जो तारपे गुज़री है..

२०१४ साली सुपरस्टार रजनीकांतचा ‘कोचडयान’ (२३ मे) प्रदर्शित झाला. भारतातला पहिला एजाकर्षी (परफॉर्मन्स कॅप्चर) चित्रपट! अनेक वर्षे निर्माणाधीन असलेला १५० कोटींचा महत्त्वाकांक्षी चित्रपट!! चित्रपट धो-धो चालला. धो-धो म्हणजे जवळ जवळ १२५ कोटी. भारतात एखाद्या प्रादेशिक चित्रकथापटाने (ऍनिमेटेड सिनेमा) एवढी प्रचंड कमाई करण्याचे हे पहिले आणि एकमेव उदाहरण. उरलीसुरली रक्कम दूरचित्रवाणी अधिकारांतून मिळाली. पण म्हणजे रजनीचा चित्रपट जितका चालायला हवा, तितका काही ‘कोचडयान’ चालला नाहीच!! ते एक नवं पाऊल होतं, नवी सुरुवात होती. आणि अश्या सुरुवातीच्या पावलांना नेहमीच वाट्याला येणारं अपयश त्याच्याही वाट्याला आलं. अर्थात, रजनीचे चाहते (मीसुद्धा!!) प्रचंड नाराज होते कारण आमचा तलयवा तब्बल ४ वर्षांनंतर मुख्य भूमिकेत दिसणार होता, परंतु प्रत्यक्ष वाट्याला आली होती ती केवळ एजाकर्षी चित्रकथा!!

रजनीने ह्या गोष्टीची मात्र ताबडतोब नोंद घेतली आणि ताबडतोब के. एस. रविकुमारच्या ‘लिंगा’वर काम सुरु केले. सुरुवातीलाच हेही घोषित करुन टाकले की जुनमध्ये चित्रणास सुरुवात झालेली असली तरी चित्रपट रजनीच्या वाढदिवशीच (१२ डिसेंबर! हो, बारा ठिकाणी मति चालवणाऱ्या साहेबांप्रमाणेच रजनीदेखील १२चाच आहे! एकाच दिवशी जन्मलेल्या व्यक्ती पण कमालीचे भिन्न स्वभाव!! एक देवमाणूस तर दुसरा.. असो!!) चाहत्यांना भेट म्हणून प्रदर्शित होणार. म्हणजे निर्माणपूर्व, निर्माण आणि निर्माणोत्तर अश्या तिन्ही गोष्टींसाठी हाती केवळ ६ च महिने!! रहमानपासून गुलज़ारपर्यंत सगळ्यांनी अक्षरशः रात्रीचा दिवस करुन काम केलं (तसा रहमान मात्र शब्दशः रात्रीचाच दिवस करतो, हा भाग वेगळा!!)! भल्यामोठ्या आजारातून उठलेला असूनही रजनीने सलग दोन दमवणाऱ्या (१ अंगावर मणामणांची जड यंत्रे वागवत एजाकर्षी, तर २रा देमार साहसपट!) चित्रपटांत काम केलं आणि ‘लिंगा’ ठरल्यादिवशी प्रदर्शित केला! २० वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या वर्षी रजनीचे सलग २ चित्रपट प्रदर्शित होत होते. चाहत्यांसाठी पर्वणीच जणू!! ‘लिंगा’ने पहिल्याच दिवशी २२ कोटींचा गल्ला जमवला!! हे भल्याभल्या हिंदी चित्रपटांनाही साधत नाही. प्रादेशिक चित्रपटांसाठी तर हा आजही अबाधित असलेला विक्रमच (मी नव्हे!!) आहे. ८० कोटींमध्ये बनलेल्या ‘लिंगा’ने एकूण १४९ कोटी कमावले. तरीदेखील काही वितरकांनी नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या. रजनीचा मोठेपणा पाहा, तो ह्या चित्रपटाचा निर्माता नसूनही त्याने निर्मात्यावर ओझे पडू न देता स्वतः ३३ कोटी रुपये वितरकांना दिले. कायदेशीररित्या रजनीवर कुठलीही जबाबदारी येत नसूनही!! हा आहे रजनी. पैश्यांपेक्षा जास्त माणसांना जपणारा तलयवा!!

पण एकूणात काय, तर रजनीचे सलग २ चित्रपट म्हणावे तसे (शाब्बास!!) चालले नाहीत. ते त्यावर्षीच्या इतर अनेक चित्रपटांपेक्षा जोरात चालले, हा भाग वेगळा!! ह्याने रजनीच्या सुपरस्टारपदाला काडीमात्रही धक्का बसणार नव्हता. रजनी ३ तास पडद्यावर काहीही न करता स्वस्थ बसून जरी राहिला, तरीही आम्ही जगभर पसरलेले त्याचे चाहते आवडीने तिकीट काढून पाहू!! याची रजनीला पूर्णपणे जाणीव आहे. पण मग तरीही त्याने काय केलं माहितीये? त्याने रणजीत नावाच्या एका तरुण, आजवर केवळ २च चित्रपट बनवलेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट स्वीकारला!!

कोण बुवा हा रणजीत? जश्या नवकथा, नवकविता असतात; तसेच चित्रपटांतही प्रवाहापेक्षा वेगळे जाऊ पाहाणारे, कला आणि व्यवसाय दोन्हींचा मेळ साधू पाहाणारे नव-चित्रपट असतात!! रणजीत हा असाच ताज्या दमाचे पण कमी खर्चाचे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक. त्याच्या अट्टाकथ्थी (२०१२) आणि मद्रास (२०१४) ची स्तुती करताना समीक्षक आजही थकत नाहीत. आपला सारा मानमरातब, स्टारडम बाजूला ठेवून रजनीने ह्या रणजीतचा चित्रपट स्वीकारलाय. दक्षिण चेन्नईत घडणारी अगदीच स्थानिक पातळीवरची कथा असेल. नाव ठरायचेय अजून! पण रजनी ह्या चित्रपटात एका वयस्कर डॉनची भूमिका करणार आहे म्हणे!! खरं तर सलग ४ बिगबजेट चित्रपट हिट दिलेला राष्ट्रपती-पारितोषिकविजेता शंकर रजनीची ‘यन्धिरन २’साठी वाट पाहातोय. यन्धिरन/रोबोट (२०१०) ह्या अतिशय गाजलेल्या चित्रपटाचा हा पुढचा भाग. मुख्य भूमिकेत अर्थातच रजनी. आणि खलनायकी भूमिकेत साक्षात चियान विक्रम!! अक्षरशः पर्वणी असणार आहे पर्वणी!! पण रजनीने शंकरलाही थांबवून ठेवलेय रणजीतच्या चित्रपटासाठी!! रणजीतच्या चित्रपटाच्या निमित्ताने रजनी ८ वर्षांत प्रथमच ‘रहमाने’तर संगीतकारासोबत (संतोष नारायणन) काम करणार आहे. म्हटलं तर प्रयोग, म्हटलं तर जोखीम! काय गरज आहे वयाच्या ६५ व्या वर्षी, सारे उच्चतम तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ समोर हात जोडून उभे असतानाही, एका कमी खर्चाच्या चित्रपटाची जोखीम पत्करण्याची? पण निष्ठावंत चाहते कोट्यवधी आहेत हो, आत्ताच योग्य वेळ आहे ‘चित्रपट’ करायची! खराखुरा, टीकाकारांची तोंडे बंद करणारा, अभिनयाला वाव असलेला, वितरकांना फायदेशीर ठरणारा कमी खर्चातला चित्रपट!! शेकडों कोटी काय, नंतर ‘यन्धिरन २’मधूनही मिळवता येतीलच की!! पण हीच वेळ आहे स्वतःला नव्याने शोधण्याची. रुमी म्हणतो, ‘जग जेव्हा तुम्हाला गुडघे टेकायला भाग पाडतं ना, तेव्हाच परिपूर्ण स्थिती लाभते प्रार्थना करण्यासाठी’!! मला वाटतं, सलग २ चित्रपटांचं अपयश (!) पाहिलेला रजनी नेमकं हेच करतोय!!

आणि विनयशीलता तर केवढी? एकदा कुठल्याश्या चित्रपटाच्या यशानंतर नेहमीप्रमाणेच साधासा वेष परिधान केलेला रजनी बेंगरुळूमधील एका मंदिरात गेला होता. पायरीशी जमिनीवर बसलेला असताना, एका बाईने त्याला भिकारी समजून १० रुपयाची नोट देऊ केली. रजनीला गंमत वाटली. त्याने मान लववून ती नोट स्वीकारली. जरावेळाने गाडीच्या दिशेने निघालेला रजनीकांत पाहिल्यावर बाईंना आपण काय पाप केले आहे ते समजून चुकले. घाईघाईने त्या रजनीकडे धावल्या आणि वारंवार क्षमायाचना करु लागल्या. रजनी हसला. म्हणाला, “आई तुम्ही माफी मागू नका. माझ्या पाया पडू नका. आपण दोघेही देवाच्या दरबारात आहोत. बहुतेक हा त्याच परमेश्वराचा संकेत असावा मला दाखवून देण्यासाठी की, बाहेर तू असशील मोठा सुपरस्टार; पण प्रत्यक्षात ही किंमत आहे तुझी”!! गायत्री श्रीकांत ह्यांनी रजनीकांतचे ससंदर्भ चरित्र लिहिले आहे. त्यात नोंदवलेला किस्सा आहे हा! काय बोलणार ह्या नम्रतेच्या महासागरापुढे?

आयला, विषयांतर झालं की! हा तर, हा जो दिग्दर्शक रणजीत आहे ना, ह्याची कामाची एक पद्धत आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटापूर्वी त्यातील सर्व कलाकारांचं एक शिबिर घेतो तो. प्रत्यक्ष चित्रणाच्यावेळी पुनरांकने (रिटेक्स) वाचतात ना त्यामुळे! मुळातच कमी रक्कम आणि साधने उपलब्ध असली की, अश्या युक्त्या कराव्या लागतात. चित्रपटाच्या भाषेत ह्याला ‘चतुर चित्रनिर्मिती’ (स्मार्ट फिल्ममेकींग) म्हणतात!! हादेखील चित्रपट सुरु करण्याआधी त्याने असेच एक काटेकोर शिबिर आयोजिले होते. अर्थातच रजनीला दृश्य ‘ओके’ देण्याची काय गरज? तो सुपरस्टार आहे, त्याने दृश्य ‘ओके’ देण्याऐवजी त्याने दिलेलेच दृश्य निर्मात्या-दिग्दर्शकांनी ‘ओके’ करावे अशी परिस्थिती. पण रणजीत अक्षरशः चाट पडला, ज्यावेळी त्याच्या शिबिरात रजनी उपस्थित राहिला. रजनी नुसता आलाच असे नाही, तर त्याने शिबिर पूर्णसुद्धा केले. सारे ऐकले. समजून घेतले. शंकादेखील विचारल्या. सीए, सीएस मंडळींना सतत वेगवेगळे ‘रिफ्रेशिंग कोर्सेस’ करावे लागतात, त्यावेळी जुन्याजाणत्या अनुभवी मंडळींची काय कंटाळवाणी अवस्था होते, जरा विचार करा; म्हणजे रजनीने काय दिव्य केलंय ते समजेल! हे अतिप्रचंड कष्ट तो रोज उपसतो म्हणूनच एकेकाळी हमाल असलेला आणि नंतर बसचा वाहक बनलेला शिवाजीराव गायकवाड आज आंतरराष्ट्रीय सुपरस्टार रजनीकांत आहे. लक्षात घ्या, कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होणं फार सोपं असतं. अवघड असतं ते मिळालेल्या यशाला कायम टिकवून ठेवणं!! ग़ालिब म्हणतो, “जो साज़से निकली है वो धुन सभीने सुनी है, पर जो तारपे गुज़री है वो किसने सुनी है”!! आपल्याला रजनीकांतवरचे विनोद माहिती असतात, त्याचं देवदुर्लभ स्टारडमही दिसतं; पण रजनी आज सलग ३५ वर्षे सर्वोच्च स्थानावर आहे, ते सर्वोच्च स्थान टिकवण्यासाठी तो गेली ३ दशके रोज घेत असलेले कष्ट मात्र कुणाला क्वचितच माहिती असतात! वाद्यातून निघालेले स्वर सर्वांनाच आवडतात, पण त्यासाठी तारेला काय भोगावं लागतं, ‘जो तारपे गुज़री है’; ते मात्र क्वचितच कुणाला समजतं. रजनीचा मेहनतीला ना ३५ वर्षांपूर्वी नकार होता, ना आज वयाची पासष्टी गाठल्यावरही नकार आहे. आणि म्हणूनच, जरी अजून नावसुद्धा ठरलेले नसले तरीही मी खात्रीने सांगू शकतो की, रणजीतचा चित्रपट यशस्वी होणार! तुफान यशस्वी होणार! रजनीकांत काल सुपरस्टार होता, आज सुपरस्टार आहे आणि उद्यासुद्धा तोच सुपरस्टार राहाणार! ही अशीच गेल्या २ वर्षांत तारपे काय काय गुज़री है, याची कहाणी!!

— © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा: www.vikramedke.com)

image

One thought on “जो तारपे गुज़री है..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *