जय हो ‘रहमान’भाई!!

रात्रीचे दहा वाजून गेलेले. चेन्नईच्या ‘अपोलो कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये सर्वत्र निजानीज झालेली. स्पेशल रुम क्र. १३३५ मध्ये लहानग्या निहारिकाचीही झोपायची तयारी चालू होती. अवघी पाच वर्षांची पोर. आजच केमोथेरपीचे एक सत्र संपले होते तिचे. आई — निखिला, बिछाना नीट करून देत होती तिचा. सर्व तयारी मनासारखी झाल्यावर निहारिकाने हळूच आईच्या डोळ्यांत पाहिले.

“हो माहितीये मला”, आई निखिला हसून म्हणाली. आणि तिने आपल्या मोबाईलवर मंद आवाजात ‘हायवे’ चित्रपटातले गीत ‘सूहा साहा’ लावले. गेले काही दिवस हा रोजचाच दिनक्रम (की रात्रीक्रम!) झाला होता दोघींचा. रोज झोपताना निहारिकाला ‘सूहा साहा’ ऐकायचेच असायचे. काही दिवसांपूर्वी या गीताची जागा ‘कडल’मधील ‘सिथ्थिरई निला’ कडे होती. त्याआधी निहारिकाला ‘127 Hours’मधील ‘इफ आय राईज्’ हवे असायचे झोपताना. त्याआधी ‘विनईतांडी वरुवाया’चे शीर्षकगीत आणि कधी कधी ‘स्वदेस’मधले ‘आहिस्ता आहिस्ता’!! सध्या निहारिका — ‘निका’चा जीव ‘सूहा साहा’वर जडला होता. आणि लपवायचे कश्याला — तिची आई निखिलाचाही!

इतके दिवस ऐकूनही या गीताचा रोज तस्साच आणि तितकाच जादुई प्रभाव कसा काय पडतो, हे निखिलाला कधीही न सुटलेले कोडे होते. पण आता अनुभवाच्या या टप्प्यावर तिने ‘रहमान’च्या कोणत्याही संगीतामागची कारणमीमांसा शोधणे बंद केले होते. तो — रहमान — तिच्या लेकराला जगवतोय एवढे पुरेसे होते तिच्यासाठी!

हे गीत सुरू केल्यानंतर कितीही दुखत असलं, त्रास होत असला तरीही कशी कोण जाणे पण पाचच मिनिटांत निका गाढ झोपी जायची. आजही तेच घडलं! निका झोपी गेली आणि निखिलाचं मन रहमानच्या संगीतासोबत वाहात वाहात मागे जाऊ लागलं. चार वर्षांपूर्वीची — २०१० सालची ती सकाळ लख्खपणे डोळ्यांसमोर उभी राहिली निखिलाच्या. दिवाळीच्या एक दिवस आधीची ती सकाळ! त्याच दिवशी डॉ. टि. राजा यांनी निकाला ऍक्युट ल्युकेमिया —कॅन्सर असल्याचं सांगितलं होतं. नवरा-बायकोच्या पायाखालची जमिनच सरकली होती त्यादिवशी.

“हे बघा मिस्टर आणि मिसेस नटराजन”, डॉक्टर जणू शब्द शोधत शोधत म्हणाले होते, “तुम्ही दोघेही सुशिक्षित आहात, समजूतदार आहात, फॉरेन रिटर्न्ड आहात. मला तुम्हाला कोणत्याही भ्रमात ठेवायचं नाहीये. ल्युकेमिया बरा झाल्याची खूप उदाहरणे आहेत. परंतू निकाची केस जरा वेगळी आहे. अवघी दोनच वर्षांची आहे ती. तिचं वय आणि आजाराची तीव्रता पाहाता तिच्या हाती आता सहा आठवड्यांपेक्षा.. अं.. जास्त काळ उरलेला नाहीये”.

डोळ्यांत पाण्याचा सागर गोळा झालेला माझ्या. आणि त्या सागराच्या भोवऱ्यांत बुडत चाललेलं माझं मन. तश्यात डॉक्टरांचा आवाज लांबच्या कुठल्यातरी किनाऱ्यावरून आल्यासारखा वाटला नसता तरच नवल. शब्दांच्या लाटा कानावर आदळत होत्या. आज्ञाधारक संगणकासारखा मेंदू त्यांचे अर्थही लावत होता. पण त्या शब्दांचा कान ते मेंदू असा प्रवास आईचं काळीज जाळत चालला होता, हे कुणाला दिसणार? माझं अंतर्मन केव्हाच खुर्चीवरून उठलं होतं अन् डॉक्टरांची कॉलर पकडून जाब विचारत होतं,

“काय डोकं-बिकं फिरलंय का डॉक्टर तुमचं? अहो साधा ताप आला असणार माझ्या बाळाला. रात्रीची अचानक घामाघूम होते हो ती फक्त! म्हणून थेट कॅन्सरवर कुठे चाललात? अहो, जरा बघा तरी हो तिच्याकडे एकदा. फुलासारखी नाजूक आहे हो माझी पोर. देव कसा काय तिच्याशी एवढा निष्ठूरपणा करेल. सांगा ना.. सांगा ना…”

प्रत्यक्षात ओठ जणू शिवले गेले होते. आणि शरीर क्रुसावर चढवलेल्या येशूसारखं कुणीतरी खिळ्यांनी खुर्चीला जखडून टाकलं होतं.

डॉक्टर सांगत होते, “आपण आता जो इलाज करणार आहोत, तो केवळ निकाचा अखेरचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी. वेदना सुसह्य व्हाव्यात म्हणून..”

मला पुढचं काहीही ऐकू येणं केव्हाच बंद झालं होतं. ‘सहा आठवडे’ या दोनच शब्दांनी माझं अवघं आयुष्य व्यापून टाकलं होतं. आणि निष्ठूर मृत्यू मला व्यापूनही दशांगुळे उरला होता — जिभल्या चाटीत आणि माझ्या पोटच्या गोळ्याकडे वखवखलेल्या नजरेने पाहात!

मी केव्हा आणि कशी निकाच्या रुममध्ये आले मला कळलंच नाही. नवरा औषधं आणि इंजेक्शन्स आणायला बाहेर गेला होता. निका झोपली होती. आमच्या लहानश्या जगाची झालेली उलथापालथ गावीही नव्हती तिच्या. इतका वेळ रोखून धरलेला बांध तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहाताच फुटला. आपोआप हुंदका बाहेर आला. पण तो नुसताच हुंदका नव्हता. अस्पष्टसे शब्दही मिसळले गेले होते त्यात — ओ पालनहारे, निर्गुण ओ न्यारे, तुमरे बिन हमरा कौनु नाही..! परमेश्वरा, तुझ्याशिवाय माझं दु:ख निवारणारं कुणीच नाही रे..!! सवय म्हणा वा अन्य काही, पण मनाने त्याही स्थितीत नोंद घेतली होती — ‘लगान’!

माझ्या आवाजानेच बहुतेक, निकाला जाग आली. तिने माझ्याकडे पाहून हात पसरले. तिच्या इशाऱ्याचा अर्थ ध्यानात यायला वेळ लागला मला. पण मी ताबडतोब मोबाईलमध्ये ते गाणे शोधले. हळू आवाजात गीत लावून फोन तिच्या उश्याशी ठेवून दिला मी. त्याक्षणी तिची कोणतीही इच्छा मी पूर्ण केली असती. निका हे गाणे ओळखायची. तिच्या चेहऱ्यावर परिचयाचे हासू फुलले. त्यानंतर दोनच मिनिटांत ती पूर्वीसारखीच गाढ झोपून गेली. गीत चालूच होते — प्रभुजी हमरी हैं बिनती, दुखीजन को धीरज दो, हारे नहीं वो कभी दुखसे.. हैं पथमें अंधियारे, दे दो वरदानमें उजियारे… शब्द समजणं केव्हाच बंद झालं होतं. मात्र त्या संगीताने अवघं वातावरण कुंद करून सोडलं होतं. खूप सकारात्मक असं.. भारून टाकणारं काहीतरी रुग्णालयाच्या खोलीत निर्माण झालं होतं. त्या भारलेल्या क्षणीच मी निर्णय घेतला. निकाच्या शांत चेहऱ्याकडे पाहाताना निर्धार अजूनच पक्का झाला होता माझा!

नवऱ्याच्या कामाच्या शिफ्ट्समुळे त्याला तर शक्यच नव्हते. त्यामुळे निखिलाच सकाळी सकाळी सारं सामान घेऊन आली. आता तिचा मुक्काम तिच्या बाळासोबतच असणार होता. औषधोपचार सुरू झाले. परंतू औषधांसोबतच निखिला आणखी एका गोष्टीचे डोस देत होती निहारिकाला — रहमानची गाणी! जगातील इतर कोट्यवधी लोकांसारखाच तिचा खूप विश्वास होता रहमानच्या संगीतावर आणि त्यात गवसणाऱ्या परमेश्वरावर! निहारिका केवळ रहमानच्याच संगीताला चांगला प्रतिसाद देते, आनंदी होते, कितीही वेदना होत असल्या तरीही विसरते; हे निखिलाने बरोब्बर हेरलं होतं. त्यातल्या त्यात ‘ओ पालनहारे’ आणि ‘कन्नथ्थिल मुथ्थमिटाल’ मधील ‘ओरु देवम् तंद पूवे’ विशेष आवडते होते तिचे. डॉक्टरांनी फक्त सहाच आठवड्यांचा, म्हणजे अवघ्या ४२ दिवसांचाच अवधी दिला होता. ती निहारिका नाही नाही म्हणता म्हणता दिड महिना उलटून गेला तरी जिवंत होती, एवढेच नव्हे तर उपचारांना प्रतिसादही देत होती. डॉ. राजांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा वैद्यकीय जगतातला चमत्कारच होता. निहारिकासारख्या केसेसमध्ये कुणीच अशी प्रगती केली नव्हती. निखिलाला ठाऊक होतं, हे सारं केवळ एकाच व्यक्तीमुळे घडतंय — ए. आर. रहमान!

एकदा निकाच्या नियमित तपासणीसाठी एक नर्स खोलीत आली. त्यावेळी योगायोगाने ‘दिल्ली ६’मधलं ‘अर्जियाँ’ सुरू होतं. दोनेक मिनिटं गाणं ऐकल्यावर नर्स अचानक म्हणाली,
“कव्वाली? आर यू मुस्लिम्स”?

निखिलाने मानेनेच नकार दिला. तो विषय तिथेच थांबला. निखिलाच्या मनातून मात्र तो विषय गेला नाही. त्यादिवशी रात्री सारे झोपले तरी निखिला एकटीच स्वत:शी विचार करत जागी होती — आपला धर्म हिंदू. निहारिकाचे बाबा ख्रिश्चन. निहारिकाला आजवर कित्येकदा रक्त द्यावे लागलेय. रक्तपेढी थोडीच धर्मानुसार रक्ताची वर्गवारी करते? कित्येकदा कुणा मुसलमानाचंही रक्त तिला दिलं गेलं असेलच की. म्हणजे निहारिकाच्या धमन्यांत एकाचवेळी तीन वेगवेगळ्या धर्मांचं रक्त वाहातंय! मग निहारिकाचा धर्म कोणता? रहमानच्या संगीताचंही असंच असतं का? त्याचा धर्म आहे इस्लाम. म्हणून मग त्याचं संगीत मुसलमान ठरतं का? असं असेल तर मग रोज सकाळी गणपतीच्या मंदिरात गेल्यावर माझ्या कानांत ‘अर्झियाँ’ वा ‘हायवे’मधील ‘तू कूजा’ कसं काय वाजतं मग? आपला ख्रिश्चन नवरा का बरं ‘स्वदेस’मधलं ‘पल पल हैं भारी’सारखं श्रीरामाचं भजन ऐकताना भावूक होतो मग? ‘सपने’मधलं ‘रौशन हुई रात मरियमका बेटा उतरके जमींपे आया’ ऐकल्या ऐकल्या शेजारी राहाणाऱ्या फातिमामौसींच्या डोळ्यांत का बरं पाणी उभं राहिलं होतं मग? ‘कडल’मधलं ‘अन्बिन वासले’ तर चर्चमध्ये गायचं गीत आहे ना, तरीही केवढं आवडतं आपल्याला! खरं तर इस्लाम हा रहमानचा केवळ वरवरचाच धर्म आहे. तो त्याचा खरा धर्म नाहीच. त्याचा खरा धर्म आहे अध्यात्म! अध्यात्म — जे जगातल्या प्रत्येक धर्माच्या गाभ्यात आहे. आणि म्हणूनच रहमानचं संगीत वैश्विक आहे. त्यातल्या भावना सच्च्या आहेत. त्यातल्या जाणिवा दैवी आहेत. इतरांची गाणी आवडतात किंवा आवडतही नाहीत, परंतू रहमानची गाणी मात्र पार आत्म्यात झिरपतात.. जणू काही तेच त्यांचे खरे घरटे असावे! मी जेव्हा जेव्हा रहमानचं एखादं गीत, त्याच्या संगीताचा एखादा लहानसाच तुकडादेखील ऐकते, तेव्हा तेव्हा असं वाटतं जणू मी माझ्या मोबाईलवरून थेट परमेश्वराला फोन लावलाय आणि तोही त्याच्या खाजगी क्रमांकावर!

विचार करता करता निखिलाला केव्हा झोप लागली तेच समजले नाही! जाग आली तेव्हा नुकतंच कुठे उजाडू लागलं होतं. बघता बघता तीन वर्षं कशी भुर्रकन उडून गेली होती! निहारिका आता हळूहळू बरी होऊ लागली होती. सावरू लागली होती. बागडू लागली होती. लब्बाड ‘जोधा-अकबर’मधलं ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ लावलं की एखाद्या सूफी संताप्रमाणे एक हात आकाशाच्या दिशेने उंचावत आणि दुसरा हात दानमुद्रेत आडवा पसरत गिरक्या घेते. मध्येच “आई ते ‘रंग दे बसंती’मधलं ‘लुकाछुपी’ लाव ना”, म्हणते! तिला रुग्णालयातून केव्हाच सुटी मिळालीये. आता फक्त अधून-मधून केमोथेरपीसाठी रुग्णालयात यावं लागतं. याप्रकारात निकाचे सारे केस झडले. निखिलाला वाईट वाटलं, तर निहारिकानेच तिला ‘लगान’मधलं ‘चले चलो’ ऐकवत धीर दिला! आजही अशीच केमोथेरपी संपवून निखिलाने गाडी सुरू केली तर मागच्या सीटवर बसलेली निहारिका मोठ्ठ्याने ओरडली, “आई, ‘रंग दे बसंती’ लाव ना, मला नाचायचंय”! अन् आनंदाला पारावार न राहिलेली निखिला कारच्या म्युझिक-सिस्टिमवर गाणं लावता-लावता स्वत:लाच ऐकू जाईलसे पुटपुटली, “जय हो रहमानभाई.. जय हो”!!!

(सत्यघटनेवर आधारित)

– © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाच्या अन्य कथा/लेख वाचण्यासाठी व लेखकाने आजवर दिलेली विविध व्याख्याने ऐकण्यासाठी आणि तुमच्या परिसरात लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *