आत्मार्पण

या माणसाने देशासाठी घर सोडले, पदवी सोडली, सनद सोडली, नोकरी-व्यवसायाची संधी सोडली, पैसा सोडला, आरोग्य सोडले, ज्ञातिगत अस्मिता सोडली, संसारावर उदक सोडले आणि वेळ आली तेव्हा कर्तव्यतृप्तीने क्लांत देहदेखील सोडला. मी बोलतोय सावरकरांबद्दल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल. मी कधीच आजच्या दिवसाचा उल्लेख पुण्यतिथी म्हणून करत नाही, तर आत्मार्पणदिन म्हणून करतो ते यासाठीच. सावरकरांचे प्राण काळाने हरले नाहीत. किंबहूना तितकी काळामध्ये हिंमत तरी होती की नाही, हाच प्रश्न आहे. सावरकरांनी केलेय ते आत्मार्पण! होय, हिंदूधर्मातील शाश्वत सन्यासपरंपरेतील अनेकांनी गेली सहस्रावधी वर्षे केले तेच सहर्ष आत्मार्पण. ज्यावेळी सावरकरांना जाणीव झाली की, मातृभूमीच्या विमोचनार्थ आपण हाती घेतलेल्या व्रताचे उद्यापन झाले आहे, हिंदू समाजासाठी त्यानंतरही आवाक्यात असलेले सारे काही करून झाले आहे, तेव्हा त्यांनी या धरेला देहाचा भार न ठेवता तो सोडण्याचा निर्णय घेतला. केवढी पराकोटीची नि:स्वार्थता ही?

आपल्या ‘आत्महत्या आणि आत्मार्पण’ लेखात (जुलै १९६४) सावरकर लिहितात –
“अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणीवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून अत्यंत अतृप्त अशा मन:स्थितीत वैतागाच्या भरात जे बळाने जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारण: आत्महत्या असे म्हटले जाते. परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू संपूर्णपणे सफल झाला आहे अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या त्या कृत्यास आत्मार्पण असे म्हणतात. यद्यपि या परिवर्तनशील जगात सर्वतोपरी परिपूर्णता अशी केव्हाही असू शकणार नाही. जे जीवनात संपादवायचे होते ते सर्व संपादिलेले आहे म्हणून आता कर्तव्य असे काही उरलेले नाही, अशा कृतकृत्य भावनेने रिक्तकाम किंवा पूर्णकाम झालेले धन्य पुरुष आपणहून आपले प्राण विसर्जित करतात. ते आपले नश्वर जीवन विश्वाच्या चिरंतन जीवनात विलीन करून टाकतात. योगवासिष्ठात म्हटल्याप्रमाणे –
अन्तर्रिक्तो बहिर्रिक्तो रिक्त कुम्भरिवाम्बरे ।
अन्त:पूर्णो बहि:पूर्णो पूर्ण कुम्भरिवार्णवे ।।
तथापि आपल्या या जीवनकार्याची सापेक्षत: परिपूर्णता झालेली आहे, अशी आत्मसंतुष्टता वाटल्यानंतर समाजाला किंवा स्वतःला जो देह वार्धक्याने म्हणा, व्याधीने म्हणा पण केवळ भारभूत असाच राहाणार आहे, त्या देहाचा गुहाप्रवेशाने, प्रायोपवेशनाने, अग्निदिव्याने, समुद्रसमाधी किंवा अंतिम योगसमाधी घेऊन किंवा अशाच कोणत्यातरी मार्गाने जे त्याग करतात, ते त्यांचे कृत्य उत्तान अर्थी बळाने जीव देणेच असताही त्याला आत्मसमर्पण म्हणून जे गौरविले जाते, ते यथार्थच आहे”.

हे केवढेतरी सखोल चिंतन आहे सावरकरांचे. आपल्या देहाचा आता समाजाला, देशाला अथवा कुणालाच उपयोग नाही म्हणून तो देहच सोडून देणे ही एकाचवेळी स्वार्थत्याग आणि उपयोगितावाद अशा वरकरणी विरोधी वाटणाऱ्या दोन्ही गुणांची परिसीमा आहे. सावरकरांसाठी आपण काय केलं, हा विचार आत्ता कुठे आपण करू लागलो आहोत. सावरकरांच्या मनाला हा विचार दूरान्वयानेदेखील शिवलेला नव्हता. किंबहूना आजवरच्या योगदानाच्या बदल्यात काही मागायचे तर नाहीच, उलट आहे ते सारेच देऊन टाकायचे ही त्यांची सर्वोच्चातीलही सर्वोच्चतम भावना आहे. म्हणूनच सकल सुखांचा परित्याग करून हा प्रवाहाविरुद्धचा योगी फाल्गुन शुक्ल षष्ठी, शके १८८७ अर्थात २६ फेब्रुवारी १९६६ या दिनी प्रायोपवेशनाद्वारे अनंतब्रह्माच्या प्रवासास निघून गेला. जणू परमेश्वराने मानवजातीवर कृपावंत होऊन आपल्या तेजाचा एक अंश आमच्यात धाडला होता, तो लक्षावधी आयुष्यांना तेजस्वी स्पर्श करून पुन्हा एकवार अनंतात विलीन झाला. आणि त्याने स्पर्शलेली आयुष्येच नव्हे तर पिढ्यानपिढ्या उजळून निघाल्या, कायमच्या साठी!!

— विक्रम श्रीराम एडके
(लेखक सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *