ईसईज्ञानी
सिम्फनी लिहायला किती वेळ लागतो? मोठमोठे संगीतकार त्यासाठी ६ महिने ते १ वर्षसुद्धा घेतात. पण एक भारतीय कलाकार आहे ज्याने आजपासून पाव शतकापूर्वी सिम्फनी लिहिलीये. सिम्फनी लिहिणारा तो भारतातलाच नव्हे, तर आशिया खंडातला पहिलाच संगीतकार आहे. त्याला किती काळ लागला माहितीये? ६ महिने? एखादं वर्षं? १९९३ साली लंडनच्या रॉयल फिलहार्मनिक ऑर्केस्ट्राला घेऊन त्याने ही सिम्फनी अवघ्या १३ दिवसांत लिहिलीये! आणि तिचा दर्जा ऐकून इंग्लंडमधील त्या प्राचीन वाद्यवृंदाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. सांगायची गरजच नाही की, हा पराक्रम करण्याची ताकद असलेला केवळ एकच संगीतकार सबंध जगात आहे, ‘ईसईज्ञानी’ इलयराजा!!
राजा प्रसंग ऐकतो. जागच्या जागी चाल लिहितो. आणि अवघ्या ५ मिनिटांत गाणं तयार होतं! शब्द लिहायला आणि गायकाला शिकून गायला वेळ लागतो, तेवढाच कालव्यय. तुम्ही विचार कराल की पाचच मिनिटांच्या गाण्याचा दर्जा तो काय असणार? एकदा बॉम्बे जयश्री म्हणाल्या होत्या, राजाकडे गाणं म्हणजे परत एकवार शाळेत जाण्यासारखं असतं. त्याच्या चालीत इतके बारकावे असतात की, प्रत्येक गाण्याची टिपणं काढण्यासाठी स्वतंत्र वहीच करावी लागते. राजाने आजवर १०००हूनही अधिक चित्रपट केलेयत आणि त्यातील किमान ८५० तरी म्युझिकल ब्लॉकबस्टर्स आहेत. जगात आजवर कुणालाच न साधलेला विक्रम आहे हा! राजा स्टुडिओत येतो. सिनेमा लावायला सांगतो. सिनेमा पुढे सरकतो तसतसा पाहात झरझर नोटेशन्स लिहितो. सिनेमा संपेपर्यंत सबंध चित्रपटाचे पार्श्वसंगीत कागदावर उतरलेलेसुद्धा असते! हे सुद्धा जगात कुणीच करू शकत नाही. राजाने आपल्या पार्श्वसंगीताच्या जोरावर अतिसामान्य चित्रपटांना व प्रसंगांनाही वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेय. इतरांची वाद्ये बोलतात, राजाच्या पार्श्वसंगीतात मौनसुद्धा बोलते! आजवर मिळालेल्या ५ राष्ट्रपती पारितोषिकांपैकी २ पार्श्वसंगीतासाठी मिळालेयत राजाला.
आपल्याकडे जो दर्जा माऊलींच्या ज्ञानेश्वरीला आहे, तसाच दर्जा तमिळ साहित्यात ९व्या शतकातील संतकवी मणिक्कवसागरांनी लिहिलेल्या ‘तिरुवसागम’ला आहे. त्यातील ५१ रचनांपैकी ६ रचना राजाने २००५ साली निवडल्या. हंगेरीच्या बुडापेस्ट सिम्फनी ऑर्केस्ट्राला हाताशी धरलं आणि एक अभूतपूर्व ओरॅटरियो लिहिला. ओरॅटरीयो हा इटालियन शब्द आहे. सिम्फनीमध्ये नुसताच वाद्यवृंद असतो, तर ओरॅटोरियोमध्ये त्यासोबतच कॉयर आणि सोलोजसुद्धा असतात. काहीसा ऑपेराच्या जवळ जाणारा हा प्रकार. भारताने जगाला दिलेल्या सर्वश्रेष्ठ संगीतरचनांची यादी करायला घेतली, तर ‘तिरुवसागम’चा समावेश मी अतिशय वरच्या स्थानी करेन इतक्या श्रेष्ठ सांगितिक दर्जाचा अल्बम आहे हा. असाच एक प्रयोग राजाने १९८६ साली केला होता. पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतातील बरोक शैलीचा निष्णात संगीतकार बाख़ (१६८५-१७५०) आणि आपल्याकडील कर्नाटक शास्त्रीय संगीतातील संत त्यागराज (१७६७-१८४७) या दोघांच्या शैली एकत्र करून राजाने अल्बम केलेला “हाऊ टु नेम इट”. लेणं आहे हे संगीतातील अक्षरशः! त्यानंतर दोनच वर्षांनी ५० जणांचा वाद्यवृंद आणि साक्षात पं. हरिप्रसाद चौरसियांना घेऊन केलेला इन्स्ट्रुमेंटल अल्बम “नथिंग बट विण्ड”ला (१९८८) तर माझ्या प्लेलिस्टमध्ये ध्रुवबाळासारखे अढळपद आहे! आणि असे अनेक अल्बम्स राजाने आजवर केले आहेत.
चित्रपट आणि चित्रपटेतर संगीत, दोन्हींमध्ये राजाने केलेल्या प्रयोगांची संख्या अनंत आहे. त्यांना तोडच नाही. राजाला ‘ईसईज्ञानी’ अर्थात ‘संगीतातला सर्वश्रेष्ठ ‘ म्हणतात, ते म्हणूनच सार्थ आहे. आज राजाचा वाढदिवस. आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करून हा संगीतकुलगुरू पंचाहत्तरीत पदार्पण करतोय. शरीर म्हातारं होत असतं, कला मात्र मुरतच जाते! संस्कृतमध्ये म्हणतात ना,
जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा कवीश्वरा: ।
नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।
या ओळींचा खरा मालक आहे इलयराजा, नव्हे राजाधिराजा इलयराजा!!
— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)