मुकम्मल ग़ज़ल : ९६

रात्रीचे जवळजवळ साडेअकरा वाजलेयत आणि मी एका पंक्चरवाल्याच्या दुकानात बसून हे लिहितोय. घरी जायला अजून एखादा तास लागेल. एखादा तास मी थांबू शकत नाही का? मी थांबू शकतो. अंतर्मनात उसळणारा समुद्र नाही थांबू शकत. अर्ध्या तासापूर्वी सी. प्रेमकुमारचा “९६” बघून बाहेर पडलोय. तेव्हापासून सैरभैर झालोय मी. बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावरच्या प्रेमकहाणीसाठी, त्या पात्रांसाठी, ते कुणीतरी जवळचे, सगे-सोयरे असल्यासारखी काळजी वाटली मला. आणि आता मी इथे डोकं खाजवत बसलोय की, मी या चित्रपटाबद्दल निष्पक्ष लिहू शकेन का? की पुरात वाहावत जाईन मी? कधीकधी बाजू घेणंच खरी निष्पक्षता असते!

प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, भावनेची! आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा त्याची आपोआप कविता होते. भाषा सिनेमाचीही असते. चित्रांची, प्रतिमांचा, संकेतांची. आणि म्हणूनच सिनेमात जेव्हा प्रेम हाताळलं जातं, तेव्हा ती नुसतीच चित्रमालिका न राहाता, त्याचं चित्रकाव्य व्हावंसं वाटतं. तुम्हाला ग़ज़ल ठाऊक आहे? चांगल्या ग़ज़लेचा एक गुण असतो. तिचा प्रत्येक शे’र मुकम्मल असतो, परिपूर्ण असतो. स्वतःच संपूर्ण कविता असतो. आणि तरीही जेव्हा ते सारे शे’र एकत्र येतात, तेव्हा निर्माण होणारी अनुभूती अजूनच स्वतंत्र, अजूनच वेगळी आणि अजूनच गहिरी असते. “९६”ची प्रत्येक फ्रेम एक मुकम्मल शे’र आहे आणि सबंध चित्रपट मुकम्मल ग़ज़ल! सिनेमा जर प्रतिमांची भाषा बोलणारा असेल, तर त्याला संवादांची अशी कितीशी गरज असणार? सुरुवातीच्या काही दृश्यांत आलेली एखादी प्रतिमा, एखादं पात्र नंतर कधीतरी बरोब्बर नेमक्या जागेवर जाऊन लागणे, हा खरं तर सतर्क पटकथेचा नियम. तो या चित्रपटात इतक्या काही खूबीने जागोजागी वापरलाय की त्यांना ‘वाह’ म्हणण्यापेक्षा आपोआपच ‘आह’ म्हटले जाते. किंबहूना सबंध चित्रपटच आपल्या मनावर अलगद सुऱ्या फिरवत राहातो, हळूहळू धागा-धागा उसवत राहातो, आठवणींची एक एक आवरणे उलगडत राहातो, अशक्य कोटीचा त्रास देत राहातो आणि विचारांच्या पलिकडची शांतता देऊन जातो. असं उसवण्याची ताकद कितीशा कलाकृतींमध्ये असते?

गेल्याच आठवड्यात मणिरत्नमचा “सीसीव्ही” प्रदर्शित झाला. त्यातसुद्धा विजय सेतूपती होताच ना? मग त्याने लगेचच पुढच्या आठवड्यात इतकी वेगळी भूमिका घेऊन का समोर उभं राहावं? इतकी वेगळी भूमिका आणि इतका अवर्णनीय सुंदर अभिनय की, तुलनेपुरतादेखील आपल्याकडचा कुणी अभिनेता सुचू नये? का? गौतम मेननचा “व्हिटिव्ही” पाहून आठ वर्षांपूर्वी ‘जेसी’ला पक्षी त्रिषा कृष्णनला घाल-घाल शिव्या घातल्या होत्या, एवढी ताकदवान भूमिका होती ती. तिनेही त्यापलिकडचा चटका लावून जावं? राम आणि जानकी ही नावे निव्वळ सांकेतिकतेपुरती न उरता त्याहून खूपच जास्त मोठी व्हावीत? रावणाने जेव्हा सीतेचं अपहरण केलं होतं तेव्हा ती एक एक दागिना खुणेसाठी सोडत गेली होती. तोच प्रसंग संपूर्णपणे वेगळ्या संदर्भात ज्यावेळी “९६”मध्ये घडतो, तेव्हा के. रामचंद्रन आणि एस. जानकीच्या प्रेमाचे पावित्र्य अजूनच ठसठशीतपणे जाणवते. आणि चित्रपट एका, अगदी एखाद्या क्षणासाठीसुद्धा हे पावित्र्य सोडत नाही. असं तरल पातळीवरचं प्रेम आपल्याकडे पाहून कित्येक वर्षे लोटली, कोण जाणे! कदाचित नव्वदच्या दशकाचा संदर्भ असल्यामुळे ते प्रेम इतकं अशारीर, आंतरिक असावं का? अशा कशा चुकीच्या पिढीत जन्माला आलो आपण की त्याकाळचा साधेपणा मनाच्या पाटीवरून पुसला जात नाही आणि तरीही नवीन काळाची नवीन बाराखडी त्याच पाटीवर मन मारून लिहिण्याखेरीज पर्यायसुद्धा नाही.

संवाद त्या मानाने खूपच कमी आहेत, पण जेव्हा आहेत त्या त्या प्रत्येक वेळी प्रतिमांच्या भाषेहून लाखपटींनी पुढे जाता येण्यासारखे असेल, तेव्हाच आहेत. आपल्याकडे चांगली आणि टिकाऊ गाणी हल्ली का होत नाहीत, माहितीये? कारण त्यांच्यासाठी जी भावना लागते ना ती मुळातच आपल्याकडच्या चित्रपटांच्या आडात नाही आणि म्हणूनच ती गाण्यांच्या पोहऱ्यातसुद्धा येत नाहीत. परंतु “९६”ची गाणी अशा नेमक्या जागी येतात की जिथून संवादांच्याही पुढे लाखपटींनी जाता येण्यासारखे असेल. गोविंद वसंताचे संगीत आणि अनेकविध गीतकारांचे शब्द मिळून असलेला हा अल्बम माझ्या मते यावर्षीचा आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ रहमानेतर अल्बम तर आहेच, परंतु तितकेच श्रेष्ठ पार्श्वसंगीतसुद्धा आहे. प्रतिमा, संवाद, गीते यांच्याहीपुढे लाखपटींनी जाऊन हे पार्श्वसंगीत चित्रपटाची खोली वाढवते.

जसजसा चित्रपटाचा शेवट जवळ येऊ लागला होता ना, तसतसं मला दोन भीती ग्रासू लागल्या होत्या. एक, संपू नये असं वाटत असतानाही चित्रपट का संपतोय ही भीती आणि सुरुवातीपासूनच रहस्यांची सुयोग्य किनार लावून चढत असलेला मनोरा पाहाता अखेरीस एखाद्याच चुकीने तो कोसळणार तर नाही ना ही दुसरी. आणि जेव्हा शेवटची फ्रेम आली, खरं सांगतो, सप्पकन एखादं हत्यार आत रुतावं तशी रुतली ती, आणि तिथेच राहिलीये मनाच्या पटलावर छापल्यासारखी, कधीच न निघण्यासारखी. असाच आहे हा चित्रपट. अनेकदा अनुभवाव्याशा ग़ज़लेसारखा. खूप लिहूनही शब्दांमध्ये पूर्णार्थाने न गवसणारा!

— © विक्रम श्रीराम एडके

*५/५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *