काफिर हैं वो..

आपल्यापैकी बहुतेकांना पंडित द्वारकानाथ कौल हे नाव ऐकूनही माहिती नसेल. “नसिम” या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९व्या शतकातील अतिशय महान शायर पंडित दयाशंकर कौल यांचा हा मुलगा. पंडित द्वारकानाथांना अतिशय कमी – अवघ्या २८ वर्षांचंच आयुष्य लाभलं, परंतू आपल्या अमर कृतींच्या रुपाने ते आजही जिवंत आहेत.

कौल घराणं काश्मिरी पंडितांचं. द्वारकानाथजीही फारसीतून लिहित असले तरीही हिंदू धर्माचे अतिशय अभिमानी. त्यांचा हाच अभिमान तत्कालीन काही मुसलमान शायरांना खटकत असे.

image

एकदा एका नवाबाने आपल्या संस्थानात मुशायरा (कविसंमेलन) आयोजित केला होता. द्वारकानाथजींनाही निमंत्रण होतं. द्वारकानाथजींचा द्वेष करणारे काही शायर नवाबाच्या कानाशी लागले आणि नवाबासकट सगळ्यांनी मिळून पंडितजींचा पाणउतारा करण्याची एक योजना आखली. आधीच ठरल्याप्रमाणे नवाबाने ऐन कार्यक्रमात जाहीर केलं की, आता मी ऊर्दूतील एक ओळ देईन आणि सगळ्या कवींनी त्याओळीआधीची ओळ रचून शेर पूर्ण करायचा! यांनी आधीच ठरवलेल्या योजनेनुसार नवाबाने ओळ दिली –

“काफिर हैं वो जो बन्दे नहीं इस्लामके”
[इस्लामला न मानणारे काफिर असतात]

काफिर म्हणजे “ईश्वराला न मानणारे”. मुस्लिम तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सरसकटपणे या शब्दाचा अर्थ “इस्लामप्रणीत ईश्वराला न मानणारे” असा करतात. अश्या या काफिरांचं काय करावं याबद्दल कुरआनात मनोरंजक आज्ञा दिल्या आहेत, त्या प्रत्येकाने -.विशेषत: सर्वधर्मसमभाववाल्या मित्रांनी अवश्य वाचाव्यात!

असो! तर नवाबाने उपरोक्त ओळ दिल्या दिल्या सगळे शायर एका मागोमाग एक इस्लामची स्तुती करणारे शेर रचू लागले. या ओळीवर दुसरं काहीच लिहिलं जाऊ शकत नव्हतं, त्यामुळे पंडितजींनाही आज त्यांचा सारा अभिमान बाजूला सारून स्तुतीपर शेर रचावाच लागेल, हे माहिती असल्याने सार्यांच्याच मनात जणू लाडू फुटत होते. पंडितजींना हिणवण्यासाठी एकेक रचना सादर केल्या जात होत्या.
होता होता पंडितजींची पाळी आली! त्यांनी एकवार डोळे मिटून घेतले. डोळे उघडून आत्मविश्वासपूर्ण नजरेने रचना सादर केली,

“लाम के मानिन्द गेसू हैं मेरे घनश्यामके ।
काफिर हैं वो जो बन्दे नहीं इस-लामके ।।”
[“ल” अक्षरासारखे मनमोहक कुरळे केस आहेत माझ्या घन:श्याम मुरारीचे (फारसीत
“ल”ला “लाम असे म्हणतात). काफिरच म्हटलं पाहिजे त्यांना जे भक्त नाहीत
या “लाम”चे! (“इस्लामके” नव्हे तर पंडितजींनी फोड केलीय “इस लामके”)]

पार नवाबासुद्धा सारी सभा अवाक झाली! पंडितजींनी त्यांच्याच ओळीचा आधार घेऊन, भगवान श्रीकृष्णाला न मानणार्यांना “काफिर” ठरवलं होतं. काव्यप्रतिभेत स्पर्धा केली असती तर गोष्ट वेगळी, परंतू धार्मिक आधारावर पंडितजींचा अपमान करायचा प्रयत्न करणार्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन पंडितजींनी अक्षरशः सगळ्यांचे दातच घशात घातले होते! पंडितजींची वाहवाही करण्याखेरीज कुणाकडे काही पर्यायच उरला नव्हता!

असे हे पंडित द्वारकानाथ कौल! आजकालच्या धर्मनिरपेक्ष युगात हा “सांप्रदायिक” कवी धर्मांध ठरून विस्मृतीच्या गर्तेत जाणे स्वाभाविकच आहे! स्वयंघोषित धर्मनिरपेक्षांनी आखून दिलेल्या मार्गावरच चालणार्या शिक्षणपद्धतीत तयार झालेल्यांना तर पंडितजींचे नावही माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही! परंतू
सत्य हे कुणा विचारधारेला बांधील नसून शाश्वत असते. कोंबडा झाकल्याने काही सूर्य उगवायचा राहात नाही! त्यामुळे ज्यांना अजूनही सत्यघटनांची अजूनही चाड उरली आहे, अश्यांसाठी ही घटना उजेडात आणणे मला आवश्यक वाटले. यानिमित्ताने तरी या महान कवीच्या स्मृती जाग्या राहातील, त्यांना उजाळा मिळेल, त्यांच्यापासून कुणीतरी पुन्हा प्रेरणा घेईल, किमान पंडितजींच्या लेखनाचा तरी अभ्यास करेल; ही अपेक्षा!

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी वा लेखकाने विविध विषयांवर दिलेली व्याख्याने डाऊनलोड करून ऐकण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *