आठवणींच्या गल्लीबोळांतून
नव्वदचं दशक हे अनेक अर्थांनी नॉस्टॅल्जियाचं दशक आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांसाठी ते नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित अश्या जोड्यांनी, अन्नू मलिक वगैरेंसारख्या सफाईदार “बाजीगरां”नी व विजू शाहसारख्या अनेकानेक अंडररेटेड माणकांनी बनवलेल्या आणि कुमार, अलका, उदित वगैरेंनी बेभान होऊन गायलेल्या दिलतोड गीतांचं दशक आहे; तर नव्वदच्याच दशकात जन्मलेल्या आजच्या तरुणांसाठी ते इंडीपॉप गाण्यांमधील नव्या प्रवाहांत केलेल्या सचैल स्नानांचं दशक आहे. दोन्हीही प्रकारच्या मंडळींसाठी ते एकत्रितपणे समीरचंदेखील दशक आहे. आणि दोन्हीही प्रकारची मंडळी त्या दिवसांबद्दल बोलताना जरादेखील थकत नाहीत.
याच दशकाने सोनू निगम, शान, केके, शंकर असे हिरेसुद्धा दिले! याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला!! त्यामुळे “आशिकी” (१९९०) वगैरेंपासून सुरू झालेली नॉस्टॅल्जियाची गाडी “रंगीला” (१९९५), “दिल से” (१९९८), “ताल” (१९९९), “कहो ना प्यार है” (२०००), “लगान” (२००१), “दिल चाहता है” (२००१), अशी शेकडों स्टेशनं पार करत करत पार “प्यार में कभी कभी” (१९९९), “कल हो ना हो” (२००३), “हम तुम” (२००४) ते थेट “धूम”पर्यंत (२००४) जाऊन पोहोचते! २००५, २००६ सालापर्यंत हा नव्वदच्या दशकातला सांगितिक मॉन्सून परतीचा पाऊस बनून बरसत होता. त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक लावला तो हिमेश रेशमियाने २००५ मध्ये “आशिक बनाया आपने”द्वारे!
तसं बघायला गेलं, तर हिमेश हे देखील नव्वदच्याच दशकाचं बायप्रॉडक्ट! परंतु “प्यार किया तो डरना क्या” (१९९८), “कुरुक्षेत्र” (२०००), “दुल्हन हम ले जाएँगे” (२०००), “तेरे नाम” (२००३) वगैरे सरधोपट मेलडीजच्या मार्गावरून जाता जाता त्याने त्याचा साऊंड “आशिक बनाया आपने”मध्ये आमूलाग्र बदलला. हा बदल जितका सानंद स्वीकारला गेला तितकाच भल्याभल्यांना समूळ हलवूनसुद्धा गेला. पहिला धक्का ओसरताच हळूहळू सारं बॉलिवूड त्याच साऊंडची कॉपी करू लागलं. स्वतःचा वेगळा साऊंड जपणारे त्याकाळीही रहमान आणि शंकर-अहसान-लॉय वगैरे लोक होते.
यांपैकी रहमान हा बदलांना सगळ्यांत वेगळ्या प्रकारे रिस्पॉण्ड करणारा माणूस आहे. हिमेशच्या लाटेच्याही पूर्वी आपला साऊंड जुना होऊ लागल्याचं त्याने बरोब्बर हेरलं होतं आणि “रंग दे बसंती”द्वारे (२००५) त्याने सगळा खेळच पालटून टाकला होता. पण कॉपीज हिमेशच्या बनल्या, रहमानच्या नाही. कारण, रहमानचा आधीचा साऊंड हा खूपच साधासरळ, प्रयत्नाने आत्मसात करता येण्यासारखा होता. २००४ नंतर रहमानने साऊंड बदलण्याची सुरू केलेली प्रक्रिया २००९ ला “दिल्ली ६”पर्यंत पूर्ण झाली आणि तोपर्यंत त्याचा साऊंड इतका काही गुंतागुंतीचा झाला होता की त्याची सहीसही नक्कल करूनही तो प्रतिभेच्या कवेत गवसणे शक्यच नव्हते.
याच काळाने प्रीतम, अमित त्रिवेदींसारखी मंडळी दिली, तर विशाल-शेखरला अजून वरच्या पातळीवर पोहोचवलं. म्हणजे ज्यांना रहमान परवडत नाही आणि हिमेशपर्यंत खालीसुद्धा उतरायचं नाही, ते इन्स्टंट हिट्ससाठी प्रीतमकडे जाऊ लागले. त्यात अजून थोडासा क्लास हवा असलेले विशाल-शेखरकडे तर अजून प्रयोगशीलता हवे असलेले अमित त्रिवेदीकडे जाऊ लागले.
शंकर-अहसान-लॉय यांचाही साऊंड २००२ चे २००५ पर्यंत रिपिटिटिव्ह होत गेला. पण तुरळक अपवाद वगळता त्यांना तो अनेक वर्षे बदलताच आला नाही. त्यामुळे त्यांचे चांगले आणि हिट असे दोन्हीही प्रकारचे अल्बम्स तुलनेने कमी कमी होत गेले. त्यांच्यातला मोठा, सकारात्मक बदल दिसला तो २०१२ सालच्या “विश्वरूपम” साऊंडट्रॅकमध्ये! त्यानंतर “कट्यार काळजात घुसली” (२०१५), “मिर्ज्या” (२०१६) अशी एकाहून एक रत्ने जरी त्यांनी दिली असली तरी आत्ता आत्ता कुठे ते पुन्हा एकवार जम बसवू लागलेयत.
दरम्यान हिमेश केव्हाच मागे पडला. किंबहूना एकेकाळचे मोठमोठे दिग्गज विस्मृतीत गेले व जाऊ लागले. अवघ्या १०-१५ वर्षांपूर्वीपर्यंत जेवढे प्रयोग मुख्य प्रवाहातल्या चित्रपट संगीतात व्हायचे, तेवढे तर आता इंडीपॉप आणि समांतरमध्येसुद्धा होताना दिसत नाहीत. चित्रपटसंगीताची तर गोष्टच नको. ते रोज रोज नवीन पायऱ्या “उतरतच” चालले आहे. आणि गंमत म्हणजे हेही दशक उद्या कुणाच्या तरी उसासे टाकायला लावणाऱ्या नॉस्टॅल्जियाचा भाग असणार आहे! जितकी कळ आज पस्तिशीत असलेल्यांच्या काळजातून कुमार सानूसाठी उठते, तितकीच उद्या कुणाच्यातरी काळजातून अरिजित सिंहसाठी उठणार आहे! बदल हाच एकमेव शाश्वत असतो असे नाही, तर बदलणारेदेखील शाश्वत असतात. त्यामुळे रहमान हा नव्वदच्या दशकातल्यांसाठी जितका नॉस्टॅल्जियाचा भाग आहे तितकाच दहाच्या, वीसच्या दशकातल्यांसाठीसुद्धा आहे आणि तीसच्या व चाळीसच्या दशकांतल्यांसाठीसुद्धा राहिल. बाकी आपापले नॉस्टॅल्जियाज खूपच सापेक्ष असतात आणि म्हणूनच ते ह्रदयाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात, हूरहूर लावणाऱ्या कातरवेळी मनगटावरून फायासारखे फिरवण्यासाठी!!
— © विक्रम श्रीराम एडके
(संपर्क: www.vikramedke.com)