आधुनिक महाभारताचे उपाख्यान

महाभारतातली घटना आहे. कर्णाने आपली कवचकुंडले गमावून इंद्राकडून अमोघ अशी ‘वासवी शक्ती’ मिळवली होती. हेतू एकच – अर्जुनाचा वध! परंतू श्रीकृष्ण अतिशय धूर्त राजकारणी होता. त्याने युद्ध ऐन भरात असतानाच भीमपुत्र घटोत्कचाला मैदानात उतरवले. घटोत्कच हा तर मायावी राक्षस. त्यातून साक्षात भीमाचा मुलगा! त्यामुळे त्याच्या अतुल्य पराक्रमाची केवळ कल्पनाच केलेली बरी. असा हा घटोत्कच इतक्या वेगाने कौरवांचा विनाश करत सुटला की, जणू एकाच दिवसात संपूर्ण कौरवसेना संपवून टाकेल! ही परिस्थिती पाहून दुर्योधन घाबरला. त्याने घटोत्कचाला रोखण्यासाठी आपली वासवी शक्ती वापरण्याची कर्णाला विनंती केली. कर्ण पेचात पडला! शक्ती तर खास अर्जुनासाठी राखून ठेवलेली. ती कशी वापरायची? आणि दुसरीकडे ज्याने आपल्याला माणसात आणलं, मान-मरातब दिला तो आपला जीवश्चकंठश्च मित्र संकटात सापडलेला. दुर्योधन कर्णाला म्हणाला की, ‘अरे बाबा, आपण सारे आत्ताच वाचू शकलो नाही तर अर्जुनाला काय मारणार? त्यापेक्षा तू आत्ता तुझी शक्ती वापरून घटोत्कचाला मार, आपल्या सगळ्यांचा जीव वाचव. अर्जुनाला कसं मारायचं ते आपण जीव वाचल्यावर बघू’! कर्णाला हे म्हणणं पटलंच असं नाही, परंतू मित्रासाठी त्याने ते मानलं! आपल्या दिव्य कवचकुंडलांची किंमत देऊन मिळवलेली ती अमोघ वासवी शक्ती त्याने अर्जुनासाठी न वापरता घटोत्कचासाठी वापरली आणि त्याचा वध केला! समस्त कौरवसेनेत एकच जल्लोष सुरू झाला. विजयाचा जल्लोष! प्राण वाचल्याचा जल्लोष!! सारेच आनंदी होते. फक्त एकटा कर्ण सोडून. कारण या तात्कालिक विजयातच उद्याच्या अंतिम पराभवाची बीजे दडली असल्याची जाणीव होती त्याला!

ही तर झाली ऐतिहासिक कथा (महाभारत इतिहासग्रंथ आहे, पुराण नव्हे!). आता तुम्ही म्हणाल की, ही कथा तर आम्हाला माहिती आहे किंवा या कथेचा आज काय संबंध? तर संबंध आहे. कसा, ते सांगतो!

ही कथा आठवण्याचे कारण असे की, आजही याच कथेची पुनरावृत्ती घडताना दिसतेय. संपूर्ण पुनरावृत्ती जरी अजून झालेली नसली, तर घटनाक्रम त्याच मार्गाने चाललाय. म्हणूनच ही कथा आज महत्वाची वाटतेय. आजच्या या कथेत ‘कर्ण’ आहेत, मनसेचे अध्यक्ष मा. श्री. ‘राज ठाकरे’ – जरासे दुर्लक्षित, जरासे सापत्न, अकारणच स्वत:ला अन्यायग्रस्त समजणारे – बरोब्बर कर्णासारखे! त्यांची ‘कवचकुंडले’ होती ‘ठाकरे नावाची पुण्याई आणि त्यांचा करिश्मा’. ‘इंद्र’ म्हणजे स्वत: ‘मा. शिवसेनाप्रमुख स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे’. ‘भीम’ आहे ‘मनसेबद्दल सुरुवातीचा काही काळ वाटत असलेल्या अपेक्षा’ आणि ‘भीमपुत्र घटोत्कच’ आहे ‘त्या अपेक्षांचा भंग झाल्यामुळे मनसेबद्दल निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण’. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, या घटोत्कचाचा लोकसभा निवडणुकीशी संबंध आहेच, परंतू तो पूर्णार्थाने नाही. हा घटोत्कच आधीपासूनच अस्तित्वात आला होता. लोकसभेने त्याला केवळ आणखी शक्तीशाली करायचे काम केलेय एवढेच! या कोटीक्रमाने पाहायला गेले, तर संपूर्ण देशभर प्रादेशिक पक्षांची दुकानदारी बंद करणारे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आपोआपच श्रीकृष्ण ठरतात! तर असा हा घटोत्कच कर्णाच्या पक्षाला संपवण्यात काहीच कसूर करणार नाही, हे तर उघडच आहे. म्हणून वापरलीये ती एकमेवाद्वितीय असलेली वासवी शक्ती – ‘निवडणुका लढवण्याचा निर्णय’. वासवी शक्ती अमोघ तर खरीच. परंतू तिच्यात एक दोषही आहे. या शक्तीच्या वापरामुळे सध्या तितक्याश्या परिपूर्ण स्थानावर नसलेले शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. ‘उद्धव ठाकरे’ आपोआपच (बाय-डिफॉल्ट!) ‘अर्जुन’ ठरतायत! यात त्यांचे कर्तृत्व फारसे नसून राज ठाकरेंची वैयक्तिक हल्ले करण्याची खेळीच यास कारणीभूत आहे! त्यामुळे या शक्तीप्रयोगाचा कर्णाला फायदा होईल की नाही यापेक्षाही त्याचा परिणाम असा झालाय की, आपोआपच अर्जुन कोण ते समजलेय, आणि डाव न खेळताही आपोआपच उद्धव ठाकरेंच्या पारड्यात एक गुण जमा झालाय!

आता कथा इथवर आलीच आहे, तर ती पुढे काय अंगाने जाणार हे सांगायला काही कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही. अर्थात या कथेत दुर्योधन कोण हे ठरविण्याचे काम मी सूज्ञ वाचकांवर सोपवतो. ते तुम्ही आपापल्या वकूबाप्रमाणे करालच याची खात्री आहे! मला रस वाटतोय तो दुसऱ्याच प्रश्नात. घटोत्कचावर अमोघ वासवी शक्ती वापरून आपण तात्पुरता आपल्या कौरव ‘पक्षाचा जीव जरी वाचविलेला असला’ आणि ‘आपल्या पक्षात तात्कालिक उत्साह’ जरी निर्माण केलेला असला, तरीही यात अंतिम पराभवाचीच बीजे लपलेली आहेत, याची महाभारतातल्या कर्णाला कुठेतरी जाणीव होती. आपल्या आधुनिक कर्णालाही ती जाणीव असेल का? देवच जाणे! तूर्तास तरी पात्रयोजना परिपूर्ण झालीये, एवढं नक्की!

– © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *