मर्यादांमध्ये अडकून पडलेला – पोन्नियिन सेल्वन: १

दहाव्या शतकाच्या मध्यात चोळ साम्राज्याच्या सीमा इतर राज्यांच्या सीमांना धक्के देऊ लागल्या होत्या. ‘कडारम कोण्डान’ राजेन्द्र चोळाचं सर्वंकष साम्राज्य अद्याप अवतरायचं आहे, परंतु दुसरा परान्तक तथा सुन्दर चोळाचं (प्रकाश राज) साम्राज्य मात्र डौलाने उभं होतं. आणि त्या डौलाला पेलून धरणारे दोन समर्थ खांदे होते, ते म्हणजे आदित्य करिकालन् (चियान विक्रम) आणि अरुळमोळीवर्मन् (जयम् रवी). परंतु सुन्दर चोळाचं राज्य अवैध मानणारेही काही लोक होतेच की! काय कारण होतं त्यापाठी? त्याचं झालं असं की, मुळात सम्राट होता गण्डरादित्य चोळा. त्याच्यानंतर राज्य त्याचा मुलगा मदुरान्तकाला मिळायला हवं होतं. पण तो पडला खूपच लहान. त्यामुळे राज्य गेलं सुन्दर चोळाकडे. तेव्हा राज्य हे खरा वारस म्हणून मदुरान्तकाकडेच जायला हवं, असं काहींना वाटल्यास नवल नाही. गंमत केव्हा झाली, जेव्हा हे वाटणारे ते तथाकथित काही लोक खरोखरच मदुरान्तक गादीवर यावा म्हणून षडयंत्र करायला लागले!

ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी की, युवराज आदित्य करिकालन् हा राज्यात राहातोच कुठे? पळवूर नंदिनीशी (ऐश्वर्या राय) प्रेमात ताटातूट झाल्यापासून तो रांगड्या शिपाईगड्यासारखा सतत मोहिमेवरच असतो. त्याच्यामुळे दुखावलेली नंदिनी एखाद्या विदुलेसम आहत आहे व सूड घेण्यास उत्सुक आहे. तिसरीकडे अरुळमोळीवर्मनही श्रीलंका जिंकायला गेलाय. त्याच्या जीवावर पांड्य उठलेले आहेत. थोडक्यात काय तर चोळांच्या बाजूने काय लोक असतील ते असोत, पण विरोधात मात्र एकापाठोपाठ एक आघाड्या उघडतच चालल्यायत. मणिरत्नमचं स्वप्न म्हणावा असा ‘पोन्नियिन सेल्वन’ सुरूच या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर होतो. कल्कीच्या मूळ कादंबरीप्रमाणेच आपल्याला हा सगळा खेळ वल्लवरायन् वंदियादेवन् (कार्ती) च्या नजरेतून दिसतो. कल्कीच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीवर आधारित असणे हे जसे चित्रपटाचे बलस्थान आहे तसेच तेच त्याचे मर्मस्थानदेखील!

मी बलस्थान म्हणतोय ते यासाठी की, तमिळनाडूतील लोकांना पिढ्यानपिढ्या ओढ लावलेली ही अभिजात कथा चित्रपटाला भक्कम पाया देते. परंतु दुर्दैवाने कथेचा अतिपरिचय हाच चित्रपट म्हणून माध्यमांतर होताना अवज्ञेचे कारणही ठरतो. कथेचा भलामोठा आवाका कवेत घ्यायला दोन चित्रपटही अपुरे वाटतात. आणि जेव्हा चित्रपट संपायला आला तरीही नव्याने पाहाणाऱ्या प्रेक्षकांना पात्रांची धड नावेच उलगडलेली नसतात, तेव्हा तर या कादंबरीवर चित्रपट करायच्या ऐवजी दोन-तीन पर्वे चालणारी एखादी मालिकाच बनवली असती, तर जास्त बरं झालं असतं, असं वाटू लागतं.

मणिरत्नमने अखेरचा सर्वांगसुंदर चित्रपट जर कोणता दिला होता आठवायचे झाले तर पार ‘ओ कादल कन्मणी’पर्यंत (२०१५) मागे जावे लागते. त्यानंतर त्याने केलेले दोन्हीही चित्रपट ‘काऽट्र वेलियिडयि’ (२०१७) आणि ‘चेक्का चिवन्ता वानम्’ (२०१८) एकापेक्षा अनेक पातळ्यांवर फसलेच होते. त्यातही ‘चेक्का चिवन्ता वानम्’ची कथा ही जवळपास ‘पोन्नियिन सेल्वन’सारखीच आहे. मी कायम म्हणत असतो की, राजमौलीचा ‘मघाधीरा’ (२००९) हा नुसता चित्रपट नाहीये, तर जगातले सगळ्यांत महागडे ‘पिच’ आहे. त्या पिचच्याच जोरावर राजमौलीने ‘बाहूबली’ (२०१५-१७) पटकावला. नेमके तेच मणिरत्नमने ‘पोन्नियिन सेल्वन’च्या आधी ‘चेक्का चिवन्ता वानम्’ बनवून केले. पण मणिरत्नमचं स्वप्न जरी असलं तरीही प्रत्येक कलाकृती ही एका विवक्षित काळानंतर कालबाह्यच होत जाते. नेमका तोच जरामरणादि भयांचा शाप या कलाकृतीला भोवताना दिसतोय. आणि म्हणूनच कादंबरी म्हणून रोमहर्षक असू शकणारी कथा चित्रपटात माध्यमांतरित होताना पारच सपाट वाटू लागते.

मणिरत्नम हा मानवी भावभावनांची आणि परस्परसंबंधांची गुंतागुंत मांडण्याच्या बाबतीत वस्ताद आहे अक्षरशः! पण बाहूबल्योत्तर भव्यपटांना केवळ याच मुद्यावर शंभर गुण मिळवून भागत नाही आता, तर साहसदृश्ये, युद्धप्रसंग आदी विभागांतही बाजी मारावी लागते. आणि त्या दोन्हीही आघाड्यांवर मणिरत्नमचं दिग्दर्शन नवखं, अक्षरशः बालीश वाटतं. आणि निम्मा चित्रपट इथेच गंडतो. त्या प्रसंगांमध्ये पडद्यावर नुसता गोंधळच दिसतो, विचारपूर्वक नियोजिलेल्या आणि कौशल्यपूर्वक चितारलेल्या चौकटी दिसतच नाहीत. त्या प्रसंगांमधील रविवर्मनचा सततचा हलता कॅमेरा त्रासात अजूनच भर घालतो. बरं एवढं होऊन ही घसरण थांबते म्हणावं, तर तसंही नाही. चित्रपट जरी चार-पाच भाषांमध्ये प्रदर्शित केलेला असला तरीही मुळात तो बनवताना पॅन-भारतीय प्रेक्षकांचा जराही विचार केलेला दिसून येत नाही. किंबहूना प्रेक्षकांपैकी सगळ्यांनीच मूळ कादंबरी वाचली आहे आणि त्या सगळ्यांनाच मुख्य घटना व त्यातील मैलाचे दगड माहिती आहेत, असेच गृहित धरल्याचे जागोजागी दिसून येते. त्यामुळे प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग हा आपोआपच चित्रपटापासून तुटतो, दुसरा दूर जातो आणि तिसरा कधी जवळच येत नाही. कितीही चांगली डबिंग केलेली असली तरीही शेवटी चित्रपट हा वैश्विक कथा न बनता एक काहीशी परकी वाटणारी, काठावरूनच पाहिल्यासारखी तमिळ कलाकृतीच तेवढा राहातो. हाच प्रकार याआधी लोकेश कनगराजच्या ‘विक्रम’बाबतही (२०२२) झाला होता व त्यामुळेच तो दक्षिणेकडे धो-धो चालूनही उत्तरेकडे ‘बाहूबली’, ‘केजीएफ’ (२०१८-), ‘आरआरआर’सारखा (२०२२) रुजलाच नाही. ‘पोन्नियिन सेल्वन’देखील त्याच मर्यादांमध्ये अडकून पडतो. शिवाय जर चित्रपटाचा मूळ प्रेक्षकवर्ग हा कादंबरी वाचलेला, ती पडद्यावर पाहून स्मरणरंजनात दंग होणारा असेल, तर मग अखेरच्या प्रसंगातील ट्विस्टला काही एक अर्थ उरत नाही. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अरुळमोळीवर्मन् हा इतिहासात कोण आहे हे माहिती असणाऱ्यांसाठी तर शेवटच्या प्रसंगातील लटकंती अजिबातच अनावश्यक ठरते. ‘बाहूबली’च्या पहिल्या भागाच्या धक्कादायक शेवटाशी साधर्म्य साधणारे काहीतरी दाखवायचे म्हणून असे दाखवले की काय, अशी सार्थ शंका आपल्याला वाटून जाते. परंतु त्या शेवटाने सबंध देशाला महिनोन्महिने विचार करायला भाग पाडले होते, इथे मुळातच हाताळणी विचार न करता अगदी घाईत केलेली असल्यामुळे त्या धक्क्याचा प्रभाव ताबडतोब ओसरूनदेखील जातो.

मला या कथेमागचा इतिहास, कादंबरी व त्यापाठची भूमिका या सगळ्या गोष्टी सखोल माहिती असूनही चित्रपट माझ्या मनाचा ठाव घेत नाही, याचं कारण म्हणजे इळांगो कुमारवेल, बी. जयमोहन आणि मणिरत्नमचे लेखन. वर सांगितल्याप्रमाणे लेखक-दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना कथा माहिती असल्याचे गृहित धरले आहे. पण ते एकवेळ बाजूला ठेवले तरीही पटकथालेखनाला काहीच दिशा नाहीये. त्यामुळे कार्तीचे प्रसंग छान वाटतात, विक्रमचे प्रसंग छान वाटतात, तृषाचे प्रसंग छान वाटतात, जयम् रवीचे प्रसंग छान वाटतात पण तरीही त्या प्रसंगांची एकत्र मोट बांधूनही चित्रपट एकूणात प्रभाव पाडू शकत नाही. दुसरं म्हणजे ज्याला पटकथालेखनात कॉन्फ्लिक्ट म्हणतात आणि नायकांच्या प्रवासात जे अडथळे येणं अपेक्षित असतं, त्या दोन्हीही गोष्टी समप्रमाणात घडत नाहीत. पात्रांची कथा सांगण्याऐवजी कथाच पात्रांच्या मागे वाहावत जाते. त्यामुळे काही प्रसंग सुसह्य तर काही असह्य कंटाळवाणे होतात. चित्रपटाची १६७ मिनिटांची भलीमोठ्ठी लांबी पार करूनही कथा फारशी पाहिलीच नाही, असे जाणवत राहाते. त्याला संपादक ए. श्रीकर प्रसादही काहीच करू शकत नाही. कथावस्तू कोणत्याही चित्रपटाचा आत्मा असतो. परंतु त्याभोवती जर तितकेच सामर्थ्यवंत शरीर नसेल, तर तो आत्मा भटकतच राहातो. इथे तेच झाले आहे. कल्कीची दमदार कथा साथीला आहे या भ्रमात चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाबींकडे फारसे लक्ष न दिले गेल्यामुळे चित्रपट हा घाईघाईत उरकल्यासारखा वाटतो व चित्रपटगृहाबाहेर पडल्यानंतर त्याचा प्रभाव फारसा स्मरणात राहात नाही. पुन:प्रत्ययाची ओढ नसणे हे इतक्या मोठ्या बजेटच्या चित्रपटासाठी धोक्याचेच आहे.

चित्रपटाची सगळ्यांत जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे कलाकारांची निवड. विक्रमने आदित्य करिकालनचं धुमसणं पडद्यावर अक्षरशः साकार केलंय. त्यातून पुढे काय घडणार आहे हे ठाऊक असणाऱ्यांना तर त्याच्या अभिनयाची वेगळीच झिंग चढेल. पण त्याच्या पात्ररचनेवर मणिरत्नमच्याच ‘रावणन्’चा (२०१०) नको तितका प्रभाव आहे. त्यातही त्याने अगदी अशीच, हेच सगळे कंगोरे असलेली भूमिका चितारली होती. तो साक्षात विक्रम आहे म्हणूनच इथेदेखील तो त्या भूमिकेच्या सगळ्याच मर्यादांना पलांडून जातो, एवढंच. तो भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांपैकी एक खचितच आहे, फक्त त्याने चुकीच्या संहिता निवडण्याचा शाप तेवढा ओलांडला पाहिजे. त्याच्या खालोखाल चपखल जमलाय तो कार्तीचा वल्लवरायन् वंदियादेवन्! त्याला इतर कोणत्याही अभिनेत्यांच्या तुलनेत सगळ्यांत जास्त स्क्रिनटाईम आहे. परंतु त्याने त्यातील एक एक मिनिट वसूल केलाय मस्तपैकी! त्याच्या एकट्याच्याच वाट्याला चित्रपटातील बहुतांशी विनोदी प्रसंग आलेले असल्यामुळे त्याला पाहाणे मजेदार वाटते. पण त्याचे पात्र उगाचच उठवळ दाखवले आहे. तो दिसेल त्या प्रत्येक स्त्रीशी फ्लर्ट करतो. मग तो राणी बघत नाही, राजकुमारी बघत नाही, त्याला अगदी नावाडीसुद्धा चालते. त्याचा घोडा बायकांचे कपडे पळवतो. हेच सगळे कादंबरीतही असेल तर हा परत एकवार माध्यमांतराचाच दोष म्हटला पाहिजे. कारण, तो जे काही करतो तेच सगळे समजा पळुवेट्टरायरच्या (हिंदीत पर्वतेश्वर) माणसांपैकी कुणी केले असते तर त्याची घृणा वाटली असती. इथे तेच सगळे खपवून का घ्यायचे, तर केवळ तो नायकांच्या बाजूचा आहे म्हणून? त्याचेही पाठलागाचे प्रसंग, युद्धाचे प्रसंग अतिशय नवशिक्यासारखे चित्रित केले आहेत.

अरुळमोळीवर्मनच्या भूमिकेत जयम् रवी अतिशय राजस वाटतो. त्याला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या थाटाची भूमिका मिळाली आहे आणि तो ती मन लावून करतो. ऐश्वर्या ही दैवी सुंदरी दिसणे कथेत अपेक्षित आहे व तशी ती विभासादी वापरून का होईना, पण दिसते. अभिनयाच्या बाबतीत तिने चांगलेच काम केलेले असले तरीही तिच्या दिखाऊ अभिनयाला तृषाने आपल्या नैसर्गिक सामर्थ्याच्या जोरावर सुस्पष्ट मात दिली आहे. तिचे सौंदर्य अधिक नैसर्गिक वाटते आणि म्हणूनच तिची भूमिका प्रेक्षकांना अधिक जवळचीदेखील वाटते. तिच्या पात्राची चतुराई त्या भावनेत अजूनच भर घालते. मी वर जे लिहिलेय की, चित्रपटातील सगळ्यांत जास्त भावलेली गोष्ट म्हणजे पात्रांची निवड, ते अशाच मार्मिक गोष्टींमुळे. प्रकाश राजची भूमिका शब्दशः ‘चेक्का चिवन्ता वानम्’मधल्या ‘सेनापती’चीच आहे व ती त्याने इथेही तशीच्या तशीच वठवली आहे. मणिरत्नमला मुळातच आपल्या चित्रपटांतून आपल्याच आधीच्या चित्रपटांतील गोष्टींची पुनरावृत्ती करायचा वाईट छंद आहे. ‘गुरू’मध्येही (२००७) ‘मौना रागम्’ची (१९८६) जाणवण्याइतपत पुनरावृत्ती होती. तोच प्रकार इथेही दिसून येतो. पार्तिबन्, शरदकुमारादी नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी नेहमीसारखेच त्यांच्या त्यांच्या भूमिकेचे पदर लीलया उलगडले आहेत. अळवारकाडियान नम्बीची वेड पांघरून पेडगावला जाणारी भूमिका जयरामने परिपूर्णतेने वठवली आहे. माध्यमांतराच्या दोषाचं आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर चित्रपटातील विनोद हा किंचित असंवेदनशीलतेच्या अंगाने जाणारा आहे. सत्तर वर्षांपूर्वी कादंबरी लिहिली त्यावेळी तमिळनाडूच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत ते चालून गेलेलं असलं तरीही आजच्या काळात ते काहीसं अप्रस्तुतच वाटतं. शिवाय मणिरत्नमची विचारसरणी आणि कादंबरीला अभिप्रेत असलेली विचारसरणी या दोन्हींचा संगम करण्याच्या द्राविडी प्राणायामात चित्रपट ना धड या बाजूचा राहातो, ना त्या बाजूला जातो.

चित्रपटाची आवडून गेलेली दुसरी गोष्ट म्हणजे दिव्य प्रकाश दुबेंनी लिहिलेले हिंदीतील संवाद. मी व्यक्तीश: चित्रपट त्या त्या मूळ भाषेत पाहाण्याचा खंदा पुरस्कर्ता आहे. परंतु इथे मात्र हिंदी संवाद निव्वळ मीटर भरण्यापुरते न राहाता त्या काळाला साजेसे संस्कृतप्रचुर व अर्थवाही झालेले आहे. याउलट महबूबची गाणी मात्र परकीय शब्दांची रेलचेल असलेली आहेत. ती ऐकताना एखाद्याला आपण एतद्देशीय चोळांचा गौरव ऐकतोय की आक्रमणकारी मुघलांचा असा प्रश्न पडल्यास नवल नाही. त्यामुळे संवाद वेगळ्या संस्कृतीचे आणि गाणी वेगळ्याच असा एक ठिगळछाप प्रकार चित्रपटाचा रसभंग करणारा ठरतो. रहमानचे संगीत किती जरी दैवी असले तरी हिंदीतच नव्हे तर तमिळमध्येसुद्धा लिरिक्स फारसे प्रभावी झालेले नाहीत. वैरामुत्तूची कमतरता पदोपदी जाणवते. शिवाय एक ‘राच्चस मामने’ वगळता इतर सगळ्यांच गाण्यांचं चित्रण अतिशय सुमार पद्धतीने केल्यामुळे रहमानच्या प्रतिभेला पडद्यावर अजिबात न्याय मिळत नाही. तरीदेखील अनेक प्रसंग रहमानने नुसत्या पार्श्वसंगीताच्या ताकदीवर जिवंत केले आहेत! चित्रपटात अगदी सुरुवातीलाच मणिरत्नमच्याही आधी रहमानचे नाव येते, हीच त्याच्या अद्वितीयतेची पावती आहे. विक्रम गायकवाडांची रंगभूषा (खात्री करणे आवश्यक), तोट्टा तरणीचं नेपथ्य आणि एका लखानीची वेशभूषा या चित्रपटाच्या अत्यंत जमेच्या बाजू.

मला वाटतं महापुरुषांप्रमाणेच काही कलाकारही त्या त्या काळाची अपत्यं असतात. मणिरत्नम हा अत्यधिक प्रतिभेचा धनी आहे. त्याने काही काळ विश्रांती घेऊन स्वतःचा नव्याने शोध घ्यायचा प्रयत्न केल्यास त्याच्याकडे सांगण्यासारखे कदाचित अजूनही खूप काही असू शकेल. परंतु दशकभरापूर्वीपर्यंत जशी चौकटींची आखणी, कथाकथन आदी सगळ्याच विभागांमध्ये त्याची स्वतंत्र छाप दिसायची, तशी या चित्रपटात एकाही चौकटीत दिसत नाही. फार लांब कशाला, त्याच्याच मागच्या ‘चेक्का चिवन्ता वानम्’ची सुरुवातीची चौकट आठवा, आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबातून पात्र दाखवणे केवढे रंजक होते! त्या दर्जाची एकही चौकट या चित्रपटात दिसत नाही. अखेरचं नौकायुद्ध अतिशय रोमांचक झालंय, परंतु तोपर्यंत एक तर वेळ निघून गेलेली आहे आणि दुसरे म्हणजे त्यासारख्या प्रसंगांची त्याहून चांगली हाताळणी अनेक इंग्रजीच नव्हे तर प्रादेशिक चित्रपटांतूनही प्रेक्षकांनी आधीच पाहिली आहे. मानवी मनाच्या गुंतागुंतीइतकीच बजेटला न्याय देणाऱ्या गोष्टींमधील गुंतागुंत कौशल्यपूर्वक मांडली गेली असती तर ‘पोन्नियिन सेल्वन’चा पहिला भाग सुसह्य झाला असता. सध्याची कलाकृती तमिळमध्ये अभिनेते, संगीत व स्मरणरंजनाच्या जोरावर चालून जाईल, परंतु इतरत्र ती चालणे व त्याहून पुढे स्मरणात राहाणे अतिशय दुरापास्त आहे.

*३/५

— © विक्रम श्रीराम एडके
[इतर लेख वाटण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *