गेमसारखाच – टेट्रिस!

एखाद्या ऐतिहासिक कलाकृतीत निर्मात्यांना कल्पनाविलासाचं कितपत स्वातंत्र्य असायला हवं, हा एक मोठा प्रश्नच म्हटला पाहिजे. पराकोटीचे मुक्तीवादी म्हणतील की, संपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. पराकोटीचे कर्मठ म्हणतील की, अजिबातच नको. सत्य दोन्हीही टोकांना नाहीये. ते एक तर काही वेळा या बाजूला तरी असतं नाही तर त्या बाजूला तरी असतं आणि बहुतांशी वेळा दोन्हींच्या मध्येच कुठेतरी असतं. मुळात कल्पनाविलासाचं स्वातंत्र्य आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया ही गोष्टच सापेक्ष आहे. ‘आरआरआर’चंच (२०२२) उदाहरण घ्या. रामराजू आणि भीम या खऱ्या व्यक्तिरेखा होत्या का? हो, होत्या. चित्रपटाची कथा खरी आहे का? बिलकुल नाही! अशा वेळी आपल्याला बॉलिवूडच्या अशाच धाटणीच्या चित्रपटांना होणारा जो टोकाचा विरोध पाहायची सवय झालेली असते, इथे घडलेला प्रकार त्याच्या एकदमच विपरीत आहे. काही थोडे प्रकार सोडल्यास लोकांनी ‘आरआरआर’ला नुसतं स्वीकारलंच नाही, तर साजरंसुद्धा केलंय!

म्हणजे आणखी एक तिसराच चलांक असला पाहिजे. तो चलांक आहे, हेतू! लोक अतिशय हुशार झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांना चित्रपट बनवणाऱ्यांचे हेतू बरोब्बर समजू लागले आहेत. हेतू वाईट असेल तर लोक त्या चित्रपटाला बरोब्बर फाट्यावर मारतात आणि हेतू चांगला वाटला तर कलात्मक सूट द्यायलाही सहर्ष तयार होतात. हा नियम नाही, निरीक्षण आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, चित्रपटाकडे चित्रपट म्हणूनच पाहायला हवं, तर तसे दिवस आता राहिलेले नाहीत. पूर्वीही नव्हते. फक्त पूर्वी तसे दिवस नव्हते हे सामान्य प्रेक्षकांना कळालेलं नव्हतं, एवढंच. लोक आता शहाणे होऊ लागले आहेत. त्यांना कळतं की, सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असलं तरीही ते दर वेळी सिनेमॅटिक असेलच असं नाही. अशा वेळी त्या सत्याला सिनेमाच्या चौकटीत बसवायला काही तडजोडी आवश्यकच असतात. कधी कधी चित्रपटाचा विषय असलेली घटना अनेक दिवसांच्या, क्वचित वर्षांच्याही कालखंडात घडते. सिनेमात दाखवताना मात्र आपल्याकडे फक्त दोन-तीनच तास असतात, हे लोकांना समजतं. लोकांना हे ही समजतं की, काही काही घटना या वेगवेगळ्या घडलेल्या असल्या तरीही त्यांना एकत्र करून दाखवल्यामुळे किंवा त्यांचा क्रम बदलल्यामुळे सिनेमा म्हणून त्या गोष्टीचा प्रभाव जास्त पडतो. थोडक्यात हेतू पटला की, लोक सगळं काही मानायला तयार असतात. कथेत प्रपोगण्डा चालूनही जाईल एक वेळ, पण लोकांना प्रपोगण्डात कथा टाकलेली बरोब्बर कळते म्हणून ते बहुतांशी चित्रपट नाकारतात.

नमनालाच घडाभर तेल ओतण्याचं कारण म्हणजे, ॲपल टिव्ही प्लसचा नवाकोरा चित्रपट ‘टेट्रिस’. तुम्हाला सांगतो, गेल्या अनेक वर्षांपासून माझं हॉलिवूडच्या चित्रपटांवरून मन उडत चाललंय. एक तर मोठमोठे स्टुडिओ सुपरोहिरोपटांचा अतिरेक करू लागलेयत. दुसरं म्हणजे नवीन आयपीवर काम करायला मोठमोठे स्टुडिओ काहीसे कचरू लागलेयत. आधीपासूनच अस्तित्वात असलेली आयपी असेल तर त्यांना सेफ गेम वाटू लागलाय. तिसरं आणि सगळ्यांत महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांना चित्रपट पाहायचा असतो, पण त्या ऐवजी त्यांना वाढलं जातं जेण्डर पॉलिटिक्स, कलर पॉलिटिक्स हे आणि इतर बरंच काही. गैरसमज नका करून घेऊ, यातील काही मुद्दे लोकांना खऱ्या जगात पटत जरी असले तरीही चित्रपट म्हणजे काही व्याख्यान किंवा भाषण नव्हे. लोक मूल्यशिक्षणाचा आणि त्यातही तुम्हाला जी मूल्यं सोयीची वाटतात त्या मूल्यशिक्षणाचा धडा घ्यायला म्हणून चित्रपट पाहात नाहीत. लोकांचं सर्वाधिक प्राधान्य मनोरंजनालाच होतं आणि आहे. त्या खालोखाल समाधान वगैरे गोष्टी येतील. तुमचं राजकारण तुमच्या यादीत जरी पहिल्या क्रमांकावर असलं तरी लोकांच्या यादीत ते कधीच पहिल्या क्रमांकावर नव्हतं, नाही आणि नसेल. या तिसऱ्या कारणाच्या अतिरेकामुळेच ‘मार्व्हल’चे चित्रपट गंडू लागलेयत आणि कंटाळलेले अमेरिकन लोक ‘आरआरआर’सारखे निर्भेळ मनोरंजक चित्रपट शोधू, पाहू आणि उचलून धरू लागलेयत. किंबहूना याच कारणामुळे मी ख्रिस्तोफर नोलनसारख्या सगळ्याच गिमिक्सच्या पलिकडे असलेल्या विभूतीचे चित्रपट वगळता फार कमी वेळा हॉलिवूडचे चित्रपट थिएटरला पाहाण्याच्या निर्णयाप्रत येऊ लागलोय.

मग मला काय पाहायला आवडतं? तुम्हाला सांगतो, गेल्या अनेक वर्षांत हॉलिवूडच्या बिगबजेट चित्रपटांनी मला जेवढा आनंद दिला नसेल, तेवढा मला त्यांच्याकडच्या छोट्या छोट्या, काहीश्या इंडी चित्रपटांनी दिला. या मंडळींचं बजेट वगैरे गोष्टी मुळातच छोट्या असल्यामुळे यांना असलेली जोखीमसुद्धा काही प्रमाणात कमी असते. त्यामुळे हे लोक प्रयोग करण्याच्या बाबतीत मोठमोठ्या चित्रपटांच्या तुलनेत भरपूर धीट असतात. शिवाय त्यांच्या चित्रपटांमध्ये असलेलं पॉलिटिक्ससुद्घा मोठ्या चित्रपटांसारखं बटबटीत, उथळ आणि कॉर्पोरेट जबरदस्तीचं नसतं. अर्थात, सगळेच तसे नसतील हे इथे गृहित आहेच. सगळ्याच चित्रपटांची नावं नाही देत पण उदाहरणच द्यायचं झालं तर गेल्या वर्षी मला हॉलिवूडच्या बहुतांशी चित्रपटांच्या तुलनेत ‘द मेन्यू’ (२०२२) कमालीचा आवडला होता. त्या आधी असाच ‘नोबडी’ (२०२१) आवडून गेला होता.

त्याच यादीत मी ‘टेट्रिस’चा समावेश करेन. हा साधासोपा गेम तुम्ही सगळेच खेळला असाल. परंतु चित्रपट त्या गेमबद्दल नाही. चित्रपट आहे त्या गेमच्या भोवती घडलेल्या लीगल, फायनान्शियल आणि पॉलिटिकल बॅटलबद्दल. हा गेम रचला ॲलेक्सी पजित्नोव्ह (निकिता एफ्रेमोव्ह) या रशियन माणसाने, तो ही सोव्हियत युनियनच्या पोलादी पडद्याआड. तिथून या ना त्या मार्गाने तो बाहेर पडत असतानाच निण्टेंडोसाठी त्याचे अधिकार मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला हेन्क रॉजर्स (टॅरोन एड्गर्टन) या डच-इंडोनेशियन-अमेरिकन माणसाने. गंमत म्हणजे हेन्कला ते अधिकार मिळवण्यासाठी कम्युनिस्ट रशियाच्या अंतर्गत राजकारणाशी व भ्रष्टाचाराशी तर झगडावं लागलंच, त्या सोबतच अमेरिकन आणि ब्रिटिश भांडवलशाही व्यवस्थेशीही झुंजावं लागलं. चित्रपट या मुद्यावर जसं कम्युनिझमचं नागडं रूप मांडतो तसाच तो दोन्ही बाजूंच्या व्यावसायिकांच्या स्वार्थी मनोवृत्तीही चव्हाट्यावर आणतो. त्याच वेळी तो तिसरी बाजू दाखवायलाही चुकत नाही. चित्रपटाची मांडणी व्हिडिओगेमच्या लेव्हल्ससारखी आहे, जी मजा आणते. त्याखेरीज वेळोवेळी वापरलेली विविध गेम्सची दृश्ये आणि त्याच थाटात चित्रपटातील जागा व पात्रांचे व्हिज्युअल्ससुद्धा मजा आणतात. पण सर्वाधिक मजा येते ती पाठलागाच्या दृश्यांमध्ये पिक्सेल्स डिस्टर्ब होतात तेव्हा. अशा छोट्याछोट्या गोष्टींची फोडणीच चित्रपटाला अजूनच चटकदार बनवते.

चित्रपटात अगदीच थोडीशी साहसदृश्यं आहेत. बहुतांशी चित्रपट हा विनोदाकडेच झुकणारा आहे. किंबहूना त्यातील अंगभूत शोकात्मतेला विनोदाची झालर लावल्यामुळेच त्यातलं दु:ख अधिक जोरात बोचतं. पण असं असूनही सांगतो की, नुसत्या पात्रांच्या बडबडीतून त्यांनी जो जबरदस्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स उभा केलाय, तो शब्दातीत आहे. या मुद्यावर त्याची तुलना कदाचित ‘बॉश’शी (२०१४-२१) होऊ शकते. पण रोमहर्षकतेची अनेकानेक वळणं घेत असताना चित्रपट नुसता लीगल किंवा निगोशिएशनल ड्रामाच राहात नाही तर तो त्याच वेळी पॉलिटिकल थ्रिलर, स्पाय थ्रिलर वगैरे चौकटबद्ध जॉनरांतूनही मुक्त संचार करून येतो. आणि याच मुद्यामुळे त्याचा पृष्ठभाग मनोरंजक असूनही चित्रपट सखोल वाटत राहातो. त्यांच्या अभिनेत्यांनी वठवलेली पात्रं खऱ्या जगात पाहिली तर कळते की, किती सूक्ष्मदृष्टीने कास्टिंगवर काम केलं गेलंय. गंमत म्हणजे, पायरसीशी संबंधित चित्रपटात त्यांनी ‘द फायनल काऊंटडाऊन’ गाणं वापरलंय. त्याचं संगीत आपल्याकडं ‘मेरे रंग में’च्या इण्ट्रोसाठी उचललं होतं. हा एक आपोआपच घडलेला विनोद!

आता येऊ या आपल्या मघाशीच्या घडाभर तेलाकडे. चित्रपटाची कथा खरी आहे का? हो, आहे! पण ती तशीच घडली असेल का? मला इंटरनेटवर शोधाशोध केल्यावर दिसलं की, तिन्ही पार्टीज स्वतंत्रपणे एकाच दिवशी एकाच ठिकाणी डील करायला जमल्या हे सत्य आहे. पण अशा काही घटना सोडल्या तर कुणीही सांगेल की, कथा अशीच घडली असेलच असं नाही. काही गोष्टी या इकडच्या तिकडे केल्या असणार, नव्याने रचल्या असणार, बदलल्या असणार. हे सारं मान्य करूनही ‘टेट्रिस’ आवडून जातो कारण, त्याचा हेतू! हेतूची शुद्धता सिद्ध करण्याची नव्हे तर स्वच्छ मनाने अनुभवण्याची गोष्ट असते. चित्रपट या कसोटीवर माझ्यासाठी तरी शंभर टक्के खरा उतरतो. पण या कसोटीच्या पलिकडेसुद्धा लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत अशा अनेक पातळ्यांवरदेखील तो सहजपणे बाजी मारून जातो. बघा, मानवी भावना खूपच गुंतागुंतीच्या असतात. पण त्यातून केल्या जाणाऱ्या कृती गुंतागुंतीच्या असतीलच असं नाही. टेट्रिस गेमच्या मागचं लॉजिकही अर्थातच गुंतागुंतीचं आहे, पण पडद्यावर केल्या जाणाऱ्या कृती सगळ्याच वयाच्या मंडळींसाठी सुलभ आहेत. गंमत सांगू, ‘टेट्रिस’ चित्रपटाचंही नेमकं तसंच आहे. अनुभवून पाहा!

*४/५

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *