निरोप
तसं पाहिलं तर नेहमीसारखाच दिवस. परंतू सकाळची वेळ. त्यामुळे जरा चौकस राहावं लागे. हो, याच वेळी नवे बंदी तुरुंगात येतात, जुन्यांची दुसरीकडे पाठवणी होते, कधी-कधी बंद्यांना भेटायला नातेवाईक येतात. त्यामुळं लोकांचा राबता राहातो. आता ही अशी तुरुंगासारखी नाजूक जागा. त्यातून डोंगरीसारखा महत्वाच्या ठिकाणचा तुरुंग. त्यामुळे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणं ओघानं आलंच! आणि सकाळच्या पहाऱ्यावर असलेले दोघेही हवालदार — भैरू-मानकू या कामात चांगलेच तरबेज होते! दिवसभर विडीकाडी शिलगावतील, तंबाखू चोळतील. पण सकाळच्या वेळी – अंहं!!
तुरुंगाच्या भल्यामोठ्या दरवाजावर थाप पडली. तशी भैरूने खिट्टी काढून दाराची चौकट उघडली. बाहेरून एक चेहरा डोकावला. ब्राह्मणी पागोटं ल्यायलेला आणि व्यवस्थित कातरलेल्या मिश्या असणारा गोरापान चेहरा. पलीकडे कुणीतरी खानदानी स्त्री चापून-चोपून पदर घेऊन मोठ्या अदबीने उभी होती.
“कोन पायजे?”, भैरूनं विचारलं
“भेट ठरलीये साहेब”, पलीकडचा माणूस अनिश्चित स्वरात उद्गारला.
“कागुद आनलाय का?”, भैरूचा प्रश्न.
उत्तरादाखल पागोटेवाल्याने काहीही न बोलता कागदाचं भेंडोळं झरोक्यातून आत सरकावलं. पलीकडल्या बाईची उगाचच चलबिचल झाल्यासारखी जाणवली.
भैरूनं कागद व्यवस्थित तपासले.
“हां थांबा वाईच. उगडतो दरूजा”, असं म्हणत भैरूने कडी काढली. जरासं ओढताच ते दरवाजाचं अजस्त्र धूड करकरत उघडलं!
पागोटेवाला आत आला. वळून मागं उभ्या त्या स्त्रीकडे पाहिले. ती अजूनही घुटमळतच होती. बावरली असावी बहुतेक तुरुंगातलं वातावरण पाहून.
तिला धीर द्यावा म्हणून तो हलकेच म्हणाला, “चल की यमे. ये आत”.
त्याच्या आवाजाने जणू भानावर आली ती. हळूच आपले उजवे पाऊल उंबरठ्याच्या आत टाकले तिने. त्या नरकात आज पहिल्यांदाच लक्ष्मीची पाऊले पडत होती!
दोघे आत जाताना बघून एवढा वेळ दूर उभा असलेला मानकू भैरूपाशी आला.
“कोन रे ह्ये दोगं? कुना दरोडेखोराचे तर नातेवाईक वाटत न्हाईत. कुनाला भेटायला आल्ये म्हनायचं मंग”?
“आरं त्यो न्हाई का बालिष्टर आनून ठ्येवलाय. ५० वर्सं काळंपान्यावर धाडनारेत त्याला. त्याचे नातेवाईक हायती ह्ये. त्यो ग्येला त्यो त्येचा म्हेवना न् ती ग्येली ती त्या बालिष्टराची बालिष्टरीन”.
“ऑं? म्हंजी ह्ये त्या सावरकरला भेटायला आल्येत”?
“तर! आरं आता हुब्या जल्मात भ्येट व्हनार हाय का पुना? ५० वर्सांत कोन जितं का मरतं”?
“व्हय त्ये बी खरंच हाय म्हना”, मानकू उद्गारला, “पन काय रे.. ५० वर्सं? ही अशी कोन्ची जगाच्या इरहीत शिक्षा म्हनायची”?
“म्हंजी? आरं तुला म्हाईती न्हाय का मर्दा? आरं लई मोटा क्रांतिकारी हाय त्यो. गोरा साह्येब निस्ता चळचळ कापतो त्येच्या नावानी. त्यो असा घावतोय होय यान्ला? कसातरी घावला तर द्यायची काईबाई शिक्षा. फाशीच धीली आस्ती. पन आख्ख्या जगात लई दबदबा हाय म्हने त्येचा. मंग धीली जन्मठेप. म्हंजे मारायचं बी न्हाई न् जगू बी द्याचं न्हाई. असले बाराबोडाचे हाईत ह्ये गोरे”!
भैरूकडून एवढं ज्ञानामृत मिळाल्यावर मानकूचा त्याच्याबद्दलचा आदर वाढला नसता तरच नवल. त्याला आत कुठेतरी सावरकरांची कीवही वाटत असावी. म्हणून त्याने विचारले,
“उमर काय आसंल रं त्या बालिष्टराची”?
“आसंल २०-२५”.
“आयोऽ.. लयी कवळं प्वॉर रे… ५० वर्साची शिक्षा आयकून रडलंच असनार”!
“चल.. खूळा झालास ल्येका तू. आरं सावरकर हाय त्यो. त्यो रडतोय व्हय? आरं त्यो भल्याभल्याला रडवील”.
“म्हंजी रं”?
“आरं म्या तितंच हुतो ना. त्यो सायब ५० वर्साच्या शिक्षेची बातमी घेऊन आला. म्हनला येकापाठोपाठ येक अश्या दोन जल्मठेपी भोगाव्या लागनारेत सावरकर तुला. आन दात इचकून हासलं त्ये लाल वानर. तर ह्यो सावरकर मोठमोठ्यानी हसायलाच लागला. मला आधी वाटलं, चांगल्याचुंगल्या प्वॉराला याड लागलं शिक्षा आयकून.
त्या सायबाला बी तसंच वाटलं. म्हून त्येनी इचारलं, का हसतोस म्हून. तर ह्यो काय म्हनलाय म्हाईतीये”?
“काय म्हनला”?
“ह्यो म्हन्ला, चला बरं झालं, त्याच निमित्तानी का होईना पन आमच्या हिंदूंचा पुनर्जल्माचा सिध्धांत मानला तर खरा तुमच्या ख्रिस्ती सरकारनी”!
“आयोऽ बाऽबाऽऽ”!!
“तर! त्या गोऱ्या सायबानी पन अश्याच बोंबा मारल्या आस्तील. विन्ग्रजीत”!
“आरं कोन मानूस म्हनायचा का कोन ह्यो”?
“आरं त्यो मानूस न्हाईच. द्येवच म्हन्ला पायजे त्येला. येवढं दु:ख कोसळून बी जो शांत ऱ्हातो, त्यो तुज्यामाज्यासारखा सामान्य मानूस कसाकाय आसंल”?
“खरंय तुजं भैरू. आरं आपन या गोऱ्या सरकारची नोकरी करतो म्हंजी येकप्रकारानी हरामाचंच खातो ना. आन् त्यो सावरकर.. येवढी मोटी बालिष्टरकी सोडून आपल्यासारख्या हराम्यांसाठी लढतो. त्यो मानूस कसा आसंल? द्येवच आसला पाहिजे त्यो.. त्यो द्येवच आसला पाहिजे..”!
बोलता-बोलता मानकूचे डोळे भरून आले. सावरकरांची पत्नी आणि मेहुणे ज्या दिशेने गेले होते, त्या दिशेला पाहात त्याने हळूच नमस्कार केला. त्यापाठोपाठ भैरूनेसुद्धा!
यमुनाबाई सावरकर. त्यांना सारेच माई म्हणत असत. त्या भावापाठोपाठ चालतच होत्या. पावलागणिक एक-एक घटना आठवत होती त्यांना. ‘ह्यां’च्यासोबतचा विवाह, सुरुवातीचे सुखाचे दिवस, लवकरच लक्षात आलेले नवऱ्याचे आभाळभर मोठेपण – त्यांचा आवाका, त्यांचे विलायतेस जाणे – त्यावेळी आपण दिलेला निरोप, तिकडून येणाऱ्या आणि काळीज चिरून टाकणाऱ्या त्या महाभयंकर बातम्या, इंग्रजांनी घरादारावर आणलेली जप्ती, धाकट्या भावोजींना पोलिसांनी कित्येकदा केलेली मारहाण, आपल्याला आणि वहिनींना कसं भर पावसात घरादाराला पारखं व्हावं लागलं – तो दिवस, स्वत:च्याच माहेरी गायींच्या गोठ्यात काढावे लागलेले दिवस – कारण इंग्रजांचं फर्मान की या बायकांना जो कोणी आसरा देईल त्याच्या घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवू, आणि आपला प्रभाकर.. तो तर या सगळ्या अपेष्टांमुळेच दगावला…
प्रभाकरची आठवण येताच माईंचा बांध फुटला. तोंडावर पदराचा बोळा घट्ट दाबला त्यांनी. भावाच्या नजरेतून काही ते सुटले नाही. काहीतरी बोलून धीर द्यायचा म्हणून तो बोलला,
“पोहोचलोच हो आपण आता”!
माईंनी मान डोलावली. तोवर ते दोघेही एका दालनात येऊन पोहोचले. त्यांच्या हातातली कागदपत्रे एका पहारेकऱ्याने घेतली आणि तो आत निघून गेला. माईंनी पहिल्यांदाच नजर वर करून पाहिले. दालन जरी मोठ्ठे असले तरी मधोमध मजबूत गजांची भिंत घालून दोन भाग केले होते त्याचे. यांच्या भागात बसायला खुर्च्या होत्या. आणि पलिकडे काहीच नव्हते. पाठीमागे एक झरोका होता फक्त. तोही उंचावर.
माईंचे निरीक्षण चालू असतानाच साखळ्या खुळखुळण्याचा आवाज आला. आणि मागोमाग हिंदुस्थानचा स्वातंत्र्यसूर्य अवतरला! अतिताणामुळे झिजलेला देह परंतू नजरेतला करारीपणा अक्षरशः नरसिंहाचा होता! जणू शरीरातले सारे तेज दोन तेजस्वी डोळ्यांत उतरले होते! छातीवर झुलत होता “डि” (डेंजरस) कोरलेला बिल्ला क्रमांक ३२७७८. आणि अंगावर सर्वत्र साखळदंड – जणू कुणा वाघालाच बंदिस्त करून ठेवलंय!
नवऱ्याला पाहून माई अभावितपणे पुढे झाल्या. त्यांचे हात गजांभोवती केव्हा आवळले गेले ते त्यांचे त्यांनाही समजले नाही. भाऊ हळूच दोन पावले मागं जाऊन थांबला आणि माईंनी एवढावेळ लपाछपी खेळणाऱ्या अश्रूंना मनमोकळी वाट करून दिली!
हे असे होणार याची सावरकरांना कुठेतरी कल्पना असावी. कारण ते अतिशय आश्वासक, मृदू हसले. म्हणाले,
“काय, ओळखलंस का? अगं माझे नुसतेच कपडे बदलले आहेत. मी तोच आहे. तुझ्याशी देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह केलेला! हां आता चारचौघांसारख्या संसाराचं म्हणशील तर तो नाही करू शकलो मी”.
सावरकर अंमळ थांबले. शब्द जुळवून बोलले,
“आणि संसार संसार तरी असा काय असतो गं? चार काटक्या गोळा करून घरटी बांधणे आणि मुला-बाळांची वीण वाढवणे यालाच संसार म्हणणार असशील, तर तो चिमण्या-कावळेही करतात. तो नाही केला आपण. पण यमुना, आपण काही चिमण्या-कावळे नाहीत. माणसं आहोत. तेव्हा दु:ख करू नकोस. संसाराचा भव्यतर अर्थ घ्यायला शिक!”
माईंना आपल्या नवऱ्याचा एक नवाच पैलू आज उलगडत होता. रडणं थांबवून त्या अनिमिष नेत्रांनी ऐकू लागल्या —
“अगं, स्वत:चा क्षुद्र स्वार्थ विसरून केवळ परसेवेसाठी नि परोपकारासाठी देह झिजविणे, ही उच्चतम जीवनकला आहे. खरा श्रेष्ठ तोच की, जो अंगीकृत ध्येयापासून कधी ढळत नाही; अंतर्बाह्य मोहाला कधी बळी पडत नाही, अवजड भाराखाली दबत नाही, आपत्तीच्या वादळांनी कधी अस्वस्थ होत नाही आणि उग्र परिस्थितीच्या वक्र दृष्टीला घाबरत नाही! तू तशी आहेस यमुना. आपण तसे आहोत. आणि म्हणूनच बहुधा रामाने या रामकार्यासाठी आपली निवड केलीये!
अगं आपली चार चूल-बोळकी आपण आज फोडतो आहोत, घर-दार जाळतो आहोत. पण आज आपला संसार जळण्यामुळे निघणारा धूर हा उद्या या अखंड भारतवर्षातल्या कोट्यवधी घरांतून निघणारा सोन्याचा धूर ठरणार आहे यमुना, विश्वास ठेव”!
माईंचा आपल्या नवऱ्यावर विश्वास होताच! आज त्या विश्वासाचे रुपांतर निर्धारात झाले होते! तितक्यात पहारेकऱ्याने भेटीची वेळ संपल्याचे सांगितले. तिघांनीही एकमेकांचा नजरेनेच निरोप घेतला. आत्ता फिरवलेली मान आता अजून ५० वर्षं फिरवता येणार नाही, हे माईंना ठाऊक होते. त्यांचा चेहरा कसल्याश्या अदम्य तेजाने फुलारून आला होता. त्यांच्या भावाने त्यांच्यातले हे स्थित्यंतर दिपलेल्या डोळ्यांनी पाहिले होते. सावरकर वळून चालले होते. त्यांनी त्या अवजड साखळदंडाचा लीलया ताल धरला होता. आणि ते म्हणत होते,
“जातस्य हि ध्रुवोऽमृत्यूर्ध्रुवोऽजन्म मृतस्य च।
तस्मादपरिहारार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।।
नैनं छिन्दति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
नचैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।।”
– © विक्रम श्रीराम एडके.
(कोणत्याही माध्यमातून पुनर्प्रकाशन करण्यापूर्वी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक. लेखकाच्या अन्य सावरकर-कथा वाचण्यासाठी तसेच लेखकाची व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)
नकळत डोळ्यांच्या कडा ओलावल्या. धन्य ते राष्ट्रप्रेम, धन्य तो त्याग आणि अशा पुत्रास जन्म देणारी धन्य ही भारतभू.
अत्त्युत्तम लेख ! खरोखर, इंग्रजांनी त्यांना भारताबाहेर ठेवण्यासाठी स्वतःचेच कायदे कसे धाब्यावर बसवले होते, ह्यावरून ते सावरकरांना किती घाबरत होते हे समजून येते…
सावरकरांनी जे भोगले आहे त्याला सीमा नाही, अश्या परिस्थितीत आज कुणी त्यांच्यावर काही घरबसल्या शेरेबाजी करत असेल. तर त्याची कीव करावीशी वाटते, पण ह्या देवमाणसाच्या चारित्र्याला धक्काही लागणार नाही
अत्त्युत्तम लेख ! खरोखर, इंग्रजांनी त्यांना भारताबाहेर ठेवण्यासाठी स्वतःचेच कायदे कसे धाब्यावर बसवले होते, ह्यावरून ते सावरकरांना किती घाबरत होते हे समजून येते…
सावरकरांनी जे भोगले आहे त्याला सीमा नाही, अश्या परिस्थितीत आज कुणी त्यांच्यावर काही घरबसल्या शेरेबाजी करत असेल. तर त्याची कीव करावीशी वाटते, पण ह्या देवमाणसाच्या चारित्र्याला धक्काही लागणार नाही ..
खूप चांगले कार्य करत आहात विक्रम जी !