ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिटेक्टिव्हची गोष्ट — मंक

मनोव्यापार हे असं गूढ आहे, जे जितकं सोडवू जाल तितकं जास्त भुलवतं. आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर लहान किंवा मोठ्या स्वरूपाच्या मानसशास्त्रीय विकाराला सामोरं जावंच लागतं. त्या खेरीज आपण रोजच्या आयुष्यातही कित्येक प्रकारचे गंड, भिती वगैरे घेऊनच जगत असतो. पण जर एखाद्याला ३१२ प्रकारचे भयगंड असतील तर? त्याने काय करावं? कोणता व्यवसाय करावा? आणि भयगंड तरी कसले तर जंतू, टोकदार वस्तू, उंची, कोंदट जागा, अळिंबी, सुया, मृत्यू, साप, वीज, गर्दी, विमाने, मुंग्या, लहान बाळं, पक्षी, माश्या, पांघरूण, जहाज, पूल, मांजरं, गुहा, खडू, बदल, डांबर, ढग, खोकला, विदुषक, कुरळे केस, अंधार, डिकॅफ, वाळवंट, घाण, कुत्रे, ड्रायर, खेळणी, अंड्याचा बलक, आग, विदेश, फ्रेंच सिनेमा, बेडूक, जिराफ, हिमनग, जंगल, खाकी, चुंबन, किवीचे फळ, शिडी, ढेकूण, कुष्ठरोग, २२१ किंवा २२३ आकड्यांनी संपणाऱ्या याद्या, निसर्ग, उंदरं, माकडं, मेड इन चायनाचे लेबल्स, नवीन जागा, नग्नता, फोन बुथ, औषधं, प्रश्न, बाहूल्या, सभा, गर्दी, ससे, नद्या, खारे शेंगदाणे, बिनबाह्यांचे शर्ट, टॅक्सी, स्पर्श, रेल्वे, झाडं, ट्रक, बोगदे, अंतर्वस्त्रे, वारा, झेब्रा, प्राणिसंग्रहालये इ. इ. तुम्ही कदाचित म्हणाल की, अशा माणसाने तर काही व्यवसाय करण्यापेक्षा स्वतःला आयुष्यभर एखाद्या खोलीतच कोंडून घेतले पाहिजे. जो माणूस दुधालाही घाबरतो, तो माणूस काय करणार आयुष्यात? तर श्वास रोखून धरा, हा माणूस आहे एड्रियन मंक (टोनी शॅलूब). जगातील सर्वश्रेष्ठ डिटेक्टिव्ह आणि “मंक” (२००२-२००९) या टिव्ही मालिकेचा नायक!

जगातल्या बहुतांशी गोष्टींना घाबरणारा, तऱ्हेतऱ्हेचे ओसीडीज असणारा आणि तरीही जगातील सर्वश्रेष्ठ डिटेक्टिव्ह, ही कल्पनाच इतकी अफाट आहे की, नुसत्या तेवढ्याच भांडवलावर मी ही मालिका पाहायला सुरुवात केली होती. परंतु लवकरच माझी खात्री पटली की, ही भन्नाट कल्पना त्या कल्पनेच्या कल्पनेपलिकडे फुलवण्यात मालिकाकार कल्पनातीत यशस्वी झालेयत! “मंक” केवळ नेहमीसारखा प्रोसिजरल ड्रामाच नाहीये, तर त्याहून खूप जास्त आहे.

एड्रियन मंक एकेकाळी पोलिस अधिकारी होता. त्याही काळात त्याला या सगळ्या प्रकारचे भयगंड होतेच, पण त्यांचं प्रमाण बरंचसं कमी होतं. मात्र एके दिवशी मंकला समजून घेणारी त्याच्या आयुष्यातील एकमेव व्यक्ती, त्याची प्राणप्रिय बायको ट्रूडी कालवश होते आणि मंकचे सारेच गंड कळस गाठतात. वर्षांमागून वर्षं तो नैराश्य आणि विस्मृतीच्या गर्तेत घालवतो. पण एखादा बृहस्पती असा किती काळ राहू शकणार? मंकचा मित्र आणि पोलिस अधिकारी कॅ. लीलंड स्टॉटलमायरच्या (टेड लिव्हाईन) सांगण्यावरून मंक कन्सल्टंट म्हणून पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी मदत करायला तयार होतो. अर्थात भीतभीतच. त्याला पदोपदी त्याची नर्स व मदतनीस शॅरोनाची (बिट्टी श्रॅम) मदत लागत असते. आणि अशाप्रकारे मंकचं एक नवंच आयुष्य सुरू होतं. समोर असलेल्या घटनास्थळातून तो त्याच्या अचाट निरीक्षणशक्तीच्या, अफाट आकलनशक्तीच्या आणि असीम प्रतिभेच्या बळावर असे काही धागे शोधून काढत असतो, की कोणताही गुन्हा हा त्याच्यापासून कोडे राहूच शकत नाही.

वरचं वाक्य वाचून तुम्हाला आपसूकच वाटेल की, “मंक” शेरलॉक होम्सवरून तर प्रेरित नसेल? मालिकेने ही बाब कधीच लपवून ठेवलेली नाही. उलट शक्य तितक्या वेळा मालिका होम्सचे रेफरन्स देत असते. किंबहूना मूळ संहितेत मंकचे वर्णनच “शेरलॉक होम्स, पण सटकलेला” असे केलेय! मंकचा भाऊ अॅम्ब्रोजचे (जॉन टर्टुरो) पात्रदेखील मायक्रॉफ्टवरच बेतलेले आहे. परंतु ही साम्यस्थळे इथेच संपतात. होम्स जरासा तिरसट असला, तरीही निडर आहे. मंक मात्र जगातील जवळपास प्रत्येक गोष्टीला घाबरतो. होम्स गरज पडली तर दोन फटके खाऊ शकतो आणि चार देऊ शकतो, मंकला हे कधीच जमणारे नाही. होम्सला व्यसनं आहेत, मंकला कशाचेच व्यसन नाही. मंकच्या कथेचं मूळ शोकारंभी आहे. शोकारंभी कथा, अवसादग्रस्त नायक आणि प्रोसिजरल ड्रामा, विचार करा मालिका किती गंभीर असायला हवी. या गोष्टींत जर, मंक जगातील प्रत्येक गुन्ह्याचा माग लावू शकतो परंतु बायकोच्या खुन्याचा शोध तो अद्याप घेऊच शकलेला नाही या बाबीची भर टाकली, तर दु:खाची किनार अजूनच गडद होते. “मंक” या सगळ्याच गोष्टी अतिशय ठळकपणे आणि तितक्याच प्रामाणिकपणे मांडते. “मंक”मधील गुन्हे गंभीर आहेत, त्यांचा तपासही प्रामाणिकपणे चालतो. मंक सातत्याने ट्रूडीबद्दल भरभरून बोलत असतो, तिच्या आठवणींनी हळवा होत असतो. आता धक्का देऊ? श्वास रोखून धरा, “मंक” ही एक सिटकॉम आहे! होय, मंक ही एक विनोदी मालिका आहे! फक्त ती किंचित जुनी असल्यामुळे त्यांचा विनोद आजकालच्या पुरोगामी स्टँडअप कमेडियन्ससारखा ओढूनताणून आणलेला नाहीये, तर अतिशय नैसर्गिक आहे!

डिटेक्टिव्ह मालिकांसाठी सगळ्यांत मोठा सापळा जर कोणता असेल, तर तो म्हणजे प्रेक्षकांनी खुनी कोण ते आधीच ओळखणे. हे एकदा-दोनदा जरी झालं तरी लोकांचा रस संपण्याची शक्यता असते. “मंक” मला आवडण्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण हे की, त्यांनी हा प्रकारच ठेवलेला नाही. त्यांचे बहुतांशी भाग खुनी कोण, ते सुरुवातीलाच दाखवून टाकतात. चातुर्याची बाब हीच की, त्यांचा ढाचा “हू-डनिट” नाहीच आहे. ते कुणीही ओळखेल, हे माहितीये त्यांना. ते प्रेक्षकांना प्रत्येकवेळी “हाऊ-डनिट” आणि “व्हाय-डनिट” याच दोन मुद्यांवर खेळवतात आणि अतिशय यशस्वीपणे खेळवतात! एकतर सिटकॉम, त्यात हा फॉर्मॅट-ट्विस्ट “मंक”ला इतर प्रोसिजरल ड्रामांपासून वेगळ्याच श्रेणीत नेऊन बसवतो! ट्विस्टचाच विषय असेल, तर प्रत्येक भागाच्या शेवटी मंक जेव्हा खून नेमका कसा झाला ते विशद करतो, ज्याला मंकव्हर्समध्ये “हिअर इज व्हॉट हॅपण्ड” म्हणतात, त्यात बहुतांशी वेळा वेगवेगळ्या कथनशैली वापरूने ते अधिकच रंजक करण्यात मालिका एवढी यशस्वी झालीये की, ज्याचे नाव ते!!

तुलनाच करायची झाली, तर शेरलॉक होम्समध्ये शेल्डनची (द बिग बँग थियरी) बुद्धिमत्ता, शेल्डनचे गंड, शेल्डनचा गरजेपेक्षा जास्त नीटसपणा अधिक हॅरल्डची (पर्सन ऑफ इंटरेस्ट) आकलनशक्ती आणि हॅरल्डचे दु:ख मिसळले तर काहीसा मंक तयार होऊ शकतो. पण त्याच्यात शेल्डनच्या स्वभावात नकळतपणे असलेला स्वार्थ नाही आणि हॅरल्डसारखी दुनियादारीची समजदेखील नाही. मंक या सगळ्यांपेक्षा वेगळाच किंबहूना खरोखर एकमेव आहे. एकमेव आहे, म्हणूनच एकटादेखील आहे. त्याच्या भयगंडांमुळे मालिकेत त्याचा वारंवार अपमान होतो. इतका की, अक्षरशः बघवत नाही. त्याला साध्यासाध्या गोष्टीही करणे जमत नाही. पण शेल्डनचा जितक्या वेळा राग येतो, तितक्या वेळा मंकचा राग येत नाही. उलट जास्तीत जास्त वेळा निर्मळ मनाच्या मंकबद्दल सहानुभूतीच वाटत राहाते. किंबहूना शेल्डनचेच पात्र कालानुक्रमे “मंक”मधून उचलले असण्याचीच जास्त शक्यता वाटते.

“मंक” प्रसंगोपात एड्रियनचे पूर्वायुष्यदेखील उलगडते. त्याला रूढार्थाने मित्र नाहीतच. त्याची स्थिती पाहाता, असूही शकत नाहीत. पण त्याच्या जवळचे लोक त्याच्यासाठी खरोखर जीव टाकतात. स्टॉटलमायर, ल्युटेनंट रँडी डिशर (जेसन ग्रे-स्टॅन्फर्ड), शॅरोना, शॅरोनाचा मुलगा बेंजी हे सगळेच मंकचा तिरसटपणा, तुसडेपणा सहन करतात, त्याला समजून घेतात. लेखनातील गंमत म्हणजे, मंक त्याच्या स्वभावानुसार कुणालाच, अगदी कुणा अपराध्यालादेखील चतुराईपूर्ण उलट उत्तरं देऊ शकत नाही. ते काम मंकसाठी बरेचदा स्टॉटलमायर करतो. तो मंकपेक्षा खूपच कमी हुशार परंतु अतिशय अनुभवी माणूस आहे. तो मंकचा मोठा भाऊ असल्यासारखा त्याला सांभाळून घेतो. मालिकेतील ब्रेन जर मंक असेल, तर मसल स्टॉटलमायर आहे. डिशर हा मेहनती, परंतु अद्याप अनुभवाची शिदोरी गाठिशी जमा न झालेला असा किंचित मंद अधिकारी आहे. तो कामाचा आहे, परंतु त्याचा निर्बुद्धपणा आणि चंचलपणा बरेचदा विनोदाचे कारण बनतात. या दोघांचाही पात्रपरिपोष जितका चांगला केला गेलाय, तितकेच जबरदस्त या दोघा कलाकारांचे कामही झालेय. टेड लिव्हाईन हा दिसायला सुरेश ऑबेरॉयसारखा दिसतो, असे मला उगाचच सातत्याने वाटत राहाते! मंकचं मानसशास्त्र उलगडण्यात, त्याला बोलतं करण्यात सगळ्यांत महत्त्वाची भूमिका बजावतो तो त्याचा मानसोपचारतज्ञ डॉ. चार्ल्स क्रोगर (स्टॅन्ली कामेल). त्या दोघांची केमिस्ट्री वेगळीच जमलीये. आणि टोनी शॅलूब! त्याच्याबद्दल काय बोलू या लेखासारखे अजून पन्नास लेख जरी लिहिले तरी त्याने मंकचे पात्र ज्या प्रतिभेने मांडलेय, ते एक टक्काही समजावून सांगता नाही येणार. त्याचं काम ही पाहाण्याचीच गोष्ट आहे. आनंदाचा ठेवा आहे तो खरोखर!

एकदा का पात्रांची आणि कलाकारांची भट्टी जमून आली की, कुणा एकाचेही जाणे सबंध मालिकेलाच मारक ठरू शकते. “मंक”मध्येही जेव्हा शॅरोनाची भूमिका करणारी बिट्टी श्रॅम मालिका सोडून गेली, तेव्हा अशीच वेळ आली होती. हा मालिकेचा स्खलनबिंदू ठरू शकला असता. कारण, तिने शॅरोनाची भूमिका एवढी सुंदर वठवलीये की, तिच्या जागी दुसऱ्या कुणाला स्वीकारायची कल्पनाही सहन होत नव्हती. परंतु मंकची नवी असिस्टंट नॅटली टीगरच्या भूमिकेत ट्रेलर हॉवर्ड आली आणि माझे मतच बदलून गेले. शॅरोनाच्या पात्रातील सगळ्याच त्रुटी तिने भरून काढल्या आणि वेगळीच उंची गाठली. शॅरोना जराशी डॅम्सेल इन डिस्ट्रेस होती, नॅटली अतिशय कणखर आहे. शॅरोना मंकला एखादी गोष्ट करायला फार जबरदस्ती करत नसायची, नॅटली बरोब्बर रागावून मंकला ताब्यात ठेवते. तिची मुलगी ज्युलीसुद्धा (एमी क्लार्क) कमाल पात्र आहे. असंच त्यांचं जेफ बिलने बनवलेलं सर्वांगसुंदर थीम म्युझिकही (माझी सध्याची रिंगटोन!) त्यांनी नंतरच्या सीझन्समध्ये रँडी न्यूमनच्या “इट्स अ जंगल आऊट देअर” गाण्याने रिप्लेस केलं, तेव्हा आवडलं नव्हतं. हळूहळू ते गाणं मला आवडू लागलं. गंमत म्हणजे, मालिका सुरू असतानाही प्रेक्षकांच्या शॅरोना आणि गाण्याच्या रिप्लेसमेंटबद्दल सुरुवातीला नेमक्या याच भावना असाव्यात कारण, एका भागात (२/१२) मालिकाकारांनी या बदललेल्या गाण्याचा आडूनआडून मोठ्या खुबीने उल्लेख केलाय! परिवर्तन जरी संसाराचा नियम असला, तरी आपल्या प्रत्येकातच बदलाला घाबरणारा एक मंक दडलाय बहुतेक!

हाच तर खरा मुद्दा आहे. मंक गटात न बसणारा आहे. सगळ्यांहून वेगळा आहे. पण कोणत्या ना कोणत्या पातळीवर आपण सगळेच तसे नसतो का? आपणही काही बाबतींत तिरसट असतो, तुसडे असतो, हट्टी असतो, दुराग्रही असतो. थोडक्यात, कोणत्या ना कोणत्या स्तरावर आपण प्रत्येकजण मंकच असतो! इतके जगावेगळे पात्र, परंतु एका पातळीवर ती आपल्याच आयुष्यातील गोष्ट वाटू लागते, मला वाटतं की “मंक” मालिकेचे हेच सगळ्यांत मोठे यश आहे. तेव्हा जगभरातील, विशेषतः भारतातील ओटिटी प्लॅटफॉर्म्सवरील प्रोपगेण्डाछाप मालिकांना कंटाळला असाल आणि काहीतरी खरोखरीचे चांगले, सशक्त व सकस पाहायचे असेल, तर “मंक”सारखी मालिकाच नाही!

*५/५

— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेख वाचण्यासाठी पाहा

www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *