मृद्गंधी झुळूक : गीता-गोविंदम

विजय गोविंद (विजय देवेरकोंडा) तरुण प्राध्यापक आहे. कॉलेजमध्ये, खासकरून मुलींमध्ये पॉप्युलर आहे. पण त्याला मात्र हवी आहे एखादी सुसंस्कृत आणि पारंपारिक ललना! तशी ती त्याला दिसतेसुद्धा, गीताच्या (रश्मिका मांदण्णा) रुपात. किती घासून घासून गुळगुळीत झालेली पार्श्वभूमी आहे नाही? क्लिषे अगदी! परंतु याच क्लिषेच्या पायावर उभा राहिलेला “गीता गोविंदम” नावाचा २ तास २८ मिनिटे लांबीचा चित्रपट तुम्हाला अक्षरशः एका क्षणासाठीही बोअर करत नाही!

बॉलिवूडचा आणि त्यांचं अनुकरण करणाऱ्या मराठी इंडस्ट्रीचाही काही प्रमाणात ‘आधुनिकता म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणं’ असा समज आहे. तमिळ इंडस्ट्री ही त्यांच्या वेगळ्या मांडणीसाठी ओळखली जाते तर मलयाळम इंडस्ट्री त्यांच्या वेगळ्या विषयांसाठी. परंतु तेलुगू इंडस्ट्री अशी आहे जी प्रेमकथा, कौटुंबिक मनोरंजन अश्या हल्ली दुर्मिळ होत चाललेल्या विषयांना पडद्यावर अतिशय सुरेखपणे मांडते. सिद्धार्थ आणि जेनेलियाचा “बोम्मारिल्लू” अथवा अल्लू अर्जुनचा “आर्या” पाहिलेले किंबहूना विजय देवेरकोंडाचाच “पेल्ली चुपूलू” पाहिलेले माझ्या मताशी सहजच सहमत होतील. अगदी त्याच रांगेत “गीता गोविंदम”सुद्धा येतो.

सबंध चित्रपटभर नितळ विनोदाची पखरण आहे. परंपरेचा सन्मान आहे आणि कुटूंबाला प्राधान्य आहे. आणि तरीदेखील जागोजागी खटकेबाज ट्विट्ससुद्धा आहेत! बॉलिवूडवाल्यांची अडचण ही आहे की, ते ना धड भारतीय मुळं घट्ट धरून ठेवू शकताहेत ना त्यांच्या पाश्चात्यांकडे पसरवलेल्या फांद्यांवर फुलं उमलताहेत. याउलट दक्षिणेची मुळं भारतीय संस्कृतीत घट्ट आहेत. “गीता गोविंदम” पाहाताना ते पदोपदी जाणवतं. आणि तरीही आधुनिक हाताळणीमुळे तो आजच्या पिढीचाच चित्रपट वाटतो. याचे श्रेय लेखक आणि दिग्दर्शक परशुरामला दिलेच पाहिजे.

गोपी सुंदर या संगीतकाराला तुम्ही ऐकलेय का? नसेल, तर तुम्ही एका खूप मोठ्या ठेव्याला मुकताहात. हिंदीतील तीच ती टेम्प्लेटछाप पंजाबी घुसडलेली किंवा बद्धकोष्ठ झाल्यासारख्या आवाजाच्या गायकांनी गायलेली किंवा जुन्या गाण्यांवर पाशवी अत्याचार केलेली गाणी ऐकून कंटाळला असाल, तर या सुरेल संगीतकाराच्या “चार्ली”, “बंगलोर डेज”, “उस्ताद हॉटेल” वगैरे एकाहून एक सुंदर चित्रपटांची गाणी ऐकाच. तशीच “गीता गोविंदम”ची गाणीसुद्धा ऐका. चित्रपट माध्यमाच्या चौकटीत राहूनही केवढं जिवंत संगीत तयार करता येतं याचा वस्तुपाठ आहेत ही गाणी. चित्रपटाच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

तसाच सिंहाचा वाटा आहे विजय देवेरकोंडाचा. फारशी मोठी पार्श्वभूमी नसलेल्या या पोराने गेल्या तीन वर्षांत “पेल्ली चुपूलू”, “अर्जुन रेड्डी” आणि हा असे तीन ब्लॉकबस्टर दिलेयत. त्याचा अभिनय अक्षरशः घायाळ करणारा आहे! आवडत्या मुलीला अप्रोच करताना झालेली एकच चूक कायमची भोगणाऱ्या परंतु मुळात सरळ स्वभावाच्या विजयची भूमिका त्याने कमालीची सुंदर साकारलीये. ‘कर्नाटका क्रश’ म्हटली जाणारी रश्मिकाही गीता म्हणून अप्रतिम भासते. “बाहूबली – द कन्क्लुजन”मधील कुमारवर्माच्या भूमिकेने आपल्याकडे प्रसिद्ध झालेला सुब्बाराजू त्याच्या भूमिकेत चपखल शोभतो. आणि तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर भूमिकेची लांबी वगैरे गोष्टी अंधश्रद्धा असतात, हे वेन्नेला किशोर त्याच्या छोट्याशाच भूमिकेतून सहज सिद्ध करतो. पाहुण्या भूमिकेत का होईना, पण नित्या मेनन आणि अनु इमॅन्युएलला पाहून अतिशय छान वाटते. अवघ्या ५ कोटीत बनलेल्या या चित्रपटाने केव्हाच १०० कोटींचा आकडा ओलांडलाय. खरोखरीच “गीता गोविंदम” आजकालच्या विसविशीत कलाकृतींच्या काळात पुन्हापुन्हा अनुभवाव्याश्या मृद्गंधी झुळुकेसारखाच आहे!!

— © विक्रम श्रीराम एडके

*४/५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *