स्वत:च्याच सापळ्यात अडकलेला : आजोबा

एखाद्या कादंबरीवर चित्रपट बनवणे ही अतिशय अवघड गोष्ट असते. अवघड अश्या अर्थाने की, ती एकप्रकारची तारेवरची कसरतच असते! काय ठेवायचं, काय कापायचं यासोबतच मूळ लेखकाची दृष्टी आणि आपला दिग्दर्शक या नात्याने असलेला दृष्टीकोन या सगळ्याचा समन्वय साधणे अतिशय जोखमीचे काम असते. या तराजूत तोलल्यास ‘शाळा’ हा अजिबात वेगळा प्रयोग नव्हता. एका चांगल्या पुस्तकाचे पडद्यावर केलेले माध्यमांतर, एवढेच ‘शाळा’बद्दल सांगता येईल. पण मग तरीही ‘शाळा’ का वेगळा वाटतो? काही जण त्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक मैलाचा दगड का समजतात? याचे उत्तर आहे त्याच्या सादरीकरणात. कथा जरी जशीच्या तशी ठेवलेली असली, तरीही त्यातील पात्रे अचूक निभावणारे कलाकार शोधणे, त्यांच्याकडून चोख काम करवून घेणे — जोश्या असणार तर हाच, सुऱ्या हाच, शिरोडकर हिच्यापेक्षा वेगळी नसणारच; हे प्रेक्षकांना वाटायला भाग पाडणे आणि याहूनही अवघड म्हणजे तो आणीबाणीचा काळ उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, या अश्या गोष्टींमध्ये दिग्दर्शक सुजय डहाकेचे खरे कौशल्य होते आणि त्यात तो शतप्रतिशत खरा उतरला होता. अन्यथा ‘शाळा’चाही ‘बीपी’, ‘दुनियादारी’, ‘टाईमपास’ इ. सारखा विस्कोट व्हायला वेळ नसता लागला!

या पार्श्वभूमीवर सुजय डहाकेंच्या नव्या ‘आजोबा’ चित्रपटाबद्दल अपेक्षा वाटल्या नसत्या तरच नवल! त्यातून तो चित्रपट एका बिबट्याच्या प्रवासाभोवती फिरणारा, अनेकानेक चित्रपट-महोत्सवांनी गौरवलेला! शिवाय एकेकाळी हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या उर्मिलाचे मराठीत पदार्पण घडविणारा चित्रपट, मराठीत पहिल्यांदाच ऍनिमेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरलेला चित्रपट. उत्सुकता ताणायला आणि उत्कंठा वाढवायला एक नव्हे तर शेकडों कारणं होती. चित्रपट सुरू झाला व ‘शाळा’च्याच दर्जाची उत्कृष्ट ऍनिमेटेड श्रेयनामावली सरकू लागली आणि मी निश्चिंत झालो. परंतू ही निश्चिंतता काही मिनिटांतच संपली आणि भ्रमाचा भोपळा भसकन् फुटला!

एका बिबट्याचा वनखात्याने सोडल्यापासून ते आपल्या निवासस्थानी परतेपर्यंतचा प्रवास, ही कल्पनाच किती थरारक आहे! स्वत: दिग्दर्शकानेच अनेकदा याबद्दल सांगितले आहे. परंतू प्रत्यक्षात मात्र या बिबट्याचा जो काही प्रवास दिसतो तो एकतर संगणकीकृत सिग्नल्समध्ये अथवा कार्टूनच्या (ऍनिमेशन नव्हे) माध्यमातून. शिवाय जिथे खरोखरीच ऍनिमेशन वापरलेय, त्यांपैकी कित्येक ठिकाणी त्याचा दर्जा अतिशय सुमार असा आहे. जे अजिबात पाहावत नाही. इथं तुम्ही ‘मराठी चित्रपट आहे, बजेट कमी आहे, मराठीला आपण उत्तेजन दिले पाहिजे’ वगैरे बचाव नाही करू शकत. कारण इतरवेळी आपणच म्हणतो ना की, सिनेमाला भाषा नसते! एकदा बाजारात उतरवलं की, तुमचं उत्पादन दर्जेदारच हवं. तिथे ‘आपलं आहे, घ्या सांभाळून’ असं नाही ना म्हणता येत! एकवेळ ही भावनिकता इतर कुठे दाखवता येईलही, परंतू जो प्रेक्षक काही-शे रुपये खर्चून चित्रपटगृहात येतो, त्याने का ही तडजोड स्वीकारावी?

बरं एकवेळ तेही चालवून घेऊ. पण मुळात सिनेमाला कथा तरी हवी की नको! कथा हवी, तिला पुढे सरकण्यासाठी एखादा अवघड ता होईना मार्ग असावा. इथे मात्र दिग्दर्शक कधी डॉक्यु-ड्रामा दाखवू इच्छितो, तर कधी पर्यावरण आणि मानवाच्या संघर्षावर भाष्य करू पाहातो, तर कधी या सगळ्याची सामाजिक बाजू दाखवू पाहातो, तर कधी काही वैज्ञानिक बाजू दाखवू पाहातो. आणि अश्या या सगळ्या गोंधळात कथा नावाचा लहानसा जीव कुठे हरवून जातो, तेच कळत नाही. जे काही दाखवलंय, ते इतकं विखुरलंय की, कश्याचाच कश्याला मेळ लागत नाही. कोणत्याही, अगदी कोणत्याही पात्राचा व्यवस्थित पात्र-परिपोषच केलेला नाही. पूर्वा राव (उर्मिला मातोंडकर) ही दाक्षिणात्य आहे, हे कुणीतरी पात्र सांगतं तेवढंच – अन्यथा तिने संपूर्ण चित्रपटभर एकच दाक्षिणात्य शब्द उच्चारलाय. तोही उत्तरार्धात! इतरवेळी ती वाया गेलेली प्रौढा, दारुडी, चेन-स्मोकर, हिस्टेरिक, बायपोलर डिसॉर्डर आणि मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डरची रुग्ण इथपासून ते एक अतिशय उथळ आणि डिप्रेस्ड, खेड्यापाड्यांत अंगप्रदर्शन करत फिरणारी एक भंपक बाई इथपर्यंत काहीही वाटू शकते. कथेप्रमाणे काही गोष्टी नाईलाजास्तव कराव्या लागल्यामुळे ती अधून-मधून संशोधिका वाटते एवढंच! बाकी तिची संवादफेक तर अक्षरशः ‘दिव्य’ आहे. बिबट्या जर तिच्यासमोर आला असता ना, तर मूळची मराठी असूनही चायनिज वाटावी अशी मराठी बोलते, एवढ्या एकाच गोष्टीसाठी ते उमदं जनावर नरभक्षक (की नारीभक्षक) झालं असतं! याहून विचित्र गोष्ट म्हणजे बिबट्याचं नाव ‘आजोबा’ असंच का ठेवलं, याची कारणमीमांसा करण्याची दिग्दर्शकाला थोडीशीही गरज भासलेली नाहीये, बोला!! जे काय समजायचं ते आपणच दिग्दर्शकाच्या मुलाखतींवरून समजून घ्यायचं (आणि वरून पैसे खर्चून चित्रपट पाहायलाही जायचं)! कथेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असलेलं यशपाल शर्माचं उपकथानक तर इतकं काही ढीलेपणाने हाताळलंय की, ते लक्षातही राहात नाही. गोष्टी अगदीच उरकून घेतल्याहेत हो! बरं तर बरं, तिथे यशपाल शर्मांसारखा नाणावलेला अभिनेता होता, म्हणून त्याने ते व्यवस्थित निभावलं तरी! पूर्वाच्या इंटर्नची प्रेमकहाणी मात्र अगदीच कथेला विसंगत अशी. अजिबातच आवश्यकता नसलेली. अश्या गोष्टी चित्रपटात का घुसडल्या तेच समजत नाही. तीस दिवसांत एकशेवीस किलोमीटरचा प्रवास, तोही मानवी वस्त्यांमधून करणारा बिबट्या विरुद्ध मनुष्यप्राणी असा एक संघर्ष फुलायला हवा होता. बिबट्या संपूर्ण प्रवासात कुणाही माणसावर हल्ला करत नाही, मनुष्य मात्र सतत या ना त्या प्रकारे त्याला ओरबाडू पाहातोय – कधी शिकारीसाठी तर कधी संशोधनासाठी. या गोष्टी अधोरेखित व्हायला हव्या होत्या, ज्या नेमक्या होत नाहीत. आणि तरीही दिग्दर्शकाचा आव मात्र हा संघर्ष व्यवस्थित चितारल्याचा! आणि यामुळेच, बिबट्या गेल्यावर पात्रांना काही का वाटले असेना, परंतू प्रेक्षकांना मात्र जरादेखील वाईट वाटत नाही. आणखी एका तांत्रिक बाबीकडे लक्ष वेधायचं झालं तर सब-टायटल्सचा दर्जा अतिशय सुमार आहे व त्यात खूप साऱ्या चुकाही आहेत. दिलीप प्रभावळकरांसारख्या सर्वच दृष्टींनी थोर कलाकाराला केवळ तीन-चारच प्रसंगांपुरतं वापरून दिग्दर्शकाने काय मिळवलं, हे देवच जाणे. त्यातून कपडेपट कुणी सांभाळलाय आणि दिग्दर्शक त्यातून काय दाखवू पाहात होता कुणास ठाऊक, परंतू दिवस असो वा रात्र प्रभावळकरांना ‘जंगल के लिए तैय्यार’ अश्याच कपड्यांत दाखवलंय. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात भर रात्री फेल्ट-हॅट घालून फिरतो हा माणूस? का? कश्यासाठी??

याचा अर्थ ‘आजोबा’मध्ये एकसुद्धा चांगली गोष्ट नाही का? असं अजिबात नाही. ज्ञानोबाच्या भूमिकेचा परिपोषही इतरांसारखाच सुमार असूनदेखील ह्रषिकेश जोशी या गुणी अभिनेत्याने ती भूमिका अतिशय ताकदीने साकारलीये. ज्ञानोबा (सब-टायटल्समध्ये पूर्णवेळ ‘द्यानोबा’ असे लिहून येते) त्याने अक्षरशः  जिवंत केलाय! काय ती त्याची सुरेख शब्दफेक आणि काय तो बिनतोड मुद्राभिनय!! अहाहा!!! जियो,  जियो ह्रषिकेश जोशी, जियो!!! ‘आजोबा’चे छायाचित्रण अतिशय सुरेख आणि दर्जेदार जमून आलेय – अगदी ‘फॅण्ड्री’च्या खालोखाल. त्यासाठी दिएगो रोमेरो यांना दाद द्यायलाच हवी! परंतू ह्रषिकेश जोशींच्या खालोखाल चित्रपटाची सर्वाधिक जमेची बाजू आहे, ती म्हणजे त्याचं पार्श्वसंगीत! साकेत कानेटकर या ताज्या दमाच्या संगीतकाराने अतिशय सुरेख, अर्थवाही आणि तरीही अत्यंत शैलीदार असे पार्श्वसंगीत निर्माण केले आहे. प्रणाम त्यांच्या प्रतिभेला!!

मराठीतला एक वेगळा प्रयोग म्हणून या चित्रपटाकडे नक्कीच पाहाता येईल! परंतू काही जमेच्या बाजू असल्या तरीही ‘आजोबा’ एक सिनेमा म्हणून प्रभाव पाडण्यात कमी पडतो, असेच म्हणावे लागेल. ‘एका बिबट्याचा एकाकी प्रवास’ ही कल्पनाच दिग्दर्शकाला इतकी थरारक वाटलेली दिसतेय, की त्याभोवती कथेची गुंफण करण्याचे भानच त्यांना राहिलेले नाही. त्यामुळे तयार झालाय एक विसविशीत आणि कमालीचा ढीला चित्रपट! आपल्याच जाळ्यात अडकून जेरबंद झालेला ‘आजोबा’!!

*२.५/५

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *