स्ट्रगलपलिकडचा स्ट्रगलर – पारसमणी ‘पीटर डिंक्लेज’

स्ट्रगल हा प्रकार म्हटलं तर रोमँटिक असतो, म्हटलं तर अजिबातच नसतो. असतो यासाठी की, यश मिळाल्यावर स्ट्रगल सांगायला आणि ऐकायला, दोन्हींमध्ये मजा येते. आणि नसतो यासाठी की, स्ट्रगल सुरू असताना तो करणाऱ्याला रोमँटिक वगैरे तर सोडाच परंतु अनेकदा हॉररच वाटत असतं. त्याचा स्ट्रगलही असाच, चारचौघांसारखा. आत्ता वाचताना भावनोत्तेजनेने अंगावर काटा आणणारा, पण त्यावेळी त्याच्या फ्लॅटमध्ये हिटर नसल्यामुळे खरोखरीच अंगावर शहारे आणणारा. प्रत्येक स्ट्रगलर करतो तशीच त्याने पोटाची खळगी भरण्यापुरती बरीचशी कामे केली; कुणाचा पियानो साफ करून दे, कुठे फोन ऑपरेटर म्हणून काम कर वगैरै!

स्ट्रगल तर सगळेच करतात, पण सगळेच स्ट्रगलर्स काही यशस्वी होत नाहीत. कारण, स्वप्नं सगळेच पाहातात, पण ती पूर्ण होण्यासाठी लागणारं परिश्रमांचं इंधन आणि ते जहाज चालू लागण्यासाठी लागणारं नशिबाचं वारं, हा योग सगळ्यांच्याच आयुष्यात नसतो. याच्या बाबतीत गोष्टी अजूनच अवघड होत्या, कारण याची उंची! उंची म्हणण्यापेक्षा, उंचीचा अभाव. तो केवळ साडेचार फुटांचाच होता, किंबहूना आहे. त्यामुळे याला सगळ्या भूमिका तशाच चालून यायच्या, बुटक्यांबाबत झापडबंद विचार करणाऱ्या! हा मानी, त्यामुळे नेमकं तेच तर याला नको होतं. होता होईल तितकं नाकारलंही त्याने, पण अनेक वर्षे रोजच बटाट्याचे वेफर्स रात्रीचं जेवण म्हणून खाणाऱ्याला फारसा चॉईस देत नाही ही चंदेरी दुनिया नावाची जखिण!

नाटक या विषयावर त्याचं प्रचंड प्रेम. त्याच्याकडे नाट्यशास्त्राची पदवीदेखील आहे. तो आणि त्याच्या एका मित्राने मिळून विल्यम्सन पुलाजवळ एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. हाच तो हिटर नसलेला फ्लॅट. त्यातल्या ओव्हनमध्ये उंदीर पोटभाडेकरूसारखे राहायचे. एकदा तक्रार केली, तर मालक सुरी उगारून अंगावर आला होता म्हणे! अशा परिस्थितीत त्यांच्या तासनतास नाटकांच्या योजना चालायच्या. पण व्यावसायिक नाटकंच नव्हे, तर हे जग नावाचं महानाट्यही एकाच गोष्टीवर चालतं, ती म्हणजे पैसा! नाटकांच्या योजनेसाठी पॅशन पुरते, फ्लॅटच्या भाड्यासाठी खरेखुरे पैसेच लागतात ना! एके दिवशी घरी परतले, तर दरवाज्याला मालकाने घातलेलं भलंमोठ्ठं कुलुप होतं.

त्याला कामं मिळालीच नाहीत असं नाही. १९९५ पासून चित्रपट मिळत होतेच. पण स्मरणीय काही मिळायला २००३ सालचा “द स्टेशन एजंट” उजाडावा लागला. त्यानंतरही त्याचं नाव फार गाजू लागलं अशातलाही भाग नाही. गाडी चालू लागली, एवढंच. स्ट्रगल संपलं, पण यश मात्र दूर; हा काळ स्ट्रगलपेक्षाही दसपट अवघड असतो. कारण, आता सोबतीला स्ट्रगल करण्याइतका बेबंद नवखेपणा नसतो आणि यशाची चव ऐकूनही माहिती नसते. बरेचसे लोक संपतात ते याच स्ट्रगलनंतरच्या स्ट्रगलमध्ये. हा सुद्धा संपलाच असता. पण तशात त्याला एक भूमिका मिळाली. बुटक्याचीच भूमिका. पण चौकटबद्ध नव्हे, अक्षरशः लाखो पैलू असणारी! मालिकेचं नाव होतं “गेम ऑफ थ्रोन्स” आणि भूमिकेचं नाव होतं टिरियन लॅनिस्टर!!

याने तिच्यात असा काही जीव ओतला की, “गेम ऑफ थ्रोन्स”च्या महाभारतातला श्रीकृष्ण कुणी असेल, तर तो हाच! त्याची भूमिका राखाडी कंगोऱ्यांची होती, पण त्या मालिकेचं वैशिष्ट्य असलेल्या स्वार्थीपणाच्या पल्याड जाऊ पाहाणारीसुद्धा होती. बुटकेपणामुळे आलेली सारी अवहेलना, अपमान त्याने टिरियनच्या डोळ्यांत उतरवला आणि प्रेक्षक व समीक्षकांनी एकमुखाने डोक्यावर घेतल्यामुळे हा अभिनेता सगळ्यांहून जास्त उंच ठरला! पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत त्याने टिरियनचं केवळ आणि केवळ सोनंच केलं, नंतरच्या काळात शोरनर्सनी माती करण्यात काहीच कसर सोडलेली नसताना!!

कालच त्याचा एक्कावन्नावा वाढदिवस झाला. मात्र मी अद्याप त्याचे नावच सांगितलेले नाही. कर्तृत्ववान माणसाला वेगळ्या ओळखीची काय गरज? मी न सांगताही तो पीटर डिंक्लेज असल्याचे आपण केव्हाच ओळखले असेल. काल त्याने वयाची पन्नाशी पार केली. पण खरं सांगू, त्याचं स्ट्रगलपलिकडचं स्ट्रगल अद्याप संपलंय असं मला वाटत नाही. कारण “जीओटी” ही आयुष्यात एकदाच घडू शकणारी गोष्ट आहे, ती सतत होत नसते. त्याच्या प्रतिभेची उंची कवेत घेऊ शकणाऱ्या भूमिका मिळणं खरोखरीच दुरापास्त आहे. वॉकिन फिनिक्सने “जोकर”ची पार्श्वभूमी जशी उत्कट साकारली, तशीच हीथ लेजरने “जोकर”ची तिरपागडी शैली अजरामर करून सोडली. माझं वैयक्तिक मत सांगू? “जोकर”ची भूमिका दिल्यास पीटर डिंक्लेज त्याचं कारुण्य आणि बीभत्सपणा, दोन्हीही एकाच वेळी साकारून दाखवू शकतो. पीटर डिंक्लेजला अशा भूमिका मिळत गेल्या, तरच त्याच्या स्ट्रगलपलिकडचा स्ट्रगल खऱ्या अर्थाने संपू शकेल. मात्र तोपर्यंत आणि त्यानंतरही हा पारसमणी येणाऱ्या प्रत्येक भूमिकेचे सोनेच करत राहिल, यात कसलीच शंका नाही!!

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *