शब्दांत न मावणारी — बॉडीगार्ड
मी अनेक चित्रपटांबद्दल लिहितो. गेल्या काही वर्षांपासून मला आवडलेल्या मालिकांबद्दल देखील नियमितपणे लिहितो. अगदी “गेम ऑफ थ्रोन्स”सारख्या (२०११-१९) ७३ भागांच्या किंवा “पर्सन ऑफ इंटरेस्ट”सारख्या (२०११-१६) १०३ भागांच्या मालिकेबद्दलही मी भरभरून लिहिलंय. त्यांच्याबद्दल लिहिताना माझी लेखणी कुंठित झाल्यासारखी, अवरुद्ध झाल्यासारखी आजवर कधी एकदा सुद्धा वाटली नाही. परंतु आज मात्र माझी लेखणी एका अवघ्या ६ भागांच्या मालिकेपुढे थबकली आहे. चोवीस तास उलटून गेले मी ही मालिका पाहून, परंतु अजूनही मी लिहिताना शंभरदा खोडतोय. ती मालिका म्हणजे, बीबीसी-वनची “बॉडीगार्ड” (२०१८-)!
डेव्हिड बड/बुड (रिचर्ड मॅडेन) हा भूतपूर्व सैनिक युद्धावरून जरी परतलेला असला, तरीही युद्धाच्या जखमा अद्यापही अंगावर आणि मनावर बाळगून आहे. तशातच त्याची निवड कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाची सांसद आणि गृहसचिव ज्युलिया मॉण्टेग्यूचा (कीली हॉज) अंगरक्षक म्हणून होते. ही बाई मोठी धीराची आहे. अल्पावधीतच तिने राष्ट्रीय राजकारणात मोठी मजल मारलीये. आणि आता ती संसदेत जे विधेयक मांडणार आहे, त्यानंतर तर ती थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीतच आघाडी घेण्याची शक्यता आहे. यातून अर्थातच कल्पनेपल्याडचा आवाका असलेलं शह-काटशहांचं घट्ट जाळं विणलं जाऊ लागतं!
माझा एक सर्वसाधारण नियम आहे. कोणत्याही मालिकेने पहिल्या पंधरा मिनिटांत मला प्रभावित केले नाही, तर नंतर तिने प्रभावित करण्याची शक्यता खूपच खालावते. उदाहरणार्थ, “पर्सन ऑफ इंटरेस्ट”. ती पहिल्या दहा मिनिटांतच चित्रपटीय तंत्रे, कथन आणि साहसदृश्ये अशा विविध आघाड्यांवर जी बाजी मारते की, मालिका पाहाण्याच्या उत्साहाला जेटपॅकच लागले पाहिजे. “बॉडीगार्ड”चा पहिला प्रसंग एका रेल्वेत घडतो. जवळजवळ पंधरा-वीस मिनिटं चालतो तो. खरं सांगतो, तो प्रसंग संपल्यावर मी दहा मिनिटं मालिका पॉज करून बसलो होतो, फक्त शांतपणे श्वास घेण्यासाठी! एवढी ही मालिका तुम्हाला शोषून घेते. इतका ताण मी अलिकडच्या काळात कोणत्याच मालिकेत अनुभवलेला नाही. एवढेच नव्हे, तर प्रत्येक भागातील तणावाच्या प्रत्येक प्रसंगात तितकाच तणाव निर्माण करण्यात ही मालिका पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.
डेव्हिड आपल्या कामात कमालीचा पक्का आहे. पण वैयक्तिक दृष्ट्या त्याला मॉण्टेग्यूचे राजकारण पटत नाही. किंबहूना त्याला राजकारणाची तितकी सखोल समजदेखील नाही. तो आपला साधा रांगडा सैनिक आहे. आयुष्य आणि परिस्थिती दोन्ही बाजूंनी गांजलेला आहे. त्याचं नशिब अतिशय वाईट आहे. त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याला लोकांचं ऐकून घ्यावं लागतं, ते त्याचं कामच आहे. सगळीकडचे वरिष्ठ त्याला सहजी वापरून घेतात. परंतु वैयक्तिक आयुष्यातही तो अतिशय अपोलोजेटिक बनलाय. तो जितक्या वेळा बायकोला उगाचच सॉरी म्हणतो, तितकं क्वचितच कुणी म्हणत असेल. पण तरीही तो अत्यंत चाणाक्ष आहे. त्याच्या कामासाठी आवश्यक अशा एकूण एक थियरेटिकल आणि प्रॅक्टिकल कौशल्यांचा खजिना आहे त्याच्यापाशी. इतकं गुंतागुंतीचं पात्र अलिकडच्या काळात क्वचितच कोणत्या मालिकेत लिहिलं गेलं असेल. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सगळ्याच्या सगळ्या बाबी रिचर्ड मॅडेनने ज्या काही संयतपणाने अधोरेखित केल्या आहेत त्याला तोड नाही.
मुळात ही मालिका मी बघायला सुरू केली होती ती “अरे, रॉब स्टार्कची मालिका” असा विचार करून. परंतु पहिल्या दहाच मिनिटांत रिचर्ड मॅडेनने माझ्या मनातील त्याची रॉब स्टार्कची छवि कायमची पुसून टाकली. त्याने जे काम केलेय, ते अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. “बॉडीगार्ड”च्या भूमिकेत आपल्या वैयक्तिक भावना चेहऱ्यावर दिसू न देण्याची त्याची शैली निव्वळ अप्रतिम आहे. एकदा त्याला ड्युटीवर असताना हसायचा प्रसंग येतो, त्या वेळी तो ज्या प्रकारे पापणीची उघडझाप करावी तितक्या निमिषार्धात तोंड उघडून मिटतो की, वाह रे वाह! किंवा एकदा त्याला ड्युटीवर असताना एक वाईट बातमी समजते. तो त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही, परंतु त्याचा एकच गाल ज्या सहजपणे थरारतो, तो निव्वळ बघण्याचा विषय आहे. तोच रिचर्ड मॅडेन डेव्हिडचे वैयक्तिक आयुष्य चितारताना मात्र कायिक अभिनयातून भावनांचा कल्लोळ असा काही चितारतो की, विचारता सोय नाही. प्रमाणापलिकडे हँडसम, ब्रिटीश आणि अभिनयाची सांगोपांग जाण असणारा हा माणूस सर्वार्थाने उज्ज्वल भविष्याचा धनी आहे. त्यामुळेच जेम्स बॉण्डची भूमिका करण्यासाठी योग्य निवड कोण असे जर कुणी मला विचारले, तर मी क्षणाचाही विलंब न करता इथून पुढे रिचर्ड मॅडेनचेच नाव घेणार आहे. शेकडो कारणं आहेत “बॉडीगार्ड” पाहाण्याची, परंतु एकाच कोणत्या तरी कारणासाठी पाहाणार असाल, तर फक्त आणि फक्त रिचर्ड मॅडेनच्या कामासाठी पाहा! अर्थातच कीली हॉजने व्यावसायिक आयुष्यात कणखर परंतु वैयक्तिक आयुष्यात कमालीची भित्री ज्युलिया मॉण्टेग्यू तितक्याच सक्षमपणे उभी केलीये. तिच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शकांनी राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या दुहेरी आयुष्यावर केलेले भाष्य अगदीच अचूक आहे!
काही मालिका या थ्रिलर असतात. काही पॉलिटिकल थ्रिलर असतात. काही सस्पेन्स थ्रिलर असतात. काही अॅक्शन थ्रिलर असतात. काही सायकॉलॉजिकल थ्रिलर असतात. “बॉडीगार्ड” मात्र अशा दुर्मिळ प्रजातीत येते की, ती एकाच वेळी या सगळ्याच प्रकारची आहे. ती एकाच वेळी जिहाद, उजव्या विचारसरणीचा नैसर्गिकरित्या जगभर चढता आलेख, युद्ध आणि त्याचे परिणाम, राजकारणातील दुर्गम डावपेच, कायदा आणि सुव्यवस्था, पीटीएसडी अशा वेगवेगळ्या – म्हटलं तर परस्परावलंबी आणि म्हटलं तर पूर्णतया भिन्न विषयांबद्दल अनेक स्तरांवर आणि सखोल भाष्य करते, आणि ते ही केवळ ६ च भागांत! या मालिकेत दाखवलेले राजकारण हे शब्दशः “हाऊस ऑफ कार्ड्स” (२०१३-१८) आणि “गेम ऑफ थ्रोन्स”च्या वरताण आहे. “बॉडीगार्ड” आणि त्यांच्यातील सगळ्यांत मोठा फरक म्हणजे, उपरोक्त दोन्हीही मालिका या नंतरच्या पर्वांमध्ये पारच गंडल्या, परंतु “बॉडीगार्ड”ला मात्र भल्याभल्यांना न समजू शकलेली एक गोष्ट समजलीये, नेमके कुठे थांबायचे! आपण कितीही अंदाज लावायचा प्रयत्न केला तरीही असीम संयतपणे उलगडत जाणाऱ्या या नाट्याने रहस्याच्या पेटाऱ्यावरील झाकण अखेरपर्यंत घट्ट बंद राखण्यात पूर्ण यश मिळवलेय.
तुम्ही जर मालिका त्यांच्यातील चित्रपटीय तंत्रांसाठी पाहात असाल, तर या मालिकेसारखी दुसरी मालिका एवढ्यात तरी कोणतीच दिसत नाही. स्टीव्ह सिंगल्टन व अँड्र्यू जॉन मॅकक्लिलण्ड यांनी तणावाचे प्रसंग ज्या पद्धतीने संपादित केले आहेत, ते संपादनाचे वस्तुपाठ आहेत. जॉन ली ने ज्या पद्धतीने दृश्ये त्यांच्या चपखल कलर पॅलेटसह चितारली आहेत, ती छायाचित्रणाचा वस्तुपाठ आहेत. थॉमस व्हिन्सेंट आणि जॉन स्ट्रिक्लॅण्ड यांनी छोट्या छोट्या प्रसंगांतून, साध्याश्याच सूचक वाक्यांतून, सांकेतिक मौनांतून जे नाट्य उभे केलेय, ते दिग्दर्शनाचे वस्तुपाठ आहेत. एकच उदाहरण सांगतो. ज्युलियाची टिव्हिवर प्रश्नोत्तरी चित्रित होतेय. ती प्रश्नांची उत्तरं देतेय. परंतु कॅमेरा मात्र डेव्हिडच्या चेहऱ्यावर आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर तिची प्रश्नोत्तरी प्लेबॅकमध्ये दिसतेय. तिच्या शब्दांवर तो मौनातूनच प्रतिक्रिया देतोय, हे दृश्य इतक्या कल्पकतेने चित्रित केलेय की मन आपसूकच स्तुती करू लागते! एक उदाहरण म्हणालो, पण अजून एक सांगण्याचा मोह आवरतच नाहीये. डेव्हिड ज्युलियाच्या कार्यालयाबाहेर उभा राहून तिच्यावर लक्ष ठेवतोय. ती कार्यालयात एक मिटिंग घेतेय. दृश्य त्याच्या पीओव्हीने आणि त्रयस्थ असे इंटरकटमध्ये दिसते. परंतु ऐकू मात्र केवळ त्रयस्थ नजरेतूनच येते. त्याच्या पीओव्हीला पूर्ण शांतता आहे. का? कारण तो साऊंडप्रुफ काचेच्या बाहेर उभा आहे. इतक्या साध्या युक्तिने दिग्दर्शक तांत्रिक गंमत तर करतोच, शिवाय त्या दोघांमधील सामाजिक आणि बौद्धीक दरीदेखील उभी करतो! असे अनेक छोटे-छोटे प्रसंग आहेत, जे निव्वळ तांत्रिक क्षमतेच्या जोरावर शहारा निर्माण करतात. कसदार कथेला अशी तांत्रिक शुद्धतेची जोडच, या मालिकेला अजोड बनवते!
व्यक्तिश: मी अमेरिकन मालिकांपेक्षा ब्रिटीश मालिकांचा चाहता आहे. एक तर ते अजूनही अभिनयाला व्यवसायापेक्षा कला अधिक समजतात. त्यांचे नाट्य हे कायमच नैसर्गिक असते. मी सदर्न, नॉर्दर्न, कॉक्नी, स्कॉटीश, आयरीश वगैरे विविध ब्रिटीश उच्चारपद्धतींचा अतोनात पंखा आहे. त्यांची शब्दसंपदा, उच्चारण्याच्या खानदानी आणि इतर पद्धती – हे खरं इंग्लिश. अमेरिकनांनी इंग्रजी भाषेचे आपल्या संस्कृतीहीन वर्तनाने अवमूल्यनच तेवढे केलेय. पण माझा हा झुकाव बाजूला ठेवूनही “बॉडीगार्ड” सगळ्यांच पातळ्यांवर सरसच ठरते. वर मी लिहिलेय की, या मालिकेबद्दल लिहिताना माझी लेखणी कुठून सुरुवात करू आणि काय काय लिहू, या विचारांनी अक्षरशः थबकलीये. आता एवढं लिहून झाल्यावरही माझी ती आणि तशीच भावना कायम आहे. एवढे लिहूनही खूप काही लिहायचे राहूनच गेले आहे, नि:संशय “बॉडीगार्ड” ही मालिका खरोखरच शब्दातीत आहे!
*५/५
— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]
टीप: “बॉडीगार्ड” नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
तुझ्या घड्याळात 24 ऐवजी 30 तास आहेत असं वाटत राहतं!!