भेट: इतिहासकाराची इतिहासाशी!!

सावरकरांना देशाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलण्यासाठी इंग्रजांनी त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले खरे. परंतू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनीच इतकी काही जबरदस्त होती की, लवकरच आडगावी असलेले रत्नागिरी शहर हिंदुस्थानच्या गुप्त राजकारणाचे महत्वपूर्ण केंद्र बनले. सावरकरांना भेटायला येणाऱ्यांचा, चर्चा-मसलती करणाऱ्यांचा ओघच रत्नागिरीत सुरू झाला. मोहनदास गांधींपासून ते थेट अलीबंधूंपर्यंत सगळ्यांनाच रत्नागिरीत यावे लागले.

त्याकाळी सावरकर रत्नागिरीच्या पटवर्धनांकडे मुक्कामी होते. असेच दुपारच्या वेळी दार वाजले म्हणून पाहातात तर काय, दारात एक वयोवृद्ध व्यक्ती उभी. वयोवृद्ध असली तरी चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेची आभा मात्र चिरतरुण होती.

image

“कोण?”, सावरकरांनी हलकेच विचारले.
“मी  बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”.
सावरकर चमकलेच, “म्हणजे… तुम्ही.. रियासतकार…”?

सावरकरांच्या नजरेसमोरून आठवणींचा पट झरझर सरकू लागला. रियासतकार सरदेसाई! त्यांनी लिहिलेल्या सुसंशोधनाधारित इतिहासावरच तर सावरकरांचा पिंड पोसलेला! विद्यार्थीदशेतच त्यांची बहुतेक पुस्तके सावरकरांनी वाचून काढलेली. “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” लिहिताना अंगी बाणवलेली इतिहासलेखनाची दुर्लभ शिस्त, रियासतकारांच्याच तर पदचिन्हांवर चालताना मिळवलेली! कित्येकदा वाटलं, सरदेसायांना भेटावं. नपेक्षा किमान पत्रातून तरी संवाद साधावा. पण सावरकर पडले क्रांतिकारक. त्यांच्याशी संबंधित सगळ्यांवरच सरकारचा रोष. प्रसंगी नुसत्या ओळखीच्यांवरही राजद्रोहाचा ठपका येण्याची भिती. त्यातून रियासतकार बडोद्याच्या संस्थानात जरी नोकरी करत असले तरी बोलून-चालून सरकारी नोकरीच ती! कशी भेट व्हावी? पत्र लिहावं म्हटलं तर सावरकरांचे अक्षर म्हणजे अंगार! सावरकरांची बोटभर चिठ्ठी जरी कुणाकडे सापडली तरी त्याच्या घरादारावर जप्ती येणार हे ठरलेलेच! कित्येकदा हस्तेपरहस्ते निरोप पाठवून दोघांचे बोलणे झालेले. पण तेवढ्यापुरतेच. इच्छा असूनही भेटीची, संपर्काची अभिलाषा मनातच दाबून ठेवावी लागलेली. तेच सरदेसाई आज स्वत:च समोर उभे राहून विचारत होते की,
“मी बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”.

सावरकरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी प्रेमाने रियासतकारांना घरात बोलावले. खूप गप्पा झाल्या दोघांच्या. मराठ्यांचा इतिहास किती जरी तेजस्वी असला तरी महाराष्ट्राबाहेर फारसा कुणाला ठाऊक नाही — तो जर रियासतकारांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिला तर साऱ्या जगाला महाराष्ट्राच्या पराक्रमाची किर्ती समजेल, ही आपल्या आपल्या मनीची इच्छा सावरकरांनी रियासतकारांना बोलून दाखवली. वृद्धापकाळ आणि प्रकृतीअस्वास्थ्य या कारणांमुळे हे शिवधनुष्य आपल्याला पेलणार नाही असे रियासतकारांनी प्रांजळपणे सावरकरांना सांगितले. विशेष म्हणजे, त्यानंतर लवकरच रियासतकारांनी सावरकरांच्या विनंतीचा मान राखत मराठा साम्राज्याचा इतिहास लिहिला. आणि तोही इंग्रजीतूनच लिहिला!

निरोपाची वेळ झाली, तसे सावरकर नम्रपणे म्हणाले, “आपल्यासारख्या थोर इतिहासलेखकाचे दर्शन झाले. खरोखर भाग्यच म्हटले पाहिजे हे माझे!”
रियासतकार हसले. म्हणाले, “भाग्य तुमचे नव्हे. भाग्य कुणाचे असेल, तर ते माझेच. कारण आम्ही नुसतेच इतिहास लिहून ठेवणारे. एकप्रकारे कारकूनच म्हणा ना! परंतू तुम्ही.. तुम्ही तर साक्षात स्वातंत्र्यवीर! कर्तृत्वाच्या बळावर इतिहास निर्माण करणारे! खऱ्या अर्थाने ‘इतिहासकर्ते’! आजवर पूर्वजांचा इतिहास अनेकदा लिहिलाय मी. मात्र आज पहिल्यांदाच जिवंत इतिहास कसा असतो, ते पाहाण्याचे भाग्य लाभलेय मला! आज मी खऱ्या अर्थाने धन्य झालो”!

सावरकरांना काय बोलावे तेच कळेना. त्यांनी विनम्रतेने मान तुकवली. मान वर केली, तो ते इतिहासमहर्षी झपझप पावले टाकीत जात होते. इतिहासकर्ता आणि इतिहासकाराच्या भेटीचा तो अपूर्व क्षण इतिहास आपल्या आठवणींच्या कुपीत अलगद साठवून घेत होता, येणाऱ्या पिढीला त्याचा सुगंध देण्यासाठी..!

– © विक्रम श्रीराम एडके
(सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रावर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी, तसेच सावरकरांच्या अलौकिक चरित्रावर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा — www.vikramedke.com)

One thought on “भेट: इतिहासकाराची इतिहासाशी!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *