गॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम

रामायण-महाभारत यांची आजवर जगात इतक्या वेगवेगळ्या चित्रपटकारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी मांडणी केलीये की विचारता सोय नाही. पण एखाद्या चित्रपटाच्या बाबतीत मात्र हा मान जर कुणाला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त फ्रान्सिस फोर्ड कपोलाच्या “गॉडफादर”लाच (१९७२)! मुळचीच सशक्त कथा आणि तिची पडद्यावरील तितकीच ताकदवान मांडणी. “गॉडफादर”ने सिनेमाच्या मांडणीच्या क्षेत्रात इतकी वेगवेगळी दालने खुली केली की, तेव्हापासून आत्तापर्यंत माफियांवर जेवढे म्हणून काही सिनेमे बनले असतील त्यांच्यावर कुठे ना कुठे “गॉडफादर”चा प्रभाव हा दिसतोच. कधी अजाणतेपणी तर कधी जाणून-बुजून. वर मी रामायण आणि महाभारताचं उदाहरण दिलं ना, अगदी तसंच वेगवेगळ्या चित्रपटकारांनी आपापल्या दृष्टिकोनांप्रमाणे आणि अर्थातच वकूबांप्रमाणे “गॉडफादर”ची पुनर्मांडणी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. भारतातही असे प्रयोग कित्येकदा झालेयत. रामगोपाल वर्माचा “सरकार” (२००५), प्रकाश झाचा “राजनीती” (२०१०), दिलीप शंकरचा “आतंक ही आतंक” (१९९५) आणि मणिरत्नम किती जरी नाकारत असला तरी त्याचा “नायगन” (१९८७) अशी कित्येक उदाहरणं देता येतील. याच मालिकेत येतो परवा रिलिज झालेला “चेक्का चिवंता वानम”!

गॉडफादरला एक मुलगी आणि तीन मुलं असतात. मुलगी कॉनी, भडक डोक्याचा सांतिआनो अथवा सॉनी, हुशार परंतु हॉटेल व कसिनोंपुरताच मर्यादित असलेला लंपट फ्रेडो आणि सगळ्यांत धाकटा मायकेल. गॉडफादरवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा ही मंडळी एकत्र येऊन आपापल्या पद्धतींनी परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करतात. आता प्रश्न असा उद्भवतो की गॉडफादरवर हल्ला व्हर्जिल सोलोझोने केलाच नसेल तर? तो जर गॉडफादरच्या मुलांपैकीच कुणीतरी केला असेल तर? तर काय होईल? तर सुरू होईल गॉडफादरची भाऊबंदकी किंवा गॉडफादरचे महाभारत (कोटी हेतुत:)! नेमकी हीच कथा आहे मणिरत्नमच्या “चेक्का चिवंता वानम”ची. चेन्नईतला सगळ्यांत मोठा डॉन सेनापतीवर (प्रकाश राज) प्राणघातक हल्ला होतो. आधी वाटतं की त्याचा प्रतिस्पर्धी चिन्नप्पादासननेच (त्यागराजन) हा हल्ला घडवून आणलाय की काय, परंतु हळूहळू उलगडत जातं की हा हल्ला त्याच्या मुलांपैकीच एकाने केलाय. सेनापतीला चार मुलं. एक मुलगी आणि ताकदवान वरदराजन (अरविंद स्वामी), दुबईत राहून हॉटेलचा बिझनेस पाहाणारा कुटील त्यागराजन अथवा त्यागू (अरुण विजय) आणि सर्बियात शस्त्रांचा व्यापार करणारा निर्दयी एतिराज अथवा एति (सिलम्बरासन). तिघांपैकी एकाने कुणीतरी बापाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय आणि आता सुरू झालीये बापाची जागा घेण्यासाठी तिघांचीही जीवघेणी चढाओढ! गॉडफादरच्या महाभारताला बऱ्याच अंशी “पोन्नियिन सेल्वन”ची किनार आणि किंचितशी करुणानिधी कुटूंबाची फोडणी!!

सीसीव्हीची कथा मुळातच अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यातसुद्धा तिला शेकडो कंगोरे आहेत. तिघांची आई लक्ष्मी (जयसुधा) हीच्या वडलांशी सेनापतीचं जुनं शत्रुत्व. त्यांना संपवल्यानंतरही त्याने तिचा भाऊ चेळीयानला (चित्रपटाचा लेखक शिवा अनंत) जिवंत ठेवलं. इतकंच नव्हे तर त्याला आपल्या ‘फॅमिली’त सामील करून घेतलं. त्याची मुलगी चित्राला (ज्योतिका) मुलीप्रमाणे वाढवलं व यथावकाश तिचं वरदराजनशी लग्नही लावून दिलं. लक्ष्मी एकदा चित्राला म्हणतेसुद्धा की ‘खूपच कठोर आहेस तू’! वरदराजनची एक प्रेयसीसुद्धा आहे, पार्वती (अदिती राव हैदरी). ही पत्रकार आहे. थोडक्यात बऱ्याच जणांचे बरेच हितसंबंध सेनापतीच्या भोवती कुठे ना कुठे गुंतलेले आहेत. वरदराजनचा बालमित्र रसूल (विजय सेतूपती) आता पोलिस इन्स्पेक्टर झालाय. तो वरदराजनला आतून मदत करतो आणि वरदराजन त्याला. हा त्यांच्यातला दोस्तीखात्यात केलेला अलिखित करार आहे. रसूलची पार्श्वभूमीही काळवंडलेलीच म्हणावी अशी आहे. पण लक्ष्मीने रसूलला आईची माया दिलीये. एतिराजची गर्लफ्रेण्ड आहे छाया (डायना एरप्पा) त्यागूची बायको रेणू (ऐश्वर्या राजेश). सांगितलं ना आधीच गुंतागुंतीची कथा आणि तिला शेकडो कंगोरे!

पण दिग्दर्शक मणिरत्नम आहे! तो या सगळ्या कंगोऱ्यांना असा काही घट्ट धरून ठेवतो की एकसुद्धा धागा इकडचा तिकडे जात नाही. त्याने प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि त्यात तो बहुतांशी यशस्वीसुद्धा झालाय. बऱ्याच वर्षांनी जुना मणिरत्नम पाहायला मिळाला या चित्रपटात. कथेच्या वेगावर त्याची कमाल पकड आहे आणि मांडणीत वेगळीच प्रयोगशीलता. तो खऱ्या अर्थाने सीसीव्हीचा सेनापती आहे. छायाकार संतोष सिवन आणि संपादक श्रीकर प्रसाद या दोन शिलेदारांचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय त्याने. गाणी नेमक्या जागी येतात. हे गणित जरा मागच्या “काऽट्र वेलियिडई”मध्ये (२०१७) चुकलं होतं. आणि रहमानचे पार्श्वसंगीत चित्रपटाचा एकूणच दृक्परिणाम शतकोटीपटींनी वाढवते, हे सांगणे न लगे! परंतु मध्यांतरानंतर काही काळ जेव्हा कथा जराशी अडखळते तेव्हा रहमानचं दैवी संगीतच आहे जे सिनेमाला पडण्यापासून रोखून धरते. खासकरून ‘सायफर’ ही माझी प्रथमश्रवणी सगळ्यांत आवडती जागा आहे! रहमानचा असा मोठ्या क्षमतेने वापर हिंदीत अनेक वर्षांत कुणी केलेला नाहीये.

कथा अडखळते म्हणजे तरी काय? कथेला रहस्याचा, साहसपटाचा बाज असला तरीही हे मुळात एक कौटुंबिक नाट्य आहे. मध्यांतरानंतर त्याचा प्रभाव वाढतो. सिनेमांत भावना पाहायची सवय राहिली नसलेल्यांना हे काहीसे कंटाळवाणे वाटू शकेल. अर्थात रहस्योद्घाटन ज्या जागी केलंय, ती जागा मलाही फारशी आवडलेली नाही. आणि दुसरे म्हणजे इतके कंगोरे असताना मी जरा मोठ्या ट्विस्टची अपेक्षा करत होतो, तो त्या तुलनेत अगदीच सामान्य ठरतो. मुख्य पात्रांना जरासं अजून विस्तारून मांडायला हवं होतं, त्यांचे विचार त्यांचे परस्परसंबंध त्यांची घडण अजून उलगडायला हवी होती असं वाटत राहातं. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे, सेनापती म्हणतो की मला मार्ग सापडलाय, पण त्याचा मार्ग अखेरीस गोष्टी अजूनच बिघडवून ठेवतो, मग त्याच्या नेतृत्वावर कसा विश्वास बसावा? अशा खूप साऱ्या सैल जागा आहेत. परंतु या गोष्टीची पूरेपूर भरपाई मणिने उत्कर्षबिंदूच्या दिग्दर्शनात केलीये. काय ते मी नाही सांगणार. परंतु मणिरत्नमने आजवर हाताळलेल्या सर्वश्रेष्ठ उत्कर्षबिंदूंच्या यादीत त्याचा समावेश होईल, हे नक्की!

अभिनयाच्या पातळीवर बोलायला गेलं तर प्रकाश राज, जयसुधा या मुरलेल्या अभिनेत्यांकडून चांगल्याच अभिनयाची अपेक्षा आहे. ते ती लीलया पूर्ण करतात. मणिरत्नमच्याच “कडल”पासून (२०१२) नव्याने गवसलेला अरविंद स्वामी राकट वरदाला अक्षरशः जिवंत करतो. काही प्रसंगांत माजलेला वळू वाटण्यापासून ते अगदी हळवा माणूस वाटण्यापर्यंत वैविध्य त्याच्या वाट्याला आलंय आणि तो कुठेच कणभरही उणा पडलेला नाही. अरुण विजयला त्यागूच्या रूपाने जबरदस्त संधी मिळालीये आणि त्याने त्याचं अक्षरशः सोनं केलंय. डायनाला फारसं काम नाही. ऐश्वर्या राजेशने माती केलीये. ज्योतिका मात्र खऱ्या अर्थाने लेडी सुपरस्टार आहे. केवढं जबरदस्त काम केलंय तिने. अदिती राव हैदरीला संधी कमी होती, पण तिनेही सुंदरच काम केलंय. खरं तर सशक्त स्त्रीपात्रे हे मणिरत्नमचं वैशिष्ट्य याही चित्रपटात प्रकर्षाने जाणवतं. आणि तरीही बायकांना फारशी संधीच न देणं, खटकत राहातं. पण चित्रपटाचे खरे स्टार दोनच आहेत. एक सिम्बू! त्याच्या एण्ट्रीलाच प्रेक्षकांनी चित्रपटगृह जे डोक्यावर घेतले, की बास! त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात किती जरी विरोधी वातावरण असलं तरीही तो खऱ्या अर्थाने सुपरस्टार आहे, हे लोकांच्या त्याच्यावरील प्रेमातून बरोब्बर दिसतं. आणि तो सुद्धा ही संधी गमावत नाही. आतल्या गाठीचा एति तो अश्या काही खूबीने साकारतो ना की, मजा येते! पण त्याच्यापेक्षा जास्त जल्लोष झाला तो अर्थातच विजय सेतूपतीच्या एण्ट्रीला! या निष्णात कलाकाराचा शब्दशः ड्रीमरन सुरू आहे आत्ता. दारुडा, विचित्र पार्श्वभूमीतून आलेला आणि सदोदित संकटात सापडलेला रसूल त्याने छप्परतोड रंगवलाय. कसाही प्रसंग असो तो हास्याची लकेर उमटवतोच!

“चेक्का चिवंता वानम” काळवंडलेले रक्ताकाश हा असा अनुभवण्याचा चित्रपट आहे. थोडा कडू-गोड असला तरीही अनुभवण्याचा. आणि अनुभवण्याचा म्हणजे पाहाण्याचाच नव्हे, तर ऐकण्याचाही! तो “आयुधा येऽळदऽ”इतका (२००४) ग्रेट नाही आणि “काऽट्र वेलियिडई”इतका सामान्यसुद्धा नाही. तो दोन्हींच्या मध्ये कुठेतरी खास जागी आहे!!

— © विक्रम श्रीराम एडके
[www.vikramedke.com]

*३.५/५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *