Category: Savarkar Katha

  • निरोप

    निरोप

    तसं पाहिलं तर नेहमीसारखाच दिवस. परंतू सकाळची वेळ. त्यामुळे जरा चौकस राहावं लागे. हो, याच वेळी नवे बंदी तुरुंगात येतात, जुन्यांची दुसरीकडे पाठवणी होते, कधी-कधी बंद्यांना भेटायला नातेवाईक येतात. त्यामुळं लोकांचा राबता राहातो. आता ही अशी तुरुंगासारखी नाजूक जागा. त्यातून डोंगरीसारखा महत्वाच्या ठिकाणचा तुरुंग. त्यामुळे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणं ओघानं आलंच! आणि सकाळच्या पहाऱ्यावर असलेले दोघेही हवालदार — भैरू-मानकू या कामात चांगलेच तरबेज होते! दिवसभर विडीकाडी शिलगावतील, तंबाखू चोळतील. पण सकाळच्या वेळी – अंहं!!

    तुरुंगाच्या भल्यामोठ्या दरवाजावर थाप पडली. तशी भैरूने खिट्टी काढून दाराची चौकट उघडली. बाहेरून एक चेहरा डोकावला. ब्राह्मणी पागोटं ल्यायलेला आणि व्यवस्थित कातरलेल्या मिश्या असणारा गोरापान चेहरा. पलीकडे कुणीतरी खानदानी स्त्री चापून-चोपून पदर घेऊन मोठ्या अदबीने उभी होती.

    “कोन पायजे?”, भैरूनं विचारलं
    “भेट ठरलीये साहेब”, पलीकडचा माणूस अनिश्चित स्वरात उद्गारला.
    “कागुद आनलाय का?”, भैरूचा प्रश्न.
    उत्तरादाखल  पागोटेवाल्याने काहीही न बोलता कागदाचं भेंडोळं झरोक्यातून आत सरकावलं. पलीकडल्या बाईची उगाचच चलबिचल झाल्यासारखी जाणवली.
    भैरूनं कागद व्यवस्थित तपासले.
    “हां थांबा वाईच. उगडतो दरूजा”, असं म्हणत भैरूने कडी काढली. जरासं ओढताच ते दरवाजाचं अजस्त्र धूड करकरत उघडलं!

    पागोटेवाला आत आला. वळून मागं उभ्या त्या स्त्रीकडे पाहिले. ती अजूनही घुटमळतच होती. बावरली असावी बहुतेक तुरुंगातलं वातावरण पाहून.
    तिला धीर द्यावा म्हणून तो हलकेच म्हणाला, “चल की यमे. ये आत”.
    त्याच्या आवाजाने जणू भानावर आली ती. हळूच आपले उजवे पाऊल उंबरठ्याच्या आत टाकले तिने. त्या नरकात आज पहिल्यांदाच लक्ष्मीची पाऊले पडत होती!

    दोघे आत जाताना बघून एवढा वेळ दूर उभा असलेला मानकू भैरूपाशी आला.
    “कोन रे ह्ये दोगं? कुना दरोडेखोराचे तर नातेवाईक वाटत न्हाईत. कुनाला भेटायला आल्ये म्हनायचं मंग”?
    “आरं त्यो न्हाई का बालिष्टर आनून ठ्येवलाय. ५० वर्सं काळंपान्यावर धाडनारेत त्याला. त्याचे नातेवाईक हायती ह्ये.  त्यो ग्येला त्यो त्येचा म्हेवना न् ती ग्येली ती त्या बालिष्टराची बालिष्टरीन”.
    “ऑं? म्हंजी ह्ये त्या सावरकरला भेटायला आल्येत”?
    “तर! आरं आता हुब्या जल्मात भ्येट व्हनार हाय का पुना? ५० वर्सांत कोन जितं का मरतं”?
    “व्हय त्ये बी खरंच हाय म्हना”, मानकू उद्गारला, “पन काय रे.. ५० वर्सं? ही अशी कोन्ची जगाच्या इरहीत शिक्षा म्हनायची”?
    “म्हंजी? आरं तुला म्हाईती न्हाय का मर्दा? आरं लई मोटा क्रांतिकारी हाय त्यो. गोरा साह्येब निस्ता चळचळ कापतो त्येच्या नावानी. त्यो असा घावतोय होय यान्ला? कसातरी घावला तर द्यायची काईबाई शिक्षा. फाशीच धीली आस्ती. पन आख्ख्या जगात लई दबदबा हाय म्हने त्येचा. मंग धीली जन्मठेप. म्हंजे मारायचं बी न्हाई न् जगू बी द्याचं न्हाई. असले बाराबोडाचे हाईत ह्ये गोरे”!
    भैरूकडून एवढं ज्ञानामृत मिळाल्यावर मानकूचा त्याच्याबद्दलचा आदर वाढला नसता तरच नवल. त्याला आत कुठेतरी सावरकरांची कीवही वाटत असावी. म्हणून त्याने विचारले,
    “उमर काय आसंल रं त्या बालिष्टराची”?
    “आसंल २०-२५”.
    “आयोऽ.. लयी कवळं प्वॉर रे… ५० वर्साची शिक्षा आयकून रडलंच असनार”!
    “चल.. खूळा झालास ल्येका तू. आरं सावरकर हाय त्यो. त्यो रडतोय व्हय? आरं त्यो भल्याभल्याला रडवील”.
    “म्हंजी रं”?
    “आरं म्या तितंच हुतो ना. त्यो सायब ५० वर्साच्या शिक्षेची बातमी घेऊन आला. म्हनला येकापाठोपाठ येक अश्या दोन जल्मठेपी भोगाव्या लागनारेत सावरकर तुला. आन दात इचकून हासलं त्ये लाल वानर. तर ह्यो सावरकर मोठमोठ्यानी हसायलाच लागला. मला आधी वाटलं, चांगल्याचुंगल्या प्वॉराला याड लागलं शिक्षा आयकून.
    त्या सायबाला बी तसंच वाटलं. म्हून त्येनी इचारलं, का हसतोस म्हून. तर ह्यो काय म्हनलाय म्हाईतीये”?
    “काय म्हनला”?
    “ह्यो म्हन्ला, चला बरं झालं, त्याच निमित्तानी का होईना पन आमच्या हिंदूंचा पुनर्जल्माचा सिध्धांत मानला तर खरा तुमच्या ख्रिस्ती सरकारनी”!
    “आयोऽ बाऽबाऽऽ”!!
    “तर! त्या गोऱ्या सायबानी पन अश्याच बोंबा मारल्या आस्तील. विन्ग्रजीत”!
    “आरं कोन मानूस म्हनायचा का कोन ह्यो”?
    “आरं त्यो मानूस न्हाईच. द्येवच म्हन्ला पायजे त्येला. येवढं दु:ख कोसळून बी जो शांत ऱ्हातो, त्यो तुज्यामाज्यासारखा सामान्य मानूस कसाकाय आसंल”?
    “खरंय तुजं भैरू. आरं आपन या गोऱ्या सरकारची नोकरी करतो म्हंजी येकप्रकारानी हरामाचंच खातो ना. आन् त्यो सावरकर.. येवढी मोटी बालिष्टरकी सोडून आपल्यासारख्या हराम्यांसाठी लढतो. त्यो मानूस कसा आसंल? द्येवच आसला पाहिजे त्यो.. त्यो द्येवच आसला पाहिजे..”!
    बोलता-बोलता मानकूचे डोळे भरून आले. सावरकरांची पत्नी आणि मेहुणे ज्या दिशेने गेले होते, त्या दिशेला पाहात त्याने हळूच नमस्कार केला. त्यापाठोपाठ भैरूनेसुद्धा!

    यमुनाबाई सावरकर. त्यांना सारेच माई म्हणत असत. त्या भावापाठोपाठ चालतच होत्या. पावलागणिक एक-एक घटना आठवत होती त्यांना. ‘ह्यां’च्यासोबतचा विवाह, सुरुवातीचे सुखाचे दिवस, लवकरच लक्षात आलेले नवऱ्याचे आभाळभर मोठेपण – त्यांचा आवाका, त्यांचे विलायतेस जाणे – त्यावेळी आपण दिलेला निरोप, तिकडून येणाऱ्या आणि काळीज चिरून टाकणाऱ्या त्या महाभयंकर बातम्या, इंग्रजांनी घरादारावर आणलेली जप्ती, धाकट्या भावोजींना पोलिसांनी कित्येकदा केलेली मारहाण, आपल्याला आणि वहिनींना कसं भर पावसात घरादाराला पारखं व्हावं लागलं – तो दिवस, स्वत:च्याच माहेरी गायींच्या गोठ्यात काढावे लागलेले दिवस – कारण इंग्रजांचं फर्मान की या बायकांना जो कोणी आसरा देईल त्याच्या घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवू, आणि आपला प्रभाकर.. तो तर या सगळ्या अपेष्टांमुळेच दगावला…

    प्रभाकरची आठवण येताच माईंचा बांध फुटला. तोंडावर पदराचा बोळा घट्ट दाबला त्यांनी. भावाच्या नजरेतून काही ते सुटले नाही. काहीतरी बोलून धीर द्यायचा म्हणून तो बोलला,

    “पोहोचलोच हो आपण आता”!

    माईंनी मान डोलावली. तोवर ते दोघेही एका दालनात येऊन पोहोचले. त्यांच्या हातातली कागदपत्रे एका पहारेकऱ्याने घेतली आणि तो आत निघून गेला. माईंनी पहिल्यांदाच नजर वर करून पाहिले. दालन जरी मोठ्ठे असले तरी मधोमध मजबूत गजांची भिंत घालून दोन भाग केले होते त्याचे. यांच्या भागात बसायला खुर्च्या होत्या. आणि पलिकडे काहीच नव्हते. पाठीमागे एक झरोका होता फक्त. तोही उंचावर.

    माईंचे निरीक्षण चालू असतानाच साखळ्या खुळखुळण्याचा आवाज आला. आणि मागोमाग हिंदुस्थानचा स्वातंत्र्यसूर्य अवतरला! अतिताणामुळे झिजलेला देह परंतू नजरेतला करारीपणा अक्षरशः नरसिंहाचा होता! जणू शरीरातले सारे तेज दोन तेजस्वी डोळ्यांत उतरले होते! छातीवर झुलत होता “डि” (डेंजरस) कोरलेला बिल्ला क्रमांक ३२७७८. आणि अंगावर सर्वत्र साखळदंड – जणू कुणा वाघालाच बंदिस्त करून ठेवलंय!

    नवऱ्याला पाहून माई अभावितपणे पुढे झाल्या. त्यांचे हात गजांभोवती केव्हा आवळले गेले ते त्यांचे त्यांनाही समजले नाही. भाऊ हळूच दोन पावले मागं जाऊन थांबला आणि माईंनी एवढावेळ लपाछपी खेळणाऱ्या अश्रूंना मनमोकळी वाट करून दिली!

    हे असे होणार याची सावरकरांना कुठेतरी कल्पना असावी. कारण ते अतिशय आश्वासक, मृदू हसले. म्हणाले,
    “काय, ओळखलंस का? अगं माझे नुसतेच कपडे बदलले आहेत. मी तोच आहे. तुझ्याशी देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह केलेला! हां आता चारचौघांसारख्या संसाराचं म्हणशील तर तो नाही करू शकलो मी”.
    सावरकर अंमळ थांबले. शब्द जुळवून बोलले,
    “आणि संसार संसार तरी असा काय असतो गं? चार काटक्या गोळा करून घरटी बांधणे आणि मुला-बाळांची वीण वाढवणे यालाच संसार म्हणणार असशील, तर तो चिमण्या-कावळेही करतात. तो नाही केला आपण. पण यमुना, आपण काही चिमण्या-कावळे नाहीत. माणसं आहोत. तेव्हा दु:ख करू नकोस. संसाराचा भव्यतर अर्थ घ्यायला शिक!”

    माईंना आपल्या नवऱ्याचा एक नवाच पैलू आज उलगडत होता. रडणं थांबवून त्या अनिमिष नेत्रांनी ऐकू लागल्या —
    “अगं, स्वत:चा क्षुद्र स्वार्थ विसरून केवळ परसेवेसाठी नि परोपकारासाठी देह झिजविणे, ही उच्चतम जीवनकला आहे. खरा श्रेष्ठ तोच की, जो अंगीकृत ध्येयापासून कधी ढळत नाही; अंतर्बाह्य मोहाला कधी बळी पडत नाही, अवजड भाराखाली दबत नाही, आपत्तीच्या वादळांनी कधी अस्वस्थ होत नाही आणि उग्र परिस्थितीच्या वक्र दृष्टीला घाबरत नाही! तू तशी आहेस यमुना. आपण तसे आहोत. आणि म्हणूनच बहुधा रामाने या रामकार्यासाठी आपली निवड केलीये!
    अगं आपली चार चूल-बोळकी आपण आज फोडतो आहोत, घर-दार जाळतो आहोत. पण आज आपला संसार जळण्यामुळे निघणारा धूर हा उद्या या अखंड भारतवर्षातल्या कोट्यवधी घरांतून निघणारा सोन्याचा धूर ठरणार आहे यमुना, विश्वास ठेव”!

    माईंचा आपल्या नवऱ्यावर विश्वास होताच! आज त्या विश्वासाचे रुपांतर निर्धारात झाले होते! तितक्यात पहारेकऱ्याने भेटीची वेळ संपल्याचे सांगितले. तिघांनीही एकमेकांचा नजरेनेच निरोप घेतला. आत्ता फिरवलेली मान आता अजून ५० वर्षं फिरवता येणार नाही, हे माईंना ठाऊक होते. त्यांचा चेहरा कसल्याश्या अदम्य तेजाने फुलारून आला होता. त्यांच्या भावाने त्यांच्यातले हे स्थित्यंतर दिपलेल्या डोळ्यांनी पाहिले होते. सावरकर वळून चालले होते. त्यांनी त्या अवजड साखळदंडाचा लीलया ताल धरला होता. आणि ते म्हणत होते,
    “जातस्य हि ध्रुवोऽमृत्यूर्ध्रुवोऽजन्म मृतस्य च।
    तस्मादपरिहारार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।।
    नैनं छिन्दति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
    नचैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।।”

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (कोणत्याही माध्यमातून पुनर्प्रकाशन करण्यापूर्वी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक. लेखकाच्या अन्य सावरकर-कथा वाचण्यासाठी तसेच लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

  • सागरा प्राण तळमळला..!

    सागरा प्राण तळमळला..!

    image

    ब्रायटन गावातली ती सायंकाळ तशी नेहमीसारखीच तर होती. तेच वातावरण, तीच पक्ष्यांची किलबिल, तीच फिरायला आलेली कुटूंबे.. क्वचित काही प्रेमी जोडपी.. आणि नित्यनेमाने फिरायला येणारे तेच दोघे. दोन काळे तरुण. त्या वर्तमान खेडेगावाच्या दृष्टीने काहीसे दुर्लक्षित, परंतू इतिहासाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने मात्र अत्यंत महत्वाचे.

    त्यांच्यापैकी एकाचे नाव होते निरंजन पाल. आणि कुणाला सांगून खरे वाटले नसते की, जो दुसरा मुळचा अतिशय रुपवान परंतू सध्या आजाराने खंगून गेल्यासारखा वाटणारा पंचविशीतला तरुण होता त्याने आत्ता काही दिवसांपूर्वीच ज्या साम्राज्यावरून म्हणे कधी सूर्य मावळत नाही ते – जगद्व्यापी ब्रिटीश साम्राज्य – पार मुळापासून हादरवून सोडले होते. तो जरी सध्या अतिशय कृश, अक्षरश: मरणप्राय वाटत असला तरीही त्याचे नाव ऐकताच त्या किनाऱ्यावरील एकूणएक ब्रिटीशांमध्ये धावपळ माजली असती! त्याचे नाव? त्याचे नाव होते – विनायक दामोदर सावरकर!

    हो तेच ते सावरकर, जे इंग्रजांच्या राजधानीत राहून त्याच इंग्रजांचे जुलमी साम्राज्य उखडण्यासाठी बॉम्ब बनवून भारतात पाठवत होते! हो तेच ते सावरकर, ज्यांनी नुकताच कर्झन वायलीचा वध करणाऱ्या मदनलाल धिंग्राविरुद्धची निषेधसभा हाणून पाडली होती! हो तेच ते सावरकर, ज्यांनी ती सभा उधळल्यानंतर वृत्तपत्रांना पत्रे पाठवून सगळ्यांचीच तोंडे कायदेशीररित्या बंद करून टाकली होती! हो तेच ते सावरकर, ज्यांनी अटकेत असलेल्या धिंग्राचे ब्रिटिशांनी दाबून टाकलेले निवेदन प्रसिद्धवून इंग्रजांची त्यांच्याच देशात पार नाचक्की करून टाकली होती! हो तेच ते सावरकर, जे शत्रूच्या शिबिरात राहून त्याच शत्रूच्या शत्रूंशी संधान बांधून होते! हो तेच ते सावरकर, ज्यांना ‘ग्रेज इन’ने ‘बॅरिस्टर’ पदवी देऊ केली होती, परंतू ‘ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहाण्याची शपथ घ्यावी लागणार असेल तर मला तुमच्या पदव्या नकोत’ असे ज्यांनी त्या संस्थेच्या चालकाला सुनावले होते! हो तेच ते सावरकर जे..! असो!!

    पण तेच सावरकर आज फिरताना शांत वाटत होते. नेहमी तर किती काय काय बोलत असतात. नवनवीन गोष्टी सांगत असतात. निरंजनला कळेचना! काहीतरी बोलायचं म्हणून त्यांनी बोलायचा प्रयत्न केला,

    “आज हवा छान आहे नाही”?

    उत्तरादाखल सावरकरांनी त्यांच्याकडे नुसतंच पाहिलं. मग हळूहळू एक-एक शब्द उच्चारत म्हणाले,

    “निरंजन, मला कळत नाही, असा अजून किती काळ तुझ्यावर ओझं बनून राहायचं मी..”

    “ओझं? अहो काय बोलता सावरकर? तुमचं ओझं का होणार आहे मला? अहो, तुम्ही लंडनमध्ये जो पराक्रम करून दाखवला आहे तो शतकानुशतकांतून कुणीतरी एखादाच करून दाखवतो. अहो, नायक आहात तुम्ही आम्हां भारतीयांचे. बॅरिस्टर झाला असता, तर ऐश्वर्यात लोळला असता अक्षरश:, परंतू केवळ देशजननीपायी क्रांतिचा खडतर मार्ग स्वीकारणारे तुम्ही.. अहो सारे इंग्रज तुम्हाला आतंकवादी समजत होते, इंग्लंडच्या त्या तसल्या भयानक हवामानात तुम्हाला कुणी छप्परही द्यायला तयार नव्हते, तेव्हा तुम्ही काय अपेष्टा काढल्यायत त्याच्या कथा बाबांनी (बिपिनचंद्र पाल) सांगितल्यावर तर मी तुमचा पार भक्तच झालो आहे. म्हणूनच तर आपण समवयीन असूनही आणि तुम्ही इतक्या वेळा बजावलेलं असूनही तुम्हाला ‘अरे-तुरे’ करावंसं वाटलं नाही कधी मला. अहो, इंग्रजांच्या ससेमिऱ्याममुळे तुमची तब्येत ढासळलीये आणि डॉक्टरांनी तुम्हाला हवेत बदल सुचवलाय हे बाबांकडून कळल्याबरोब्बर तुम्हाला इकडे माझ्याकडे पाठवून द्यावं असा हट्टच धरला मी त्यांच्यापाशी! तुमची तब्येत सुधारावी या परमार्थासोबतच, तुमच्यासारख्या महापुरुषाकडून चार गोष्टी शिकता आल्या तर सोने होईल माझ्या आयुष्याचे, हा स्वार्थही होताच त्यापाठी! आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही माझ्यावर ओझे आहात..?”

    सावरकर काही न बोलता नुसतेच खाली पाहात चाललेले. काही क्षण तसेच शांततेत गेले. धीर करून निरंजनच परत म्हणाले,

    “आज तुम्ही एवढे गप्प का..?”

    काहीही न बोलता सावरकरांनी एवढा वेळ हातात घट्ट दाबून धरलेला, चुरगळलेला कागदाचा तुकडा पुढे केला. निरंजनने हातात घेऊन पाहिला, तर ती तार होती – सावरकरांचा लहानगा मुलगा प्रभाकर वारल्याची!
    निरंजनच्या डोळ्यांत पाणी तरळले. सावरकरबंधू क्रांतिकार्यात सक्रिय झाल्यापासून त्यांच्या कुटूंबाला काय काय जाच सहन करावा लागतोय हे इंग्लंडमध्ये साऱ्यांना ठाऊक होते. इंग्रजांनी घरा-दारावर जप्ती आणली होती. बंधू नारायण लहान. त्याला कित्येकदा पोलिस चौकीच्या फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. क्वचित मारहाणही झालेली. कुणीच आसरा द्यायला तयार नाही. दोन स्त्रिया – माई आणि येसूवहिनी – त्यांच्या पदरी मुलं – मात्र इंग्रजांच्या भीतीपायी त्यांना साधा आसरा द्यायलाही कुणी तयार होईना. माहेरी गेल्या तरी राहायची सोय नाही. स्वत:च्या माहेरी, त्या हक्काच्या घरीदेखील अक्षरश: गायींच्या गोठ्यात राहून दिवस काढत होत्या त्या. त्यांच्या आईवडलांचं काळीज रोज तिळ-तिळ तुटायचं, पण इंग्रजांपुढे त्यांचाही नाईलाज होता – न जाणो, पोरीच्या डोक्यावरचं आहे-नाही ते छप्परही जायचं! त्यात ही प्रभाकर गेल्याची तार..

    निरंजनचे मन आतल्याआत आक्रंदू लागले, “परमेश्वरा, तू या जगात नाहीसच का रे? का या देवमाणसांवर असे जुलूम करतोयस? अरे, स्वत:साठी का काही मागताहेत ते? सारं तर देऊन टाकलं त्यांनी मातृभूमीला? का असे भोग त्यांच्या नशिबात?”

    निरंजनने नजर वर करून पाहिलं. ज्या सावरकरांवर हा दु:खाचा हिमालय कोसळलेला ते स्वत: मात्र किनाऱ्यावर मौज करणाऱ्या एका कुटुंबाकडे टक लावून पाहात होते. आई-बाबा-मुलगा-मुलगी.. लहानसंच चौकोनी कुटूंब! काय विचार करत असतील सावरकर? आपलंही कुटूंब असंच असू शकलं असतं – हे वाटत असेल का त्यांना? ऐन तारुण्यात ज्या पत्नीला एकटं सोडून आलो, त्या पत्नीची आठवण येत असेल का त्यांना? की नुकताच ज्याचा मृत्यू झालाय त्या आपल्या लहानग्याच्या बाललीला आठवत असतील त्यांना? निरंजन सावरकरांच्या डोळ्यांचं निरीक्षण करत होते. चालता चालता आपण समुद्राच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत, याचेही भान राहिले नव्हते त्यांना. बघता-बघताच, रमणीच्या गळ्यातील मोतीमाळ तुटावी आणि सारे मौल्यवान मोती इतस्ततः विखुरावेत तसे, अगदी तस्सेच दोन चुकार अश्रू पापण्यांची तटबंदी ओलांडून सावरकरांच्या गालावर ओघळले. सावरकरांचा चेहरा वेदनेने अक्षरशः पिळवटून निघाला. वाटले.. वाटले आता ते हुंदका देणार..

    हुंदका आला, पण वेगळ्याच रुपाने. धीरोदात्त वीराला शोभेलसा. सावरकर कापऱ्या, अस्फुट आवाजात गाऊ लागले होते..

    “ने मजसी ने परत मातृभूमीला.. सागरा प्राण तळमळला..”

    त्या ऐतिहासिक गीताच्या जन्माचे एकमेव मानवी साक्षीदार – निरंजन – अवाक् होऊन गेला होते. ते दैवी काव्य ऐकावे की त्या महापुरुषाच्या चेहऱ्यावरचे तेज न्याहाळावे, काही कळतच नव्हते!

    एक निरंजन होते, जो नुसताच पाहात होते!

    एक सावरकर होते, जे देहभान हरपून समुद्राला साद घालित होते!!

    एक परदास्यमदाने उन्मत्त समुद्र होता.. निर्दयपणे फेसाळत हसणारा!

    आणि होते सावरकरांचे अश्रू.. ज्यांनी गाणे पूर्णच होऊ दिले नाही.. काळ तेवढा बिचारा थांबून राहिला होता!!

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख/सावरकर-कथा वाचण्यासाठी, लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी/आयोजित करण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

  • भेट: इतिहासकाराची इतिहासाशी!!

    सावरकरांना देशाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलण्यासाठी इंग्रजांनी त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले खरे. परंतू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनीच इतकी काही जबरदस्त होती की, लवकरच आडगावी असलेले रत्नागिरी शहर हिंदुस्थानच्या गुप्त राजकारणाचे महत्वपूर्ण केंद्र बनले. सावरकरांना भेटायला येणाऱ्यांचा, चर्चा-मसलती करणाऱ्यांचा ओघच रत्नागिरीत सुरू झाला. मोहनदास गांधींपासून ते थेट अलीबंधूंपर्यंत सगळ्यांनाच रत्नागिरीत यावे लागले.

    त्याकाळी सावरकर रत्नागिरीच्या पटवर्धनांकडे मुक्कामी होते. असेच दुपारच्या वेळी दार वाजले म्हणून पाहातात तर काय, दारात एक वयोवृद्ध व्यक्ती उभी. वयोवृद्ध असली तरी चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेची आभा मात्र चिरतरुण होती.

    image

    “कोण?”, सावरकरांनी हलकेच विचारले.
    “मी  बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”.
    सावरकर चमकलेच, “म्हणजे… तुम्ही.. रियासतकार…”?

    सावरकरांच्या नजरेसमोरून आठवणींचा पट झरझर सरकू लागला. रियासतकार सरदेसाई! त्यांनी लिहिलेल्या सुसंशोधनाधारित इतिहासावरच तर सावरकरांचा पिंड पोसलेला! विद्यार्थीदशेतच त्यांची बहुतेक पुस्तके सावरकरांनी वाचून काढलेली. “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” लिहिताना अंगी बाणवलेली इतिहासलेखनाची दुर्लभ शिस्त, रियासतकारांच्याच तर पदचिन्हांवर चालताना मिळवलेली! कित्येकदा वाटलं, सरदेसायांना भेटावं. नपेक्षा किमान पत्रातून तरी संवाद साधावा. पण सावरकर पडले क्रांतिकारक. त्यांच्याशी संबंधित सगळ्यांवरच सरकारचा रोष. प्रसंगी नुसत्या ओळखीच्यांवरही राजद्रोहाचा ठपका येण्याची भिती. त्यातून रियासतकार बडोद्याच्या संस्थानात जरी नोकरी करत असले तरी बोलून-चालून सरकारी नोकरीच ती! कशी भेट व्हावी? पत्र लिहावं म्हटलं तर सावरकरांचे अक्षर म्हणजे अंगार! सावरकरांची बोटभर चिठ्ठी जरी कुणाकडे सापडली तरी त्याच्या घरादारावर जप्ती येणार हे ठरलेलेच! कित्येकदा हस्तेपरहस्ते निरोप पाठवून दोघांचे बोलणे झालेले. पण तेवढ्यापुरतेच. इच्छा असूनही भेटीची, संपर्काची अभिलाषा मनातच दाबून ठेवावी लागलेली. तेच सरदेसाई आज स्वत:च समोर उभे राहून विचारत होते की,
    “मी बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”.

    सावरकरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी प्रेमाने रियासतकारांना घरात बोलावले. खूप गप्पा झाल्या दोघांच्या. मराठ्यांचा इतिहास किती जरी तेजस्वी असला तरी महाराष्ट्राबाहेर फारसा कुणाला ठाऊक नाही — तो जर रियासतकारांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिला तर साऱ्या जगाला महाराष्ट्राच्या पराक्रमाची किर्ती समजेल, ही आपल्या आपल्या मनीची इच्छा सावरकरांनी रियासतकारांना बोलून दाखवली. वृद्धापकाळ आणि प्रकृतीअस्वास्थ्य या कारणांमुळे हे शिवधनुष्य आपल्याला पेलणार नाही असे रियासतकारांनी प्रांजळपणे सावरकरांना सांगितले. विशेष म्हणजे, त्यानंतर लवकरच रियासतकारांनी सावरकरांच्या विनंतीचा मान राखत मराठा साम्राज्याचा इतिहास लिहिला. आणि तोही इंग्रजीतूनच लिहिला!

    निरोपाची वेळ झाली, तसे सावरकर नम्रपणे म्हणाले, “आपल्यासारख्या थोर इतिहासलेखकाचे दर्शन झाले. खरोखर भाग्यच म्हटले पाहिजे हे माझे!”
    रियासतकार हसले. म्हणाले, “भाग्य तुमचे नव्हे. भाग्य कुणाचे असेल, तर ते माझेच. कारण आम्ही नुसतेच इतिहास लिहून ठेवणारे. एकप्रकारे कारकूनच म्हणा ना! परंतू तुम्ही.. तुम्ही तर साक्षात स्वातंत्र्यवीर! कर्तृत्वाच्या बळावर इतिहास निर्माण करणारे! खऱ्या अर्थाने ‘इतिहासकर्ते’! आजवर पूर्वजांचा इतिहास अनेकदा लिहिलाय मी. मात्र आज पहिल्यांदाच जिवंत इतिहास कसा असतो, ते पाहाण्याचे भाग्य लाभलेय मला! आज मी खऱ्या अर्थाने धन्य झालो”!

    सावरकरांना काय बोलावे तेच कळेना. त्यांनी विनम्रतेने मान तुकवली. मान वर केली, तो ते इतिहासमहर्षी झपझप पावले टाकीत जात होते. इतिहासकर्ता आणि इतिहासकाराच्या भेटीचा तो अपूर्व क्षण इतिहास आपल्या आठवणींच्या कुपीत अलगद साठवून घेत होता, येणाऱ्या पिढीला त्याचा सुगंध देण्यासाठी..!

    – © विक्रम श्रीराम एडके
    (सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रावर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी, तसेच सावरकरांच्या अलौकिक चरित्रावर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा — www.vikramedke.com)