लढ मित्रा
डरतो कश्याला तू लढ मित्रा
लढत्याची दासी धरणी मित्रा
दु:ख तितुके माया हो
सूर्य गिळतो छाया हो
टाकीच्या घावांमधुनी
देव बनते काया हो
वेदना रे वीराला
लिहिली असे जन्माला
वेणांची करुनि गीते
गा तू आपुल्या कर्माला
तुझिया रे कष्टांनी हो अवनिला आधारा
तू बांध माथ्यावरती जखमांचा हा भारा
व्रण हे जरी भीषण रे
युद्ध वीरा भूषण रे
तू पार्थ तुझा तू कृष्ण तुझा तू तुझी गीता रे
होतील कविता ह्या तलवारी
देतील अंधारा त्या ललकारी
डरतो कश्याला तू लढ मित्रा
लढत्याची दासी धरणी मित्रा
गंध मातीचा येण्या
चार महिने ताप हो
तपाचे फळ मिळण्या
पाहावी लागते वाट हो
शंभरवेळा पडताना
शंभरवेळा जो उठतो
त्याचीच होते सरशी
जुळण्यासाठी जो तुटतो
असू दे किती जरी उन्नत हिमवंताचा माथा
धीराच्या पदचिन्हांकित विजयाच्या या गाथा
ध्येय असे ह्रदयात
बदले हार विजयात
हे मर्म असे रण कर्म असे हा इतिहासच आहे
होतील कविता ह्या तलवारी
देतील अंधारा त्या ललकारी
डरतो कश्याला तू लढ मित्रा
लढत्याची दासी धरणी मित्रा
— © विक्रम श्रीराम एडके
**************************************
चाल: ओव्वोरु पूकळुमे (ऑटोग्राफ)
राग: सिंधुभैरवी
**************************************