येणें वाग्यज्ञें तोषावें
२००४ चा सुमार होता. नुकताच कॉलेजला प्रवेश केलेला तो, आजूबाजूचं मोकळं वातावरण पाहून जरासा बुजला होता. शिकायला जायचं, पण गणवेषाची सक्ती नाही; अश्या छोट्याछोट्या गोष्टीदेखील त्याला अचंबित करायला पुरेश्या होत्या. त्या कॉलेजमध्ये अनेक दशकांपासून चालत आलेली एक नावाजलेली वादविवाद स्पर्धा व्हायची. सूचना पाहून त्यानेसुद्धा नाव दिलं. आयुष्यात कधी स्टेजवर जाऊन काही बोललेला नाही. पण वाचायचा भरपूर. भरपूर म्हणजे, पुस्तकं खायचा तो अक्षरशः! कुठेकुठे थोडंफार लिहायचादेखील. या शिदोरीच्या जोरावर, त्याने स्पर्धेत नाव दिलं. मुद्देसूद विषय तयार केला. आठ अधिक दोन मिनिटे वेळसुद्धा कदाचित पुरणार नाही, इतके मुद्दे निघाले. स्पर्धेआधी पात्रता फेरी होती. कॉलेजच्याच एक कला विभागाच्या प्राध्यापिका ती फेरी घेणार होत्या. त्याचं नाव पुकारलं. तो समोर आला. आणि ऐकणारे पाच-सहा श्रोते पाहून त्याचं अवसान गळालं. दहा मिनिटंही पुरणार नाहीत वाटणारे मुद्दे दोनच मिनिटांत संपले होते. मग उगाचच बावरून उभा राहिला. लोक हसायचे ते हसलेच. प्राध्यापिका म्हणाल्या, “तू लिहितोस बरा, पण जन्मात कधी स्टेजवर उभा राहायचा विचारदेखील करू नकोस. तुझ्यात नाहीच ते”! तो हिरमुसला. निघून गेला. या प्रसंगातला तो अपमानित मुलगा, मी होतो.
शाळेत असताना आम्हाला ‘अवांतर वाचन’ नावाचा उपक्रम असायचा. सगळ्यांनी नाव नोंदवलं तसं मीदेखील नोंदवलं. पुस्तक आणायला गेलो. दसरे सर नावाचे ग्रंथपाल होते. त्यांना म्हणालो, “काहीतरी चंपक, ठकठक वगैरे द्या ना”! त्यांनी मला नखशिखांत न्याहाळलं. विचारलं, “कितवीत आहेस तू”? मी म्हणालो, “सातवी”! त्यावर ते कडकपणे म्हणाले, “मग आता चंपक वाचण्याचं वय राहिलंय का तुझं? हे वाच”, असं म्हणून त्यांनी माझ्या हातात एक पुस्तक दिलं, ते होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं “माझी जन्मठेप”! पुस्तक हातात पडताच काही दिवसांपूर्वीचा प्रसंग लख्खपणे नजरेसमोर उभा राहिला माझ्या!
आमच्या शाळेत, अर्थात नगरच्या प्रसिद्ध भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये सर्वच महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या उत्साहात साजऱ्या व्हायच्या. २८ मे, या सावरकरांच्या जयंतीदिनी उन्हाळ्याच्या सुट्या असायच्या, त्यामुळे २६ फेब्रुवारी या त्यांच्या आत्मार्पण-दिनी शाळेत वक्तृत्व स्पर्धा व्हायची. अश्या स्पर्धा म्हणजे आम्हां ठोंब्यांसाठी पर्वणीच असायची अक्षरशः! कारण, स्पर्धांमध्ये दोन-तीन तास सहज निघून जायचे. अभ्यासाला सुट्टी. क्वचित शाळादेखील लवकर सुटायची. अशीच हीदेखील स्पर्धा. स्पर्धेसाठी शाळेच्या भल्यामोठ्या बॅडमिंटन हॉलचे नेट काढून त्याचे सभागृह केले जायचे. भाग-बिग घेणाऱ्या हुशार जमातीतला मी कधीच नव्हतो. मी टेकण्यासाठी पटकन एक खांब पकडला. स्पर्धा सुरू झाली तशी मला डुलक्या येऊ लागल्या आणि स्पर्धा रंगू लागली तशी माझी झोपही गाढ झाली! स्पर्धा संपली की उठव रे, असं मित्राला सांगून झोपलेलो असल्यामुळे मी निश्चिंत होतो. नंतरचा प्रसंग मला मित्रांच्या सांगण्यावरून आठवतोय तो असा. कुणीतरी मुलगी तिचं व्यवस्थित पाठ केलेलं भाषण म्हणून दाखवत होती. त्याचवेळी आमच्या वर्गशिक्षिकेची नजर माझ्यावर पडली. “त्या एडकेला उठवा रे”, त्यांनी माझ्या शेजारच्या मुलाला फर्मावलं. त्याने बिचाऱ्याने शिक्षिकेची आज्ञा म्हणून मला गदगदा हलवायला सुरुवात केली. मला वाटलं स्पर्धा संपली म्हणूनच उठवतोय तो मला. स्पर्धा संपल्यावर काय करतात? टाळ्या वाजवतात! त्याप्रमाणे मी उत्साहात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. समोर एक कुणीतरी मुलगी बोलतेय. सगळं सभागृह माझ्याकडे पाहातंय. आणि मी टाळ्या वाजवतोय! ती मुलगी बिचारी भाषण विसरली आणि गांगरून तशीच उभी राहिली. मला त्यादिवशी असा काय तुडवला की, विचारूच नका!
दसरे सरांनी पुस्तक समोर धरताच मला हा प्रसंग आठवला आणि नकळतच गाल व पाठ हुळहुळले! ज्या माणसावरच्या वक्तृत्व स्पर्धेत आपल्याला मार बसला तो माणूस आहे तरी कोण, असा विचार करून मी ते पुस्तक हातात घेतले आणि त्याच दिवसापासून सावरकर नावाच्या पंचाक्षरी मंत्राने मला झपाटून टाकले ते कायमचेच! जन्मठेप वाचून संपवल्या-संपवल्या मी सावरकरांची इतर पुस्तके शोधू लागलो. विकत घेण्याइतकी ऐपत नव्हती. मग एकूण एक वाचनालयं पालथी घातली नगरमधील. सावरकर-स्मारकाने प्रकाशित केलेले “समग्र सावरकर”चे दहाच्या दहा खंड वेड लागल्यागत वाचून फस्त केले. काहीतरी दैवी, याआधी कधीच न अनुभवलेले विचार आपण वाचतो आहोत, हे त्या वयातही कळत होते. त्या नकळत झालेल्या संस्कारांची शिदोरी आजदेखील मजबूत आहे. सावरकर वाचू लागलो, तसे ते माझ्या बोलण्यातही डोकावू लागले. चार मित्रांमध्ये बोलायचो, तर ते मुग्ध होऊन ऐकत बसायचे. एव्हाना कॉलेजला जाऊ लागलो होतो. वर सांगितलेल्या त्या वाद-स्पर्धेत नाव नोंदवलं आणि तोंडघशी पडलो. जन्मात कधी स्टेजवर उभा राहू नको, सांगून घालवून दिले मला.
त्याक्षणी पहिली गोष्ट जर कोणती कळाली असेल, तर तो चार मित्रांमध्ये बोलणे आणि स्टेजवर उभे राहून बोलणे यामधला फरक. ह्रदयात सावरकर धारण केलेले असल्यामुळे “अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला; मारील रिपू जगती असा कवण जन्मला” हे मनात पक्के होते. त्याच दिवशी ठरवले, हार मानायची नाही. आपले कुठे चुकले हे शोधायचे आणि त्या त्रुटी दूर करायच्या. काही दिवसांपूर्वीच मी लिहिलेल्या एका विज्ञानकथेला पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात पुरस्कार मिळाला होता. त्यावेळीही स्टेजवर जाऊन दोन शब्द बोलायचे होते. त्या विचारांनीच माझी दातखिळ बसली. कसाबसा स्टेजवर उभा राहिलो, तर सभागृहाच्या दुसऱ्या टोकाला माझ्या अगदी समोरच सावरकरांचे पूर्णाकृती तैलचित्र! ते पाहिले आणि काय सुचले कुणास ठाऊक, मी म्हणालो, “माझे आदर्श असलेल्या सावरकरांच्या सान्निध्यात मला हा पुरस्कार दिला जातोय, यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट ती कोणती”? ताबडतोब सारे सभागृह टाळ्यांनी भरून गेले! अच्छा, म्हणजे श्रोत्यांना रिझवणारी वाक्यं बोलता आली पाहिजेत तर! हे एक समजले. पण नुसत्या तेवढ्याने भागणार नाही. आपल्याकडे मुळात आशय हा असलाच पाहिजे. मग ज्या विषयावर बोलायचं, त्याचे मुद्दे काढू लागलो. मुद्यांचा क्रम असा ठेवला की, एकातून दुसरा मुद्दा सहजच निघाला पाहिजे. म्हणजे कोणताच मुद्दा विसरला जाणार नाही. अवघड होते हे. पण सरावाने सारेच सोपे वाटू लागते.
याच काळात नगरमध्ये “भास्कराचार्य अॅस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटर”शी जोडला गेलो. खगोलशास्त्राची लहानपणापासूनच आवड. “भास्कराचार्य”ने त्या आवडीला नुसती दिशाच दिली नाही, तर प्रत्यक्ष अनुभवांतून व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वेसुद्धा शिकवली. याकाळात खूप सारे आकाशदर्शनाचे कार्यक्रम घेतले मी. शाळाशाळांमध्ये जाऊन खगोलशास्त्रावर व्याख्याने दिली. हळूहळू भीड चेपू लागली होती. दरम्यान पुण्याच्या “वेद-विज्ञान मंडळा”ने विचारलं, आमच्याकडे सावरकरांवर व्याख्यान देणार का? जाहीर व्याख्यान! नुसत्या नावानेच भिती वाटू लागली. पण हिंमत करून होकार दिला. दिनांक होता २४ डिसेंबर २०११ आणि विषय होता “सावरकरांवरील आक्षेपांचे खंडन”. भरपूर तयारी करून गेलो. तोपर्यंत एक गोष्ट पक्की समजली होती की, मुद्दे काढण्यात आणि काढलेल्या मुद्यांचा कागद सोबत ठेवण्यात काहीच चूक नाही. आपण काही परीक्षेला बसलेलो नसतो. उलट मुद्दे समोर असले की वाक्प्रवाहात अडथळा येत नाही. मोठमोठे वक्तेसुद्धा हे करतात. ते व्याख्यान आधीच्यापेक्षा छान झाले. विशेष म्हणजे मी यावेळी ठरवलेच होते की, सबंध व्याख्यान रेकॉर्ड करायचे. त्याप्रमाणे फोन माईकजवळ ठेवून मस्त रेकॉर्डिंग केली. स्मार्टफोनमुळे ही एक चांगलीच सोय झालीये. रेकॉर्ड केलेले माझेच व्याख्यान मी ऐकले. पुन्हा पुन्हा ऐकले. अतिशय कठोरपणे त्यातल्या त्रुटी शोधल्या. कुठे घटनाक्रम बदलता आला असता, ते शोधले. प्रवाह बदलण्यावरही विचार केला. कुठे आवाजात चढ-उतार असले पाहिजेत, याची टिपणे काढली. याच काळात सांगलीच्या ब्राह्मणसभेने सावरकरांवरच व्याख्यानाला बोलावले. आधीच्या व्याख्यानोत्तर टिपणांचा यावेळी खूपच चांगला उपयोग झाला. पुन्हा नवे रेकॉर्डिंग आणि नवी टिपणे!
तेव्हापासून आजवर अव्याहत हा क्रम चालू आहे. मी व्याख्यान कधीच पाठ करत नाही आणि प्रत्येकवेळी नव्याने टिपणे काढतो. त्यामुळे आजही त्याच त्या विषयांवर व्याख्याने देण्याचा माझा आणि कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकण्याचा श्रोत्यांचा उत्साह टिकून आहे. हळूहळू सावरकरांसोबतच स्वामी विवेकानंदांवरही व्याख्यानाची बोलावणी येऊ लागली. वेद-पुराणे यांची पूर्वीपासूनच आवड. त्यामुळे काही लोकांच्या स्वार्थापोटी अकारण वादग्रस्त ठरवण्यात आलेल्या परशुरामांचा मुळातून अभ्यास केला आणि त्यावरही आजच्या काळाला सुसंगत व्याख्याने द्यायला सुरुवात केली. भन्साळीचा “बाजीराव-मस्तानी” आला त्या दरम्यान योगायोगाने एका प्रथितयश वृत्तपत्रात माझा बाजीरावांचा प्रेमकथेपल्याडचा खराखुरा पराक्रम सांगणारा लेख प्रकाशित झाला होता. त्याही विषयावर बोलावणी येऊ लागली. किंबहूना हल्ली सर्वाधिक बोलावणी त्याच विषयांवर येतात. जाहीर व्याख्याने तर होतातच, परंतु शाळा-महाविद्यालयांनाही चित्रपटामुळे हा विषय वारंवार ऐकावासा वाटतो. आजवर मस्तानी आणि बाजीरावांच्या प्रेमकथेला नको इतके चघळले गेलेय. त्यामुळे मी ठरवून मस्तानीचा भाग कमीत कमी ठेवून बाजीरावांच्या युद्धांची वर्णने आणि त्यांची त्यापाठची युद्धनीती यांवर भर देतो. त्या विषयाला मी नावच दिले आहे, “मस्तानीपल्याडचे बाजीराव”!
या सगळ्यांत एक फार महत्त्वाचा मुद्दा मला चर्चेसाठी घ्यावासा वाटतो. तो म्हणजे वक्त्याचे मानधन. व्याख्यान ही वाङ्सेवा आहे आणि सेवेचे मूल्य होऊ शकत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. व्याख्यान हे एक समाजकार्य, प्रबोधन असले पाहिजे; हेदेखील मला मान्यच आहे. पण याबाबतीत मी माझा वैयक्तिक आणि म्हणूनच ‘फर्स्ट-हॅण्ड’ अनुभव सांगू इच्छितो. पूर्वी मी व्याख्यानांसाठी अजिबातच मानधन घेत नसे. किंबहूना, कुणी आग्रह केलाच तर तुम्हाला शक्य होतील तेवढे द्या, असे सांगत असे. पण यातून आपणां भारतीयांची एक गमतीदार मनोवृत्ती अनुभवास आली. वक्ता फुकट येतोय, याचा अर्थ तो काही फारसा चांगला नसणार; असा समज करून घेऊन कार्यक्रमात जाणून-बुजून दुर्लक्षित करणे, गृहित धरणे, अपमान करणे असे प्रकारच जास्त अनुभवास यायला लागले. राहाण्याची व्यवस्था उत्तम तर सोडाच परंतु किमान स्वच्छ ठिकाणी होणेही मुश्किल होऊ लागले. जिथे मानधनच नाही, तिथे प्रवासखर्चाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. काहींनी तर फुकट येतोय म्हणून इतरही काही गोष्टी करवून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यांची चर्चा इथे अप्रस्तुत ठरेल. जेवणाचं ताट द्यावं, पण बसायचा पाट देऊ नये; ही म्हण चांगलीच शिकायला मिळाली मला. तेव्हापासून मी एक विवक्षित रक्कम मानधन म्हणून आकारण्यास सुरुवात केली अधिक प्रवासखर्च. आणि काय आश्चर्य! जी मंडळी एकेकाळी दुर्लक्ष करायची, तीच आता सन्मानपूर्वक बोलावू लागली. आपण पैसे मोजतोय म्हटल्यावर व्याख्यानाकडे अधिक लक्ष देऊ लागली. ओघानेच राहाण्याची व्यवस्थाही सुधारली. थोडक्यात व्यवहारामध्ये सेलिब्रिटी राहाण्यालाच किंमत आहे निस्वार्थ सेवेला नाही, याचा पुरेपूर प्रत्यय आला! अर्थातच याबाबतीत मी स्वतःच स्वत:वर काही नियम घालून घेतले आहेत. एक म्हणजे मी कधीच माझ्या योग्य मानधनापेक्षा अधिक रक्कम मागत नाही. योग्य म्हणजे काय, तर व्याख्यानाचे कौशल्य हे अभ्यासावर अवलंबून असते. त्यासाठी घ्यावी लागणारी पुस्तके आणि बाकी सर्व कामे सोडून द्यावा लागणारा वेळ हा उगाचच अंगावर पडणार नाही, इतकी रक्कम. साधा विचार करा, व्याख्यानासाठी जी काही तयारी केली जाते, त्यात कुणी सूट देतं का? लाईटवाला फुकट लाईट देत नाही. माईकवाला फुकटात माईक देत नाही. स्टेजवाला फुकटात स्टेज बनवत नाही. अश्या अनेक ठिकाणी पैसे मोजावेच लागतात. मग ज्या वक्त्यावर हा सगळा डोलारा अवलंबून आहे, त्यानेच तेवढं फुकट यावं अशी अपेक्षा का? अर्थातच, कुणाकडून पूर्ण मानधन घ्यायचं, कुणाकडून कमी घ्यायचं आणि कुणाकडून अजिबातच घ्यायचं नाही; याचं नैतिक तारतम्य पाळता आलंच पाहिजे. ते मी मनापासून पाळतो. दुसरे असे की, मी प्रवासाच्या साधनांवर कधीच अडून राहात नाही. जे स्वस्त आणि सोपे असेल, त्याला माझी कधीच हरकत नसेल. अगदीच गरज असेल, तरच मी विमानप्रवास करतो, तेही प्रवासाचा वेळ वाचावा आणि जोडून दुसरे व्याख्यान असेल, तर आयोजकांचा खोळंबा होऊ नये म्हणून. तिसरे म्हणजे मी शक्यतो हॉटेलचा आग्रह धरत नाही. कुणा कार्यकर्त्याकडे माझी सोय केली तर ते आयोजकांना परवडते आणि मलाही चालते. फक्त माझा एकच आग्रह असतो तो म्हणजे व्याख्यानापूर्वीचा आवश्यक एकांत आणि प्रवासाचा शीण घालवण्यासाठी पुरेशी विश्रांती. चौथी गोष्ट म्हणजे जेवण. मी अस्सल खवय्या आहे. ज्या राज्यात जाईन तेथील खासियत चाखायचा माझा हमखास प्रयत्न असतो. पण हे करतानाही आयोजकांवर भार पडू नये, याची मी पुरेपूर काळजी घेतो.
व्याख्याने देण्यापासून ते उपरोक्त नियम स्वतःवर लादण्यापर्यंत कोणतीच गोष्ट मला कधीच कुणी शिकवली नाही. इतरांचे ऐकत, निरीक्षण करत, ठेचकाळत-धडपडत स्वतःच शिकलो. अनुभवासारखा कठोर गुरू नाही आणि सातत्यपूर्ण अभ्यासाला कोणताच पर्याय नाही. आजही मी माझ्या व्याख्यानविषयांबद्दल सतत माहिती गोळा करत राहातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतूनच नव्हे तर देशभरातून व्याख्यानांसाठी आमंत्रणे येतात मला. गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा, कर्नाटक अशी कित्येक राज्ये मी विविध महापुरुषांची ससंदर्भ चरित्रं पोहोचवण्याच्या ध्यासापायी वारंवार पालथी घातलीयेत. अंदमानात तर वर्षातून दोन वेळा (सप्टेंबर व फेब्रुवारी) सलग पाच-पाच दिवस व्याख्याने देतो मी. या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. आणि असे करणारा मी पहिलाच सर्वांत लहान वयाचा वक्ता आहे. वयाच्या तिशीच्या आतच श्रोत्यांनी मला न भूतो न भविष्यति प्रेम दिले. कित्येकदा कार्यक्रमानंतर अनेक वयोवृद्ध मंडळी चरणस्पर्शाचा प्रयत्न करतात, मी तसे करू देत नाही, पण अक्षरशः भारावून जायला होते. चांगले दिले, तर ऐकण्याची इच्छा अजूनही टिकून आहे, याची पदोपदी जाणीव होत राहाते. सुह्रद तर किती मिळाले याची गणतीच नाही.
पहिल्या परिच्छेदातला तो अपमानित मुलगा, एवढा लांबवरचा प्रवास करून इथवर पोहोचलाय. लवकरच परदेशातूनही व्याख्यानासाठी निमंत्रण आहेच. पण अजून एक गंमत सांगू? ज्या स्पर्धेच्या पात्रताफेरीतूनच मला हाकलून दिले होते, त्याच अगदी त्याच स्पर्धेसाठी यंदा मला परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते! निमंत्रणाचे पत्र पाहून डोळे आपसूकच पाणावले. नकळतच एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे जाणवले. मी हे माझ्या मोठेपणासाठी सांगत नाही. ज्या प्राध्यापिकेने मला हाकलून दिले होते, त्यांच्यावर तर काडीमात्रही राग नाही माझा. उलट त्यादिवशी त्या मला टोचून बोलल्या म्हणूनच तर मी ही भरारी घेऊ शकलो. अन्यथा जगाच्या जंजाळात कुठेतरी खितपत पडलो असतो आज. या लेखाचादेखील हाच तर उद्देश आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक फिनिक्स दडलेला असतो. राखेतून जन्म घेऊन उड्डाणाच्या तयारीत असलेला! त्या प्रत्येक फिनिक्सच्या आयुष्यावर साचलेल्या राखेला फुंकर घालण्याचे लहानसेच योगदान या लेखाने दिले तरी पुरे. मग होणाऱ्या गगनभेदी उड्डाणाला देवदेखील रोखू नाही शकणार!!
— © विक्रम श्रीराम एडके
(स्वबोध. दिवाळी अंक. २०१७)
टीप: अॅडव्होकेट विक्रम एडकेंची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा www.vikramedke.com
तुमचा सावरकरांवरील व्याख्यानाचा मी अनुभव घेतला आहे. तेव्हा सावरकर समजले.
तुमच व्याख्यान अतिशय उत्क्रूष्ठ आहे.
“अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला;
मारील रिपू जगती असा कवण जन्मला”
पुढील प्रवासासाठी अनंत shubheccha।