मार्मिक भाष्याने समृद्ध – बिफॉरेनर्स
नॉर्वेतील पुढारलेल्या, शहरी ओस्लोमध्ये एके दिवशी अचानकपणे अश्मयुगीन लोक, प्राचीन व्हायकिंग्स आणि एकोणिसाव्या शतकातील मंडळी झुंडीच्या झुंडीने प्रकट होऊ लागतात. सुरुवातीचा बावरलेपणा ओसरल्यावर आजचे जगही त्यांना सामावून घेते, किमान प्रयत्न तरी करते. पण ते आजच्या लोकांचे पूर्वज असले तरीही त्यांच्या संस्कृतींमध्ये भूमी-आकाशाएवढे अंतर आहे. काही बाबतीत ते बरोबर आहेत तर काही बाबतीत आजचे लोक. यातून साहजिकपणे संघर्ष उद्भवतो. या पार्श्वभूमीवर ओस्लोच्या पोलिस दलातील अधिकारी लार्स हालंडला (निकोलाई क्लीव्ह ब्रोश) एका अश्मयुगीन महिलेच्या खुनाच्या तपासासाठी काहीशा अनिच्छेनेच इन्क्लुझिव्हनेसच्या हट्टापायी भरती केलेली, व्हायकिंग काळातून आलेली तरुण अधिकारी आल्फ्हिद्र एंगिन्स्दोत्तिरसोबत (क्रीस्टा कोसोनेन) काम करावं लागतं. कथानकाचा एक एक पापुद्रा उलगडू लागतो तसतसं आपल्याला आकळू लागतं की, त्या खुनाचे धागेदोरे काळात खूपच खोलवर हरवलेले आहेत. हे बीज आहे ‘एचबीओ’ची नॉर्वेजियन मालिका ‘बिफॉरेनर्स’चं.
मागच्या दशकात मध्यपूर्वेत रक्तरंजित युद्धसापेक्ष परिस्थितीमुळे विविध देशांमधून सहस्रावधी निर्वासित बाहेर पडले. मानवतेबद्दलच्या चुकीच्या संकल्पनांमुळे या निर्वासितांना आश्रय देण्यासाठी डाव्या विचारसरणींनी ग्रासलेल्या युरोपियन राष्ट्रांमध्ये चढाओढ सुरू झाली. हे निर्वासित एकटे आले नाहीत. ते येताना त्यांची कालबाह्य विचारसरणीदेखील सोबत घेऊन आले. पारशी जसे हिंदुस्थानच्या संस्कृतीत दुधामध्ये साखर मिसळावी तसे मिसळून गेले, तसे हे निर्वासित मिसळले नाहीत. उलट आपापल्या आश्रयदात्यांच्या राष्ट्रांनाच आपल्यासारखे कालबाह्य बनविण्यासाठी ते झटू आणि झगडू लागले. त्यातून युरोपात दंगली, हल्ले आणि जाळपोळींचे जे सत्र सुरू झाले ते थांबण्याचे नाव घेत नाहीये. उलट वाढतच चाललेय. इन्क्लुझिव्हनेसच्या भस्मासुराने त्या त्या राष्ट्रांचा बळी घ्यायला सुरुवात केली. ‘बिफॉरेनर्स’ या घटनाक्रमावर अतिशय मार्मिक भाष्य करते. ते त्यांच्या कथेच्या परीघात सोयीस्कर जेण्डर पॉलिटिक्स, रिव्हर्स रेसिझम, व्हिक्टिम कार्ड, अशा अनेक पॉलिटिकली इनकरेक्ट परंतु खऱ्याखुऱ्या मुद्यांना हात घालतात. ख्रिश्चॅनिटी आणि नॉर्स मंडळींचा मूळ पंथ यांच्यातील संघर्ष अधोरेखित करतात. मालिकेचे नावच ‘बिफोर’ आणि ‘फॉरेनर्स’ या दोन शब्दांचा शब्दच्छल आहे. असे इतरही सुरेख शब्दच्छल मालिकेत ऐकायला व पाहायला मिळतात, उदाहरणार्थ टाईम अधिक इमिग्रंट्स अर्थात ‘टाईमिग्रंट्स’.
मालिकेत वापरलेली एकूण एक गाणी चपखल आहेत. परंतु त्यांनी शीर्षकगीत म्हणून वापरलेल्या बॉबी ब्लॅण्डच्या ‘एण्ट नो लव्ह इन द हार्ट ऑफ द सिटी’च्या निवडीला तोडच नाही. मालिकेच्या सुरुवातीला नायक हार्ट ऑफ द सिटीमध्ये घर घेतो आणि त्याच दिवशी घडू लागलेल्या घटनांमुळे तो संपूर्ण भागच हळूहळू बदलून जातो, या वर गाणे तिरकस भाष्य करते. पण तेवढ्यावरच ते थांबत नाही, तर त्याचे इतरही पैलू कथेच्या ओघात आपल्याला एक एक करून गवसत जातात. या गाण्यासोबत जी श्रेयावली येते, ती त्यांनी जवळपास प्रत्येक भागासाठी नव्याने चित्रित केली आहे. सांस्कृतिक आक्रमणाचा राष्ट्रावर पडणारा प्रभाव त्या चित्रणातून ज्या जबरदस्त रीतीने मांडलाय, तसा मी तरी कोणत्याच मालिकेत आजवर बघितला नव्हता. शहरातील बदलत जाणाऱ्या ग्राफिटी, दरवेळी नव्याने बकाल होत जाणारे भाग इतक्या सूक्ष्म दृष्टीने चित्रित केले आहेत की मनापासून दाद द्यावीशी वाटते.
‘बिफॉरेनर्स’कडे भरमसाठ बजेट नाही. परंतु ती कमतरता भरून काढणारी अद्वितीय कल्पनाशक्ती आहे त्यांच्याकडे. विज्ञानकथेच्या परीघात राहूनही ते मानवी नातेसंबंध, राजकारण, धर्म यांच्यावर जी टीप्पणी करतात, ती वाखाणण्यासारखी आहे. मालिका जसजशी पुढे जाऊ लागते तसतसे कथेचे कंगोरे विस्तारत जातात, परंतु क्वचित अपवाद वगळता मालिका कुठेच आपल्या मुळांपासून दूर जात नाही. उलट कथेच्या ओघात निर्माण होणाऱ्या शक्य तितक्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं द्यायचा प्रयत्न करते. त्या उत्तरांमधून निर्माण होणाऱ्या नवनव्या प्रश्नांमधून वाट काढत कथानक पुढे नेण्याची त्यांची शैली स्तुत्य आहे. मालिकेत काही खरोखरीच्या ऐतिहासिक पात्रांचा वापर केलेला आहे. भारतीय मनाला असा वापर काहीसा वादग्रस्त वाटणारा असला, तरीही मालिका या प्रत्येक पात्राची काल्पनिक चांगली आणि काल्पनिक वाईट, अशा दोन्हीही बाजू धिटाईने मांडते. ऐतिहासिक नाट्य मांडत असतानाही ते विज्ञानकथेचे बोट कुठेच सुटू देत नाहीत, हे विशेष. हे वैशिष्ट्यच ‘बिफॉरेनर्स’ला केवळ चांगली नव्हे तर शब्दशः एकमेवाद्वितीय मालिका बनवते.
अर्थात त्यातही काही प्रमाणात अनावश्यक नग्नता व अतिरेकी प्रणयाचा अट्टाहास काहीसा विरस करतोच. शिवाय पात्रांना गुंतागुंतीचे बनविण्यासाठी त्यांची पार्श्वभूमी उगाचच मोडकी दाखवणं या क्लिषेचा मालिकेत अतिरेक जाणवतो. ते कमी म्हणूनच की काय, मुख्य पात्रांना उगाचच काहीतरी व्यसन दाखवण्याची क्लृप्तीदेखील काहीशी अनाठायी वाटते. पण जगात संपूर्णतः परिपूर्ण असं काय असतं?
अद्यापपावेतो दोनच पर्वे व एकूण बाराच भाग, हे गणित डेलिसोप्सच्या फास्टफूडवर पोसलेल्यांना कदाचित पचणार नाही. परंतु अभिजात लेखन आणि विचारपूर्वक मांडणी काय असते हे समजून घ्यायचे असेल, तर ते पचवून घ्यायलाच हवे. प्रत्येक भागामध्ये काही ना काही नैसर्गिक कलाटणी आणणे, हे मालिकेचे आणखी एक वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यांना धरूनच मालिका एक खून ते आंतरराष्ट्रीय राजकारण या भल्यामोठ्या आवाक्यात लीलया संचार करते. पहिले पर्वच नव्हे तर दुसरेही मोठे रहस्योद्घाटन करत अधांतरीच संपते. तिसऱ्या पर्वासाठी त्यांनी भांडवलाची जमवाजमव सुरू केल्याचे नुकतेच कळते आहे. ते त्यांना हवे तितके मिळावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. खूप दिवसांनी काहीतरी वेगळे आवडले आहे. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हायलाच हवी!
*४.५/५
— © विक्रम श्रीराम एडके
[अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]
