विस्मृतीत गेलेली त्रिमूर्ती

आज १९ डिसेंबर. १९२७ साली याच दिवशी पं. रामप्रसाद “बिस्मिल”, अशफाकउल्लाह खान “हसरत” आणि ठाकूर रोशनसिंह यांना फाशी देण्यात आली होती. तीन जीव हुतात्मा झाले होते. दुर्दैवाने क्रमिक पुस्तकांतून राजकीय हेतूंनी प्रेरित इतिहास शिकलेल्या आम्हाला, चार-दोन अहिंसक राजकारणी सोडल्यास, मातृभूमीसाठी प्राणांचीही बाजी लावणारे अन्य हुतात्मे माहितीदेखील नसतात. त्यामुळे उपरोक्त तिघांबद्दल थोडक्यात सांगतो, जेणेकरून वाचकांना त्यांची माहिती व्हावी व या देशभक्तांचा अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी..

१) आर्यसमाजी असलेले पं. रामप्रसाद बिस्मिल हे कट्टर हिंदुत्ववादी. शुद्धीकार्यात अग्रेसर. बाणेदारपणा तर असा की, फाशीपूर्व खटला चालू असताना एकदा त्यांचा उल्लेख “मुलजिम” (आरोपी) ऐवजी चुकून “मुलाजिम” (नोकर) असा झाला तर या पठ्ठ्याने थेट न्यायाधिशाला सुनावले –
“मुलाजिम हमको मत कहिये, बड़ा अफ़सोस होता है; अदालत के अदब से हम यहाँ तशरीफ लाए हैं। पलट देते हैं हम मौजे-हवादिस अपनी जुर्रत से; कि हमने आँधियों में भी चिराग अक्सर जलाये हैं।”
ही शायरी ऐकून न्यायाधीश चाटच पडला, हे सांगणे न लगे!
त्यांची तर्कनिष्ठ शैली पाहून एकदा न्यायाधीशांनी त्यांना विचारले होते की, “बिस्मिल, कोणत्या विद्यापीठातून मिळवलीत कायद्याची पदवी?” हे महाशय खाडकन् उत्तरले होते, “किंगमेकर डज् नॉट नीड एनी डिग्री”!
२) रामप्रसाद किती जरी हिंदुत्ववादी असले तरी त्यांचे जीवश्चकंठश्च मित्र होते – अशफाकउल्लाह खान! किंबहुना भारतीय स्वातंत्र्यासाठी फाशी जाणारे पहिले मुसलमान होते अशफाकउल्लाह खान! फाशी जाण्यापूर्वी लिहिलेल्या “अशफाक की आखरी रात” या काव्यात हा वीर काय म्हणतो पाहा तरी एकदा –
“जाऊँगा खाली हाथ मगर,यह दर्द साथ ही जायेगा;जाने किस दिन हिन्दोस्तान,आजाद वतन कहलायेगा।
बिस्मिल हिन्दू हैं कहते हैं, फिर आऊँगा-फिर आऊँगा; ले नया जन्म ऐ भारत माँ! तुझको आजाद कराऊँगा।।
जी करता है मैं भी कह दूँ, पर मजहब से बँध जाता हूँ; मैं मुसलमान हूँ पुनर्जन्म की बात नहीं कह पाता हूँ।
हाँ, खुदा अगर मिल गया कहीं, अपनी झोली फैला दूँगा; औ’ जन्नत के बदले उससे, यक नया जन्म ही माँगूँगा।।”
त्यांच्या मजारवर त्यांचे किती चपखल काव्य आहे पाहा—
“जिन्दगी वादे-फना तुझको मिलेगी ‘हसरत’,
तेरा जीना तेरे मरने की बदौलत होगा।”
३) या त्रयीतले तिसरे वीर होते ठाकूर रोशनसिंह! या महाधीराने फाशीच्या अवघ्या तीनच दिवस आधी आपल्या मित्राला एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी जे लिहिलंय, त्यावरून त्यांच्या देशभक्तीचा आणि स्थितप्रज्ञतेचा अंदाज बांधता येतो –
“इस सप्ताह के भीतर ही फाँसी होगी। ईश्वर से प्रार्थना है कि वह आपको मोहब्बत का बदला दे। आप मेरे लिये रंज हरगिज न करें। मेरी मौत खुशी का बाइस (कारण) होगी। दुनिया में पैदा होकर मरना जरूर है। दुनिया में बदफैली करके अपने को बदनाम न करे और मरते वक्त ईश्वर की याद रहे;यही दो बातें होनी चाहिये और ईश्वर की कृपा से मेरे साथ ये दोनों बातें हैं। इसलिये मेरी मौत किसी प्रकार अफसोस के लायक नहीं है। दो साल से बाल-बच्चों से अलग रहा हूँ। इस बीच ईश्वर भजन का खूब मौका मिला। इससे मेरा मोह छूट गया और कोई वासना बाकी न रही। मेरा पूरा विश्वास है कि दुनिया की कष्ट भरी यात्रा समाप्त करके मैं अब आराम की जिन्दगी जीने के लिये जा रहा हूँ। हमारे शास्त्रों में लिखा है कि जो आदमी धर्म युद्ध में प्राण देता है उसकी वही गति होती है जो जंगल में रहकर तपस्या करने वाले ऋषि मुनियों की।”

भारतमाता ही खरोखर वीरप्रसवा आहे. परंतू या वीरांना विसरून जाणे हा इथल्या धर्मनिरपेक्षतेचा रिवाज आहे! आज या तिन्ही हुतात्म्यांना नमन करताना भीती वाटते की, आम्ही जर आमच्या वीरांना आणि त्यांच्या कार्याला विसरलो, तर येणारी पिढी प्रेरणा कुणापासून घेणार? ज्यांच्यावर पुढच्या पिढीने डोकी ठेवावीत, असे पाय कुठून येणार? तुम्हालाही वाटतेय का हो ही भीती? जर वाटत असेल, तर उठा – जागे व्हा आणि मिळवून द्या या हुतात्म्यांना त्यांचे उचित स्थान! नाहीतर
“शहिदोंकी मजारोंपर लगेंगे हर बरस मेले
वतनपर मिटनेवालोंका बाकी निशाँ होगा”
या ओळी वल्गनाच ठरतील, व्यर्थ ठरतील. आणि असे झाले, तर आपल्यासारख्या करंटे केवळ आपणच असू..!

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच लेखकाने व्याख्यानांतून मांडलेली विविध क्रांतिकारकांची चरित्रे ऐकण्यासाठी आणि या विषयांवर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा – www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *