडत, एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल आपले बरे-वाईट मत काय वगैरे अनंत गोष्टींची माहिती सोशल मिडियावर शेअर करत असतो. सध्याचे युग हे माहितीचे युग आहे. माहिती हे आजच्या जगात शस्त्र आहे आणि या शस्त्राचा वापर चतुर लोक कसा करू शकतात याचे केंब्रिज अॅनालिटिकासारखे उदाहरण फार जुने नाही. या तथाकथित पॉलिटिकल कन्सल्टिंग कंपनीने फेसबुकवरील एका अॅपद्वारे बेकायदेशीररित्या लोकांची माहिती मिळवली आणि तिचा वापर करून निवडणुकांवर प्रभाव टाकायचा प्रयत्न केला. फेसबुकवर आपण “तुम्ही मागच्या जन्मी कोण होता” वगैरे टाईमपास चाचण्या देत असतो ना? नीट पाहा, या चाचण्यांचे अॅप्स आपली पब्लिक प्रोफाईल आणि इतरही अनेक प्रकारची माहिती मागवत असतात. ‘त्याने काय फरक पडतोय’ अथवा ‘माझ्याकडे काय आहे चोरण्यासारखं’ म्हणून आपण सहज त्यांना परवानग्या देऊन टाकतो. परंतु केंब्रिज अॅनालिटिकाच्या प्रकरणात माहिती एकाची, गोळा केली दुसऱ्याने आणि वापरली तिसऱ्यानेच. तेव्हा, ‘माझी माहिती चोरून कुणाला काय मिळणार आहे’ म्हणण्याआधी लक्षात घ्या की, तुमच्या माहितीचा वापर हा तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल इतक्या वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो.

    काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी माझे थोरले बाजीरावांवर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर एक माझ्याच वयाच्या आसपासचा तरुण मुलगा भेटायला आला. मला म्हणाला, ‘मी सुद्धा बाजीरावांचा अभ्यासक आहे’. मी म्हणालो, ‘वाह, कोणकोणते संदर्भ अभ्यासता तुम्ही’? माझा विचारण्याचा हेतू असा की, एखादा नवीन संदर्भग्रंथ किंवा अभ्यासाचा मुद्दा समजावा. तर तो उत्तरला की, ‘खूप कसून अभ्यास करतोय मी बाजीरावांचा. व्हॉट्सॅपवर त्यांच्याबद्दल आलेले सगळे मेसेजेस वाचलेयत मी’! मला गंमत वाटली. मी स्वतःही काही परिपूर्ण नाही, परंतु तो तरुण मित्र मात्र व्हॉट्सॅपलाच संदर्भ समजून बसला होता. वर म्हणालो त्याप्रमाणे, सध्याचे युग माहितीचे युग आहे. आपली नेमकी गडबड होते ती इथेच. आपण माहिती आणि ज्ञान यांच्यात फरक आहे, हेच मुळात समजून घेत नाही. साधी गोष्ट सांगतो. ज्ञानाला आह्वान नसते, माहितीची मात्र दुसरी बाजूसुद्धा असू शकते. उदाहरणच द्यायचं झालं तर, दुधी भोपळ्याचा रस एखाद्यासाठी चांगला आहे की नाही, हे कोण व्यवस्थित सांगू शकतं? फक्त तज्ञ डॉक्टर! कारण, त्यांच्याकडे त्याबाबतीत ज्ञान आहे. याउलट सोशल मिडियावर तुम्हाला दुधी भोपळ्याचा रस जणू अमृतच असतो इथपासून ते दुधी भोपळ्याचा रस म्हणजे विषच इथपर्यंत सगळ्या स्वरूपाची माहिती दिसेल! तिची कोणती तरी एकच बाजू बरोबर असणार, परंतु ज्ञान मात्र संपूर्ण बरोबर असतं! व्हॉट्सॅप, ट्विटर, फेसबुक, युट्यूब किंवा इतर कोणत्याही सोशल मिडियावर आलेल्या कोणत्याही पोस्टला, फोटोला, व्हिडिओला; ते विशेषतः इतिहास, धर्म, राजकारण, विज्ञान इ. विषयांवर असतील तर, जर आपण उपरोक्त वाक्याची कसोटी लावली आणि त्यांना पारखून घेऊ लागलो, तर विचार करा, केवढ्या साऱ्या अफवा थांबतील!

    या विषयाला आणखी एक पैलू आहे. हायपोकॉण्ड्रिया नावाचा एक विकार असतो. यात व्यक्तीला सतत वाटत राहाते की आपल्याला काहीतरी भयंकर आजार झालाय. जरासं काही झालं की या व्यक्ती त्या लक्षणांवरून आपल्याला त्याच्याशी संबंधित एखादा मोठा आजार झाल्याचा समज करून घेतात. याच विकाराचं एक भावंड आहे, त्याला म्हणतात सायबरकॉण्ड्रिया! नावाप्रमाणेच या विकारात लोक एखाद्या आजाराबद्दल ऑनलाईन वाचून किंवा बघून आपल्यालाही तोच आजार झाल्याचा समज करून घेतात. टाईम्स ऑफ इंडियातील १८ जानेवारी २०१६च्या बातमीनुसार गुगलवरील दर २० मागे १ सर्च हा वैद्यकीय गोष्टींशी संबंधित असतो. आज हा आकडा काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांमध्ये स्वनिदानाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय आहे.

    केवळ सायबरकॉण्ड्रियाच नव्हे, तर सध्या सर्वत्र वाढत चाललेले तणाव, अस्वस्थता, निद्रानाश इ. अनेक गोष्टींच्या मुळाशी हेच सोशल मिडिया, मोबाईल आणि इंटरनेटचे व्यसन आहे. इंटरनेट अॅडिक्शन डिसॉर्डर आणि त्याचाच भाऊ फेसबुक अॅडिक्शन डिसॉर्डर हे प्रकार उंबऱ्याशीच नव्हे तर उंबऱ्याच्या आत, तुमच्या-माझ्या आयुष्यामध्ये येऊन ठेपले आहेत व आपल्या मन:शांतीशी छेडछाड करताहेत. फेसबुक, इंटरनेट, मोबाईल यांच्यापलिकडे काही जग असतं, हेच जणू विसरून गेलो आहोत आपण! तुम्हाला गोल्डफिश माहितीये? अॅक्वेरियममध्ये ठेवतात तो मासा. त्याची एखाद्या गोष्टीवरची सरासरी एकाग्रता किती वेळाची असते, ठाऊक आहे? सुमारे ९ सेकंद! आणि माणसाची किती आहे? जवळजवळ ८ सेकंद! दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, तर आपण गोल्डफिशपेक्षाही जास्त चंचल झालो आहोत. मी मुद्दामहून झालो आहोत म्हणतोय कारण, इ. स. २००० मध्ये आपली सरासरी एकाग्रता होती, जवळजवळ १२ सेकंद! म्हणजेच गेल्या १८ वर्षांत आपल्या एकाग्रतेची सरासरी जवळजवळ १/३ कमी झालीये!! डेलॉईट मोबाईल कन्झ्युमर सर्व्हे २०१६च्या आकडेवारीनुसार, ६१% लोकांना झोपेतून उठल्यावर पहिल्या ५ च मिनिटांत मोबाईल लागतो. ८८% लोक पहिल्या अर्ध्या तासात तर तब्बल ९६% लोक पहिल्या तासाभरात मोबाईल पाहातात. झोपण्याच्या १५ मिनिटे आधीपर्यंत मोबाईल पाहाणाऱ्यांचे प्रमाण ७४% आहे. याच सर्वेक्षणानुसार मोबाईल उघडल्या उघडल्या लोक आधी सोशल नेटवर्किंग साईट्स तपासतात, त्याखालोखाल मेसेजेस आणि इमेल्सचा क्रमांक लागतो. हा सर्व्हेदेखील जवळजवळ ३ वर्षे जुना आहे. आता काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी! हे कुठेतरी थांबावे असे नाही वाटत का? काही मिनिटे जरी इंटरनेट, व्हॉट्सॅप, फेसबुक गडगडलं तरीही आपण चिंताक्रांत होतो, हीच खरी चिंतेची परिस्थिती नाही का? ‘डिजिटल डिटॉक्स’ आणि त्यापेक्षाही ‘डिजिटल डिटॅचमेंट’ ही आता हळूहळू काळाची गरज बनू पाहातेय.

    बघा ना, पूर्वी एकेकाळी कॉलेजमध्ये कुणीतरी आवडायचं. पण बोलण्याची हिंमत कुठे? आज बोलू, उद्या बोलू करत कित्येकांची शिक्षणं झाली आणि त्याच्या किंवा तिच्या लग्नाला हजेरीसुद्धा लावून झाली. दहा-एक वर्षांपूर्वी सोशल मिडिया नावाचा मेघदूत अवतरला आणि ज्याच्याशी किंवा जिच्याशी नजरेला नजर भिडवण्याचीसुद्धा हिंमत नव्हती, हळूहळू त्या व्यक्तीला संगणकाच्या पडद्याआडून फ्रेण्ड रिक्वेस्ट टाकणे जमू लागले! आमच्या नगरकडे ना, फ्रेण्डशिप करत नाहीत. मागतात! एकेकाळी “फ्रेण्डशिप देतीस का” हे तीन जादुई शब्द पोट्ट्यांसाठी “आय लव्ह यू”इतकेच महत्त्वाचे होते. उच्चारणाऱ्याला आणि ऐकणारीला सर्रास ठाऊक असायचं की गाडी मैत्रीपूरच्या फाट्यावरून पलिकडे न्यायचीये. अर्थातच फाटा आहे तिथे फाट्यावर मारणंसुद्धा आहे! त्या तीन जादुई शब्दांनी कित्येकांना चपलेची चव कशी असते, याचाही अनुभव दिलाय. सोशल मिडियाने ही भिती कमी केली. ब्लॉकचा धोका होता, पण चपलेपेक्षा त्याने कमी दुखतं म्हणतात. एकेकाळी जशी गुलाबांची संख्या हे ब्युटीक्वीन्सच्या पॉप्युलॅरिटीचं परिमाण असायचं, त्याची जागा हळूच पेण्डिंग फ्रेण्डरिक्वेस्ट्सनी घेतली. ब्युटीसुद्धा हळूहळू गार्ड्स आणि फिल्टरपाठी लपू लागली! काही मंडळी जिला फ्रेण्डशिप मागू शकले नव्हते तिला “झालं का जेवण” विचारण्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याचे बरेवाईट परिणामसुद्धा भोगले. तरुणाईला, मदर्स डे ला मानलेली सासू आणि फादर्स डे ला मानलेल्या सासऱ्यांची दर्शनं घडू लागली. पोरं बऱ्याच विषयांवर बोलती झाली. “फूड व्लॉगर (Food Vlogger)” या व्यवसायाची दहा वर्षांपूर्वी कुणी कल्पना तरी केली असती का हो? पण आज हा व्यवसाय आहे! हे आणि असे कित्येक बदल या पिढीने नको तितक्या वेगात पचवले. पुढे पुढे जाताना बरंच काही मागं राहून गेलं. नव्या पुस्तकांचा वास आता मनाच्या दुर्लक्षित कप्प्यात कुठेतरी पडून आहे, तसाच तळमळून लिहिलेल्या प्रेमपत्रांचा चुंबनस्पर्शसुद्धा कुठेतरी हरवलाय. लेखणीचा स्पर्श कामाशिवाय होतच नाही आता. क्लिक आणि टचची भुरळ पडू लागलीये. कवितांची जुनी डायरी दूर कुठेतरी हरवलीये. पुस्तक वाचता वाचता छातीवर उपडं ठेवून तासनतास विचार करणं जणू दुसऱ्याच कोणत्यातरी युनिव्हर्समध्ये व्हायचं. कालचं वर्तमानपत्र आज जुनं होतं, इथं मिनिटभरापूर्वी लिहिलेली पोस्टसुद्धा जुनी वाटू लागलीये. प्रेम आजही फुलते. नाती आजही बनतात. पण पूर्वी ती तुटल्यावर जितकी सलायची तितकी आता सलत नाहीत. लाईक आणि कमेंटपुरत्याच कॉम्प्लिमेंट्सने छाती फारशी धडधडत नाही. आज एक प्रोफाईल अनफ्रेण्ड केली की तिच्या जागी दुसरी सहज तयार असते. एकूण जगण्याचाच अटेन्शन-स्पॅन कमी झालाय. जणू सबंध आयुष्याचाच सोशल-मिडिया झालाय!

    बदल सृष्टीचा नियम आहे. पण तो बदल स्वीकारताना आपला मूळ गाभा, व्यक्तीमत्त्व तर त्याने चुरमडून जात नाहीये ना; आपल्यातल्या चांगल्या आणि साध्यासुध्या गुणांची किंमत तर त्यासाठी मोजावी लागत नाहीये ना, हे पाहायला नको? आजच्या काळात, सोशल मिडिया वापरणे कुणीच टाळू शकत नाही; परंतु तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवताना आपलं जगणंच त्याच्यावर सोपवणं कितपत योग्य? कुठेतरी अंतर राखता आले पाहिजे. कुठेतरी आयुष्यातल्या इतर सहजसुंदर नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे. आहे तो क्षण साजरा करायला शिकले पाहिजे. सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यात आणि नंतर इन्स्टाफीडमध्ये बंदिस्त करायचा अट्टाहास का? आणि सगळ्यांत महत्त्वाचे. कुठे थांबायचे हे ठरवायला शिकले पाहिजे. थोडक्यात, सोशल मिडिया आपलं आयुष्य हाताळायला लागलाय, त्याच्या आत आपणच त्याला योग्यप्रकारे हाताळायला शिकले पाहिजे!

    — © अॅड. विक्रम श्रीराम एडके

    (अभ्यासक आणि व्याख्याते. २६ जानेवारी २०१९ दिनी प्रकाशित झालेल्या वार्षिक ‘सहजीवन’ साठी लिहिलेला लेख.)

  • ईसईज्ञानी

    सिम्फनी लिहायला किती वेळ लागतो? मोठमोठे संगीतकार त्यासाठी ६ महिने ते १ वर्षसुद्धा घेतात. पण एक भारतीय कलाकार आहे ज्याने आजपासून पाव शतकापूर्वी सिम्फनी लिहिलीये. सिम्फनी लिहिणारा तो भारतातलाच नव्हे, तर आशिया खंडातला पहिलाच संगीतकार आहे. त्याला किती काळ लागला माहितीये? ६ महिने? एखादं वर्षं? १९९३ साली लंडनच्या रॉयल फिलहार्मनिक ऑर्केस्ट्राला घेऊन त्याने ही सिम्फनी अवघ्या १३ दिवसांत लिहिलीये! आणि तिचा दर्जा ऐकून इंग्लंडमधील त्या प्राचीन वाद्यवृंदाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. सांगायची गरजच नाही की, हा पराक्रम करण्याची ताकद असलेला केवळ एकच संगीतकार सबंध जगात आहे, ‘ईसईज्ञानी’ इलयराजा!!

    राजा प्रसंग ऐकतो. जागच्या जागी चाल लिहितो. आणि अवघ्या ५ मिनिटांत गाणं तयार होतं! शब्द लिहायला आणि गायकाला शिकून गायला वेळ लागतो, तेवढाच कालव्यय. तुम्ही विचार कराल की पाचच मिनिटांच्या गाण्याचा दर्जा तो काय असणार? एकदा बॉम्बे जयश्री म्हणाल्या होत्या, राजाकडे गाणं म्हणजे परत एकवार शाळेत जाण्यासारखं असतं. त्याच्या चालीत इतके बारकावे असतात की, प्रत्येक गाण्याची टिपणं काढण्यासाठी स्वतंत्र वहीच करावी लागते. राजाने आजवर १०००हूनही अधिक चित्रपट केलेयत आणि त्यातील किमान ८५० तरी म्युझिकल ब्लॉकबस्टर्स आहेत. जगात आजवर कुणालाच न साधलेला विक्रम आहे हा! राजा स्टुडिओत येतो. सिनेमा लावायला सांगतो. सिनेमा पुढे सरकतो तसतसा पाहात झरझर नोटेशन्स लिहितो. सिनेमा संपेपर्यंत सबंध चित्रपटाचे पार्श्वसंगीत कागदावर उतरलेलेसुद्धा असते! हे सुद्धा जगात कुणीच करू शकत नाही. राजाने आपल्या पार्श्वसंगीताच्या जोरावर अतिसामान्य चित्रपटांना व प्रसंगांनाही वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेय. इतरांची वाद्ये बोलतात, राजाच्या पार्श्वसंगीतात मौनसुद्धा बोलते! आजवर मिळालेल्या ५ राष्ट्रपती पारितोषिकांपैकी २ पार्श्वसंगीतासाठी मिळालेयत राजाला.

    आपल्याकडे जो दर्जा माऊलींच्या ज्ञानेश्वरीला आहे, तसाच दर्जा तमिळ साहित्यात ९व्या शतकातील संतकवी मणिक्कवसागरांनी लिहिलेल्या ‘तिरुवसागम’ला आहे. त्यातील ५१ रचनांपैकी ६ रचना राजाने २००५ साली निवडल्या. हंगेरीच्या बुडापेस्ट सिम्फनी ऑर्केस्ट्राला हाताशी धरलं आणि एक अभूतपूर्व ओरॅटरियो लिहिला. ओरॅटरीयो हा इटालियन शब्द आहे. सिम्फनीमध्ये नुसताच वाद्यवृंद असतो, तर ओरॅटोरियोमध्ये त्यासोबतच कॉयर आणि सोलोजसुद्धा असतात. काहीसा ऑपेराच्या जवळ जाणारा हा प्रकार. भारताने जगाला दिलेल्या सर्वश्रेष्ठ संगीतरचनांची यादी करायला घेतली, तर ‘तिरुवसागम’चा समावेश मी अतिशय वरच्या स्थानी करेन इतक्या श्रेष्ठ सांगितिक दर्जाचा अल्बम आहे हा. असाच एक प्रयोग राजाने १९८६ साली केला होता. पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतातील बरोक शैलीचा निष्णात संगीतकार बाख़ (१६८५-१७५०) आणि आपल्याकडील कर्नाटक शास्त्रीय संगीतातील संत त्यागराज (१७६७-१८४७) या दोघांच्या शैली एकत्र करून राजाने अल्बम केलेला “हाऊ टु नेम इट”. लेणं आहे हे संगीतातील अक्षरशः! त्यानंतर दोनच वर्षांनी ५० जणांचा वाद्यवृंद आणि साक्षात पं. हरिप्रसाद चौरसियांना घेऊन केलेला इन्स्ट्रुमेंटल अल्बम “नथिंग बट विण्ड”ला (१९८८) तर माझ्या प्लेलिस्टमध्ये ध्रुवबाळासारखे अढळपद आहे! आणि असे अनेक अल्बम्स राजाने आजवर केले आहेत.

    चित्रपट आणि चित्रपटेतर संगीत, दोन्हींमध्ये राजाने केलेल्या प्रयोगांची संख्या अनंत आहे. त्यांना तोडच नाही. राजाला ‘ईसईज्ञानी’ अर्थात ‘संगीतातला सर्वश्रेष्ठ ‘ म्हणतात, ते म्हणूनच सार्थ आहे. आज राजाचा वाढदिवस. आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करून हा संगीतकुलगुरू पंचाहत्तरीत पदार्पण करतोय. शरीर म्हातारं होत असतं, कला मात्र मुरतच जाते! संस्कृतमध्ये म्हणतात ना,
    जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा कवीश्वरा: ।
    नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।
    या ओळींचा खरा मालक आहे इलयराजा, नव्हे राजाधिराजा इलयराजा!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • आठवणींच्या गल्लीबोळांतून

    नव्वदचं दशक हे अनेक अर्थांनी नॉस्टॅल्जियाचं दशक आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांसाठी ते नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित अश्या जोड्यांनी, अन्नू मलिक वगैरेंसारख्या सफाईदार “बाजीगरां”नी व विजू शाहसारख्या अनेकानेक अंडररेटेड माणकांनी बनवलेल्या आणि कुमार, अलका, उदित वगैरेंनी बेभान होऊन गायलेल्या दिलतोड गीतांचं दशक आहे; तर नव्वदच्याच दशकात जन्मलेल्या आजच्या तरुणांसाठी ते इंडीपॉप गाण्यांमधील नव्या प्रवाहांत केलेल्या सचैल स्नानांचं दशक आहे. दोन्हीही प्रकारच्या मंडळींसाठी ते एकत्रितपणे समीरचंदेखील दशक आहे. आणि दोन्हीही प्रकारची मंडळी त्या दिवसांबद्दल बोलताना जरादेखील थकत नाहीत.

    याच दशकाने सोनू निगम, शान, केके, शंकर असे हिरेसुद्धा दिले! याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला!! त्यामुळे “आशिकी” (१९९०) वगैरेंपासून सुरू झालेली नॉस्टॅल्जियाची गाडी “रंगीला” (१९९५), “दिल से” (१९९८), “ताल” (१९९९), “कहो ना प्यार है” (२०००), “लगान” (२००१), “दिल चाहता है” (२००१), अशी शेकडों स्टेशनं पार करत करत पार “प्यार में कभी कभी” (१९९९), “कल हो ना हो” (२००३), “हम तुम” (२००४) ते थेट “धूम”पर्यंत (२००४) जाऊन पोहोचते! २००५, २००६ सालापर्यंत हा नव्वदच्या दशकातला सांगितिक मॉन्सून परतीचा पाऊस बनून बरसत होता. त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक लावला तो हिमेश रेशमियाने २००५ मध्ये “आशिक बनाया आपने”द्वारे!

    तसं बघायला गेलं, तर हिमेश हे देखील नव्वदच्याच दशकाचं बायप्रॉडक्ट! परंतु “प्यार किया तो डरना क्या” (१९९८), “कुरुक्षेत्र” (२०००), “दुल्हन हम ले जाएँगे” (२०००), “तेरे नाम” (२००३) वगैरे सरधोपट मेलडीजच्या मार्गावरून जाता जाता त्याने त्याचा साऊंड “आशिक बनाया आपने”मध्ये आमूलाग्र बदलला. हा बदल जितका सानंद स्वीकारला गेला तितकाच भल्याभल्यांना समूळ हलवूनसुद्धा गेला. पहिला धक्का ओसरताच हळूहळू सारं बॉलिवूड त्याच साऊंडची कॉपी करू लागलं. स्वतःचा वेगळा साऊंड जपणारे त्याकाळीही रहमान आणि शंकर-अहसान-लॉय वगैरे लोक होते.

    यांपैकी रहमान हा बदलांना सगळ्यांत वेगळ्या प्रकारे रिस्पॉण्ड करणारा माणूस आहे. हिमेशच्या लाटेच्याही पूर्वी आपला साऊंड जुना होऊ लागल्याचं त्याने बरोब्बर हेरलं होतं आणि “रंग दे बसंती”द्वारे (२००५) त्याने सगळा खेळच पालटून टाकला होता. पण कॉपीज हिमेशच्या बनल्या, रहमानच्या नाही. कारण, रहमानचा आधीचा साऊंड हा खूपच साधासरळ, प्रयत्नाने आत्मसात करता येण्यासारखा होता. २००४ नंतर रहमानने साऊंड बदलण्याची सुरू केलेली प्रक्रिया २००९ ला “दिल्ली ६”पर्यंत पूर्ण झाली आणि तोपर्यंत त्याचा साऊंड इतका काही गुंतागुंतीचा झाला होता की त्याची सहीसही नक्कल करूनही तो प्रतिभेच्या कवेत गवसणे शक्यच नव्हते.

    याच काळाने प्रीतम, अमित त्रिवेदींसारखी मंडळी दिली, तर विशाल-शेखरला अजून वरच्या पातळीवर पोहोचवलं. म्हणजे ज्यांना रहमान परवडत नाही आणि हिमेशपर्यंत खालीसुद्धा उतरायचं नाही, ते इन्स्टंट हिट्ससाठी प्रीतमकडे जाऊ लागले. त्यात अजून थोडासा क्लास हवा असलेले विशाल-शेखरकडे तर अजून प्रयोगशीलता हवे असलेले अमित त्रिवेदीकडे जाऊ लागले.

    शंकर-अहसान-लॉय यांचाही साऊंड २००२ चे २००५ पर्यंत रिपिटिटिव्ह होत गेला. पण तुरळक अपवाद वगळता त्यांना तो अनेक वर्षे बदलताच आला नाही. त्यामुळे त्यांचे चांगले आणि हिट असे दोन्हीही प्रकारचे अल्बम्स तुलनेने कमी कमी होत गेले. त्यांच्यातला मोठा, सकारात्मक बदल दिसला तो २०१२ सालच्या “विश्वरूपम” साऊंडट्रॅकमध्ये! त्यानंतर “कट्यार काळजात घुसली” (२०१५), “मिर्ज्या” (२०१६) अशी एकाहून एक रत्ने जरी त्यांनी दिली असली तरी आत्ता आत्ता कुठे ते पुन्हा एकवार जम बसवू लागलेयत.

    दरम्यान हिमेश केव्हाच मागे पडला. किंबहूना एकेकाळचे मोठमोठे दिग्गज विस्मृतीत गेले व जाऊ लागले. अवघ्या १०-१५ वर्षांपूर्वीपर्यंत जेवढे प्रयोग मुख्य प्रवाहातल्या चित्रपट संगीतात व्हायचे, तेवढे तर आता इंडीपॉप आणि समांतरमध्येसुद्धा होताना दिसत नाहीत. चित्रपटसंगीताची तर गोष्टच नको. ते रोज रोज नवीन पायऱ्या “उतरतच” चालले आहे. आणि गंमत म्हणजे हेही दशक उद्या कुणाच्या तरी उसासे टाकायला लावणाऱ्या नॉस्टॅल्जियाचा भाग असणार आहे! जितकी कळ आज पस्तिशीत असलेल्यांच्या काळजातून कुमार सानूसाठी उठते, तितकीच उद्या कुणाच्यातरी काळजातून अरिजित सिंहसाठी उठणार आहे! बदल हाच एकमेव शाश्वत असतो असे नाही, तर बदलणारेदेखील शाश्वत असतात. त्यामुळे रहमान हा नव्वदच्या दशकातल्यांसाठी जितका नॉस्टॅल्जियाचा भाग आहे तितकाच दहाच्या, वीसच्या दशकातल्यांसाठीसुद्धा आहे आणि तीसच्या व चाळीसच्या दशकांतल्यांसाठीसुद्धा राहिल. बाकी आपापले नॉस्टॅल्जियाज खूपच सापेक्ष असतात आणि म्हणूनच ते ह्रदयाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात, हूरहूर लावणाऱ्या कातरवेळी मनगटावरून फायासारखे फिरवण्यासाठी!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (संपर्क: www.vikramedke.com)

  • येणें वाग्यज्ञें तोषावें

    येणें वाग्यज्ञें तोषावें

    २००४ चा सुमार होता. नुकताच कॉलेजला प्रवेश केलेला तो, आजूबाजूचं मोकळं वातावरण पाहून जरासा बुजला होता. शिकायला जायचं, पण गणवेषाची सक्ती नाही; अश्या छोट्याछोट्या गोष्टीदेखील त्याला अचंबित करायला पुरेश्या होत्या. त्या कॉलेजमध्ये अनेक दशकांपासून चालत आलेली एक नावाजलेली वादविवाद स्पर्धा व्हायची. सूचना पाहून त्यानेसुद्धा नाव दिलं. आयुष्यात कधी स्टेजवर जाऊन काही बोललेला नाही. पण वाचायचा भरपूर. भरपूर म्हणजे, पुस्तकं खायचा तो अक्षरशः! कुठेकुठे थोडंफार लिहायचादेखील. या शिदोरीच्या जोरावर, त्याने स्पर्धेत नाव दिलं. मुद्देसूद विषय तयार केला. आठ अधिक दोन मिनिटे वेळसुद्धा कदाचित पुरणार नाही, इतके मुद्दे निघाले. स्पर्धेआधी पात्रता फेरी होती. कॉलेजच्याच एक कला विभागाच्या प्राध्यापिका ती फेरी घेणार होत्या. त्याचं नाव पुकारलं. तो समोर आला. आणि ऐकणारे पाच-सहा श्रोते पाहून त्याचं अवसान गळालं. दहा मिनिटंही पुरणार नाहीत वाटणारे मुद्दे दोनच मिनिटांत संपले होते. मग उगाचच बावरून उभा राहिला. लोक हसायचे ते हसलेच. प्राध्यापिका म्हणाल्या, “तू लिहितोस बरा, पण जन्मात कधी स्टेजवर उभा राहायचा विचारदेखील करू नकोस. तुझ्यात नाहीच ते”! तो हिरमुसला. निघून गेला. या प्रसंगातला तो अपमानित मुलगा, मी होतो.

    शाळेत असताना आम्हाला ‘अवांतर वाचन’ नावाचा उपक्रम असायचा. सगळ्यांनी नाव नोंदवलं तसं मीदेखील नोंदवलं. पुस्तक आणायला गेलो. दसरे सर नावाचे ग्रंथपाल होते. त्यांना म्हणालो, “काहीतरी चंपक, ठकठक वगैरे द्या ना”! त्यांनी मला नखशिखांत न्याहाळलं. विचारलं, “कितवीत आहेस तू”? मी म्हणालो, “सातवी”! त्यावर ते कडकपणे म्हणाले, “मग आता चंपक वाचण्याचं वय राहिलंय का तुझं? हे वाच”, असं म्हणून त्यांनी माझ्या हातात एक पुस्तक दिलं, ते होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं “माझी जन्मठेप”! पुस्तक हातात पडताच काही दिवसांपूर्वीचा प्रसंग लख्खपणे नजरेसमोर उभा राहिला माझ्या!

    आमच्या शाळेत, अर्थात नगरच्या प्रसिद्ध भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये सर्वच महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या उत्साहात साजऱ्या व्हायच्या. २८ मे, या सावरकरांच्या जयंतीदिनी उन्हाळ्याच्या सुट्या असायच्या, त्यामुळे २६ फेब्रुवारी या त्यांच्या आत्मार्पण-दिनी शाळेत वक्तृत्व स्पर्धा व्हायची. अश्या स्पर्धा म्हणजे आम्हां ठोंब्यांसाठी पर्वणीच असायची अक्षरशः! कारण, स्पर्धांमध्ये दोन-तीन तास सहज निघून जायचे. अभ्यासाला सुट्टी. क्वचित शाळादेखील लवकर सुटायची. अशीच हीदेखील स्पर्धा. स्पर्धेसाठी शाळेच्या भल्यामोठ्या बॅडमिंटन हॉलचे नेट काढून त्याचे सभागृह केले जायचे. भाग-बिग घेणाऱ्या हुशार जमातीतला मी कधीच नव्हतो. मी टेकण्यासाठी पटकन एक खांब पकडला. स्पर्धा सुरू झाली तशी मला डुलक्या येऊ लागल्या आणि स्पर्धा रंगू लागली तशी माझी झोपही गाढ झाली! स्पर्धा संपली की उठव रे, असं मित्राला सांगून झोपलेलो असल्यामुळे मी निश्चिंत होतो. नंतरचा प्रसंग मला मित्रांच्या सांगण्यावरून आठवतोय तो असा. कुणीतरी मुलगी तिचं व्यवस्थित पाठ केलेलं भाषण म्हणून दाखवत होती. त्याचवेळी आमच्या वर्गशिक्षिकेची नजर माझ्यावर पडली. “त्या एडकेला उठवा रे”, त्यांनी माझ्या शेजारच्या मुलाला फर्मावलं. त्याने बिचाऱ्याने शिक्षिकेची आज्ञा म्हणून मला गदगदा हलवायला सुरुवात केली. मला वाटलं स्पर्धा संपली म्हणूनच उठवतोय तो मला. स्पर्धा संपल्यावर काय करतात? टाळ्या वाजवतात! त्याप्रमाणे मी उत्साहात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. समोर एक कुणीतरी मुलगी बोलतेय. सगळं सभागृह माझ्याकडे पाहातंय. आणि मी टाळ्या वाजवतोय! ती मुलगी बिचारी भाषण विसरली आणि गांगरून तशीच उभी राहिली. मला त्यादिवशी असा काय तुडवला की, विचारूच नका!

    दसरे सरांनी पुस्तक समोर धरताच मला हा प्रसंग आठवला आणि नकळतच गाल व पाठ हुळहुळले! ज्या माणसावरच्या वक्तृत्व स्पर्धेत आपल्याला मार बसला तो माणूस आहे तरी कोण, असा विचार करून मी ते पुस्तक हातात घेतले आणि त्याच दिवसापासून सावरकर नावाच्या पंचाक्षरी मंत्राने मला झपाटून टाकले ते कायमचेच! जन्मठेप वाचून संपवल्या-संपवल्या मी सावरकरांची इतर पुस्तके शोधू लागलो. विकत घेण्याइतकी ऐपत नव्हती. मग एकूण एक वाचनालयं पालथी घातली नगरमधील. सावरकर-स्मारकाने प्रकाशित केलेले “समग्र सावरकर”चे दहाच्या दहा खंड वेड लागल्यागत वाचून फस्त केले. काहीतरी दैवी, याआधी कधीच न अनुभवलेले विचार आपण वाचतो आहोत, हे त्या वयातही कळत होते. त्या नकळत झालेल्या संस्कारांची शिदोरी आजदेखील मजबूत आहे. सावरकर वाचू लागलो, तसे ते माझ्या बोलण्यातही डोकावू लागले. चार मित्रांमध्ये बोलायचो, तर ते मुग्ध होऊन ऐकत बसायचे. एव्हाना कॉलेजला जाऊ लागलो होतो. वर सांगितलेल्या त्या वाद-स्पर्धेत नाव नोंदवलं आणि तोंडघशी पडलो. जन्मात कधी स्टेजवर उभा राहू नको, सांगून घालवून दिले मला.

    त्याक्षणी पहिली गोष्ट जर कोणती कळाली असेल, तर तो चार मित्रांमध्ये बोलणे आणि स्टेजवर उभे राहून बोलणे यामधला फरक. ह्रदयात सावरकर धारण केलेले असल्यामुळे “अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला; मारील रिपू जगती असा कवण जन्मला” हे मनात पक्के होते. त्याच दिवशी ठरवले, हार मानायची नाही. आपले कुठे चुकले हे शोधायचे आणि त्या त्रुटी दूर करायच्या. काही दिवसांपूर्वीच मी लिहिलेल्या एका विज्ञानकथेला पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात पुरस्कार मिळाला होता. त्यावेळीही स्टेजवर जाऊन दोन शब्द बोलायचे होते. त्या विचारांनीच माझी दातखिळ बसली. कसाबसा स्टेजवर उभा राहिलो, तर सभागृहाच्या दुसऱ्या टोकाला माझ्या अगदी समोरच सावरकरांचे पूर्णाकृती तैलचित्र! ते पाहिले आणि काय सुचले कुणास ठाऊक, मी म्हणालो, “माझे आदर्श असलेल्या सावरकरांच्या सान्निध्यात मला हा पुरस्कार दिला जातोय, यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट ती कोणती”? ताबडतोब सारे सभागृह टाळ्यांनी भरून गेले! अच्छा, म्हणजे श्रोत्यांना रिझवणारी वाक्यं बोलता आली पाहिजेत तर! हे एक समजले. पण नुसत्या तेवढ्याने भागणार नाही. आपल्याकडे मुळात आशय हा असलाच पाहिजे. मग ज्या विषयावर बोलायचं, त्याचे मुद्दे काढू लागलो. मुद्यांचा क्रम असा ठेवला की, एकातून दुसरा मुद्दा सहजच निघाला पाहिजे. म्हणजे कोणताच मुद्दा विसरला जाणार नाही. अवघड होते हे. पण सरावाने सारेच सोपे वाटू लागते.

    याच काळात नगरमध्ये “भास्कराचार्य अॅस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटर”शी जोडला गेलो. खगोलशास्त्राची लहानपणापासूनच आवड. “भास्कराचार्य”ने त्या आवडीला नुसती दिशाच दिली नाही, तर प्रत्यक्ष अनुभवांतून व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वेसुद्धा शिकवली. याकाळात खूप सारे आकाशदर्शनाचे कार्यक्रम घेतले मी. शाळाशाळांमध्ये जाऊन खगोलशास्त्रावर व्याख्याने दिली. हळूहळू भीड चेपू लागली होती. दरम्यान पुण्याच्या “वेद-विज्ञान मंडळा”ने विचारलं, आमच्याकडे सावरकरांवर व्याख्यान देणार का? जाहीर व्याख्यान! नुसत्या नावानेच भिती वाटू लागली. पण हिंमत करून होकार दिला. दिनांक होता २४ डिसेंबर २०११ आणि विषय होता “सावरकरांवरील आक्षेपांचे खंडन”. भरपूर तयारी करून गेलो. तोपर्यंत एक गोष्ट पक्की समजली होती की, मुद्दे काढण्यात आणि काढलेल्या मुद्यांचा कागद सोबत ठेवण्यात काहीच चूक नाही. आपण काही परीक्षेला बसलेलो नसतो. उलट मुद्दे समोर असले की वाक्प्रवाहात अडथळा येत नाही. मोठमोठे वक्तेसुद्धा हे करतात. ते व्याख्यान आधीच्यापेक्षा छान झाले. विशेष म्हणजे मी यावेळी ठरवलेच होते की, सबंध व्याख्यान रेकॉर्ड करायचे. त्याप्रमाणे फोन माईकजवळ ठेवून मस्त रेकॉर्डिंग केली. स्मार्टफोनमुळे ही एक चांगलीच सोय झालीये. रेकॉर्ड केलेले माझेच व्याख्यान मी ऐकले. पुन्हा पुन्हा ऐकले. अतिशय कठोरपणे त्यातल्या त्रुटी शोधल्या. कुठे घटनाक्रम बदलता आला असता, ते शोधले. प्रवाह बदलण्यावरही विचार केला. कुठे आवाजात चढ-उतार असले पाहिजेत, याची टिपणे काढली. याच काळात सांगलीच्या ब्राह्मणसभेने सावरकरांवरच व्याख्यानाला बोलावले. आधीच्या व्याख्यानोत्तर टिपणांचा यावेळी खूपच चांगला उपयोग झाला. पुन्हा नवे रेकॉर्डिंग आणि नवी टिपणे!

    तेव्हापासून आजवर अव्याहत हा क्रम चालू आहे. मी व्याख्यान कधीच पाठ करत नाही आणि प्रत्येकवेळी नव्याने टिपणे काढतो. त्यामुळे आजही त्याच त्या विषयांवर व्याख्याने देण्याचा माझा आणि कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकण्याचा श्रोत्यांचा उत्साह टिकून आहे. हळूहळू सावरकरांसोबतच स्वामी विवेकानंदांवरही व्याख्यानाची बोलावणी येऊ लागली. वेद-पुराणे यांची पूर्वीपासूनच आवड. त्यामुळे काही लोकांच्या स्वार्थापोटी अकारण वादग्रस्त ठरवण्यात आलेल्या परशुरामांचा मुळातून अभ्यास केला आणि त्यावरही आजच्या काळाला सुसंगत व्याख्याने द्यायला सुरुवात केली. भन्साळीचा “बाजीराव-मस्तानी” आला त्या दरम्यान योगायोगाने एका प्रथितयश वृत्तपत्रात माझा बाजीरावांचा प्रेमकथेपल्याडचा खराखुरा पराक्रम सांगणारा लेख प्रकाशित झाला होता. त्याही विषयावर बोलावणी येऊ लागली. किंबहूना हल्ली सर्वाधिक बोलावणी त्याच विषयांवर येतात. जाहीर व्याख्याने तर होतातच, परंतु शाळा-महाविद्यालयांनाही चित्रपटामुळे हा विषय वारंवार ऐकावासा वाटतो. आजवर मस्तानी आणि बाजीरावांच्या प्रेमकथेला नको इतके चघळले गेलेय. त्यामुळे मी ठरवून मस्तानीचा भाग कमीत कमी ठेवून बाजीरावांच्या युद्धांची वर्णने आणि त्यांची त्यापाठची युद्धनीती यांवर भर देतो. त्या विषयाला मी नावच दिले आहे, “मस्तानीपल्याडचे बाजीराव”!

    या सगळ्यांत एक फार महत्त्वाचा मुद्दा मला चर्चेसाठी घ्यावासा वाटतो. तो म्हणजे वक्त्याचे मानधन. व्याख्यान ही वाङ्सेवा आहे आणि सेवेचे मूल्य होऊ शकत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. व्याख्यान हे एक समाजकार्य, प्रबोधन असले पाहिजे; हेदेखील मला मान्यच आहे. पण याबाबतीत मी माझा वैयक्तिक आणि म्हणूनच ‘फर्स्ट-हॅण्ड’ अनुभव सांगू इच्छितो. पूर्वी मी व्याख्यानांसाठी अजिबातच मानधन घेत नसे. किंबहूना, कुणी आग्रह केलाच तर तुम्हाला शक्य होतील तेवढे द्या, असे सांगत असे. पण यातून आपणां भारतीयांची एक गमतीदार मनोवृत्ती अनुभवास आली. वक्ता फुकट येतोय, याचा अर्थ तो काही फारसा चांगला नसणार; असा समज करून घेऊन कार्यक्रमात जाणून-बुजून दुर्लक्षित करणे, गृहित धरणे, अपमान करणे असे प्रकारच जास्त अनुभवास यायला लागले. राहाण्याची व्यवस्था उत्तम तर सोडाच परंतु किमान स्वच्छ ठिकाणी होणेही मुश्किल होऊ लागले. जिथे मानधनच नाही, तिथे प्रवासखर्चाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. काहींनी तर फुकट येतोय म्हणून इतरही काही गोष्टी करवून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यांची चर्चा इथे अप्रस्तुत ठरेल. जेवणाचं ताट द्यावं, पण बसायचा पाट देऊ नये; ही म्हण चांगलीच शिकायला मिळाली मला. तेव्हापासून मी एक विवक्षित रक्कम मानधन म्हणून आकारण्यास सुरुवात केली अधिक प्रवासखर्च. आणि काय आश्चर्य! जी मंडळी एकेकाळी दुर्लक्ष करायची, तीच आता सन्मानपूर्वक बोलावू लागली. आपण पैसे मोजतोय म्हटल्यावर व्याख्यानाकडे अधिक लक्ष देऊ लागली. ओघानेच राहाण्याची व्यवस्थाही सुधारली. थोडक्यात व्यवहारामध्ये सेलिब्रिटी राहाण्यालाच किंमत आहे निस्वार्थ सेवेला नाही, याचा पुरेपूर प्रत्यय आला! अर्थातच याबाबतीत मी स्वतःच स्वत:वर काही नियम घालून घेतले आहेत. एक म्हणजे मी कधीच माझ्या योग्य मानधनापेक्षा अधिक रक्कम मागत नाही. योग्य म्हणजे काय, तर व्याख्यानाचे कौशल्य हे अभ्यासावर अवलंबून असते. त्यासाठी घ्यावी लागणारी पुस्तके आणि बाकी सर्व कामे सोडून द्यावा लागणारा वेळ हा उगाचच अंगावर पडणार नाही, इतकी रक्कम. साधा विचार करा, व्याख्यानासाठी जी काही तयारी केली जाते, त्यात कुणी सूट देतं का? लाईटवाला फुकट लाईट देत नाही. माईकवाला फुकटात माईक देत नाही. स्टेजवाला फुकटात स्टेज बनवत नाही. अश्या अनेक ठिकाणी पैसे मोजावेच लागतात. मग ज्या वक्त्यावर हा सगळा डोलारा अवलंबून आहे, त्यानेच तेवढं फुकट यावं अशी अपेक्षा का? अर्थातच, कुणाकडून पूर्ण मानधन घ्यायचं, कुणाकडून कमी घ्यायचं आणि कुणाकडून अजिबातच घ्यायचं नाही; याचं नैतिक तारतम्य पाळता आलंच पाहिजे. ते मी मनापासून पाळतो. दुसरे असे की, मी प्रवासाच्या साधनांवर कधीच अडून राहात नाही. जे स्वस्त आणि सोपे असेल, त्याला माझी कधीच हरकत नसेल. अगदीच गरज असेल, तरच मी विमानप्रवास करतो, तेही प्रवासाचा वेळ वाचावा आणि जोडून दुसरे व्याख्यान असेल, तर आयोजकांचा खोळंबा होऊ नये म्हणून. तिसरे म्हणजे मी शक्यतो हॉटेलचा आग्रह धरत नाही. कुणा कार्यकर्त्याकडे माझी सोय केली तर ते आयोजकांना परवडते आणि मलाही चालते. फक्त माझा एकच आग्रह असतो तो म्हणजे व्याख्यानापूर्वीचा आवश्यक एकांत आणि प्रवासाचा शीण घालवण्यासाठी पुरेशी विश्रांती. चौथी गोष्ट म्हणजे जेवण. मी अस्सल खवय्या आहे. ज्या राज्यात जाईन तेथील खासियत चाखायचा माझा हमखास प्रयत्न असतो. पण हे करतानाही आयोजकांवर भार पडू नये, याची मी पुरेपूर काळजी घेतो.

    व्याख्याने देण्यापासून ते उपरोक्त नियम स्वतःवर लादण्यापर्यंत कोणतीच गोष्ट मला कधीच कुणी शिकवली नाही. इतरांचे ऐकत, निरीक्षण करत, ठेचकाळत-धडपडत स्वतःच शिकलो. अनुभवासारखा कठोर गुरू नाही आणि सातत्यपूर्ण अभ्यासाला कोणताच पर्याय नाही. आजही मी माझ्या व्याख्यानविषयांबद्दल सतत माहिती गोळा करत राहातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतूनच नव्हे तर देशभरातून व्याख्यानांसाठी आमंत्रणे येतात मला. गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा, कर्नाटक अशी कित्येक राज्ये मी विविध महापुरुषांची ससंदर्भ चरित्रं पोहोचवण्याच्या ध्यासापायी वारंवार पालथी घातलीयेत. अंदमानात तर वर्षातून दोन वेळा (सप्टेंबर व फेब्रुवारी) सलग पाच-पाच दिवस व्याख्याने देतो मी. या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. आणि असे करणारा मी पहिलाच सर्वांत लहान वयाचा वक्ता आहे. वयाच्या तिशीच्या आतच श्रोत्यांनी मला न भूतो न भविष्यति प्रेम दिले. कित्येकदा कार्यक्रमानंतर अनेक वयोवृद्ध मंडळी चरणस्पर्शाचा प्रयत्न करतात, मी तसे करू देत नाही, पण अक्षरशः भारावून जायला होते. चांगले दिले, तर ऐकण्याची इच्छा अजूनही टिकून आहे, याची पदोपदी जाणीव होत राहाते. सुह्रद तर किती मिळाले याची गणतीच नाही.

    पहिल्या परिच्छेदातला तो अपमानित मुलगा, एवढा लांबवरचा प्रवास करून इथवर पोहोचलाय. लवकरच परदेशातूनही व्याख्यानासाठी निमंत्रण आहेच. पण अजून एक गंमत सांगू? ज्या स्पर्धेच्या पात्रताफेरीतूनच मला हाकलून दिले होते, त्याच अगदी त्याच स्पर्धेसाठी यंदा मला परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते! निमंत्रणाचे पत्र पाहून डोळे आपसूकच पाणावले. नकळतच एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे जाणवले. मी हे माझ्या मोठेपणासाठी सांगत नाही. ज्या प्राध्यापिकेने मला हाकलून दिले होते, त्यांच्यावर तर काडीमात्रही राग नाही माझा. उलट त्यादिवशी त्या मला टोचून बोलल्या म्हणूनच तर मी ही भरारी घेऊ शकलो. अन्यथा जगाच्या जंजाळात कुठेतरी खितपत पडलो असतो आज. या लेखाचादेखील हाच तर उद्देश आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक फिनिक्स दडलेला असतो. राखेतून जन्म घेऊन उड्डाणाच्या तयारीत असलेला! त्या प्रत्येक फिनिक्सच्या आयुष्यावर साचलेल्या राखेला फुंकर घालण्याचे लहानसेच योगदान या लेखाने दिले तरी पुरे. मग होणाऱ्या गगनभेदी उड्डाणाला देवदेखील रोखू नाही शकणार!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (स्वबोध. दिवाळी अंक. २०१७)

    टीप: अॅडव्होकेट विक्रम एडकेंची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा www.vikramedke.com

  • सावरकर नावाचा ब्रॅण्ड!!

    नव्याने विमानात बसणाऱ्यांची एक बेक्कार गंमत होते. उद्धरिणीने (लिफ्ट हो!) जाताना कसं वजनरहित वाटतं आणि डोकं पिसाहून हलकं होतं, तसं वाटतं. आणि त्या अवस्थेत प्रतितास शेकडो किलोमीटर वेगाने आपण हवेत तिरके भिरकावलो जात असतो!! बाऽबोऽऽ!! शब्दातीत अवस्था असते उड्डाण म्हणजे!! यात एक वेगळाच त्रास होतो. कान भयानक दुखतात. हवेचा दाब सतत बदलत असतो. त्यामुळे कानांवर प्रचंड ताण येतो. जरा कुठं वर-खाली झालं की, “पुटूक पुटूक” आवाज करत कानात लहानसे स्फोट होतात की “सुंईईईऽऽ..” आवाज करत अडकून राहिलेली हवा निघून जाते. परत नव्याने दाब. तात्पुरता बहिरेपणा येतो. उतरल्यावरही कित्येक तास कान दुखत राहातात. यासगळ्यात नाक व तोंड दाबायचं आणि प्रयत्नपूर्वक कानावाटे श्वास सोडायचा, ह्या द्राविडी प्राणायामाची निराळीच गंमत असते!!

    मुंबई ते चेन्नई प्रवासात फारच त्रास झाला मला. कारण असं काही होईल याची कल्पना होती, पण इतकं होईल असं कुणाला वाटतंय!! त्यातून हवाईसुंदरीला मी फारसा आवडलो नसावा, कारण तीनतीनदा बोलावल्यावर तिने शेवटी कापसाचे बोळे आणून दिले. तशी ती पण नुसती “हवाई”च होती मेली, “सुंदरी” तर औषधालाही नव्हती! शेवटी व्हायचा तो त्रास झालाच. पण तिथून पुढे चेन्नई ते पोर्टब्लेअर प्रवासाच्या वेळी मात्र मी मानसिक तयारी करुन ठेवली होती. त्याप्रवासात काही मला खिडकीजवळची जागा नव्हती मिळालेली. उजव्या रांगेतली पहिली जागा. दोन तमिळ ख्रिश्चन कुटूंबे बिचारी माझ्यामुळे निम्मी इकडं आणि निम्मी तिकडं झालेली. नवरे, बायका आणि चिल्लीपिल्ली! “तमिळ” म्हटलं की मुळातच माझे अष्टसात्त्विकभाव जागृत होतात. का कोण जाणे पण मला मी मागच्या जन्मीचा तमिळ वाटतो, इतकी ओढ वाटते मला त्या भाषा आणि संस्कृतीबद्दल. त्यामुळे मी त्या अण्णा-अम्मांशी मोडक्यातोडक्या तमिळमध्ये गप्पा सुरु केल्या!

    त्यांच्यातले एक अण्णा कोटक बँकेत कामाला होते. मग देशाची सध्याची अवस्था, मोदी-बिदी असले “लडकोंवाले” विषय बोलून झाल्यावर गाडी हळूच “अंदमानला कश्यासाठी?” ह्या प्रश्नाकडे वळली. ती कुटूंबं सप्ताहान्त साजरा करायला सहज म्हणून चालली होती. मला विचारलं तर मी सांगितलं की, “महाराष्ट्रातून आम्ही काही लोक चाललोय अंदमानला. सावरकरांसाठी! आम्ही नुसते फिरणारच नाही आहोत तर मी व्याख्याने देणार आहे तिथे सावरकरांवर. त्यासाठी वक्ता म्हणून चाललोय”, वगैरे वगैरे. यावर साहजिकपणे त्यांनी विचारलं की, “कोण सावरकर बुवा”? बास!! नाहीतरी महाविद्यालयीन काळात एका बिग्रेडी प्राध्यापकाला नडलो होतो त्यावेळी त्यांनी हताश आवाजात म्हटलेच होते, “तू जिथं-तिथं सावरकर घुसडतोस सतत”! इथे तर सरळ समोरुन प्रश्न आला होता, “कोण सावरकर”? माझ्या डोक्यात उलटी गणती सुरु झाली, “३.. २.. १.. सुरु”!! मी तासभर त्या चार-पाच जणांना इंग्लिश आणि तमिळमध्ये सावरकर समजावून सांगत होतो. त्यांची साहजिक प्रतिक्रिया होती, “देशासाठी आयुष्यभर एवढा त्रास भोगलेला हा माणूस आम्हाला माहितीच नव्हता”! त्यांच्यापैकी एकाने विचारले की, “सावरकर प्रत्यक्षात किती थोर होते”? तेवढ्यात घोषणा झाली, “कृपया कुर्सीकी पेटियाँ बाँध ले, हम कुछही मिनटोंमें पोर्टब्लेअरके वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाईअड्डेपे उतरनेवाले है..”! मी म्हणालो, “अंदमानमधल्या एकमेव विमानतळाला एका मराठी माणसाचं नाव द्यावं लागलं, इतके थोर होते सावरकर”! यावर आम्ही सगळेच हसायला लागलो. बोलण्याच्या भाषा लाखों असतील जगात, पण हास्याची भाषा एकच असते!!

    हा काही अंदमानप्रवासातला असा एकमेव अनुभव नाही. तिकडे आमचा समन्वयक होता एक. विकास नाव त्याचं. वडील पंजाबी, आई तेलुगू, वाढला बंगाली बहुसंख्य असलेल्या अंदमानमध्ये. त्यामुळे ह्या तिन्ही भाषा तर तो अस्खलित बोलतोच. शिवाय अंदमानात राहून राहून तमिळ आणि हिंदीतसुद्धा पारंगत झालेला. इंग्रजीही अतिशय उत्तम. बाकीचे आमच्या ठरलेल्या गाड्यांमधून फिरायचे. मी म्हणालो, “मला नाही असं फिरायचं”! तर मला त्याच्या बाईकवरुन सबंध पोर्टब्लेअर फिरवायचा हा गडी. आमच्यासोबत राहून राहून मराठीसुद्धा शिकून घेतलं त्याने गरजेपुरतं. एके दिवशी मला म्हणाला, “यार तुम ये डेढ़-दो घण्टे क्या भाषण देते हो? मुझे सुनना है”! मी म्हणालो, “आ जाओ आज शामको”! आला. सगळ्यात मागे बसला. मराठी व्याख्यान. साहेबांना एक शब्दसुद्धा कळला नाही. पण शेवटपर्यंत बसला होता. व्याख्यान संपल्यावर म्हणाला, “विक्रमसर, मुझे समझमें तो कुछ नहीं आया, पर पूरा माहौल भावूकसा हो गया था. ज़रुर कुछ अच्छी बातेंही बताई होंगी! इतना मानते हो आप महाराष्ट्रीयन लोग वीर सावरकरको”? मी म्हणालो, “सावरकर अगर भगवान नहीं तो भगवानसे कम भी नहीं हमारे लिए”! तो विचारात पडला. जरा वेळाने म्हणाला, “हम आजतक सेल्युलर जेल किसी टुरिस्ट स्पॉटकी तरहही दिखाते आए है. आज पहली बार सोच रहा हूँ की, उसके साथ लोगोंकी कितनी भावनाएँ जुडी हो सकती है! आईंदासे मैं जेल ले जाते वक़्त ये ध्यान रखूँगा और लोगोंको बताऊँगा की जिस इन्सानके लिए आपलोग यह जेल देखने आए हो, वह भगवानसमान है महाराष्ट्रमें”!!

    मला वाटतं, आपण मराठी लोक आपल्याच महापुरुषांबद्दल न्यूनगंड बाळगतो ना, म्हणून आपल्या लोकांना कुणी फारसे ओळखत नाही बाहेर. आपण आपल्याच लोकांची सकारात्मक बाजू डंके की चोटपे सांगायला लाजतो. तिकडे हॅवेलॉक बेटावर एक “राधानगर बीच” नावाचा नितांतसुंदर समुद्रकिनारा आहे. आशिया खंडातला तिसरा सगळ्यात सुंदर आणि भारतातला तर सगळ्यात सुंदर समुद्रकिनारा. पार गळ्यापर्यंत पाण्यात गेलात तरीही खाली पाहिल्यास पावले स्पष्ट दिसतील, एवढा स्वच्छ! तिकडे आम्ही सगळे मनसोक्त खेळलो. खेळून झाल्यावर कपडे-बिपडे बदलले आणि तिथल्या बाकड्यांच्या समूहात सगळेजण अर्धवर्तुळाकार बसलो. आमच्या मंडळींचा अतरंगीपणा असा की, आजचे व्याख्यान इथेच करुया. मग काय! अतीवसुंदर, नादमय समुद्र आणि त्या पार्श्वभूमीवर सावरकरांची कीर्ती सांगणारा मी! एवढे सगळे लोक एकत्र जमून एकाच माणसाचं ऐकताहेत म्हटल्यावर कुठून कुठून आलेले पर्यटकसुद्धा जमून ऐकू लागले. पाहाता-पाहाता शे-दिडशे माणसं जमली. क्वचितच कुणाला मराठी समजत असावं त्यांच्यापैकी. मी मुद्दामच मराठीतून व्याख्यान सुरु ठेवलं. व्याख्यान संपल्यावर एक बंगाली काका हातात भेळेचा पुडा घेऊन बकाणे भरता-भरता आले, “ये जो आप ‘सावन.. सावन..’ कह रहे थे, वह क्या था?” मला हसू आले. मी त्यांना म्हणालो, “सावन नहीं, सावरकर”! मग मी त्यांना सावरकर समजावून सांगितले, ते कसे सेल्युलर जेलमध्ये होते हेही सांगितले. त्यावर ते बाबूमोशाय काय म्हणाले असतील? म्हणे, “फिर हमारे सुभाषबाबू कौनसे सेलमें थे”? मी म्हणालो, “वह यहाँ कभी कैद थे ही नहीं! अंदमान प्रसिद्ध है मात्र सावरकरजीकी वजहसे”! तर म्हणे, “क्या बात करते हो? क्या सावरकर हमारे सुभाषबाबूसेभी बडे थे”? मी म्हणालो, “जी बिल्कुल! बल्की, सुभाषबाबूको आज़ाद हिंद सेनाकी कल्पनाभी सावरकरजीनेही दी थी. गुरु मानते थे वह सावरकरजी को! उनकी पुस्तकें बंगालीमें प्रकाशितभी करते थे सुभाषबाबू”! बंगालीकाका आता चमकले, “अरे बापरे, यह तो हमें पताही नहीं था. धन्यवाद सर”!

    पाहिलंत? इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी क्रांतिकारक दिले. पण केवढा पूज्यभाव त्यांच्या मनात आपापल्या क्रांतिकारकांबद्दल! नाहीतर आपण!! नुसती मराठी क्रांतिकारकांची यादीच करायची म्हटलं तरी खंडांमागून खंड भरतील, पण आम्ही करंटे न्यूनगंडी, त्यांच्याबद्दल बोलायलादेखील लाजतो. मुळात आम्हालाच काही माहिती नसतं तर बोलणार तरी काय म्हणा! पण माहिती तर त्या बंगाली काकांनाही नव्हती. तरीदेखील रेटून विचारलंच ना त्यांनी सुभाषबाबूंबद्दल? आणि आम्ही आमच्याच गौरवबिंदूंपासून दूर दूर पळतो. मला नाही वाटत, पंजाबात शीखेतर भगतसिंहांचा द्वेष करत असतील. नाही! तो ब्रॅण्ड आहे त्यांच्या राज्याचा!! बंगालात कायस्थविरोधी चळवळ आहे की नाही कोण जाणे, पण असली तरी कुणीही बंगालीबाबू सुभाषबाबूंचा द्वेष करताना नाही आढळणार तुम्हाला. ब्रॅण्ड आहे तो त्यांच्या राज्याचा! पण त्याच भगतसिंहांच्या इतके, किंबहूना काकणभर जास्तच क्रांतिकार्य केलेले राजगुरु! केवळ त्यांच्या जातीपायी त्यांचा द्वेष करणारे किती मराठी दाखवू तुम्हाला, बोला! यांची तोंडं सदोदित वाकडीच!! यांना टिळक नको, चापेकर नको, सावरकर तर साताजन्मीसुद्धा नको. बरं बाबा, मग जे तुम्हाला गोड लागतात त्यांच्याबद्दल तरी बोला. छे!! परप्रांतीयांसमोर आपल्याच लोकांचे गुणगान गातानाही हातभर फाटते. मुळात माहितीच काही नसतं. आणि इतरांचा द्वेष करण्यातच सगळं आयुष्य गेल्यामुळे सर्वसमावेशक भाषेत आपला माणूस पटवून देण्याचं कौशल्य तर त्याहूनही नसतं. काय कप्पाळ ब्रॅण्ड निर्माण होणार महाराष्ट्राचा? मग बोंबलायचं, “त्या अमुक राज्यात शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून शिकवलं जातंय होऽ”! अरे थुक्रटराव, तू जर कधी बाहेरच्या जगात शिवरायांची चांगली बाजू सांगितलीच नाही, तर ते त्यांना जे समोर दिसेल तेच खरं मानणार ना ते येडपटा!! पण तू तर “शिवाजी कसे हिंदू नव्हतेच” असला पागल फेसबुकीया शोध लावत किबोर्ड बडवत बसलायस नाहीतर व्हिएतनामचा तो कोणतातरी नेता कसा रायगड बघायला आला होता याच्या खोट्यानाट्या कथा पसरवत बसलायस. मग जग शिवरायांना असंच काहीतरी वाट्टेल ते संबोधणार!!

    टिळक असोत, सावरकर असोत, शिवराय-शंभूराय वा थोरले बाजीराव असोत, हे ब्रॅण्ड आहेत महाराष्ट्राचे. छातीठोकपणे अमराठी आणि अभारतीय लोकांना कर्तृत्व सांगा त्यांचं. सकारात्मक बोला आणि बघाच त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा आदर कसा दुणावतो ते! एवढे मोठे मोदी, पण पटेल आणि गांधी किती जरी भिन्न विचारधारांचे असले तरीही त्यांचं कर्तृत्व सांगताना कधी थकत नाहीत. केवळ ते त्यांच्या गुजरातचे आहेत म्हणून. मग आपणच का कर्मदरिद्रीपणा करावा? बिनधास्तपणे सांगा. मी आजवर जेव्हा जेव्हा बाहेरच्या राज्यांत गेलोय, तिथे तिथे सावरकर नावाचा ब्रॅण्ड स्थापन करुन आलोय. ही तरी नुसती अंदमानातलीच उदाहरणं झाली. भाग्यनगरात (हैदराबाद) तर ठाकूर राजासिंह सावरकरांचं कर्तृत्व समजल्यावर केवळ रडायचेच बाकी होते!! येत्या फेब्रुवारीत पुन्हा चाललोय मी अंदमानला. सावरकरांबद्दल अजाण असणाऱ्यांना सावरकर सांगायला. या माझ्यासोबत. ‘फिरस्ती टूर्स’च्या श्री. Abhijeet Kulkarni (+917843011155) यांच्याकडे नोंदणी करा, आणि गर्जा जयजयकार!! आपल्याकडे सोनं आहे रे. उधळा बेभानपणे मित्रांनो! आज-उद्या आदराच्या रुपाने महाराष्ट्राकडेच परत येणार आहे ते!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचायचे असल्यास पाहा www.vikramedke.com)

    image

  • द्वीपशिखा

    द्वीपशिखा

    पोर्टब्लेअरपासून अवघ्या ८-१० मिनिटांच्या अंतरावर ‘रॉस’ नावाचे बेट आहे. ब्रिटिश खलाशी डॅनिअल रॉसच्या नावावरुन या बेटाचे नाव ठेवलेय. ह्या बेटावर राहाते एक देवी! अनुराधा राव नाव तिचं. पण का तिची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला? काय एवढं विशेष आहेत तिच्यात? एकाच वाक्यात सांगायचं झालं तर, अंदमानातली सगळ्यात महत्त्वाची अगदी तिथल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांच्याइतकी आणि सेल्युलरजेलइतकीच महत्त्वाची गोष्ट आहे ती! तुम्हाला खोटं वाटेल, पण माझ्या दौऱ्यात पहिल्या दिवशी त्यांची भेट होऊ शकली नाही तर तिसऱ्या दिवशी काही स्थळं पाहाणे रद्द केले मी, पण तिची भेट घेतलीच! यावरुनच तिच्या महत्तेची कल्पना यावी!!

    अनुराधाचे वडील रॉस बेटावरचे रहिवासी. ते वारल्यावर निव्वळ कुतुहलापोटी अनुराधा ह्या बेटावर आली. अवघं ३ वर्षाचं वय होतं तिचं. बेटावर ससे होते, हरणं होती, मोर होते, बुलबुल होते. पण सर्वत्र अनागोंदी माजलेली. सरकारी खलाशी वाट्टेल तेव्हा शिकार करत असत. झाडं तोडत असत. कुणी सांसद-विधायक येणार असला की त्याच्यासाठी हरणं मारुन नेत असत. असं होता होता आख्ख्या बेटावर केवळ ८-१०च प्राणी उरलेले. तेही जखमी. आजारी. भुकेलेले. लहानगी अनुराधा हे सगळं पाहात होती. तिने एकदा थांबवायचा प्रयत्न केला. वाईट मारले खलाश्यांनी तिला. बास! त्यादिवसापासूनच अनुराधा कुणाशीही बोलेनाशी झाली. एक कोळी तिच्याबद्दल सहानुभूती बाळगून होता. लहानगं वय! उंची कमी!! त्या कोळ्याच्या खांद्यावर चढायची. झाडपाला तोडायची. आणि दिवसभर भटकून सगळ्या प्राण्यांना खाऊ घालायची. अगदी रोज! नित्यनेमाने!! खलाशी वेडी समजू लागले होते तिला. हीसुद्धा कुणी काही बोलले की दगड उगारुन मागे लागायची त्याच्या. तिच्या वेडेपणावर अजूनच शिक्कामोर्तब व्हायचे त्याने!!

    हा क्रम १-२ नव्हे, तर तब्बल २० वर्षे चालला. २० खडतर वर्षे! ह्याकाळात ती शेकडो वेळा पडली. हजारो वेळा धडपडली. बेदम मार तर कितीदा खाल्ला ह्याची गणतीच नाही! काय मिळवलं तिने त्या २० वर्षांत? ज्या बेटावर अवघे ८-१० प्राणी उरले होते, तिथल्या प्राण्यांची संख्या हजारावर गेली. एकट्या अनुराधाच्या तपश्चर्येमुळे!! १९८७ साली रॉस बेट सैन्याच्या ताब्यात गेले आणि अनुराधाच्या आयुष्यातला दुस्वासाचा भीषण काळ संपला. सैन्याने नुसत्या तिच्या कल्पना ऐकल्याच नाहीत तर त्या प्रत्यक्षात उतरण्यासाठी सगळी मदतसुद्धा केली. तिच्यामुळे हे बेट टिकून राहिलंय. आज अनुराधाचे वय ५१ वर्षे आहे व ती तिथली अधिकृत स्थलदर्शी (गाईड) आहे. पण एवढ्यावरच तिची कहाणी संपत नाही.

    आम्ही अनुराधाला भेटलो आणि ती बेटाची माहिती देऊ लागली. तेवढ्यात तिथे एक हरिण दिसले. त्याला पाहाताच अनुराधाने हाक मारली,
    “ए राजूऽऽ इधर आ”!
    आणि काय आश्चर्य, ते हरिण चक्क आम्हां माणसांच्या घोळक्यात येऊन उभे राहिले. अनुराधा त्याच्याशी गप्पा मारु लागली. जसजसे आम्ही पुढे जात गेलो, तसतसा आमचा समूह वाढत होता. हरणं आली, मोर आले, लांडोरी आल्या, ससे आले, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी आले. अनुराधा सगळ्यांशी गप्पा मारत होती. त्या प्राण्यांपैकी एकेकाच्या सवयी आणि स्वभाव सांगत होती. अगदी जवळच्या मित्र-नातेवाईकांबद्दल बोलावं तस्सं! मग ती मध्येच एखाद्या लांडोरीला म्हणायची,
    “रेश्मा, तेरा बच्चा तो बीमार था ना? किधर है, दिखा”?
    आणि ती लांडोर ताबडतोब तिच्या पिल्लाला शोधून घेऊन आली.
    “अरे, यह तो ज़ख़्मी है! जा उसे वह वाले पेड ते पत्ते चूसके लगा”!
    आणि खरोखरच ती लांडोर पिल्लाला घेऊन त्या झाडापाशी गेली व उपचार करायला लागली! मग ती कधी सश्याशी बोलायची तर कधी हरणांशी. अचानक वरुन एक बुलबूल पक्ष्यांचा थवा उडत गेला. अनुराधाने पटकन हाक मारुन बोलावलं. त्याबरोब्बर ते शेकडो पक्षी खाली उतरले. तिने मोठ्ठ्याने ओरडून सांगितले,
    “जाओ जाके बाकीके दोस्तोंकोभी बुलाके लाओ. बोलो, अम्मा बुला रही है!”
    पटकन चार-दोन पक्षी उडाले आणि अजून शे-सव्वाशे दोस्तांना घेऊन आले. सगळे जमल्यावर अनुराधाने त्यांना सांगितलं की,
    “अभी यह नये लोग है ना, इन्होंने कभी तुमको नज़दिकसे देखा नहीं. तो यह तुम्हारे फोटो-वोटो लेंगे. डरना नहीं हां!”
    आणि काय आश्चर्य! सगळे प्राणी, पक्षी आम्हांला हात लावू देऊ लागले. फोटो काढू देऊ लागले!!

    अशी अनुराधा. यांच्यापैकी कोणत्याही जीवाला तिने प्रशिक्षण दिलेले नाही. ती त्यांच्याचसोबत वाढलीये. हे सारं गणगोत आहे तिचं. त्यांना तिची भाषा समजते आणि तिला त्यांची! त्सुनामीने सगळंच्या सगळं कुटूंब हिरावून घेतल्यानंतर तर ह्या मंडळींशिवाय अनुराधाचं आपलं असं कुणीच राहिलं नाही. जे कुणी आहेत ते हेच आहेत. कित्येकदा त्यांना वाचवताना जीव धोक्यात घातलाय अनुराधाने. एक-दोन नव्हे, तर चक्क २५ वेगवेगळ्या शस्त्रक्रिया झाल्यायत तिच्यावर. तरीही तिच्या दिनचर्येत एक दिवसही खाडा झालेला नाही. मी तिला विचारलं,
    “ऐसी खस्ता तबियतके बावजूद कैसे कर लेती है आप यह सब”?
    तर म्हणाली, “वह जो उपर बैठा है ना, बहोत बडा झगडा चल रहा है मेरा उसके साथ! मैंने उसको बोल दिया है की, अगर यह जानवर ज़िंदा रखने है तो मुझे अपने पैरोंपे खडा रख. वरना बेशक़ मार दे मुझे. मेरा क्या है! कोई नहीं आगेपीछे रोनेवाला. मगर इन लोगोंका मेरे सिवा कोई नहीं. बस, तबसे भगवान मुझे मारता नहीं और इन जानवरोंका सहारा छिनता नहीं!”
    मी पाया पडू लागलो तर पाय चटकन मागे घेतला आणि प्रेमाने माझ्या पाठित धपाटा घालून हसत-हसत म्हणाली,
    “हट सुव्वर”!!

    निघताना आमच्यातल्या एकाने पटकन पाचशेची नोट काढून दिली तिला. तिने ती घेतली आणि “थँक्यू” म्हणाली. कुणी काही कुणी काही रक्कम देऊ केली तिला तर घेईचना. म्हणाली,
    “इतने ज़्यादा पैसे मैं नहीं ले सकती. पाँचसौ बस हो गए मेरे लिए”.
    ऐकेचना. शेवटी बळजबरी कोंबले पैसे तिच्या हातात. ती सांगत होती,
    “टूरिस्ट लोगोंसे तो मैं कई-कई बार पैसे लेतीभी नहीं. हाँ, पर अगर कोई एम्पी-एमेले आए, तो छोडती नहीं सालेको. उससे मनमर्ज़ी पैसे वसूलती हूँ. क्यूँ छोडे? हरामी रोज़ लूटते है हमें. कहीं तो जेबें ढीली करना सीखो!”
    तिच्या ह्या मार्मिक तत्त्वज्ञानाची गंमत वाटत होती. पण ते मनापासून पटतही होते! ती म्हणाली,
    “पीछले महिने वह तुम्हारे ठाकरेका बच्चा आया था ना? वह आनेवाला था मुझसे मिलने! उसके पहलेही उसका पीए आ धमका मेरे पास. कहने लगा, सुना है तुम किसीभी मिनिस्टर और पॉलिटिशियनको जो मनमें आए बोल देती हो? हमारे साहबके सामने ऐसा मत करना हाँ! मैं बोली, क्यूँ ना करु? अगर वह कुछ ग़लत बोलेगा तो मैं उसे नहीं छोडूँगी! बादमें जब उसका साहब आया तो मैंने उससे पूछा, तेरा पीए ऐसा बोल रहा था. तो वह बत्तीस दाँत दिखाके हँसने लगा! बोला, नहीं अम्मा जो तुमको ठीक लगे वहीं बोलो. छोडा नहीं मैंने उसकोभी! अच्छा आदमी लगता है पर वह!”

    भूतकाळातल्या कटू आठवणींमुळे अनुराधा सगळ्याच राजकारण्यांवर उखडून आहे. पण असं नाही की, ती नुसती फटकळच आहे. तिच्या मनात एका व्यक्तीविषयी अपरंपार भक्ती भरुन राहिलीये. महाराष्ट्राच्या जातीची ना गोताची अनुराधा आम्हांला सांगत होती –
    “जब दुनियाका अंत होता है ना, तब नई संस्कृती पनपती है. वह लोग ज़मीं खोदते है तो पीछली सभ्यताके कुछ बर्तन मिलते है, मूर्तीयाँ मिलती है. उन्हींको वह भगवान समझके पूजने लगते है. जब हमारी संस्कृती खत्म हो जाएगी ना, तबभी आनेवाली नस्ल ऐसीही खुदाई करेगी. उस मिट्टीसे पता है कौनसा भगवान निकलेगा? उस माटीसे निकलनेवाले भगवान होंगे, वीर विनायक दामोदर सावरकर..!”
    माझ्याच्याने पुढचे ऐकवलेच गेले नाही. कानांवर तिचे शब्द पडत होते केवळ. मेंदू त्यांचा अर्थच लावायचा बंद झाला होता. डोळ्यांतून अश्रूंचा श्रावण बरसत होता. ती म्हणाली,
    “..जब वह नस्ल सावरकरजीको भगवान मानना शुरु कर देगी, समझो बस तभीसे धरतीका स्वर्ग बनना शुुरु हो जाएगा!”
    सावरकरांच्या स्वतःच्या राज्यात त्यांची जात पाहून द्वेष करणारी डुकरं राहात असताना अडिच-तीन हजार किलोमीटर लांबवर सावरकरांना देव मानणारी ही बाई आम्हाला त्यांचा महीमा सांगत होती. डोळ्यांतून झरणारे पाणी आणि त्यात सूर्याचा प्रखर प्रकाश, यांमुळे अस्पष्ट दिसणारी अनुराधा त्याक्षणी मानवी वाटतच नव्हती, मानव राहिलीच नव्हती. ती झाली होती “द्वीपशिखा”! चमचमणारी तेजोमयी द्वीपशिखा!! इथून पुढचे माझे अंदमानातले सारे व्याख्यानदौरे केवळ आणि केवळ ह्या द्वीपशिखेच्या दर्शनानेच पूर्ण होणार आहेत!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    [सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी-पेस्ट करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com]

    image

  • जो तारपे गुज़री है..

    २०१४ साली सुपरस्टार रजनीकांतचा ‘कोचडयान’ (२३ मे) प्रदर्शित झाला. भारतातला पहिला एजाकर्षी (परफॉर्मन्स कॅप्चर) चित्रपट! अनेक वर्षे निर्माणाधीन असलेला १५० कोटींचा महत्त्वाकांक्षी चित्रपट!! चित्रपट धो-धो चालला. धो-धो म्हणजे जवळ जवळ १२५ कोटी. भारतात एखाद्या प्रादेशिक चित्रकथापटाने (ऍनिमेटेड सिनेमा) एवढी प्रचंड कमाई करण्याचे हे पहिले आणि एकमेव उदाहरण. उरलीसुरली रक्कम दूरचित्रवाणी अधिकारांतून मिळाली. पण म्हणजे रजनीचा चित्रपट जितका चालायला हवा, तितका काही ‘कोचडयान’ चालला नाहीच!! ते एक नवं पाऊल होतं, नवी सुरुवात होती. आणि अश्या सुरुवातीच्या पावलांना नेहमीच वाट्याला येणारं अपयश त्याच्याही वाट्याला आलं. अर्थात, रजनीचे चाहते (मीसुद्धा!!) प्रचंड नाराज होते कारण आमचा तलयवा तब्बल ४ वर्षांनंतर मुख्य भूमिकेत दिसणार होता, परंतु प्रत्यक्ष वाट्याला आली होती ती केवळ एजाकर्षी चित्रकथा!!

    रजनीने ह्या गोष्टीची मात्र ताबडतोब नोंद घेतली आणि ताबडतोब के. एस. रविकुमारच्या ‘लिंगा’वर काम सुरु केले. सुरुवातीलाच हेही घोषित करुन टाकले की जुनमध्ये चित्रणास सुरुवात झालेली असली तरी चित्रपट रजनीच्या वाढदिवशीच (१२ डिसेंबर! हो, बारा ठिकाणी मति चालवणाऱ्या साहेबांप्रमाणेच रजनीदेखील १२चाच आहे! एकाच दिवशी जन्मलेल्या व्यक्ती पण कमालीचे भिन्न स्वभाव!! एक देवमाणूस तर दुसरा.. असो!!) चाहत्यांना भेट म्हणून प्रदर्शित होणार. म्हणजे निर्माणपूर्व, निर्माण आणि निर्माणोत्तर अश्या तिन्ही गोष्टींसाठी हाती केवळ ६ च महिने!! रहमानपासून गुलज़ारपर्यंत सगळ्यांनी अक्षरशः रात्रीचा दिवस करुन काम केलं (तसा रहमान मात्र शब्दशः रात्रीचाच दिवस करतो, हा भाग वेगळा!!)! भल्यामोठ्या आजारातून उठलेला असूनही रजनीने सलग दोन दमवणाऱ्या (१ अंगावर मणामणांची जड यंत्रे वागवत एजाकर्षी, तर २रा देमार साहसपट!) चित्रपटांत काम केलं आणि ‘लिंगा’ ठरल्यादिवशी प्रदर्शित केला! २० वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या वर्षी रजनीचे सलग २ चित्रपट प्रदर्शित होत होते. चाहत्यांसाठी पर्वणीच जणू!! ‘लिंगा’ने पहिल्याच दिवशी २२ कोटींचा गल्ला जमवला!! हे भल्याभल्या हिंदी चित्रपटांनाही साधत नाही. प्रादेशिक चित्रपटांसाठी तर हा आजही अबाधित असलेला विक्रमच (मी नव्हे!!) आहे. ८० कोटींमध्ये बनलेल्या ‘लिंगा’ने एकूण १४९ कोटी कमावले. तरीदेखील काही वितरकांनी नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या. रजनीचा मोठेपणा पाहा, तो ह्या चित्रपटाचा निर्माता नसूनही त्याने निर्मात्यावर ओझे पडू न देता स्वतः ३३ कोटी रुपये वितरकांना दिले. कायदेशीररित्या रजनीवर कुठलीही जबाबदारी येत नसूनही!! हा आहे रजनी. पैश्यांपेक्षा जास्त माणसांना जपणारा तलयवा!!

    पण एकूणात काय, तर रजनीचे सलग २ चित्रपट म्हणावे तसे (शाब्बास!!) चालले नाहीत. ते त्यावर्षीच्या इतर अनेक चित्रपटांपेक्षा जोरात चालले, हा भाग वेगळा!! ह्याने रजनीच्या सुपरस्टारपदाला काडीमात्रही धक्का बसणार नव्हता. रजनी ३ तास पडद्यावर काहीही न करता स्वस्थ बसून जरी राहिला, तरीही आम्ही जगभर पसरलेले त्याचे चाहते आवडीने तिकीट काढून पाहू!! याची रजनीला पूर्णपणे जाणीव आहे. पण मग तरीही त्याने काय केलं माहितीये? त्याने रणजीत नावाच्या एका तरुण, आजवर केवळ २च चित्रपट बनवलेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट स्वीकारला!!

    कोण बुवा हा रणजीत? जश्या नवकथा, नवकविता असतात; तसेच चित्रपटांतही प्रवाहापेक्षा वेगळे जाऊ पाहाणारे, कला आणि व्यवसाय दोन्हींचा मेळ साधू पाहाणारे नव-चित्रपट असतात!! रणजीत हा असाच ताज्या दमाचे पण कमी खर्चाचे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक. त्याच्या अट्टाकथ्थी (२०१२) आणि मद्रास (२०१४) ची स्तुती करताना समीक्षक आजही थकत नाहीत. आपला सारा मानमरातब, स्टारडम बाजूला ठेवून रजनीने ह्या रणजीतचा चित्रपट स्वीकारलाय. दक्षिण चेन्नईत घडणारी अगदीच स्थानिक पातळीवरची कथा असेल. नाव ठरायचेय अजून! पण रजनी ह्या चित्रपटात एका वयस्कर डॉनची भूमिका करणार आहे म्हणे!! खरं तर सलग ४ बिगबजेट चित्रपट हिट दिलेला राष्ट्रपती-पारितोषिकविजेता शंकर रजनीची ‘यन्धिरन २’साठी वाट पाहातोय. यन्धिरन/रोबोट (२०१०) ह्या अतिशय गाजलेल्या चित्रपटाचा हा पुढचा भाग. मुख्य भूमिकेत अर्थातच रजनी. आणि खलनायकी भूमिकेत साक्षात चियान विक्रम!! अक्षरशः पर्वणी असणार आहे पर्वणी!! पण रजनीने शंकरलाही थांबवून ठेवलेय रणजीतच्या चित्रपटासाठी!! रणजीतच्या चित्रपटाच्या निमित्ताने रजनी ८ वर्षांत प्रथमच ‘रहमाने’तर संगीतकारासोबत (संतोष नारायणन) काम करणार आहे. म्हटलं तर प्रयोग, म्हटलं तर जोखीम! काय गरज आहे वयाच्या ६५ व्या वर्षी, सारे उच्चतम तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ समोर हात जोडून उभे असतानाही, एका कमी खर्चाच्या चित्रपटाची जोखीम पत्करण्याची? पण निष्ठावंत चाहते कोट्यवधी आहेत हो, आत्ताच योग्य वेळ आहे ‘चित्रपट’ करायची! खराखुरा, टीकाकारांची तोंडे बंद करणारा, अभिनयाला वाव असलेला, वितरकांना फायदेशीर ठरणारा कमी खर्चातला चित्रपट!! शेकडों कोटी काय, नंतर ‘यन्धिरन २’मधूनही मिळवता येतीलच की!! पण हीच वेळ आहे स्वतःला नव्याने शोधण्याची. रुमी म्हणतो, ‘जग जेव्हा तुम्हाला गुडघे टेकायला भाग पाडतं ना, तेव्हाच परिपूर्ण स्थिती लाभते प्रार्थना करण्यासाठी’!! मला वाटतं, सलग २ चित्रपटांचं अपयश (!) पाहिलेला रजनी नेमकं हेच करतोय!!

    आणि विनयशीलता तर केवढी? एकदा कुठल्याश्या चित्रपटाच्या यशानंतर नेहमीप्रमाणेच साधासा वेष परिधान केलेला रजनी बेंगरुळूमधील एका मंदिरात गेला होता. पायरीशी जमिनीवर बसलेला असताना, एका बाईने त्याला भिकारी समजून १० रुपयाची नोट देऊ केली. रजनीला गंमत वाटली. त्याने मान लववून ती नोट स्वीकारली. जरावेळाने गाडीच्या दिशेने निघालेला रजनीकांत पाहिल्यावर बाईंना आपण काय पाप केले आहे ते समजून चुकले. घाईघाईने त्या रजनीकडे धावल्या आणि वारंवार क्षमायाचना करु लागल्या. रजनी हसला. म्हणाला, “आई तुम्ही माफी मागू नका. माझ्या पाया पडू नका. आपण दोघेही देवाच्या दरबारात आहोत. बहुतेक हा त्याच परमेश्वराचा संकेत असावा मला दाखवून देण्यासाठी की, बाहेर तू असशील मोठा सुपरस्टार; पण प्रत्यक्षात ही किंमत आहे तुझी”!! गायत्री श्रीकांत ह्यांनी रजनीकांतचे ससंदर्भ चरित्र लिहिले आहे. त्यात नोंदवलेला किस्सा आहे हा! काय बोलणार ह्या नम्रतेच्या महासागरापुढे?

    आयला, विषयांतर झालं की! हा तर, हा जो दिग्दर्शक रणजीत आहे ना, ह्याची कामाची एक पद्धत आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटापूर्वी त्यातील सर्व कलाकारांचं एक शिबिर घेतो तो. प्रत्यक्ष चित्रणाच्यावेळी पुनरांकने (रिटेक्स) वाचतात ना त्यामुळे! मुळातच कमी रक्कम आणि साधने उपलब्ध असली की, अश्या युक्त्या कराव्या लागतात. चित्रपटाच्या भाषेत ह्याला ‘चतुर चित्रनिर्मिती’ (स्मार्ट फिल्ममेकींग) म्हणतात!! हादेखील चित्रपट सुरु करण्याआधी त्याने असेच एक काटेकोर शिबिर आयोजिले होते. अर्थातच रजनीला दृश्य ‘ओके’ देण्याची काय गरज? तो सुपरस्टार आहे, त्याने दृश्य ‘ओके’ देण्याऐवजी त्याने दिलेलेच दृश्य निर्मात्या-दिग्दर्शकांनी ‘ओके’ करावे अशी परिस्थिती. पण रणजीत अक्षरशः चाट पडला, ज्यावेळी त्याच्या शिबिरात रजनी उपस्थित राहिला. रजनी नुसता आलाच असे नाही, तर त्याने शिबिर पूर्णसुद्धा केले. सारे ऐकले. समजून घेतले. शंकादेखील विचारल्या. सीए, सीएस मंडळींना सतत वेगवेगळे ‘रिफ्रेशिंग कोर्सेस’ करावे लागतात, त्यावेळी जुन्याजाणत्या अनुभवी मंडळींची काय कंटाळवाणी अवस्था होते, जरा विचार करा; म्हणजे रजनीने काय दिव्य केलंय ते समजेल! हे अतिप्रचंड कष्ट तो रोज उपसतो म्हणूनच एकेकाळी हमाल असलेला आणि नंतर बसचा वाहक बनलेला शिवाजीराव गायकवाड आज आंतरराष्ट्रीय सुपरस्टार रजनीकांत आहे. लक्षात घ्या, कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होणं फार सोपं असतं. अवघड असतं ते मिळालेल्या यशाला कायम टिकवून ठेवणं!! ग़ालिब म्हणतो, “जो साज़से निकली है वो धुन सभीने सुनी है, पर जो तारपे गुज़री है वो किसने सुनी है”!! आपल्याला रजनीकांतवरचे विनोद माहिती असतात, त्याचं देवदुर्लभ स्टारडमही दिसतं; पण रजनी आज सलग ३५ वर्षे सर्वोच्च स्थानावर आहे, ते सर्वोच्च स्थान टिकवण्यासाठी तो गेली ३ दशके रोज घेत असलेले कष्ट मात्र कुणाला क्वचितच माहिती असतात! वाद्यातून निघालेले स्वर सर्वांनाच आवडतात, पण त्यासाठी तारेला काय भोगावं लागतं, ‘जो तारपे गुज़री है’; ते मात्र क्वचितच कुणाला समजतं. रजनीचा मेहनतीला ना ३५ वर्षांपूर्वी नकार होता, ना आज वयाची पासष्टी गाठल्यावरही नकार आहे. आणि म्हणूनच, जरी अजून नावसुद्धा ठरलेले नसले तरीही मी खात्रीने सांगू शकतो की, रणजीतचा चित्रपट यशस्वी होणार! तुफान यशस्वी होणार! रजनीकांत काल सुपरस्टार होता, आज सुपरस्टार आहे आणि उद्यासुद्धा तोच सुपरस्टार राहाणार! ही अशीच गेल्या २ वर्षांत तारपे काय काय गुज़री है, याची कहाणी!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

    image

  • एका पेटंटची गोष्ट

    आज आपण अगदी सहजपणे मोबाईल, रेडिओ इ. साधने वापरतो. परंतु या सर्व ‘बिनतारी संदेशवहना’चा (Wireless Telecommunication) शोध कुणी लावलाय माहितीये का? हा शोध लावणारी व्यक्ती एक भारतीय आहे, नव्हे आपल्या सर्वांच्या परिचयाचीदेखील आहे! त्यांचं नाव आहे, आचार्य जगदिशचंद्र बसू (१८५८-१९३७)!! होय, ‘वनस्पतींनाही जीव असतो’ ही हिंदूधर्मातील संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणारे व त्या तत्त्वावर आधारित ‘क्रेसोग्राफ’ या यंत्राची निर्मिती करणारे प्रा. जगदिशचंद्र बसू!! ते नुसते वनस्पतीशास्त्रज्ञच नव्हते, तर भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, पुरातत्त्वविद, आणि विज्ञानकथालेखकदेखील होते! एवढेच कश्याला, आज वापरात असलेल्या ‘रेडिओ’च्या निर्मितीचेही श्रेय प्रा. बसू यांनाच दिले जाते, हे सर्वच वैज्ञानिक प्रगतीसाठी पाश्चिमात्यांकडे आस लावून पाहाणाऱ्या भारतीयांच्या गावीही नसेल! मग चंद्रावरील एका खळग्याला सन्मानपूर्वक त्यांचे नाव देण्यात आले आहे, हे माहिती असायची शक्यता तर आणखीनच धूसर!

    image
    आचार्य जगदिशचंद्र बसू

    मुळात आचार्यांचा स्वभावच निरीच्छ, त्यामुळेच त्यांनी ना कधी आपल्या संशोधनाचा व्यवसाय केला ना कधी पेटंट घेण्याच्या फंदात पडले. किंबहूना संशोधनांचे स्वामित्त्वाधिकार घेऊन त्यांचे बाजारीकरण करण्याला त्यांचा कायमच विरोध होता. ३० नोव्हेंबर १९१७ दिनी ‘बोस इन्स्टिट्यूट’ या आपल्या जगप्रसिध्द संशोधनसंस्थेचे उद्घाटन करताना त्यांनी दिलेल्या ‘Voice of Life’ या प्रसिद्ध व्याख्यानातही त्यांनी याच तत्त्वाचा पुरस्कार केलेला आढळतो! परंतु याच संस्थेच्या वेबसाईटवर (www.boseinst.ernet.in) मात्र त्यांच्या ‘Galena Detector’ या संशोधनाचे पेटंट त्यांच्या नावावर असल्याचे सांगितले आहे. हे काय गौडबंगाल आहे बुवा? वास्तविक स्वत: आचार्य बसू यांनीच लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट या विख्यात संस्थेत व्याख्यान देताना आपले ‘Galena Detector’ हे संशोधन मांडले होते व स्पष्टपणे नमूद केले होते की, ‘सदरचे यंत्र व त्यापाठचे संशोधन सर्वांनाच व्यावसायिक व इतर सर्व वापरासाठी मोफत उपलब्ध असेल’ (संदर्भ : ‘विज्ञान प्रसार’या शासकीय उपक्रमाच्या वेबसाईटने प्रकाशित केलेले सुबोध महंतीलिखित आचार्य बसू यांचे चरित्र). एवढेच कश्याला, त्याकाळात या संशोधनाच्या व्यावसायिक उपयोजनासाठी आलेले लठ्ठ रकमेचे सारेच प्रस्ताव आचार्य बसू यांनी धुडकावून लावले होते. तरीही या संशोधनाचे पेटंट आचार्यांच्या नावे कसे काय आढळते?

    image
    स्वामी विवेकानंद

    याचे उत्तर आहेत स्वामी विवेकानंद!! बसूंचे Galena Detector हे जगातील पहिलेवहिले ‘अर्धवाहक’ (Semi-Conductor) होय. यालाच पहिल्या पिढीतला ‘प्रकाशयोगी घट’ही (Photovoltaic Cell) म्हणता येईल! असे म्हणतात की, स्वामी विवेकानंदांना आचार्यांच्या या संशोधनाचे भविष्यकालीन महत्त्व जाणवले होते. तसेच, आपल्या विरक्त वृत्तीमुळे आचार्य या संशोधनाचे पेटंट घेऊ इच्छित नाहीत, हेही स्वामीजींनी ठाऊक होते (संदर्भ : The Monk As Man – The Unknown Life Of Swami Vivekananda, पृ. १४-२५, लेखक : मणिशंकर मुखर्जी, पेंग्विन बुक्स प्रकाशन). त्यामुळेच शिकागो येथील धर्मसभेसाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी आचार्यांची भेट घेतली व त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येत नाहीसे लक्षात आल्यावर त्यांनी सदर यंत्राच्या प्रती तयार केल्या व आपल्यासोबत अमेरिकेला नेल्या. अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात स्वामीजींनी नुसती व्याख्यानेच नाही दिली, तर आपली शिष्या व प्रख्यात लेखिका-समाजसेविका श्रीमती सारा बुल हिला सांगून सदरच्या यंत्राचे पेटंटदेखील आचार्य बसूंच्या नावे नोंदवले!!

    आज सदर संशोधनाचे पेटंट पाहू गेल्यास ते अमेरिकेत नोंदवले आहे, हे दिसते (पेटंट क्र. US755840). आवेदक या नात्याने आचार्यांच्या नावासोबत श्रीमती बुल यांचेही नाव दिसते. शिवाय स्वामीजींची वैज्ञानिक संशोधनाबाबतची दूरदृष्टी व त्यांचा आचार्यांशी असलेला स्नेहदेखील सुपरिचित आहे. तेव्हा सदरचे पेटंट हे स्वामीजींच्याच सांगण्यावरून नोंदवण्यात आले हे उघड आहे. किंबहूना श्रीमती बुल व आचार्य यांचा परिचय स्वामी विवेकांनंदांमुळेच झाला. श्रीमती बुल यांनी आचार्यांना प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी ४००० डॉलर्सची मदत केल्याचेही उल्लेख आढळतात (संदर्भ : Swami Vivekananda – The Living Vedanta, पृ. २४०-२४२, लेखक : बद्रिनाथ चतुर्वेदी). परंतु स्वामीजी शिकागोसाठी मार्गस्थ झाले ३१ मे १८९३ दिनी आणि आचार्यांनी रेडिओलहरींवरील आपले संशोधन सुरु केले १८९४ साली. तेव्हा सदरचे पेटंट हे श्रीमती बुल यांनी स्वामीजींच्याच सांगण्यावरून नोंदविले हे जरी खरे असले (संदर्भ : Swami Vivekananda & Scientists, पृ. १४, विद्यार्थी विज्ञान मंथन), तरी स्वामीजी स्वत: ते यंत्र घेऊन अमेरिकेला गेले होते ही कथा खोटी असावी, असे मला वाटते. कारण, सदर पेटंटचा आवेदन दिनांक (Filing Date) हा ३० सप्टेंबर १९०१ असा आढळतो, तर संमति व प्रकाशन दिनांक (Granting & Publication Date) हा २९ मार्च १९०४ असा (Application No. : US19010077028 19010930) म्हणजेच, स्वामीजींच्या महानिर्वाणानंतरचा आढळतो.

    image
    श्रीमती सारा बुल

    परंतु सदर पेटंटची नोंदणी ही स्वामीजींच्या सांगण्यावरूनच झाली, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. आज जेव्हा भारताने हळद, बासमती तांदूळ इ. अस्सल भारतीय संशोधनांचे पेटंट्स वेळीच न नोंदविल्यामुळे झालेला प्रचंड त्रास अनुभवलाय, त्या पार्श्वभूमीवर तर स्वामीजींची दूरदृष्टी अधिकच खुलून दिसते. एवढेच नव्हे, तर संशोधनकार्यास व्यापक स्वरूप येण्यासाठी संशोधनसंस्था असावी ही टाटा इन्स्टिट्यूटची आधारभूत कल्पनादेखील स्वामीजींनीच सर जमशेदजी टाटा यांना जपान ते शिकागो या प्रवासात सांगितली होती (संदर्भ : टाटांनी स्वामीजींना दि. २३ नोव्हेंबर १८९८ रोजी लिहिलेले पत्र). थोडक्यात, स्वामीजी केवळ अध्यात्मातच रममाण होणारे नव्हते, तर भौतिक जगात मानाने व ताठ मानेने जगण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचीदेखील जाण होती त्यांच्याठायी! एकप्रकारे अध्यात्म आणि विज्ञानाचा अपूर्व संगमच म्हणा ना! आजच्या भारताला याचीच सर्वाधिक आवश्यकता आहे. अध्यात्म व विज्ञान ही एकाच गाडीची दोन चाके आहेत. कोणतेही एक चाक जर पंगू असेल, तरीही गाडी मुक्कामी पोहोचू शकत नाही. भौतिक जगात जगण्यासाठी विज्ञान अत्यावश्यक आहेच, परंतु माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी क्रियाशील अध्यात्मदेखील तितकेच आवश्यक आहे, हा संदेशच जणू स्वामीजींनी कृतीद्वारे दिला आहे!! स्वामीजींचा जन्म मकरसंक्रांतिचा! त्यानिमित्ताने तिळगुळ खाता-खाता आपण सर्वांनी स्वामीजींच्या चरित्रातून एवढा एक बोध घेतला तरी पुरे!!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच स्वामी विवेकानंद या विषयावर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा:  www.vikramedke.com)

  • विक्रमवीर ‘विक्रम’!!

    आपल्यापैकी प्रत्येकाचे स्वप्न असते, कधीकाळी आपणही चित्रपटात ‘हिरो’ व्हावं. दररोज शेकडो लोक हे स्वप्न उराशी बाळगून मायानगरी गाठतात आणि दररोज लाखो स्वप्ने चक्काचूर होतात! साठच्या दशकात तमिळनाडूतल्या व्हिक्टर अल्बर्टने हेच स्वप्न उराशी बाळगत चेन्नईची मायानगरी गाठली होती. खरं तर मायानगरी वाटते तितकी निर्दयी नाही. इथे प्रत्येकाला काही ना काही काम मिळते. व्हिक्टरलाही मिळाले! मात्र तुम्ही किती का मोठ्या स्टारचे का बेटे असेनात, इथे टिकतात केवळ प्रतिभा आणि कष्टांचा अजोड मिलाफ असलेलेच! व्हिक्टर कष्टाळू होता, पण ना त्याच्याकडे प्रतिभा होती ना तंत्रशुद्धता. त्यामुळे लहानसहान भूमिकांवरच त्याला समाधान मानावे लागले. सखोल ज्ञानाअभावी वडलांची झालेली फरपट केनेडी विनोदराज या व्हिक्टरच्या लहानग्या मुलाने केव्हाच ओळखली होती. नव्हे, वाट्याला आलेल्या भोगांनी ती अक्षरशः मनावर कोरली गेली होती त्याच्या! १७ एप्रिल १९६६ रोजी जन्माला आलेल्या या मुलाने, यातून बरोब्बर धडा घेतला. चेन्नईच्या नाट्यवर्तुळात नाटकांची काही कमतरता नव्हती. तिकीटही फारसं नसायचं! रोज कोणत्या ना कोणत्या नाटकास जायचा. नाटकाच्या बारीक-सारीक अंगांची निरीक्षणे करायचा. कुणाच्याही नकळत वेगवेगळ्या कलाकारांच्या अभिनयाची नक्कल करायला पाहायचा. नक्कल करून झाल्यावर तोच प्रसंग आपल्याला उमगला तसा सादर करायला पाहायचा. यातून त्याला गवसत होता त्याच्यातला मेहनती नवनवोन्मेषशाली अभिनेता, तर त्याच्या शाळा-कॉलेजला गवसत होता अभिनयाचे हमखास बक्षिस मिळवून देणारा कलावंत!! वडलांनी या क्षेत्राचे चटके सोसले होते, त्यामुळे त्यांना केनेडीची काळजी वाटायची. केनेडीने मात्र अभिनयालाच सर्वस्व मानलेले. कुणीच ‘गॉडफादर’ नसताना आपला पोरगा टिकणार कसा, ही वडलांची चिंता; तर माझी मेहनतच माझी ‘गॉडफादर’ बनेल, हा केनेडीचा विश्वास!!

    वडलांना जे जमले नाही, ते आपण करून दाखवायचेच, नुसता अभिनेता वा स्टार नव्हे तर सुपरस्टार व्हायचेच ही केनेडीची जिद्द. त्या जिद्दीला मेहनतीची जोड. एकीकडे इंग्रजी साहित्याचे पदवीशिक्षण चाललेले असतानाच केनेडी न चुकता नृत्य शिकायला जायचा. हो, भारतात सुपरस्टार व्हायचे तर नृत्य हे यायलाच हवे! केनेडीने हे ओळखले होते. शास्त्रीय आणि फिल्मी दोन्ही प्रकारच्या नृत्यात त्याने पारंगतता मिळवली. दरम्यान आयआयटी-मद्रासच्या मानाच्या नाट्यमहोत्सवात केनेडीला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि वाटले, आता तमिळ चित्रपटसृष्टीचे दरवाजे आपल्यासाठी उघडतील! नियती क्रूरपणे हसली असावी याक्षणी! केनेडीला ट्रकने उडवले. भीषण अपघात झाला. पायांचा चुराडा झाला होता अक्षरशः.  शिक्षणाची आणि उमेदीची तीन वर्षे केनेडीला बिछान्यावर काढावी लागली. याकाळात त्याच्या पायांवर एक-दोन नव्हे, तर तब्बल २३ शस्त्रक्रिया झाल्या! डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की, हा इथूनपुढे कधीच नाचू शकणार नाही. डॉक्टरांच्या विधानाने स्वप्नांच्या विमानाला अजून इंधन पुरवले असावे बहुतेक! जरा चालता यायला लागल्यावर केनेडीने पुन्हा एकवार नृत्याभ्यास सुरू केला. रोज जीवघेण्या वेदना सहन करायचा आणि तरीही परिश्रम थांबत नसायचे! या परिश्रमांचे फळ असे की, ज्या आयआयटी-मद्रासच्या स्पर्धेनंतर केनेडीचा अपघात झाला होता, बरोब्बर तीन वर्षांनंतर केनेडीने तीच स्पर्धा तितक्याच ताकदीने गाजवली!! या स्पर्धेमुळेच ख्यातनाम दिग्दर्शक सी. व्ही. श्रीधर यांनी केनेडीला आपल्या चित्रपटात मुख्य भूमिका देऊ केली, नाव होते ‘एन कादल कन्मणी’ (१९९०)! पण ‘केनेडी’ असे कुठे नाव असते का सुपरस्टारचे? रुपेरी पडद्यावर राज्य करायचे तर त्याला शोभेल असे नाव नको? केनेडीने विचार केला – वडील व्हिक्टर यांच्या नावातून ‘वि’ घेतला, स्वत:च्या केनेडी नावातून ‘क’ घेतला, आई राजेश्वरीच्या नावातून ‘र’ घेऊन स्वत:च्या नावातून घेतलेल्या ‘क’ला जोडला – झाला ‘क्र’; आणि स्वत:ची सूर्यराशी ‘मेष’मधून घेतला ‘म’!! यातून साकारले भावी सुपरस्टारचे नाव — ‘विक्रम’!!

    ‘एन कादल कन्मणी’ने बरे यश मिळवले. म्हणून काही कुणी एका रात्रीत स्टार होत नाही. जे जितक्या वेगाने येते, ते तितक्याच वेगाने ओसरत असते. विक्रमला पहिला ‘हिट’ मिळायला थोडीथोडकी नाही, तर तब्बल ९ वर्षे वाट पाहावी लागली! याकाळात त्याने लहानसहान भूमिका केल्या. पोट भरण्याकरता इतर ‘बिझी’ नायकांसाठी ‘डबिंग’ केली. जी भुमिका मिळेल ती जीव तोडून केली. मणिरत्नमने त्याला ‘बॉम्बे’ (१९९३) देऊ केला होता, पण इतर एका भूमिकेसाठी वाढवलेली दाढी काढावी लागेल; म्हणून या पठ्ठ्याने साक्षात मणिरत्नमला ‘नाही’ म्हणायची हिंमत दाखवली! वास्तविक ती साधीशी भूमिका सोडून राष्ट्रपती पारितोषिकविजेत्या मणिकडे गेला असता तर विक्रमला कुणीही दोष दिला नसता. परंतु ती विक्रमवर विश्वास दाखवलेल्या त्या दुसऱ्या दिग्दर्शकाशी बेईमानी झाली असती. साक्षात कलेशीच बेईमानी झाली असती. आणि बेईमानीचे यश विक्रमला नको होते. एक वेळ तर अशी होती की – विक्रम रोज दिवसभर काम करायचा, संध्याकाळी नृत्याभ्यास करायचा आणि रात्री उशीरापर्यंत जागून इतरांसाठी ‘डबिंग’ करायचा! त्या पडत्या काळातही त्याने कधीच कुणाकडे तोंड वेंगाडले नाही. त्याही काळात मेहनत हीच त्याची ‘गॉडफादर’ होती!!

    सात वर्षे पराकोटीचे अपयश झेलल्यावर, एके दिवशी आपला पहिलाच चित्रपट करू पाहाणारा ‘बाला’ (जो आता अनेकानेक राष्ट्रपती पारितोषिकांसह तमिळच नव्हे तर जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीतले बडे प्रस्थ आहे!) नावाचा एक नवखा दिग्दर्शक विक्रमकडे आला. चित्रपटाचे नाव होते ‘सेतू’ आणि विक्रमची भूमिका होती ‘कॉलेजातला राऊडी जो एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि मारहाणीत डोक्याला मार बसून वेडा होतो’. अतिशय आह्वानात्मक भुमिका! विक्रमने हे आह्वान स्वीकारायचे ठरवले. काही दिवसांचेच चित्रिकरण असणार होते. ‘चियान (म्हणजे राऊडी!) सेतू’च्या या कॉलेजकुमार अवतारासाठी विक्रमने अक्षरशः २१ किलो वजन कमी केले. मध्यंतरानंतर भूमिकेत होणाऱ्या बदलासाठी नखे वाढवली. आणि दुर्दैवाने पुन्हा एकवार डाव टाकला! या शोकांत चित्रपटास उचलायला कुणीही वितरक तयार होईना. रंगभूषेच्या सातत्यासाठी विक्रमला दुसरे कोणतेच काम स्वीकारता येईना. अथक मेहनत वाया जाते की काय अशी स्थिती! तब्बल दोन वर्षं बेकारीत काढली विक्रमने. अखेरीस नियतीला दया आली आणि डिसेंबर १९९९ मध्ये चेन्नईच्या एका उपनगरातल्या अगदी लहानश्या चित्रपटगृहात ‘सेतू’ प्रदर्शित झाला. रोज फक्त एकच खेळ. तोही दुपारचा! पण हळूहळू ‘माऊथ पब्लिसिटी’ होत गेली आणि ‘सेतू’ लोकांना आवडला! चित्रपटगृहांनी तो मागून घेतला. खेळ वाढले! एकाच खेळापुरता एकाच चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला ‘सेतू’ तमिळनाडूतल्या अनेक चित्रपटगृहांत १०० आठवडे चालला! आणि बुद्ध हसला! विक्रमला पहिलेवहिले व्यावसायिक यश मिळाले. आणि विक्रमला मिळाले ‘चियान’ हे बिरूद! याच ‘सेतू’चा पुढे सलमान खानने ‘तेरे नाम’ नावाने रिमेक केला, हे चाणाक्ष वाचकांस सांगणे न लगे!!

    पण विक्रमच्या कथेतून काय शिकायचं, तर हे की यशाला लघुमार्ग नसतो. मान मोडेस्तोवर काम आणि आत्मा श्रमेपर्यंत जीव ओतावा लागतो, तेव्हा कुठे यशाचं दार जरासं किलकिलं होतं! ते उघडेल आणि कायमच उघडे राहील, याची इवलीशीही खात्री नसते. खरे वीर आपल्या प्रचंड कष्टांच्या जोरावर त्या दाराला बंद होण्यापासून अडवून धरत असतात! ‘सेतू’च्या यशानंतर विक्रमवर भूमिकांचा अक्षरशः पाऊस पडू लागला. पण ज्याने अपयश चवीचवीने पचवलेलं असतं ना, तो यशाच्या गोडीवर सहजासहजी विश्वास ठेवत नसतो. ‘सेतू’नंतर चक्क ६५ दिवस विक्रमने एकही चित्रपट स्वीकारला नाही. स्वत:ला वेळ दिला आत्मपरिक्षणासाठी – आपण योग्य मार्गावर तर आहोत ना? आणि अत्यंत विचारपूर्वक ‘धिल’ (२००१) ही पोलिसकथा स्वीकारली. पुन्हा तितकीच मेहनत. काहीही न खातापिता फक्त फळे आणि रसावर दिवस काढले – अप्रतिम देहयष्टी कमावली. ही जी मी गोष्ट सांगतोय ती ९९-२००० च्या सुमाराची. तेव्हा हिंदीतही कुणा तथाकथित ‘परफेक्शनिस्ट’चा परफेक्शनिस्ट म्हणून उदय नव्हता झाला, त्याकाळात एक प्रादेशिक कलाकार भूमिकेत अजोड परिपूर्णता आणत होता! याकाळात विक्रमने पूर्वीच स्वीकारलेले खूप सारे चित्रपट झळकले. त्यांपैकी खूप सारे त्याच्या नावावर चालले, काही अगदीच नाईलाजास्तव स्वीकारलेले होते, ते आपटले. विक्रमने कुठेच लक्ष दिले नाही. मेहनत चालू ठेवली. आणि ‘धिल’ने पुन्हा एकवार इतिहास रचला! विक्रमने सिद्ध केले की, तो नुसता समीक्षकप्रिय अभिनेता नाहीये, तर मसालापटही तो तितक्याच ताकदीने करू शकतो. त्याच वर्षी विक्रमचा आणखी एक चित्रपट आला, दिग्दर्शक विनयनचा ‘काशी’. लोकगीते गाणाऱ्या अंध खेडूताची भूमिका होती विक्रमची. लोक अंधाची भूमिका कशी करतात हो? निरीक्षण करतात, हाताने चाचपडण्याचा अभिनय करतात. विक्रमने या भूमिकेची तयारी कशी केली माहितीये? रोज सकाळी घराच्या गच्चीवर जायचा आणि सूर्याकडे पाहात त्राटक करायचा. डोळ्यांसमोर अंधारी यायची. चक्कर यायची. काहीही दिसेनासं व्हायचं. हे सर्व कश्यासाठी, तर केवळ आंधळ्या माणसाची खरोखर काय संवेदना असेल ते समजून घेण्यासाठी! चित्रपटात पूर्णवेळ बुब्बूळे वर करून वावरला तो! या भूमिकेतील अभिनयाने अवघ्या तमिळनाडूला ढसढसा रडवलं. समीक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या विक्रमवर. याच भूमिकेने विक्रमला पहिलेवहिले ‘फिल्मफेअर’ मिळवून दिले आणि त्याची दृष्टी कायमची अधूदेखील केली! यानंतर विक्रमला जो चष्मा लागला, तो कायमचाच! हा आहे भूमिकेत परिपूर्णता येण्यासाठी स्वत:च्या शरीररसंपत्तीची किंमत मोजणारा विक्रम!!

    २००३ च्या ‘सामी’ची हिंदीत संजय दत्तने ‘पोलिसगिरी’ नावाने अत्यंत फालतू नक्कल केली होती. मूळ रजनीपासून कमलपर्यंत सर्वांना स्टार बनवणाऱ्या के. बालचंदरची निर्मिती आणि विक्रमचा अजोड अभिनय! विक्रमसमोर आह्वान होते, ‘सामी’मधला पोलिस अधिकारी जराही ‘धिल’सारखा न वाटू देण्याचे! भूमिका वेगळी, त्यापाठची मेहनत वेगळी आणि लाभलेले यशही वेगळेच!

    रंगभूषेवर तर सारेच मेहनत करतात, विक्रम भूमिकेत अक्षरशः शिरतो. खऱ्या अर्थाने जगतो ती भूमिका. त्याची हीच मेहनत त्याला कमल हासनपेक्षाही वेगळ्या वर्गात नेऊन ठेवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शंकरचा ‘आन्नियन’ (२००४)!! हा चित्रपट आपल्यापैकी प्रत्येकाने ‘अपरिचित’ नावाने हिंदीत ‘डब’ झालेला पाहिलाय. त्यामुळे माझा मुद्दा तुम्हाला बरोब्बर लक्षात येईल. कमल हासनसारख्या एकाच चित्रपटात खूप साऱ्या वेगवेगळ्या भूमिका करण्याचे आह्वान पेलणे वेगळे आणि ‘अपरिचित’मध्ये विक्रमने एकाच वाक्यात एकापाठोपाठ एक तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या भावना ओतणे वेगळे!! अश्या भूमिका विक्रमला वेगळे असे त्याचे स्वतःचे यशोमंदिर मिळवून देतात. मग तो मणिरत्नमच्या ‘रावणन’ (२०१०) मधील भयकारी खलनायक असो वा ‘तांडवम’ (२०१२) मधला अंध ‘रॉ एजंट’ असो वा ‘डेव्हिड’ (२०१३) मधला कोळी! ‘दैवा तिरुमगळ’ (२०११) साठी तर तो चक्क महिनाभर मनोरुग्णांमध्ये राहिला होता, निरीक्षणे केली होती; एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे नोंदी घेतल्या होत्या! प्रत्येक भूमिका वेगळी अभिनयक्षमतेची नवनवे मानांकन रचणारी!!

    २००३ मध्ये आलेल्या बाला-विक्रमच्या ‘पिधामागन’ने ‘सेतू’चीच पुनरावृत्ती केली. कबर खोदण्याचे काम करणाऱ्या स्वमग्न (ऑटिस्टिक) व्यक्तीची भूमिका. एकही वाक्य नाही. संवाद नाही. जे काय व्यक्त व्हायचे ते फक्त चेहऱ्यावरील हावभावांमधून! फार काय सांगू, या भूमिकेने विक्रमला राष्ट्रपती पारितोषिक मिळवून दिलेय!!

    सध्या विक्रम शंकरचा ‘आय’ नावाचा चित्रपट करतोय. प्रादेशिक चित्रपट असूनही त्याचे बजेट शंभर कोटींहून अधिक आहे. यात विक्रमला तीन भूमिका साकारायच्या आहेत. एक अगदी बारीक माणसाची, एक अतिशय सशक्त माणसाची आणि एक जनावराची! तिन्ही भूमिकांत परिपूर्णता येण्यासाठी विक्रमने आपले वजन गरजेप्रमाणे ११० किलोंपर्यंत वाढवले तर अगदी ४० किलो इतके कमीही केले. टक्कल करावे लागणार होते. भुमिकेची गुप्तता राखण्यासाठी त्याकाळात सहा महिने सूर्यदर्शन केले नाही त्याने! वजन राखण्यासाठी सलग दोन वर्ष विशेषकरून बनवलेल्या एका खोक्यात झोपला आणि फक्त ट्यूबमधून द्रव आहार घेतला. जनावराच्या भूमिकेसाठी प्रोस्थेटिक रंगभूषेने केसतोडा तर जवळजवळ रोज व्हायचा त्याला. अगदी एक मिनिटाचे का दृश्य असेना, ती रंगभूषा चढवायला चार तास लागायचे आणि उतरवायला दोन तास! विक्रमने तेही केले!! या चित्रपटाच्या संगीत अनावरणप्रसंगी स्वतः अर्नॉल्ड श्वार्झेनेगर विक्रमच्या मेहनतीपुढे झुकलाय. चित्रपटाच्या टिझरने केव्हाच एक कोटी व्ह्यूज मिळवलेयत तर कालपरवाच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ट्रेलरने केव्हाच ३५ लाख व्ह्यूजचा टप्पा गाठलाय! तुम्ही जर त्याचे ते सर्वांगसुंदर ट्रेलर पाहिले, तर स्वत:ला एक चिमटा काढा व बजावून सांगा की या माणसाचे वय ४८ आहे, २५-३० नाही! हा चित्रपट आजवरचे हिंदी व तमिळ चित्रपटांचे कमाईचे सारे ‘विक्रम’ मोडेल यात शंकाच नाही! आणि यात सिंहाचा वाटा ‘विक्रम’चाच असणार आहे. रजनीकांत एकदा म्हणाला होता, “मला जर कुणाचे शिष्यत्व पत्करावेसे वाटत असेल, तर ते केवळ आणि केवळ विक्रमचेच”!! मला वाटतं, साक्षात रजनीकांतने हे वाक्य ज्याक्षणी उच्चारलं, त्याच क्षणी व्हिक्टर अल्बर्टचे स्वप्न पूर्ण करत त्याचा पोरगा सुपरस्टार झाला!! सुपरस्टार ‘चियान’ विक्रम!!

    — © विक्रम श्रीराम एडके.
    [लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

    image