कॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण

कलियुग हे आसुरी शक्तींचं युग आहे. त्रेता आणि द्वापारातच आसुरी शक्तींनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना, कलीत त्या शक्ती चरमसीमेवर नसतील तरच नवल! अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा? दुसरीकडे नागराजचा काका असलेला सैतानी नागपाशा अमृतप्राशन केल्यामुळे अमर आहे, परंतु तरीदेखील तो नागराजपुढे वारंवार हरतच आलाय. तो का प्रत्येकवेळी हरतो, याचे कारण शोधून त्याच्या कुटील गुरूंनी एक आगळाच प्रयोग आखलाय यावेळी. हा प्रयोग पूर्ण होणार तोच, उपरोल्लिखित महाकाय कृष्णशक्ती पृथ्वीच्या आयामात प्रवेश करते आणि घटनांचे सारे संदर्भच बदलून जातात. सुरू होते कलियुगातले रामायण, अर्थात नागायण!

आर्ष महाकाव्यच नव्हे तर इतिहास म्हणून गौरविलेले रामायण गेली हजारो वर्षे आपण वाचत, ऐकत, पाहात आलोय. अनेकांनी आपापल्या बुद्धी आणि प्रतिभेनुसार त्याचा अन्वयार्थ लावायचे प्रयत्नही केले. त्यातून उद्भवलेल्या शेकडो कलाकृती, ग्रंथ, नाटके, सिनेमे, कादंबऱ्या आपापल्या वकूबानुसार आज प्रसिद्ध आहेत. परंतु कॉमिक्सच्या विश्वात, विशेषतः भारतीय कॉमिक्सच्या विश्वात रामायणावर थेटपणे नव्हे तर वेगळ्या कथेच्या संदर्भाने भाष्य क्वचितच झाले असेल. कॉमिक्स वाचणाऱ्यांना सुपरिचित असलेल्या ‘राज कॉमिक्स’ने हे शिवधनुष्य (कोटी हेतुत:!) उचलले आणि उचललेच नव्हे तर त्याला प्रत्यंचा चढवून अचूक संधानही केलेय. त्यातूनच उभी राहिलीये काळ, दिशा, स्थल सगळ्यांनाच भेदून उरणारी महागाथा ‘नागायण’!

या ‘नागायणा’त श्रीराम आहेत, सीता, लक्ष्मण, हनुमान, कैकेयी, जटायू, विश्वामित्र, राक्षस, वानर आणि अगदी रावणसुद्धा आहेत! मला आवडलेली सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे यांतलं एकही पात्र ओढून-ताणून नाहीये. बहुतांश पात्रे नैसर्गिकरित्या आधीपासूनच राज-कॉमिक्सविश्वाचा भाग असलेली आहेत. त्यांच्या मूळ स्वभावांचे रामायणानुसार लावलेले अन्वयार्थ इतके चपखल बसतात की वाटावं, १९८६ पासून ‘राज कॉमिक्स’ जणू याच एका शृंखलेची तयारी करत होते! वाल्मिकींचे ‘रामायण’ जसे बाल, अयोध्या, अरण्य किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तर अशा ७ कांडांमध्ये पसरलेले आहे, तद्वतच अनुपम सिन्हा व जॉली सिन्हांचे हे ‘नागायण’ वरण, ग्रहण, हरण, शरण, दहन, रण, समर, इति अशी ८ कांडे व १ उपसंहार अशा एकूण ९ खंडांत (पक्षी कॉमिक्समध्ये) पसरलेले आहे. यांपैकी कोणतेही कॉमिक्स दुसऱ्याहून यत्किंचितही कमी नाही. भारतीय कॉमिक्सविश्वाला सुपरकमांडो ध्रुवसारखे एकमेवाद्वितीय न अन्य कोऽपि पात्र देणारे Anupam Sinha नि:संशय शतकातील सर्वश्रेष्ठ कॉमिक-लेखकांपैकी एक आहेत आणि ‘नागायण’ची रोमहर्षक कथा व तितकीच रोमांचक मांडणी हे या गोष्टीचे जिवंत पुरावे आहेत.

ज्यांनी मूळ वाल्मिकींचे रामायण वाचलेले असेल, त्यांना कथेचा काही काही ठिकाणी अंदाज येईल. हा म्हटलं तर दोष आहे. परंतु हे संदर्भ अनेकवार अनपेक्षित ठिकाणी आलेले असल्यामुळे ते उलगडताना अनुभवणे हा एक वेगळाच सौख्यदायी अनुभव आहे. अनेक ठिकाणी मूळ स्रोताशी विलग होताना घेतलेले स्वातंत्र्य कथेसाठी पोषकच ठरले आहे. परंतु त्यासोबतच पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांचा मूळ कथेवर होणारा परिणाम या सबंध शृंखलेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. सबंध कथाच भविष्यकाळात घडत असल्यामुळे नागराज आणि सुपरकमांडो ध्रुव या महानायकांच्या वैयक्तिक आयुष्यांमध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. त्यांचे दिसणे आणि पेहरावही कथेला अनुरुप बदललेयत. आणि तरीही अंतरी ते पूर्वीचेच नागराज व ध्रुव आहेत. हा समतोल राखणे ही मोठीच अवघड जबाबदारी, परंतु ती येथे लीलया पार पाडली गेली आहे. आणि याचवेळी अरेषीय पद्धतीने मांडणी करताना पुढच्या पिढ्यांनाही उचित स्थान देऊन त्यांची चपखल स्थापनादेखील केली आहे. अर्थात ‘राज कॉमिक्स’ हे नागराजच्या तुलनेत ध्रुवला, तो सगळ्यांपेक्षा वरचढ असूनही, कायमच सापत्नभावाची वागणुक देत आलंय, हा माझ्या मनातील जुनाच सल याही शृंखलेत काहीसा जाणवतो.

तुम्ही याआधी ‘राज कॉमिक्स’ वाचले नसेल तर काही गोष्टींचे संदर्भ लागणे अवघड जाऊन रसभंग होण्याची शक्यता आहे. या शृंखलेत हल्लीच्या परिस्थितीला अनुलक्षून काही ईस्टर-एग्ससुद्धा आहेत. परंतु ते डोळसपणे वाचणाऱ्यालाच सापडतील. अर्थात क्वचित काही गोष्टी सोडल्यास ही सबंध शृंखलाच मोठी अविस्मरणीय व अक्षरशः ‘कलेक्टर्स एडिशन’ घेऊन संग्रही ठेवावी अशीच झाली आहे. कॉमिक्स म्हणजे पोरासोरांनी वाचायच्या गोष्टी, हा आरोप तर ‘राज कॉमिक्स’ने केव्हाच धुवून टाकलाय, किंबहूना ‘नागायण’द्वारे ते या बाबतीत अजूनच शंभर पावले पुढे गेले आहेत. कधी जर ‘राज कॉमिक्स’मधील पात्रांवर चित्रपट बनलेच तर ‘नागायण’ हे शंभर ‘इन्फिनिटी वॉर’लाही भारी ठरेल, एवढा त्याचा आवाका आहे आणि एवढी त्याची महत्त्वाकांक्षी मांडणी आहे. तुम्ही तर वाचाच, परंतु आपल्या आर्ष ग्रंथांपासून दूर गेलेल्या पुढच्या पिढ्यांनाही मनोरंजक चित्रकथेद्वारे मांडलेली ही शृंखला वाचायला द्या, त्यांना त्याचे संदर्भ आणि अन्वयार्थ उलगडून सांगा व हलकेच त्यांना मूळ ग्रंथांकडे घेऊन या. संस्कार असेच होत असतात!

— © विक्रम श्रीराम एडके
[www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *