टबू – असंतांची गोष्ट
१८१४ साल आहे. इंग्लंडचं अमेरीकेशी तुंबळ युद्ध सुरू आहे. ईस्ट इंडिया कंपनी ही जणू प्रतिपरमेश्वरच असावी इतकी ताकदवान आहे. इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज हा शब्दशः वेडा आहे आणि सारा कारभार हा त्याचा अहंमन्य, दारुडा पोरगा चौथा जॉर्ज (मार्क गॅटिस) सांभाळतो आहे. अशा भयाण वातावरणात एक छोटीशी घटना घडते. डेलनी शिपिंग कंपनीचा मालक होरेस डेलनीचा (एडवर्ड फॉक्स) मृत्यू होतो. आणि साऱ्या इंग्लंडचेच नव्हे तर अमेरीकेचेही राजकारण ढवळून निघते. का? अशी कोणती मालमत्ता होती होरेस डेलनीकडे की जिच्यासाठी सगळ्यांनीच झुरावं?
त्याहून धक्कादायक गोष्ट घडते ती वेगळीच. डेलनीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याचा आफ्रिकेत बेपत्ता झालेला मुलगा जेम्स (टॉम हार्डी) अचानक अवतरतो. होरेसच्या मालमत्तेचा तो एकमेव वारसदार आहे. त्याच्या आगमनाने त्याच्या बहिणीचा नवरा थॉर्न गियरी (जेफरसन हॉल) जो इतके दिवस मालमत्तेच्या वाटाघाटींमध्ये मध्यवर्ती होता, तो एकदमच निष्प्रभ होऊन जातो. जेम्सच्या येण्यामुळे राजकारणाची सगळीच समीकरणं बदलतात आणि तो अचानकपणे इंग्लंडचं राजघराणं, ईस्ट इंडिया कंपनी आणि निर्दय अमेरीकेसाठी पायात सलणारा काटा होऊन बसतो.
‘टबू’ या छोट्याशा मालिकेची ही गोष्ट. आणि विशेष म्हणजे या कथेमध्ये कुणीच, अगदी एकही व्यक्ती संत नाही. सगळेच स्वार्थी, नीच, आणि कुकर्मांनी बरबटलेले आहेत. इंग्लंडचं राजघराणं माजलेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनी त्याहून दुप्पट माजलेली आहे आणि अमेरीका आत्यंतिक निर्दय आहे. असे तीन हत्ती मिळून ज्याची शिकार करायची ठरवतात तो जेम्स डेलनी सिंह आहेच, पण तोही सज्जन नाही. हे तिघं मिळून काय पापी असतील त्यांच्या दहापट तो पापी आहे. सत्य, सुंदर, पवित्र असं त्याच्याकडे काहीच नाही. आहे ते एक स्वप्न आणि मनाच्या अडगळीत कुठेतरी हरवलेली मानवता. तो या तिघांना नुसतं अंगावरच घेत नाही तर ज्या बेक्कार पद्धतीने झुंजवतो, त्याला तोड नाही. तोड नाही म्हणजे शब्दशः तोड नाही. इतकं सूक्ष्म कंगोऱ्यांचं राजकारण क्वचितच एखाद्या मालिकेत पाहायला मिळतं. सगळ्यांत कमालीची गोष्ट ही की, एक सिंह आणि तीन हत्तींच्या महासंग्रामाची ही देदिप्यमान गाथा निर्मात्यांनी मंद आच ठेवूनही केवळ आठच भागांमध्ये सुफळ, संपूर्ण सांगून दाखवलीये. ‘टबू’ कुणी निर्मिलीये माहितीये? ज्या स्टीव्हन नाईटने ‘पीकी ब्लाईंडर्स’ लिहिली व बनवलीये तो या मालिकेचा लेखक तर आहेच शिवाय निर्मिकांपैकी एक आहे! अन्य दोघे निर्मिक आहेत स्वतः टॉम हार्डी आणि त्याचे वडील चीप्स हार्डी. आणि सांगतो, रीड्ली स्कॉट हा या मालिकेच्या निर्मात्यांपैकी एक आहे. आता लावा दर्जाचा अंदाज!!
टॉम हार्डी काय ताकदीचा कलावंत आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. ही सबंध मालिका म्हणजे त्याच्या एकट्याचा अश्वमेध, एकट्याचा दिग्विजय म्हटला तरी चालेल इतका तो जबरदस्त खेळतो. वर म्हटल्याप्रमाणे जेम्स हा खलनायकांपेक्षा दहापट जास्त पापी आहे. आपण त्याला कचकचीत शिव्या घालतो आणि तरीही तोच जिंकावा असं मनापासून वाटत राहातं आपल्याला. ही नुसती लेखकाची ताकद नाही तर टॉमच्या अद्वितीय अभिनयाचं हे यश आहे. तो जेव्हा जेव्हा I have a use for you हे वाक्य उच्चारतो, मार्लन ब्रँडोने साकारलेल्या व्हिटो कॉर्लिऑनीचे एक वेगळेच, ब्रिटीश रूप दिसते! टॉमइतका स्क्रिनटाईम नसूनही तोडीस तोड काम केलंय ते जोनाथन प्राईसने. त्याने साकारलेला सर स्टुअर्ट स्ट्रेंज हा ब्रिटीश अरीस्टोक्रसीचं मूर्तीमंत रूप भासतो. आणि त्याच्याहूनही कमी स्क्रिनटाईम असून मार्क गॅटिसने आपली भूमिका खणखणीत वाजवलीये. अक्षरशः किळस वाटायला लावतो तो प्रिन्स जॉर्जची. ऊना चॅप्लिन मुळातच भारी आहे. पण तिच्यापेक्षा जास्त लक्षात राहाते ती जेसी बक्लीने साकारलेली लोर्ना. काय सुंदर विणलीये तिची भूमिका!
एक भारतीय म्हणून इंग्लंडने आपल्यावर पारतंत्र्याच्या काळात केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला मनस्वी चीड असते. स्वा. सावरकर वगैरे क्रांतिवीरांनी अंदमानसारख्या नरकात काय यातना भोगल्या असतील याची आपण वर्णने वाचलेली, ऐकलेली असतात. परंतु इंग्लंडच्या अमानुषतेची या मालिकेत दृश्य झलक जेव्हा दिसते तेव्हा शरीरच नव्हे तर मनही शहारून जातं. आणि अशा चहुबाजूंनी अमानुषतेने वेढलेल्या जगात जेव्हा एक कुणीतरी त्या नीचतम इंग्लंडला, त्या क्रूरतम ईस्ट इंडिया कंपनीला आणि त्या स्वार्थपरायण अमेरीकेला त्यांच्याच खेळात बोटावर नाचवतं, तेव्हा पाहायला मजा येणं साहजिकच आहे. पण ही मालिका यातील कोणतीही गोष्ट संयततेच्या मर्यादेबाहेर जाऊ देत नाही. किंबहूना मालिकेतील भडकपणात संयतता आहे, बटबटीत गोष्टींमध्ये तरलता आहे, म्हणूनच त्या कित्येक पट अधिक अंगावर येतात. मालिकेचं छायाचित्रण तर अप्रतिम आहेच, परंतु संपादनाने मालिकेचा वेग असा काही मस्त राखलाय की ज्याचं नाव ते!
पटकथालेखनात म्हणतात की, तुमच्या नायकाला सहजासहजी लक्ष्यापर्यंत पोहोचू देऊ नका, त्याच्यासमोर अडचणींचे डोंगर उभे करा, तरच तुमची कथा मनोरंजक होऊ शकेल. ‘टबू’ हा नियम पाळता-पाळता कित्येकदा तोडून, मोडून, फेकून देते आणि तरीही मालिकेची रंजकता कणभरानेही कमी होत नाही. मी सहज म्हणून एखादाच भाग पाहावा असा विचार करून बसलो होतो, तो कधी या खोल डोहात आकंठ बुडालो माझं मलाच समजलं नाही. ‘टबू’ची तुलनाच करायची झाली तर ती नैसर्गिकपणे केवळ ‘पीकी ब्लाईंडर्स’शीच होऊ शकते. मात्र ‘टबू’चा आवाका आणि विस्तार कमी असल्यामुळे असेल कदाचित, पण मला व्यक्तिश: ही मालिका ‘पीकी ब्लाईंडर्स’पेक्षा अनेक पटींनी जास्त आवडलीये. तरीही मला तिची तुलना आणखी एका मालिकेशी करायचा मोह टाळता येत नाहीये, ती म्हणजे ‘बॉडीगार्ड‘! कारण दोन्हीही मालिकांची पहिली पर्वं विलक्षण उत्तुंग झाली आहेत आणि तरीही दुसरे पर्व येणार येणार म्हणूनही त्यांचा अद्याप तरी काहीच पत्ता नाहीये. अर्थात ‘बॉडीगार्ड’ ही कर्तव्यपरायण सैनिकाची गोष्ट असली तरी ‘टबू’ मात्र शब्दशः असंतांची गोष्ट आहे आणि म्हणूनच अधिक मादकदेखील आहे. नुसती मादकच नाही तर चटक लावणारी, जहरी मादक!
*४.७५/५
— © विक्रम श्रीराम एडके
(अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)