अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेही..!

गिरीश कर्नाड ही व्यक्ती तर आपणा सर्वांना माहितीच असेल. ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत. अभिनेतेही आहेत. परंतू एवढीच एक ओळख नाहीये त्यांची. या सगळ्यासोबतच श्री. कर्नाड हे सेक्युलॅरिझमच्या भारतीय आवृत्तीचे मूर्तीमंत प्रतीकही आहेत! मग त्यासाठी ते विविध मंचांवरून हिंदूत्वविरोधी वक्तव्ये (बऱ्याचदा प्रसंग सोडून!! आठवा काही महिन्यांपूर्वी व्हि. एस. नायपॉल यांच्यावर त्यांनी केलेली टिका!) करीत असतात. मराठा साम्राज्याच्या शूर पेशव्यांना कित्येकदा पाठ दाखवून पळालेल्या जिहादी टिपूचे समर्थन करत असतात. त्यांना तुघलकही आवडतो म्हणे! मागील वर्षी तर या महानुभावांनी कमालच केली. जयपूरच्या साहित्य महोत्सवात त्यांनी भारतरत्न रवींद्रनाथ ठाकूरांचा उल्लेख “एक थर्डक्लास नाटककार” असा केला. त्यावरून बरेच वादळही उठले होते. कर्नाडांनी त्यावेळी स्वत:च्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे जोरदार समर्थनही केले होते!

नुकताच या प्रकरणाचा उत्तरार्ध पार पडला. मात्र सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने, परंतू तो कर्नाडांसाठी फारसा आनंददायी नाहीये!

बेंगरुळूच्या “रंगशंकरा”ने श्री. कर्नाड यांच्या नाट्यरचनांवर आधारित एका महोत्सवाचे आयोजन केले होते. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात काही चर्चासत्रे होणार होती, कर्नांडांच्या नाटकांचे प्रयोग होणार होते, इतकेच नव्हे तर कर्नाडांनी दिग्दर्शित केलेला चित्रपटही दाखवला जाणार होता. असा सगळा ‘कर्नाडमय’ प्रकारचा मोठ्ठा घाट घातलेला होता! या कार्यक्रमात २३ ऑक्टोबर रोजी पुदुच्चेरीच्या एका नाट्यसंस्थेने बसवलेले आणि कर्नाडांनी लिहिलेले “ड्रिम्स ऑफ टिपू सुलतान” नाटक सादर होणार होते. नाटक व्यवस्थित चालू असताना अखेरच्या १५ मिनिटांत मात्र गंमत घडली! मंचावर अचानक एका अतिरेक्याने प्रवेश केला आणि तो जोरजोराने भारतविरोधी घोषणा द्यायला लागला. पुदुच्चेरीच्या त्या दिग्दर्शकाने नाटकाचा अखेरचा प्रसंग बदललाय हे प्रेक्षकांच्या लक्षात येईपर्यंत, पात्रांपैकी एकाने त्या अतिरेक्याला मारल्याचा अभिनय केला. मग दुसऱ्याने त्याच्या चेहऱ्यावरील बुरखा बाजूला केला. मग त्यांच्यापैकी एकजण म्हणाला ‘अरे हे तर गिरीश कर्नाड’! आणखी एकजण म्हणाला, ‘कर्नाड मेले’! एकाने त्या अतिरेक्याच्या (की कर्नाडांच्या!) पात्राचे खिसे तपासले, तर त्यात काही कागद सापडले. मग एकाने ‘हे फालतू आहे’ असं म्हणून ते सारे कागद फेकून दिले!
तोपर्यंत प्रेक्षकांमध्ये कुजबूज आणि चुळबूळ सुरू झालेली! काहींनी विरोध करत थेट रंगमंचावर धाव घेतली. कडाक्याचे भांडण होईल असे वाटत असतानाच ‘रंगशंकरा’च्या संचालिका आणि अभिनेत्री अरुंधती नाग मध्ये पडल्या आणि ‘कुणाला जर या खोडसाळपणाबद्दल दिग्दर्शकाला जाब विचारायचा असेल तर त्यांनी संध्याकाळी ७.३० च्या प्रयोगात थेट दिग्दर्शकालाच विचारावं’ असं सांगितलं.

संध्याकाळच्या प्रयोगातही हाच प्रकार! परत गोंधळ सुरू झाला तेव्हा दिग्दर्शक कुमार वल्लवन स्वत:च मंचावर आले आणि त्यांनी सांगितले की, “एवढा गोंधळ घालायला काय झालं? मंचावर उभे राहून दुसऱ्या नाटककाराचा अपमान करणे तर आम्ही श्री. कर्नाडांकडूनच शिकलो आहोत! त्यांनीही नाही का रवींद्रनाथांचा अगदी असाच अपमान केला? त्या घटनेचा जर आम्ही असा प्रतिकात्मक निषेध करतोय तर काय चुकलं? रवींद्रनाथांना थर्डक्लास नाटककार म्हणणे हे जर कर्नाडांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल, तर त्याचा असा निषेध करणे हे आमचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नव्हे काय”!!

यानंतर काय झाले हे समजू शकलेले नाही, परंतू कर्नाडांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य त्यांच्याच महोत्सवात त्यांच्यावरच उलटले हे नक्की. बाकी त्यांचे दात घश्यात गेले किंवा काय हे कर्नाडच जाणे!!
(‘इंडियाफॅक्ट्स’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीच्या आधारे.
मूळ बातमीची लिंक – http://www.indiafacts.co.in/girish-karnad-medicine/)

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *