सोशल मिडिया हाताळताना

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. मला माहितीये, फारच वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे हे, पण खरं आहे. आणि या समाजप्रियतेतूनच संपर्काची वेगवेगळी साधने विकसित झाली. कालौघात या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. हा वेग इतका प्रचंड आहे की पत्रे, फोन आणि मोबाईल एकत्र पाहिलेली पिढी अजूनही अस्तित्वात आहे. परंतु गेल्या दशकभरात या संपर्काच्या क्षेत्राने त्याच्या मूळच्याच अतिप्रचंड वेगालाही चक्कर यावी असे वळण घेतले आणि उभा ठाकला सोशल-मिडिया! सोशल मिडिया म्हणजे काय? फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम, युट्यूब, स्नॅपचॅट वगैरे वगैरे? ही तर सोशल मिडियाची उदाहरणं झाली! या उदाहरणांना सोशल मिडिया का म्हणायचं, याच्या ४ मुख्य कसोट्या आहेत.

१) वेब २.० : पारंपारिक वेबचे स्वरूप असे असते की त्यावरील मजकूर केवळ वाचता येतो. परंतु वेब २.० हे परस्परसंवादी व्यासपीठ आहे. एखाद्या वेबसाईट अथवा अॅपला सोशल मिडिया म्हणण्याची पहिली कसोटी ही, की ती वेबसाईट अथवा अॅप वेब २.० वर आधारित असावी.

२) मजकूर : वर सांगितल्याप्रमाणे पारंपारिक वेबवरील मजकुर हा त्या वेबासाईटकडूनच फक्त पुरवला जायचा. इतरांनी फक्त वाचायचं. त्यापलिकडे वाचकांचा सहभाग अतिशय मर्यादित होता. एकप्रकारे ही सगळी एकमार्गी वाहतूक होती. परंतु सोशल मिडिया मात्र ‘वेब २.०’वर चालतो. तेव्हा दुसरी कसोटी ही की सोशल मिडियावर त्या वेबसाईटच्या अथवा अॅपच्या चालक-मालकांपेक्षाही त्याचे वापरकर्ते आणि वाचक त्या वेबसाईट अथवा अॅपवरीलवरील मजकूर लेखनाच्या, फोटोंच्या किंवा व्हिडिओजच्या स्वरूपात निर्माण करू शकले पाहिजेत.

३) प्रोफाईल्स : प्रोफाईल्स म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर खाती. जसे आपले बँकेत खाजगी खाते असते, तसेच सोशल मिडियावर खाते तयार करता येते. ही झाली तिसरी कसोटी.

४) नेटवर्किंग : अनेक खाती नुसती आहेत, पण त्यांचा परस्परांशी काही संपर्कच नसेल, तर ते माध्यम मृतच म्हणावे लागेल! आणि म्हणूनच सोशल मिडियाची चौथी कसोटी आहे ती म्हणजे त्यावरील खात्यांची परस्परांशी जोडणी.

या ४ कसोट्या पूर्ण करणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन व्यासपीठाला सोशल मिडिया असे म्हणतात.

संपर्काचे एक प्रभावी माध्यम म्हणून सुरू झालेला हा सोशल-मिडिया कधी आपल्यासमोरील संगणकातून निघून लॅपटॉपच्या रूपाने मांडीवर विसावला आणि कधी तिथून उडी मारून मोबाईलच्या रूपाने आपल्या खिश्यात जाऊन बसला, समजलंही नाही. हल्ली तर प्रत्येक बाबतीत लोक सोशल मिडियावर अवलंबून राहू लागलेयत. पूर्वी लग्न जुळवताना पत्रिका पाहिली जायची आता पत्रिकेच्याही आधी एकमेकांची फेसबुक अकाऊंट्स तपासली जातात. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, तिच्या आवडी-निवडी काय, राजकीय मते काय वगैरे एकूण एक माहिती आजकाल योग्यप्रकारे शोधली तर कुणालाही काही क्लिक्सवर सहज उपलब्ध आहे. जगाच्या एका कोपऱ्यातला माणूस दुसऱ्या कोपऱ्यातील माणसाशी फोन, पत्रे यांच्यापेक्षाही वेगाने आणि स्वस्तात बोलू लागला, जोडला गेला. एवढेच नव्हे, तर या दशकात जगभरातील कित्येक मोठमोठे राजकीय, सामाजिक उठाव हे या सोशल मिडियाच्याच जोरावर झाले. ‘व्हायरल’ हा एकेकाळी काळजीचा वाटणारा शब्द आता परवलीचा बनलाय.

हे जितके छान आहे, तितकेच धोक्याचेसुद्धा आहे. लोक जास्त जास्त मनोमोकळे झालेयत आणि तितकेच भेद्य अर्थात व्हल्नरेबलसुद्धा. जाणता-अजाणता आपण कुठे जातो, काय करतो, काय आवडते, काय नाही आवडत, एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल आपले बरे-वाईट मत काय वगैरे अनंत गोष्टींची माहिती सोशल मिडियावर शेअर करत असतो. सध्याचे युग हे माहितीचे युग आहे. माहिती हे आजच्या जगात शस्त्र आहे आणि या शस्त्राचा वापर चतुर लोक कसा करू शकतात याचे केंब्रिज अॅनालिटिकासारखे उदाहरण फार जुने नाही. या तथाकथित पॉलिटिकल कन्सल्टिंग कंपनीने फेसबुकवरील एका अॅपद्वारे बेकायदेशीररित्या लोकांची माहिती मिळवली आणि तिचा वापर करून निवडणुकांवर प्रभाव टाकायचा प्रयत्न केला. फेसबुकवर आपण “तुम्ही मागच्या जन्मी कोण होता” वगैरे टाईमपास चाचण्या देत असतो ना? नीट पाहा, या चाचण्यांचे अॅप्स आपली पब्लिक प्रोफाईल आणि इतरही अनेक प्रकारची माहिती मागवत असतात. ‘त्याने काय फरक पडतोय’ अथवा ‘माझ्याकडे काय आहे चोरण्यासारखं’ म्हणून आपण सहज त्यांना परवानग्या देऊन टाकतो. परंतु केंब्रिज अॅनालिटिकाच्या प्रकरणात माहिती एकाची, गोळा केली दुसऱ्याने आणि वापरली तिसऱ्यानेच. तेव्हा, ‘माझी माहिती चोरून कुणाला काय मिळणार आहे’ म्हणण्याआधी लक्षात घ्या की, तुमच्या माहितीचा वापर हा तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल इतक्या वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी माझे थोरले बाजीरावांवर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर एक माझ्याच वयाच्या आसपासचा तरुण मुलगा भेटायला आला. मला म्हणाला, ‘मी सुद्धा बाजीरावांचा अभ्यासक आहे’. मी म्हणालो, ‘वाह, कोणकोणते संदर्भ अभ्यासता तुम्ही’? माझा विचारण्याचा हेतू असा की, एखादा नवीन संदर्भग्रंथ किंवा अभ्यासाचा मुद्दा समजावा. तर तो उत्तरला की, ‘खूप कसून अभ्यास करतोय मी बाजीरावांचा. व्हॉट्सॅपवर त्यांच्याबद्दल आलेले सगळे मेसेजेस वाचलेयत मी’! मला गंमत वाटली. मी स्वतःही काही परिपूर्ण नाही, परंतु तो तरुण मित्र मात्र व्हॉट्सॅपलाच संदर्भ समजून बसला होता. वर म्हणालो त्याप्रमाणे, सध्याचे युग माहितीचे युग आहे. आपली नेमकी गडबड होते ती इथेच. आपण माहिती आणि ज्ञान यांच्यात फरक आहे, हेच मुळात समजून घेत नाही. साधी गोष्ट सांगतो. ज्ञानाला आह्वान नसते, माहितीची मात्र दुसरी बाजूसुद्धा असू शकते. उदाहरणच द्यायचं झालं तर, दुधी भोपळ्याचा रस एखाद्यासाठी चांगला आहे की नाही, हे कोण व्यवस्थित सांगू शकतं? फक्त तज्ञ डॉक्टर! कारण, त्यांच्याकडे त्याबाबतीत ज्ञान आहे. याउलट सोशल मिडियावर तुम्हाला दुधी भोपळ्याचा रस जणू अमृतच असतो इथपासून ते दुधी भोपळ्याचा रस म्हणजे विषच इथपर्यंत सगळ्या स्वरूपाची माहिती दिसेल! तिची कोणती तरी एकच बाजू बरोबर असणार, परंतु ज्ञान मात्र संपूर्ण बरोबर असतं! व्हॉट्सॅप, ट्विटर, फेसबुक, युट्यूब किंवा इतर कोणत्याही सोशल मिडियावर आलेल्या कोणत्याही पोस्टला, फोटोला, व्हिडिओला; ते विशेषतः इतिहास, धर्म, राजकारण, विज्ञान इ. विषयांवर असतील तर, जर आपण उपरोक्त वाक्याची कसोटी लावली आणि त्यांना पारखून घेऊ लागलो, तर विचार करा, केवढ्या साऱ्या अफवा थांबतील!

या विषयाला आणखी एक पैलू आहे. हायपोकॉण्ड्रिया नावाचा एक विकार असतो. यात व्यक्तीला सतत वाटत राहाते की आपल्याला काहीतरी भयंकर आजार झालाय. जरासं काही झालं की या व्यक्ती त्या लक्षणांवरून आपल्याला त्याच्याशी संबंधित एखादा मोठा आजार झाल्याचा समज करून घेतात. याच विकाराचं एक भावंड आहे, त्याला म्हणतात सायबरकॉण्ड्रिया! नावाप्रमाणेच या विकारात लोक एखाद्या आजाराबद्दल ऑनलाईन वाचून किंवा बघून आपल्यालाही तोच आजार झाल्याचा समज करून घेतात. टाईम्स ऑफ इंडियातील १८ जानेवारी २०१६च्या बातमीनुसार गुगलवरील दर २० मागे १ सर्च हा वैद्यकीय गोष्टींशी संबंधित असतो. आज हा आकडा काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांमध्ये स्वनिदानाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय आहे.

केवळ सायबरकॉण्ड्रियाच नव्हे, तर सध्या सर्वत्र वाढत चाललेले तणाव, अस्वस्थता, निद्रानाश इ. अनेक गोष्टींच्या मुळाशी हेच सोशल मिडिया, मोबाईल आणि इंटरनेटचे व्यसन आहे. इंटरनेट अॅडिक्शन डिसॉर्डर आणि त्याचाच भाऊ फेसबुक अॅडिक्शन डिसॉर्डर हे प्रकार उंबऱ्याशीच नव्हे तर उंबऱ्याच्या आत, तुमच्या-माझ्या आयुष्यामध्ये येऊन ठेपले आहेत व आपल्या मन:शांतीशी छेडछाड करताहेत. फेसबुक, इंटरनेट, मोबाईल यांच्यापलिकडे काही जग असतं, हेच जणू विसरून गेलो आहोत आपण! तुम्हाला गोल्डफिश माहितीये? अॅक्वेरियममध्ये ठेवतात तो मासा. त्याची एखाद्या गोष्टीवरची सरासरी एकाग्रता किती वेळाची असते, ठाऊक आहे? सुमारे ९ सेकंद! आणि माणसाची किती आहे? जवळजवळ ८ सेकंद! दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, तर आपण गोल्डफिशपेक्षाही जास्त चंचल झालो आहोत. मी मुद्दामहून झालो आहोत म्हणतोय कारण, इ. स. २००० मध्ये आपली सरासरी एकाग्रता होती, जवळजवळ १२ सेकंद! म्हणजेच गेल्या १८ वर्षांत आपल्या एकाग्रतेची सरासरी जवळजवळ १/३ कमी झालीये!! डेलॉईट मोबाईल कन्झ्युमर सर्व्हे २०१६च्या आकडेवारीनुसार, ६१% लोकांना झोपेतून उठल्यावर पहिल्या ५ च मिनिटांत मोबाईल लागतो. ८८% लोक पहिल्या अर्ध्या तासात तर तब्बल ९६% लोक पहिल्या तासाभरात मोबाईल पाहातात. झोपण्याच्या १५ मिनिटे आधीपर्यंत मोबाईल पाहाणाऱ्यांचे प्रमाण ७४% आहे. याच सर्वेक्षणानुसार मोबाईल उघडल्या उघडल्या लोक आधी सोशल नेटवर्किंग साईट्स तपासतात, त्याखालोखाल मेसेजेस आणि इमेल्सचा क्रमांक लागतो. हा सर्व्हेदेखील जवळजवळ ३ वर्षे जुना आहे. आता काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी! हे कुठेतरी थांबावे असे नाही वाटत का? काही मिनिटे जरी इंटरनेट, व्हॉट्सॅप, फेसबुक गडगडलं तरीही आपण चिंताक्रांत होतो, हीच खरी चिंतेची परिस्थिती नाही का? ‘डिजिटल डिटॉक्स’ आणि त्यापेक्षाही ‘डिजिटल डिटॅचमेंट’ ही आता हळूहळू काळाची गरज बनू पाहातेय.

बघा ना, पूर्वी एकेकाळी कॉलेजमध्ये कुणीतरी आवडायचं. पण बोलण्याची हिंमत कुठे? आज बोलू, उद्या बोलू करत कित्येकांची शिक्षणं झाली आणि त्याच्या किंवा तिच्या लग्नाला हजेरीसुद्धा लावून झाली. दहा-एक वर्षांपूर्वी सोशल मिडिया नावाचा मेघदूत अवतरला आणि ज्याच्याशी किंवा जिच्याशी नजरेला नजर भिडवण्याचीसुद्धा हिंमत नव्हती, हळूहळू त्या व्यक्तीला संगणकाच्या पडद्याआडून फ्रेण्ड रिक्वेस्ट टाकणे जमू लागले! आमच्या नगरकडे ना, फ्रेण्डशिप करत नाहीत. मागतात! एकेकाळी “फ्रेण्डशिप देतीस का” हे तीन जादुई शब्द पोट्ट्यांसाठी “आय लव्ह यू”इतकेच महत्त्वाचे होते. उच्चारणाऱ्याला आणि ऐकणारीला सर्रास ठाऊक असायचं की गाडी मैत्रीपूरच्या फाट्यावरून पलिकडे न्यायचीये. अर्थातच फाटा आहे तिथे फाट्यावर मारणंसुद्धा आहे! त्या तीन जादुई शब्दांनी कित्येकांना चपलेची चव कशी असते, याचाही अनुभव दिलाय. सोशल मिडियाने ही भिती कमी केली. ब्लॉकचा धोका होता, पण चपलेपेक्षा त्याने कमी दुखतं म्हणतात. एकेकाळी जशी गुलाबांची संख्या हे ब्युटीक्वीन्सच्या पॉप्युलॅरिटीचं परिमाण असायचं, त्याची जागा हळूच पेण्डिंग फ्रेण्डरिक्वेस्ट्सनी घेतली. ब्युटीसुद्धा हळूहळू गार्ड्स आणि फिल्टरपाठी लपू लागली! काही मंडळी जिला फ्रेण्डशिप मागू शकले नव्हते तिला “झालं का जेवण” विचारण्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याचे बरेवाईट परिणामसुद्धा भोगले. तरुणाईला, मदर्स डे ला मानलेली सासू आणि फादर्स डे ला मानलेल्या सासऱ्यांची दर्शनं घडू लागली. पोरं बऱ्याच विषयांवर बोलती झाली. “फूड व्लॉगर (Food Vlogger)” या व्यवसायाची दहा वर्षांपूर्वी कुणी कल्पना तरी केली असती का हो? पण आज हा व्यवसाय आहे! हे आणि असे कित्येक बदल या पिढीने नको तितक्या वेगात पचवले. पुढे पुढे जाताना बरंच काही मागं राहून गेलं. नव्या पुस्तकांचा वास आता मनाच्या दुर्लक्षित कप्प्यात कुठेतरी पडून आहे, तसाच तळमळून लिहिलेल्या प्रेमपत्रांचा चुंबनस्पर्शसुद्धा कुठेतरी हरवलाय. लेखणीचा स्पर्श कामाशिवाय होतच नाही आता. क्लिक आणि टचची भुरळ पडू लागलीये. कवितांची जुनी डायरी दूर कुठेतरी हरवलीये. पुस्तक वाचता वाचता छातीवर उपडं ठेवून तासनतास विचार करणं जणू दुसऱ्याच कोणत्यातरी युनिव्हर्समध्ये व्हायचं. कालचं वर्तमानपत्र आज जुनं होतं, इथं मिनिटभरापूर्वी लिहिलेली पोस्टसुद्धा जुनी वाटू लागलीये. प्रेम आजही फुलते. नाती आजही बनतात. पण पूर्वी ती तुटल्यावर जितकी सलायची तितकी आता सलत नाहीत. लाईक आणि कमेंटपुरत्याच कॉम्प्लिमेंट्सने छाती फारशी धडधडत नाही. आज एक प्रोफाईल अनफ्रेण्ड केली की तिच्या जागी दुसरी सहज तयार असते. एकूण जगण्याचाच अटेन्शन-स्पॅन कमी झालाय. जणू सबंध आयुष्याचाच सोशल-मिडिया झालाय!

बदल सृष्टीचा नियम आहे. पण तो बदल स्वीकारताना आपला मूळ गाभा, व्यक्तीमत्त्व तर त्याने चुरमडून जात नाहीये ना; आपल्यातल्या चांगल्या आणि साध्यासुध्या गुणांची किंमत तर त्यासाठी मोजावी लागत नाहीये ना, हे पाहायला नको? आजच्या काळात, सोशल मिडिया वापरणे कुणीच टाळू शकत नाही; परंतु तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवताना आपलं जगणंच त्याच्यावर सोपवणं कितपत योग्य? कुठेतरी अंतर राखता आले पाहिजे. कुठेतरी आयुष्यातल्या इतर सहजसुंदर नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे. आहे तो क्षण साजरा करायला शिकले पाहिजे. सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यात आणि नंतर इन्स्टाफीडमध्ये बंदिस्त करायचा अट्टाहास का? आणि सगळ्यांत महत्त्वाचे. कुठे थांबायचे हे ठरवायला शिकले पाहिजे. थोडक्यात, सोशल मिडिया आपलं आयुष्य हाताळायला लागलाय, त्याच्या आत आपणच त्याला योग्यप्रकारे हाताळायला शिकले पाहिजे!

— © अॅड. विक्रम श्रीराम एडके

(अभ्यासक आणि व्याख्याते. २६ जानेवारी २०१९ दिनी प्रकाशित झालेल्या वार्षिक ‘सहजीवन’ साठी लिहिलेला लेख.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *