तृप्त करून सोडणारे पक्वान्न — एजंट साई श्रीनिवास आत्रेय

रॉबर्ट बोल्टन म्हणतो, “A belief is not merely an idea the mind possesses; it is an idea that possesses the mind”. आपल्या प्रत्येकाला रहस्यकथा वाचण्याची, त्या पडद्यावर घडताना पाहायची आवड असते. कित्येकदा तर पडद्यावर खरा खुनी कोण हे कळण्याच्या आतच आपण ते ओळखतो आणि मग नंतर मुख्य नायक आपलीच रीत वापरून जेव्हा ती केस सोडवतो, त्यावेळी एकाच वेळी आपल्याला आनंदही होतो आणि अभिमानही वाटतो. हीच गोष्ट जर लहानपणापासून घडत असेल, तर कोणत्या ना कोणत्या चोरट्या क्षणी आपणही गुप्तहेर व्हायचं ठरवूनच टाकलेलं असतं. पुढे शिक्षण, करिअरच्या धबडग्यात ते अर्थातच शक्य होत नाहीच म्हणा, पण ती फँटसी पहिल्या प्रेमासारखीच ह्रदयाच्या एका कुपीत सचेतन राहून जाते.

बरं गुप्तहेर होण्याची जी आवड असते, ती नुसती अवघड आणि अचाट गुन्ह्यांचा थांग लावण्यापुरतीच नसते बरं का! त्या त्या गुप्तहेराची स्टाईल, त्याची बुद्धीमत्ता, हजरजबाबीपणा सगळं सगळं आपल्याला हवंहवंसं वाटत असतं. शेरलॉकचा पाईप, बॉण्डची मार्टिनी, मंकचे वाईप्स हे सगळे आपल्याला नकळतपणे आकर्षित करत असतात. पण खऱ्या गुप्तहेरांचं आयुष्य खरंच एवढं ग्लॅमरस असतं का हो? खून काही रोज घडत नाहीत. इतरवेळी गुप्तहेराचं पोट कसं चालावं? मग कुणाच्या जीवनसाथीवर पाळत ठेव, कुठे नवऱ्या मुलाची पार्श्वभूमीच काढून दे अशी बेचव पण जगवणारी कामं करावी लागतात. किंबहूना तेच मुख्य अन्न आणि मोठ्या केसेस सप्लिमेंटरी असतात खऱ्या गुप्तहेरांच्या आयुष्यात. पण अर्थातच वरलिया रंगा भुललेल्या आपल्याला याची काडीमात्र कल्पना नसते. असाच वास्तवाशी अनभिज्ञ गुप्तहेर आहे, साई श्रीनिवास आत्रेय (नवीन पोलिशेट्टी)! तो स्वतःला एजंट म्हणवतो. विविध रहस्यपटांचे रहस्य आधीच सोडवून दाखवण्याला यश मानतो. भारतात राहूनही ओव्हरकोट वगैरेसारखा तद्दन क्लिषेड पोशाख करतो. हॉलिवूडच्या हिरोची नक्कल करत कॉफीचा मग घेऊन वावरतो. थोडक्यात बाह्यांतरी सगळा आव आणतो. पण! या “पण”मध्येच गोची आहे. — पण त्याच्याकडे काम नाही! — पण तो हुशार, चाणाक्ष, चतुर असूनही त्याला वास्तवात पोलिस तपास आणि दुनियादारीची जरादेखील समज नाही. — पण त्याला लोकांच्या हरवलेल्या दुधाच्या पिशव्या शोधाव्या लागतात. — पण त्याचा सातत्याने अपमान होत राहातो! त्याची ही अतिशय खुमासदार, नर्मविनोदी कथा म्हणजे “एजंट साई श्रीनिवास आत्रेय” या तेलुगू चित्रपटाची सुरुवात!

मी सुरुवात म्हणालो, संपूर्ण चित्रपट नाही. कारण जसजसा चित्रपट मुख्य विषयाकडे वळतो, तसतशा गोष्टी गहिऱ्या होत जातात. आत्रेयच्या गावी नेल्लोरला रेल्वेच्या रुळांजवळ सापडलेल्या एका बेवारस प्रेताची केस एकामागोमाग एक भयंकर वळणे घेत राहाते आणि आपली कथादेखील एका मागोमाग एक धक्के देत आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान अशी मोठ्या पटावर फिरू लागते. रहस्यांची गुंतागुंत आणि धक्क्यांची तीव्रता वाढू लागते व अखेरीस आपल्या हाती येतो तो किंचित संथ असा परंतु संपूर्ण समाधानी करून सोडणारा एक चित्रपटानुभव! गेल्या कित्येक वर्षांत तेलुगूत इतका चांगला गुप्तहेरपट झाला नसावा. किंबहूना भारतातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेरपटांच्या यादीत मानाचे स्थान मिळावे एवढी या चित्रपटाची योग्यता आहे.

स्वरूप आर. एस. जे. चं दिग्दर्शन प्रभावी आहे. त्याने कथेतले खूप सारे ट्विस्ट्स कुठेही जडजंबालपणा येऊ न देता उत्कृष्ट हाताळले आहेत. नवीन पोलिशेट्टीचे काम मी पहिल्यांदाच पाहिले. हा तरुण अभिनेता जितक्या सहजपणे विनोद करतो, तितक्याच सहजतेने गंभीर दृश्येही साकारतो. असेच चित्रपट निवडत राहिल्यास त्याला निश्चितपणे उज्वल भविष्य आहे. असेच चित्रपट कशाला, या चित्रपटातच एवढी क्षमता आहे की, याचे स्वत:चेच एक सिनेमॅटिक युनिव्हर्स – आत्रेयव्हर्स बनू शकते. मला सर्वांत जास्त कोणती गोष्ट आवडली माहितीये? श्रृती शर्मा इतकी गोड दिसणारी, तितकंच छान काम करणारी नायिका आणि तिला भरपूर स्क्रिनटाईम असूनही कथेत कुठेच प्रेमकथेचा कोन घुसडण्याचा जरादेखील प्रयत्न केलेला नाही. पटकथेचा विषम वेग, किंबहूना काहीसा संथपणा, ही एकमेव त्रुटी सोडल्यास चित्रपट आपल्या उद्दीष्टाशी आणि कथानकाशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहातो. तेलुगू प्रेक्षकांची सुजाणता अशी की, इतका वेगळा चित्रपट असूनही केवळ दिडच कोटीत बनलेल्या या चित्रपटाने तब्बल एकवीस कोटींचा व्यवसाय केलाय!

अजून एक धक्का देऊ? चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असला तरीही त्यांच्या कथेचा पाया हा खरोखर घडलेल्या घटनांवर आधारित आहे. चित्रपटाच्या शेवटी काही सेकंदांतच ते चित्रपटासाठी वापरलेल्या संदर्भांची दृश्यं दाखवतात, त्यावरून दिग्दर्शकाने इतक्या विविधांगी गोष्टी गोळा करून त्यांना एका धाग्यात बांधण्यासाठी केवढे कष्ट घेतलेयत यांची कल्पना येते. मी सुरुवातीला वापरलेले बोल्टनचे अवतरण शेवटी येते, तेव्हा त्याचा संदर्भ खूपच वेगळा, अगदी वैश्विक होऊन गेलेला असतो. आत्रेयची ही पहिलीवहिली मोठी केस त्याच्या वैयक्तिक आयुष्यालाही अगदी नैसर्गिकपणे स्पर्शून जाते, कसलीही घालघुसड, बळजबरीचा आव नाही त्यात. म्हणून तर वर म्हणालो ना की, “एजंट साई श्रीनिवास आत्रेय” हा अतिशय समाधानी करून सोडणारा चित्रपट आहे. बुद्धीला खाद्य, विचारांना चालना, नेहमीच्या घटनांचा दिसतो त्या पलिकडे अर्थ असण्याची शक्यता आणि भावनेला स्पर्श हे जर तुमचे आवडते उद्योग असतील, चित्रपट जर तुम्ही निव्वळ टाईमपासपेक्षा अडिच तास सार्थकी लावल्याच्या तृप्ततेसाठी पाहात असाल, तर मनापासून सांगतो, “एजंट साई श्रीनिवास आत्रेय” हा तुमचा चित्रपट आहे. तो गुप्तहेरपटांचे प्रहसन तर करतोच, परंतु त्याच्या पलिकडेही खूप काही देऊन समृद्ध करून जातो!

*४/५

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेखांसाठी पाहा www.vikramedke.com]

टीप: चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *